Tuesday, July 16, 2024

ज्येष्ठांनी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’चा लाभ घ्यावा; 31 जुलैपर्यंत अर्ज मागविले

 

ज्येष्ठांनी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा; 31 जुलैपर्यंत अर्ज मागविले

 

अमरावती, दि. 16 (जिमाका) : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून ‘मुख्यमंत्री वयोश्री योजनेद्वारे सहाय साधने किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी, तसेच प्रबोधन- प्रशिक्षणासाठी एकवेळ एकरकमी तीन हजार रुपये डीबीटी प्रणालीव्दारे दिले जाते. या योजनेचा पात्र जेष्ठ व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रासह दि. 31 जुलैपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

 

राज्यातील 65 वर्ष व त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र याद्वारे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या शारीरिक अक्षमतेनुसार आवश्यक साधने, उपकरणे पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरित करण्यात येतात.

 

अर्जासोबत आधारकार्ड, मतदानकार्ड, बी. पी. एल, राशनकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेची पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, स्वयंघोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे, आवश्यक साहित्याबाबत वैद्यकीय अधिकारी यांचे शिफारसपत्र आवश्यक आहेत. पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्तालयाच्या मागे, चांदूररेल्वे रोड अमरावती  येथे संपर्क साधावा.

00000

 

No comments:

Post a Comment

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे    - जिल्हाधिकारी आशिष येरेकर *उद्दिष्ट प...