Monday, April 20, 2026

DIO NEWS AMRAVATI 20.04.2026


                        जिल्हा सामान्य रुग्णालयात 'जागतिक हिमोफिलिया दिन' साजरा

*28 रुग्णांची मोफत 'इन्हीबिटर' चाचणी, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

अमरावती, दि. 20 (जिमाका) : रक्ताशी संबंधित असलेल्या हिमोफिलिया आजाराविषयी समाजामध्ये जनजागृती व्हावी आणि या आजाराचे वेळेत निदान व्हावे, यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे 'हिमॅटोलॉजी डे केअर सेंटर' येथे जागतिक हिमोफिलिया दिन साजरा करण्यात आला. यात जिल्ह्यातील 28 रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

हिमोफिलियाच्या रुग्णांना रक्तातील संबंधित 'फॅक्टर' द्यावे लागतात. मात्र, 5 ते 10 टक्के रुग्णांमध्ये ठराविक काळानंतर या फॅक्टरचा परिणाम दिसून येत नाही. त्यांच्या शरीरात फॅक्टरच्या विरोधात 'इन्हीबिटर' तयार होतात. ही बाब लक्षात घेऊन, जागतिक हिमोफिलिया दिनाचे औचित्य साधून शिबिरातील 28 रुग्णांची मोफत 'इन्हीबिटर' चाचणी करण्यात आली.

शिबिरात तज्ज्ञांनी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आजाराची सखोल माहिती दिली. हिमोफिलियासोबत आयुष्य सुरक्षितपणे करून जगावे, वेदना कशाप्रकारे कमी कराव्यात आणि नियमित उपचार कसे घ्यावेत, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

हे शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप हेडाऊ, डॉ. सोळंके आणि अधिसेविका श्रीमती अटाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. कार्यक्रमासाठी डे केअर युनिटचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास जाधव, डॉ. प्रिती वासनकर, फिजिओथेरपिस्ट डॉ. नेहा कांबळे, समन्वयक त्रिशिला इंगोले, समुपदेशक मनोज सहारे, अधिपरिचारिका अनामिका चव्हाण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ललिता अग्रवाल, समुपदेशक मनोज पाटील आणि डॉ. बेलसरे यांनी पुढाकार घेतला.

00000

कौशल्य विकास विभागातर्फे निबंध स्पर्धा

अमरावती, दि. 20 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे राज्यभरात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विचारप्रवर्तक लेखनाची आवड निर्माण करणे तसेच डॉ. आंबेडकर याच्या विचाराचा प्रसार करणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आबेडकर यांनी महिलांविषयी केलेले कार्य, महिला साक्षमीकरणात त्यांनी दिलेले योगदान या विषयावर निबंध स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत पहिल्या गटात शासकीय आयटीआय, खासगी आयटीआय, तसेच आयटीआय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतील. निबंधाच्या विषयासाठी विद्यार्थ्यांना ५०० ते ८०० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

दुसरा खुला गट असून यात राज्यातील सर्व महिला आणि पुरुष सहभागी होऊ शकतील. या गटाला ८०० ते १ हजार २०० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दोन्ही गटाला निबंध केवळ मराठी भाषेत सादर करावा लागणार आहे. स्पर्धेचा कालावधी दि. १४ एप्रिल ते दि. २५ एप्रिल २०२६ हा निश्चित करण्यात आला आहे.स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे स्पर्धक ९१५२२३०१९३ या मोबाईल क्रमाकावर संपर्क करू शकतील. तसेच उत्कृष्ट निबंधांना पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

00000000

मंगळवारी कौशल्य विकास केंद्राचा रोजगार मेळावा

अमरावती, दि. 20 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमेचे मंगळवार, दि. 21 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, डेपो, रोड, जि. अमरावती येथे हा मेळावा होणार आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटरतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येते. मेळाव्यात योजनेसाठी विविध आस्थापना, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रांसह उपस्थित राहावे. याबाबत अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066, 8983419799, 8605654025 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

000000

मंगळवारपासून प्रत्येक पंचायत समितीत रोजगार मेळावा

अमरावती, दि. 20 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमेंतर्गत मंगळवार, दि. 21 एप्रिलपासून दि. 8 मेपर्यंत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक पंचायत समितीमध्ये हा रोजगार मेळावा होणार आहे.

मेळाव्यामध्ये हैद्राबाद येथील गार्डियन ट्रेनिंग अकादमीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येते. कंपनीला आवश्यक असलेल्या पात्रतेच्या पदासाठी सदर कंपनीचे प्रतिनिधी लेखी परीक्षा घेऊन मुलाखती घेतील.

मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रांसह उपस्थित राहावे. याबाबत अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066, 8983419799, 8605654025 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांनी बायोडाटा, पासपोर्ट फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

0000000

              शहर परेड मैदानावर महाराष्ट्र दिन कार्यक्रम साजरा होणार

       अमरावती, दि. 20 (जिमाका) : महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिवस 1 मे रोजी साजरा होणार आहे. यावर्षीचा साजरा होणारा मुख्य शासकीय कार्यक्रम पोलिस मुख्यालयाच्या शहर परेड मैदानावर होणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

विशेष लेख : पर्यटन क्षेत्रात महिला राज! 'आई' धोरणातून महिला होणार आत्मनिर्भर; जिल्ह्यात 160 महिलांची नोंदणी

  विशेष लेख : पर्यटन क्षेत्रात महिला राज! 'आई' धोरणातून महिला होणार आत्मनिर्भर; जिल्ह्यात 160 महिलांची नोंदणी    पर्यटन क्षेत्रात मह...