Tuesday, April 28, 2026

 नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 10 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

*कृषी विभागाची कारवाई

अमरावती, दि. 27 (जिमाका) : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि कृषी निविष्ठांची गुणवत्ता राखण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील कृषी केंद्रांची कसून तपासणी करण्यात येत आहे. यात गंभीर त्रुटी आढळल्याने 10 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर 6 केंद्रांना कडक ताकीद देण्यात आली आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलेल्या भरारी पथकांनी जिल्ह्यातील विविध केंद्रांची तपासणी केली. या तपासणीत ई-पॉस मशीनवरील नोंद आणि दुकानातील प्रत्यक्ष साठा यामध्ये तफावत आढळणे, खतांची छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणे किंवा पक्के बिल न देणे, परवाना नसताना बियाण्यांची साठवणूक करणे किंवा नोंदवही अद्ययावत नसणे, अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांची वाहतूक आणि विक्री करणे आदी बाबी तपासून कारवाई करण्यात आली आहे.

कृषी विभागाने एप्रिल 2026 अखेरपर्यंत 100 टक्के विक्री केंद्रांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. फसवणूक टाळण्यासाठी बियाणे किंवा खते केवळ अधिकृत परवानाधारक केंद्रांकडूनच खरेदी करावीत, खरेदी केल्यानंतर पक्के बिल आवर्जून घ्यावे आणि बियाण्यांच्या पाकिटाचे सील तपासावे, खते खरेदी करताना दुकानदार अनावश्यक उत्पादने (लिंकिंग) घेण्याची सक्ती करत असल्यास तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

शेतकऱ्याची फसवणूक झाली किंवा खतांचा अवाजवी दर आकारला गेल्यास, त्यांनी तात्काळ तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षकांकडे संपर्क साधावा. तक्रारीसाठी कृषी विभागाने ८०८०५३६६०२ हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक देखील जाहीर केला आहे.

0000000

पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डद्वारे पशुपालकांना 3 लाखांपर्यंत अर्थसहाय्य

अमरावती, दि. 27 (जिमाका) : राज्यातील पशुपालकांना आर्थिक बळकटी देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड मोहिम राबविण्यात येत आहे. या योजनेतून पात्र पशुपालकांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्जसुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील यांनी दिली.

राज्यातील पशुपालन, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन व वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पशुधनाच्या देखभालीसाठी व दैनंदिन खर्चासाठी आकर्षक व्याज सवलतीसह कर्ज दिले जाते. ज्यांच्याकडे किसान क्रेडिट कार्ड नाही, त्यांना 1.60 लाख रुपयांपर्यंत विनातारण कर्ज उपलब्ध होणार असून दूध संस्थेची हमी असल्यास ही मर्यादा 3 लाख रुपयांपर्यंत वाढवता येते. ज्या पशुपालकांकडे आधीच किसान क्रेडिट कार्ड आहे, त्यांनाही पतमर्यादा वाढवून 3 लाख रुपयांपर्यंत लाभ घेता येणार आहे.

कर्जाचा मूळ व्याजदर 9 टक्के असला तरी नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून 3 टक्के व राज्य शासनाच्या 11 फेब्रुवारी 2025 च्या निर्णयानुसार 4 टक्के अशी एकूण 7 टक्क्यांपर्यंत व्याज सवलत मिळते. बँकांकडूनही 2 टक्के सवलत दिल्याने नियमित परतफेड करणाऱ्या पशुपालकांना शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळू शकतो. सन 2026-27 पासून मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेंतर्गतही या कार्डद्वारे खेळते भांडवलाचा लाभ मिळणार आहे. राज्यातील 10 लाख पात्र पशुपालकांना या योजनेच्या कक्षेत आणण्याचे उद्दिष्ट विभागाने ठेवले आहे.

दूध सोसायटी, दूध संघ किंवा दूध उत्पादक कंपनीचे सभासद असलेले व अद्याप योजनेचा लाभ न घेतलेले पशुपालक या मोहिमेसाठी पात्र असून जिल्ह्यात पशुसंवर्धन उपआयुक्त हे योजनेचे संनियंत्रण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सध्या पशुपालन करणाऱ्या व लाभ न घेतलेल्या सर्व पात्र पशुपालकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

योजनेसाठी प्रकल्प धारकाने केंद्र, राज्य शासन किंवा जिल्हा परिषदेच्या अन्य अनुदान योजनांचा लाभ घेतलेला नसावा. सर्व पशुधनाची एनडीएलएम पोर्टलवर नोंद आवश्यक आहे. व्याज सवलत ही ठराविक किमान पशुधन संख्या असलेल्या पशूपालकांनाच लागू राहील. यामध्ये 25 हजार मांसल कुक्कुट पक्षी किंवा 50 हजार अंडी उत्पादक पक्षी, 45 हजार क्षमतेचे हॅचरी युनिट, 100 पर्यंत दुधाळ जनावरे, 500 पर्यंत मेंढी किंवा शेळी गट व 200 पर्यंत वराह यांचा समावेश आहे.

घेतलेल्या कर्जाची परतफेड कर्ज उचल केल्याच्या तारखेपासून एका वर्षाच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच योजनेच्या अटी व निकषांनुसार वेळोवेळी होणाऱ्या बदलांचे पालन करणे लाभार्थ्यांसाठी बंधनकारक राहील.

पशूधन संकल्पनेसाठी आर्थिक अडचण येऊ नये व ग्रामीण भागात पशुधन व्यवसायाला चालना मिळावी, यासाठी पात्र पशुपालकांनी आपल्या नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात, दूध संस्था किंवा 1962 या हेल्पलाईनवर संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे.

0000000


13 अवैध तंबाखू विक्रेत्यांकडून दंड वसूल

अमरावती, दि. 27 (जिमाका): शहरातील सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी आणि तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शहराच्या मुख्य बाजारपेठेत कारवाई करण्यात आली. या कारवाईत 13 अवैध तंबाखू विक्रेत्यांकडून दंड वसूल करण्यात आला.

जिल्हा सामान्य रुग्णालयाचा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सिटी कोतवाली पोलीस स्टेशन आणि संभाजीनगर येथील मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबवली. शहरातील गांधी चौक, अंबादेवी मंदिर परिसर, राजकमल चौक आणि श्याम चौक या ठिकाणी ही तपासणी करण्यात आली. यावेळी तंबाखू नियंत्रण कायदा 2003 मधील कलम 4 सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी आणि कलम 6 अ मध्ये 18 वर्षांखालील मुलांना तंबाखू विक्री करण्यास बंदी याचे उल्लंघन करणाऱ्या अवैध विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत 13 विक्रेत्यांकडून 4 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरात तंबाखू विक्री करणाऱ्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई सुरूच राहणार आहे.

00000

 

 

अमरावतीत 2 मे पासून उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

अमरावती, दि. 27 (जिमाका) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे सन २०२६-२७ या वर्षासाठी ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या दि. 2 मे पासून हे शिबीर सुरू होणार असून दि. 15 मेपर्यंत चालणार आहे.

सदर शिबिर हे दि. २ मे पासून सुरू होणार असून सकाळी ६ ते ८ आणि सायंकाळी ५.३० ते ७ वाजेपर्यंत चालणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल आहे. या शिबिरात एकूण १५ हून अधिक क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. तसेच व्हॉलीबॉल, सॉफ्टबॉल, बॅडमिंटन आणि धनुर्विद्या या ४ खेळांचे प्रशिक्षण राज्य शासनाच्या एनआयएस गुणवत्ताधारक प्रशिक्षकांमार्फत विनामूल्य दिले जाणार आहे. याव्यतिरिक्त तलवारबाजी, बास्केटबॉल, स्क्वॅश, नेटबॉल, शुटींगबॉल, मल्लखांब, टेबल टेनिस, थ्रोबॉल, स्केटींग, कुडो आणि बॉक्सिंग या खेळांचेही प्रशिक्षण दिले जाईल. जिल्हा क्रीडा संकुल, विभागीय क्रीडा संकुल, श्री गणेशदास राठी विद्यालय, गुरुकुल विद्यालय, नांदगाव खंडेश्वर, जय बजरंग व्यायामशाळा, तोगंलाबाद, दर्यापूर आणि इतर तालुका क्रीडा संकुलांमध्ये हे प्रशिक्षण वर्ग चालणार आहेत.

शिबिरादरम्यान खेळाडूंना आहार, दुखापतीवरील इलाज, फिजीओथेरेपी आणि क्रीडा मानसशास्त्र या विषयांवरही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. इच्छुक खेळाडूंनी प्रवेश अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे जमा करावेत. अधिक माहितीसाठी व्हॉलीबॉल - राहुल निवडंगे ७७७४००१५७९, सॉफ्टबॉल - स्वप्नील चांदेकर ९७६७०००९४९, बॅडमिंटन - रितेश अनंतवार ८६६९०८४१४२, धनुर्विद्या (आर्चरी) - प्रफुल्ल डांगे ९९२३००८४११, वेदांत वानखडे ७४९९०९२३१२ यांच्याशी संपर्क साधता येईल.

खेळाडूंच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या संधीचा अमरावती जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000

मातंग समाजासाठी सोमवारी विशेष कार्यशाळा

अमरावती, दि. 27 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातर्फे मातंग समाज व तत्सम बारा पोट जातीतील वंचित घटकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सोमवार, दि. 4 मे रोजी दुपारी 11 वाजता सामाजिक न्याय भवनात होणार आहे.

कार्यशाळेत मातंग समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्या येणार आहे. समाजातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योजना फायदेशीर ठरत असल्याने यावेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मातंग समाजातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एम. टी. खडसे यांनी केले आहे.

00000

दिव्यांगांना तालुकास्तरावरच मिळणार दिव्यांग प्रमाणपत्र

अमरावती, दि. 27 (जिमाका) : जिल्ह्यातील दिव्यांगांच्या सोयीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही. ही सुविधा लवकरच तालुकास्तरावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

उपजिल्हा रुग्णालय अचलपूर, धारणी, मोर्शी, दर्यापूर आणि ग्रामीण रुग्णालय चांदूर बाजार, तिवसा येथे कायमस्वरूपी दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव 'आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे' यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच संबंधित केंद्रांना 'युडीआयडी' पोर्टलचे लॉगिन आयडी व पासवर्ड दिले जातील. त्यानंतर तालुकास्तरावरच प्रमाणपत्र वाटप सुरू होईल.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत सन २०२२ ते २०२५ या कालावधीत आयोजित शिबिरांद्वारे एकूण २ हजार ४७३ दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील दिव्यांगांना अमरावती शहरात येण्या-जाण्याचा होणारा त्रास आणि खर्च वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दिव्यांग प्रमाणपत्र, आजाराचे प्रमाणपत्र किंवा वृद्धांच्या वयाचा दाखला देण्यासाठी शासन स्तरावरून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. ही प्रक्रिया पूर्णतः मोफत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही दलालांच्या आमिषाला बळी पडू नये. कोणी पैशांची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांच्याकडे तक्रार करावी, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी कळविले आहे.

00000

डाक विभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

अमरावती, दि. 27 (जिमाका) : भारतीय डाक विभाग, अमरावती विभागांतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

या सोहळ्याला नागपूर परिक्षेत्राचे डाक सेवा संचालक डॉ. सुधीर जाखरे उपस्थित होते. अमरावती डाक विभागाचे प्रवर अधीक्षक श्री. गेडाम अध्यक्षस्थानी होते.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये टपाल विभागाच्या विविध सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी 'अतिविशिष्ट' कामगिरी केली, अशा गुणवंतांचा डॉ. सुधीर जाखरे यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि पदक देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी डॉ. जाखरे यांनी, प्रत्येक कर्मचारी हा विभागाचा कणा आहे. तांत्रिक युगात ग्राहकांना अधिक दर्जेदार आणि गतिमान सेवा देण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे, असे आवाहन केले. प्रवर अधीक्षक श्री. गेडाम यांनी देखील कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले.

000000

सोमवारी जिल्हा महिला लोकशाही दिन

अमरावती, दि. 27 (जिमाका) : मे महिन्याचा जिल्हा लोकशाही दिन सोमवार, दि. 4 मे रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

00000

Saturday, April 25, 2026

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे 
  - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

*उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँकांचा गौरव

अमरावती, दि. 25 : गाव पातळीवर उद्योग उभारताना आवश्यक असलेला पतपुरवठा बँकांनी करावा. यामुळे गावातही चांगले प्रक्रिया उद्योग उभे राहण्यास मदत मिळेल. त्यामुळे बँकांनी कर्जवाटप करताना उद्योगाप्रती सकारात्मक रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योगामध्ये कर्ज मंजूरीचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँकांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँकांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, जिल्हा उद्योग अधिकारी निलेश निकम, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी बँकांची निर्मिती ही छोट्या उद्योगांना पतपुरवठा करण्यासाठी झाली आहे. हा पतपुरवठा हा सामान्य नागरिकांनी बचतीच्या स्वरूपात गोळा केलेल्या पैशातून केला जातो. मोठ्या उद्योगाप्रती बँकांचे धोरण सकारात्मक असताना छोट्या उद्योगांनाही पतपुरवठा करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. गावातील प्रक्रिया उद्योगांना पतपुरवठा झाल्यास ग्रामीण भागाचा विकास होण्यास मदत होईल. गेल्या वर्षी जिल्ह्याने प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योगांमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. संपूर्ण जिल्ह्यात शासन सहाय्य करणाऱ्या योजनांची एक हजाराहून प्रकरणे बँकांकडे सादर केली आहे. यात महिलांचा लक्षणीय सहभाग आहे. त्यामुळे सार्वजनिक आणि खासगी बँकांनी उद्योगांना मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केलेल्या बँक व्यवस्थापकांचा सत्कार करण्यात आला. यात बँक ऑफ बडोदाचे प्रशांत गावंडे, लोहिता के.एस., जयदीप राठोड, बँक ऑफ इंडियाचे रणजीत ठाकरे, घनश्याम ढवळे, बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रफुल शेंडे, प्रशांत चरडे, रुपेश नंदनवार, प्रफुल रसाळपायले, शिवशंकर फड, आलोक कोठेकर, मृणाल क्रांती राणा, कॅनरा बँकेच्या योगिता देशमुख, संदीप तेटे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अजित लिंगाटे, महेंद्र येलमे, नवनीत उमाळे, अमर दाभर्डे, संदीप सूर्यवंशी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सुदीप्ता घोष, जयंत मोरे, पंकज समर्थ, कमर सगीर, रिचा निमोणकर, मधुकर तळपदे, अभिनव राऊत, निधी अग्रवाल, युनियन बँक ऑफ इंडियाचे अक्षय सोनोने, तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक नवीनकुमार उप्पलवार, मुख्य व्यवस्थापक रविकुमार दालु, ललित त्रिपाठी, बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रादेशिक व्यवस्थापक महेश डांगे, प्रोसेसिंग हेड प्रवीण जंगम, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एलडीएम नरेश हेडाऊ, प्रादेशिक व्यवस्थापक सुनील पांडे, कॅनरा बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक रामबाबू मीना, बँक ऑफ बडोदाचे प्रादेशिक व्यवस्थापक राजेश कुमार, बँक ऑफ महाराष्ट्रचे जिल्हा समन्वयक अमोल मोरे यांचा स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
00000

Tuesday, April 21, 2026

माध्यमिक शाळांतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना.


माध्यमिक शाळांतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना.
#Narishaktivandan 
#NariShakti

राज्यात २४ एप्रिलपर्यंत वादळी पावसासह गारपीटीची शक्यता; नागरिकांनी सतर्क रहावे...


राज्यात २४ एप्रिलपर्यंत वादळी पावसासह गारपीटीची शक्यता; नागरिकांनी सतर्क रहावे...
#वादळीपाऊस #गारपीट
#हवामानअंदाज
#WeatherUpdate
#IMD

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिलांना नेतृत्वाच्या संधी—निर्णय प्रक्रियेत वाढता सहभाग!महाराष्ट्रात विविध महत्त्वाच्या पदांवर महिलांची नियुक्ती हे सक्षमीकरणाचे ठोस पाऊल ठरत आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिलांना नेतृत्वाच्या संधी—निर्णय प्रक्रियेत वाढता सहभाग!

महाराष्ट्रात विविध महत्त्वाच्या पदांवर महिलांची नियुक्ती हे सक्षमीकरणाचे ठोस पाऊल ठरत आहे. 

#महिला_सक्षमीकरण #Maharashtra #WomenInLeadership

Monday, April 20, 2026

विशेष लेख : पर्यटन क्षेत्रात महिला राज! 'आई' धोरणातून महिला होणार आत्मनिर्भर; जिल्ह्यात 160 महिलांची नोंदणी


 

विशेष लेख :

पर्यटन क्षेत्रात महिला राज!

'आई' धोरणातून महिला होणार आत्मनिर्भर; जिल्ह्यात 160 महिलांची नोंदणी

   पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवून त्यांना नेतृत्व आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत ‘आई हे महिला केंद्रित पर्यटन धोरण प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या धोरणांतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विशेष पंचसुत्री आणि सवलती जाहीर करण्यात आल्या असून, अमरावती जिल्ह्यात या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे १६० महिलांनी हॉटेल, रेस्टॉरंट, होमस्टे आणि वेलनेस सेंटर्स यांसारख्या विविध व्यवसायांसाठी आपली नोंदणी पूर्ण केली आहे.

    या धोरणाचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे महिला उद्योजकांना मिळणारा आर्थिक आधार. पर्यटन व्यवसायाच्या उभारणीसाठी महिलांनी मान्यताप्राप्त बँकांकडून १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतल्यास, त्यावरील १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा पर्यटन संचालनालयामार्फत थेट लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यात जमा करण्यात येतो. हा लाभ कर्ज परतफेड होईपर्यंत, किंवा ७ वर्षांच्या कालावधीसाठी, किंवा व्याजाची रक्कम ५ लाख रुपये पूर्ण होईपर्यंत (यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत) लागू राहते.

     या योजनेअंतर्गत सुमारे ३० प्रकारचे व्यवसाय पात्र ठरवण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने होम स्टे, हॉटेल, रिसॉर्ट, रेस्टॉरंट, कृषी पर्यटन केंद्र, साहसी पर्यटन (जमीन, हवा, जल), ट्रॅव्हल एजन्सी, टूर ऑपरेटर, आयुर्वेद व योग केंद्र, वेलनेस सेंटर, हस्तकला दुकाने आणि आदिवासी निसर्ग पर्यटनाशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या किंवा अस्तित्वातील व्यवसायाची व्याप्ती वाढवू इच्छिणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा.

योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असावा आणि त्याची मालकी पूर्णपणे महिलेकडे असणे अनिवार्य आहे. तसेच, महिलांच्या मालकीच्या हॉटेल किंवा ट्रॅव्हल एजन्सीमध्ये ५० टक्के व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे बंधनकारक आहे. याशिवाय, व्यवसायासाठी आवश्यक सर्व शासकीय परवानग्या प्राप्त असाव्यात आणि कर्जाचे हप्ते वेळेत भरणे आवश्यक आहे.

इच्छुक महिला उद्योजकांनी पर्यटन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtratourism.gov.in) ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्जासोबत ५० रुपये प्रक्रिया शुल्क भरल्याची पावती, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, व्यवसायाच्या जागेचा पुरावा (७/१२ उतारा किंवा भाडे करार), आणि ५०० शब्दांत प्रकल्पाची संक्षिप्त माहिती अशी कागदपत्रे अपलोड करावी. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर विभागाकडून 'सशर्त हेतू पत्र' दिले जाईल, ज्याच्या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर करून घेता येईल.

या क्रांतीकारी धोरणामुळे राज्यातील महिलांना केवळ रोजगाराच्या संधीच मिळत नाही, तर पर्यटन क्षेत्राच्या विकासात त्यांचा सक्रिय वाटा राहत आहे. अधिक माहितीसाठी महिला उद्योजकांनी अमरावती येथील पर्यटन उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधावा व पर्यटन धोरणातून उद्योजिका बनण्याच्या स्वप्नांना गवसणी घालावी !

अपर्णा यावलकर

माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय,

अमरावती

0000

जिल्ह्यातील शाळा सकाळी 10 वाजेपर्यंतच भरणार

अमरावती, दि. 20 (जिमाका) : विदर्भात वाढत असलेल्या तापमानाची तीव्रता आणि भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला उष्मालाटेचा इशारा लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांच्या वेळेत कपात करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा आता दहा वाजेपर्यंत भरणार आहेत.

नव्या वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, अंगणवाडी आणि नर्सरी आता केवळ सकाळी 7 ते 10 या वेळेतच भरतील. हा आदेश 21 एप्रिल 2026 ते 30 एप्रिल 2026 पर्यंत लागू राहील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सकाळी १० नंतरच्या उर्वरित तासिका ऑनलाईन किंवा डिजिटल माध्यमातून घेण्याचे नियोजन करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. हा आदेश सर्व अनुदानित, विनाअनुदानित तसेच खासगी शाळांसाठी बंधनकारक असेल.

वाढत्या उष्म्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ नये, यासाठी हा खबरदारीचा उपाय योजण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत सकाळी 10 नंतर शाळा सुरू ठेवता येणार नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे पुरेसे पाणी, सावलीची व्यवस्था आणि उष्मालाटेपासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 नुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

000000

DIO NEWS AMRAVATI 20.04.2026


                        जिल्हा सामान्य रुग्णालयात 'जागतिक हिमोफिलिया दिन' साजरा

*28 रुग्णांची मोफत 'इन्हीबिटर' चाचणी, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

अमरावती, दि. 20 (जिमाका) : रक्ताशी संबंधित असलेल्या हिमोफिलिया आजाराविषयी समाजामध्ये जनजागृती व्हावी आणि या आजाराचे वेळेत निदान व्हावे, यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे 'हिमॅटोलॉजी डे केअर सेंटर' येथे जागतिक हिमोफिलिया दिन साजरा करण्यात आला. यात जिल्ह्यातील 28 रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

हिमोफिलियाच्या रुग्णांना रक्तातील संबंधित 'फॅक्टर' द्यावे लागतात. मात्र, 5 ते 10 टक्के रुग्णांमध्ये ठराविक काळानंतर या फॅक्टरचा परिणाम दिसून येत नाही. त्यांच्या शरीरात फॅक्टरच्या विरोधात 'इन्हीबिटर' तयार होतात. ही बाब लक्षात घेऊन, जागतिक हिमोफिलिया दिनाचे औचित्य साधून शिबिरातील 28 रुग्णांची मोफत 'इन्हीबिटर' चाचणी करण्यात आली.

शिबिरात तज्ज्ञांनी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आजाराची सखोल माहिती दिली. हिमोफिलियासोबत आयुष्य सुरक्षितपणे करून जगावे, वेदना कशाप्रकारे कमी कराव्यात आणि नियमित उपचार कसे घ्यावेत, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

हे शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप हेडाऊ, डॉ. सोळंके आणि अधिसेविका श्रीमती अटाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. कार्यक्रमासाठी डे केअर युनिटचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास जाधव, डॉ. प्रिती वासनकर, फिजिओथेरपिस्ट डॉ. नेहा कांबळे, समन्वयक त्रिशिला इंगोले, समुपदेशक मनोज सहारे, अधिपरिचारिका अनामिका चव्हाण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ललिता अग्रवाल, समुपदेशक मनोज पाटील आणि डॉ. बेलसरे यांनी पुढाकार घेतला.

00000

कौशल्य विकास विभागातर्फे निबंध स्पर्धा

अमरावती, दि. 20 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे राज्यभरात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विचारप्रवर्तक लेखनाची आवड निर्माण करणे तसेच डॉ. आंबेडकर याच्या विचाराचा प्रसार करणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आबेडकर यांनी महिलांविषयी केलेले कार्य, महिला साक्षमीकरणात त्यांनी दिलेले योगदान या विषयावर निबंध स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत पहिल्या गटात शासकीय आयटीआय, खासगी आयटीआय, तसेच आयटीआय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतील. निबंधाच्या विषयासाठी विद्यार्थ्यांना ५०० ते ८०० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

दुसरा खुला गट असून यात राज्यातील सर्व महिला आणि पुरुष सहभागी होऊ शकतील. या गटाला ८०० ते १ हजार २०० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दोन्ही गटाला निबंध केवळ मराठी भाषेत सादर करावा लागणार आहे. स्पर्धेचा कालावधी दि. १४ एप्रिल ते दि. २५ एप्रिल २०२६ हा निश्चित करण्यात आला आहे.स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे स्पर्धक ९१५२२३०१९३ या मोबाईल क्रमाकावर संपर्क करू शकतील. तसेच उत्कृष्ट निबंधांना पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

00000000

मंगळवारी कौशल्य विकास केंद्राचा रोजगार मेळावा

अमरावती, दि. 20 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमेचे मंगळवार, दि. 21 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, डेपो, रोड, जि. अमरावती येथे हा मेळावा होणार आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटरतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येते. मेळाव्यात योजनेसाठी विविध आस्थापना, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रांसह उपस्थित राहावे. याबाबत अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066, 8983419799, 8605654025 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

000000

मंगळवारपासून प्रत्येक पंचायत समितीत रोजगार मेळावा

अमरावती, दि. 20 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमेंतर्गत मंगळवार, दि. 21 एप्रिलपासून दि. 8 मेपर्यंत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक पंचायत समितीमध्ये हा रोजगार मेळावा होणार आहे.

मेळाव्यामध्ये हैद्राबाद येथील गार्डियन ट्रेनिंग अकादमीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येते. कंपनीला आवश्यक असलेल्या पात्रतेच्या पदासाठी सदर कंपनीचे प्रतिनिधी लेखी परीक्षा घेऊन मुलाखती घेतील.

मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रांसह उपस्थित राहावे. याबाबत अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066, 8983419799, 8605654025 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांनी बायोडाटा, पासपोर्ट फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

0000000

              शहर परेड मैदानावर महाराष्ट्र दिन कार्यक्रम साजरा होणार

       अमरावती, दि. 20 (जिमाका) : महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिवस 1 मे रोजी साजरा होणार आहे. यावर्षीचा साजरा होणारा मुख्य शासकीय कार्यक्रम पोलिस मुख्यालयाच्या शहर परेड मैदानावर होणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी केले आहे.

000000

DIO NEWS AMRAVATI 15.8.2026

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्कृष्ट कार्यासाठी जिल्ह्यातील विविध अधिक...