Tuesday, July 30, 2024

सामान्य रुग्णालयाच्यावतीने जागतिक हिपॅटायटीस दिन साजरा; हिपॅटायटीस रोगाविषयी व्यापक जनजागृती करावी - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे

 











सामान्य रुग्णालयाच्यावतीने जागतिक हिपॅटायटीस दिन साजरा;

हिपॅटायटीस रोगाविषयी व्यापक जनजागृती करावी

- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे

 

            अमरावती, दि. 30 (जिमाका):  हिपॅटायटिस संसर्गजन्य रोगाच्या प्रभावाबाबत नागरिकांना शिक्षित करण्यासाठी जागतिक हिपॅटायटीस दिन साजरा केला जातो. हिपॅटायटीस हा रोग विषाणूजन्य संसर्ग असून तो संक्रमित व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीमध्ये वेगाने पसरतो. या रोगाचा वेळीच निदान केल्यास केल्यास रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. त्यामुळे या रोगाची सर्वसामान्य नागरिकांमध्ये माहिती पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी केले.

 

      जागतिक हिपॅटायटीस दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रीती मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्यसंपर्क डॉ. संदीप हेडाऊ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे  नोडल अधिकारी  डॉ. संदेश यमलवाड, विषय तज्ज्ञ डॉ. पंकज इंगळे, डॉ. स्वप्नली चव्हाण, डॉ. निशा पवार तसेच डॉक्टर्स, स्टाफ नर्स, कर्मचारी व अधिकारी आदी उपस्थित होते.

 

        जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हिपॅटायटीस या आजारावर सर्व प्रकारच्या तपासण्या, उपचार व लसीकरण केले जातात. या संसर्गजन्य आजाराविषयी नागरिकामध्ये संभ्रम असून आजाराबाबत भिती बाळगता. त्यामुळे योग उपचार न मिळाल्यामुळे संसर्ग आयुष्यभर टिकून राहतो आणि ते प्राणघातक देखील होवू शकतो.  या विषाणूचे लवकर निदान झाल्यास या आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. त्यामुळे कोणतेही भिती न बाळगता वेळोवेळी तपासण्या व योग्य उपचार करावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रिती मोरे यांनी केले.

 

            डॉ. पंकज इंगळे, डॉ. स्वप्नली चव्हाण व डॉ. निशा पवार या विषय तज्ज्ञांनी उपस्थितांना हिपॅटायटीस आजाराबाबत मार्गदर्शन करुन त्याचे प्रकार व आजार होण्याची कारणे, करावयाचे उपाययोजना, घ्यावयाची काळजी आदीबाबत माहिती दिली. तसेच सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी हिपॅटायटीसची लस घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन उद्धव जुकरे यांनी तर आभार प्रदर्शन नोडल अधिकारी  डॉ. संदेश यमलवाड यांनी केले.

 

हिपॅटायटिस संसर्गजन्य विषाणू :  हिपॅटायटीस हा यकृताचा एक संसर्गजन्य रोग आहे.  यकृत अवयवाचा दाह होणे किंवा यकृताला सूज येऊन त्याचे आकारमान वाढणे अशा आजाराला हिपॅटायटिस असे म्हणतात. हिपॅटायटिस विषाणूचे पाच प्रकार आहे. ते याप्रमाणे :

हिपॅटायटिस ए : जागतिक आरोग्य संघटनेच्या निष्कर्षानुसार जगभरात दरवर्षी 1.4 दशलक्ष लोकांना हिपॅटायटिस-ए चा संसर्ग होतो. दूषित पाणी किंवा अन्नातून या व्हायरसचा शरीरात प्रवेश झाल्याने हा आजार होतो. यकृताला अचानक सूज येते. सहा महिन्यांत हा आजार आटोक्यात येणे शक्य असते.

हिपॅटायटिस बी : हा प्रामुख्याने दूषित रक्त शरीरात गेल्यास किंवा शरीरातील दूषित 'बॉडी फ्लुइड', वीर्याशी संबंध आल्यास होऊ शकतो. 

हिपॅटायटिस सी : हा प्रामुख्याने वैद्यकीय चाचण्या आणि उपचारादरम्यान दूषित रक्ताशी संबंध आल्यास होण्याची शक्यता असते.

हिपॅटायटिस डी : ज्या व्यक्ती हिपॅटायटिस-बी मुळे ग्रस्त आहेत, त्यांनाच हिपॅटायटिस- डी होतो. मात्र, हे दोन्ही संसर्ग एकाच वेळी होणे, हे फारच गंभीर स्वरूपाचे ठरू शकते. 

हिपॅटायटिस इ : हा जगभर झपाट्याने वाढत आहे. दूषित पाणी ग्राणि अन्नातून हा व्हायरस मानवी शरीरात प्रवेश करतो.

 

हिपॅटायटिस होण्याची कारणे : हिपॅटायटिस होण्यामागे व्हायरल इन्फेक्शन हे एक कारण आहे. त्यामुळे हिपॅटायटिस ए, बी आणि सी होण्याची शक्यता अधिक असते.  यकृताजवळील रोगप्रतिकार पेशी कमकुवत झाल्यास त्याचा परिणाम यकृताच्या कार्यावर होऊ शकतो. अतिमद्यपानामुळे शरीराच्या मेटॅबॉलिझमवर परिणाम होतो. यामुळे शरीराचे कार्य बिघडते. त्यामुळे अतिप्रमाणात मद्यसेवन केल्यास यकृत निकामी होते. अति प्रमाणात औषधसेवनामुळे किंवा वैद्यकीय सल्ल्याविना औषधे घेतल्यास यकृताजवळील पेशींचे नुकसान होऊ शकते. खूप कडक उपवास वा डायटिंग करण्यानेही यकृताचे कार्य मंदावते.

 

हिपॅटायटिसची लक्षणे : हिपॅटायटिस असलेल्या अनेक लोकांमध्ये गडद लघवी, असह्य पोटदुखी, कावीळ, ताप, भूक न लागणे, अशक्तपणा वाटणे आणि सांधेदुखी यांसारखी लक्षणे दिसतात. या लक्षणांची नोंद घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि योग्य उपचार करणे आवश्यक आहे.

 

000000

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...