Tuesday, April 28, 2026

DIO NEWS AMRAVATI 28.04.2026

 

जिल्हा युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी होणार मान्यवरांच्या हस्ते गौरव

अमरावती, दि. 28 (जिमाका): सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील युवक, युवती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे सन 2024-25 व 2025-26 चे 'जिल्हा युवा पुरस्कार' जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस मुख्यालय, अमरावती येथील प्रांगणात आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहेत. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या शुभहस्ते आणि वरिष्ठ सनदी अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा वितरण सोहळा पार पडणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी  यांनी कळविले आहे.

सन 2024-25 या वर्षासाठी 'विशेष जिल्हा युवा पुरस्कार' नाळ चित्रपट फेम बालकलाकार श्रीनिवास गणेश पोकळे याला जाहीर झाला आहे. श्रीनिवासने आपल्या अभिनयाने दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. याच वर्षासाठी युवक गटातून अमर पुरुषोत्तम वानखडे (तिवसा), युवती गटातून कु. जानव्ही राउत (नया वाठोडा) तसेच संस्था गटातून श्री. संताजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था (गुरुकुंज आश्रम) यांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार, व्यसनमुक्ती, रक्तदान आणि आदिवासी विकास क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे.

सन 2025-26 या वर्षासाठी युवक गटात समाजप्रबोधनकार वेदांत मुंदाने (अमरावती), युवती गटात कु. पुजा गुंजरकर (ब्राम्हणवाडा थडी) आणि संस्था गटात स्वामी विवेकानंद विचार मंच (अचलपूर) यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. वेदांत मुंदाने यांनी कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले आहे, तर पुजा गुंजरकर यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात योगदान दिले आहे. अचलपूरच्या विवेकानंद विचार मंचने आरोग्य सेवा आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले आहे. युवक व युवती पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व 10 हजार रुपये रोख, तर संस्था पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व 50 हजार रुपये रोख असे आहे.

00000000

'मिशन लक्षवेध' अंतर्गत कुस्ती खेळाडूंची फेर निवड चाचणी; 6 मे रोजी आयोजन

*इच्छुक खेळाडूंनी आपले अर्ज 30 एप्रिलपर्यंत सादर करावेत

अमरावती, दि. 28 (जिमाका): ऑलिम्पिक स्तरावरील क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने 'मिशन लक्षवेध' ही महत्त्वकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अमरावती जिल्हा स्तरावर 'क्रीडा प्रतिभा विकास केंद्र' स्थापन करण्यात आले असून, कुस्ती या क्रीडा प्रकारासाठी 20 खेळाडूंची निवड करण्यासाठी येत्या 6 मे 2026 रोजी फेर निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या चाचणीत जिल्ह्यातील पात्र खेळाडूंना सुवर्णसंधी मिळणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी  यांनी दिली आहे.

ही निवड चाचणी 6 मे रोजी सकाळी 8 वाजता श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे पार पडणार आहे.  या खेळाचे आयोजक राहुल निवडंगे ( 7774001579) आहेत. यापूर्वी 9 एप्रिल रोजी चाचणी घेण्यात आली होती, मात्र आता पात्र खेळाडूंसाठी पुन्हा एकदा फेर चाचणीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी 21 वर्षांखालील (31 डिसेंबर 2026 रोजी वय ग्राह्य) मुले व मुली पात्र असून, खेळाडू महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. तसेच, संबंधित खेळाडूने गेल्या दोन वर्षांत राज्यस्तरावरील शालेय किंवा अधिकृत क्रीडा संघटनेच्या स्पर्धेत सहभाग घेतलेला असावा किंवा पदक प्राप्त केलेले असावे. निवड चाचणीसाठी येताना खेळाडूंनी आपला जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अधिकृत डॉक्टरांचे फिटनेस प्रमाणपत्र, आधारकार्ड, क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, पालकांचे संमतीपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.

निवड झालेल्या 20 खेळाडूंना शासनाच्या वतीने प्रगत प्रशिक्षण दिले जाईल. ही प्रक्रिया अनिवासी स्वरूपाची असली तरी खेळाडूंचा पूरक आहार, गणवेश, क्रीडा साहित्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा प्रवास खर्च, वैद्यकीय उपचार आणि विम्याचा संपूर्ण खर्च मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत केला जाणार आहे. इच्छुक खेळाडूंनी आपले अर्ज 30 एप्रिल 2026 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, तपोवन चौक, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. या निवड चाचणीचे आयोजन क्रीडा कार्यकारी अधिकारी श्रीमती ममता कोळमकर ( 9823704347)  यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून, जिल्ह्यातील जास्तीत -जास्त कुस्तीगीरांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000000

उष्णतेच्या लाटेपासून कामगारांच्या संरक्षणासाठी प्रशासनाचे निर्देश;

कामाच्या वेळेत बदल करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 28 (जिमाका): सध्या देशासह राज्यात उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे कामगार व मजूर वर्गाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. विशेषतः बांधकाम, औद्योगिक आणि खाण क्षेत्रातील कामगारांना उष्णतेमुळे आरोग्याच्या मोठ्या जोखमीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कामगारांचे आरोग्य व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अमरावतीचे सहायक कामगार आयुक्त अ. सु. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नियोक्ते, उद्योग आणि बांधकाम कंपन्यांना तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार कामगारांच्या कामाच्या वेळेत आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, दुपारच्या कडक उन्हाच्या काळात जड किंवा कठीण कामे टाळून ती दिवसाच्या थंड वेळेत नियोजित करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कामाच्या ठिकाणी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची मुबलक उपलब्धता करून देणे तसेच कामगारांना सावली व विश्रांतीची सोय उपलब्ध करून देणे आता बंधनकारक असणार आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येक आस्थापना स्तरावर आईस पॅक, प्राथमिक उपचार साहित्य आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक साधने सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाशी समन्वय साधून कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करणे आणि कारखाने व खाण क्षेत्रात कामाचा वेग मर्यादित ठेवण्याबाबतही सूचित करण्यात आले आहे. अत्यंत उष्णतेच्या काळात विश्रांतीच्या वेळेत लवचिकता आणणे, आवश्यक असल्यास दोन कामगारांची टीम नेमणे आणि कामाच्या ठिकाणाजवळच विश्रांतीगृहांची सोय करण्यावर भर देण्यात आला आहे.

कामगारांना थंड पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स उपलब्ध करून देण्यासोबतच, उष्णतेचे धोके व त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांबाबत कामगारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी कामगार नाका व सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स लावून जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि नियमित निरीक्षणासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात यावी. सर्व नियोक्त्यांनी याकडे वैयक्तिक लक्ष देऊन कामगारांची सुरक्षा सुनिश्चित करावी, असे आवाहन कामगार विभागामार्फत करण्यात आले आहे.

0000000



जिल्ह्यात बालविवाहाविरुद्ध मोठी कारवाई;

प्रशासकीय सतर्कतेमुळे एकाच महिन्यात 6 विवाह रोखले

अमरावती, दि. 28 (जिमाका): जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेला एप्रिल महिन्यात उल्लेखनीय यश मिळाले असून विविध यंत्रणांच्या समन्वयातून एकूण 6 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच महिला व बाल विकास विभाग, पोलीस प्रशासन, बाल संरक्षण यंत्रणा व बाल कल्याण समिती यांच्या संयुक्त पथकांनी तात्काळ हस्तक्षेप करून हे विवाह थांबविले. संबंधित पालक व कुटुंबियांचे समुपदेशन करून बालविवाहाचे दुष्परिणाम तसेच कायदेशीर परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या कारवाईमुळे संबंधित बालकांचे शिक्षण, आरोग्य व सुरक्षित भविष्य जपण्यात मदत झाली असून, समाजात सकारात्मक संदेश पोहोचला आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत बालविवाह करणे हा दंडनीय गुन्हा असल्याचे प्रशासनाने पुन्हा अधोरेखित केले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित 1098 चाईल्ड हेल्पलाईन किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. बालविवाहमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000000

खतांचा काळाबाजार आणि लिंकिंग रोखण्यासाठी कारवाई;

10 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित, तर 6 केंद्रांना सक्त ताकीद

अमरावती, दि. 28 (जिमाका): खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी आणि कृषी निविष्ठांची गुणवत्ता राखण्यासाठी अमरावती जिल्हा कृषी विभागाने जिल्ह्यात मोठी कारवाई आहेत.  धडक मोहिम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 10 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, त्रुटी आढळलेल्या इतर 6 केंद्रांना प्रशासनाने कडक ताकीद दिली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी दिली आहे.

खरीप हंगामात बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांची विक्री होऊ नये, तसेच शेतकऱ्यांकडून छापील किमतीपेक्षा जास्त दराने वसुली केली जाऊ नये, यासाठी जिल्ह्यात भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. एप्रिल 2026 अखेरपर्यंत जिल्ह्यातील 100 टक्के कृषी निविष्ठा केंद्रांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट विभागाने ठेवले आहे. ज्या केंद्रांच्या ई-पॉस (e-POS) मशीनवरील खतांचा साठा आणि दुकानातील प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठी तफावत आढळून आली, अशा 17 विक्रेत्यांची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीअंती दोषी आढळलेल्या 10 विक्रेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईमध्ये प्रामुख्याने साठ्यात तफावत असणे, अवाजवी दराने विक्री करणे, पक्के बिल न देणे, अनधिकृत बियाण्यांची साठवणूक करणे आणि बंदी असलेल्या एच.टी.बी.टी. (HTBT) कापूस बियाण्यांची विक्री करणे यांसारख्या गंभीर बाबी कारणीभूत ठरल्या आहेत.

कृषी विभागाने शेतकरी बांधवांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बियाणे किंवा खते खरेदी करताना केवळ अधिकृत परवानाधारकांकडूनच खरेदी करावी आणि त्याचे पक्के बिल आवर्जून घ्यावे. जर कोणत्याही केंद्रावर खतासोबत इतर अनावश्यक उत्पादने (लिंकिंग) घेण्याची सक्ती केली जात असेल किंवा अवाजवी दर आकारले जात असतील, तर शेतकऱ्यांनी 8080536602 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 28.04.2026

  जिल्हा युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी होणार मान्यवरांच्या हस्ते गौरव अमरावती, दि. 28 (जिमाका): सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण...