Monday, April 6, 2026

DIO NEWS AMRAVATI 06-04-2026

                                    ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा

अमरावती, दि. 06 (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे बुधवार दि. 8 एप्रिल आणि गुरूवार, दि. 9 एप्रिल रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यानुसार, बुधवार, दि. 8 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती आगमन व कार्यालयीन कामकाज. दुपारी 3 वाजता विश्रामगृह, अचलपूर येथे तालुक्यातील शेतकरी आत्महत्या व शासकीय जमिनीवर चारा लागवडीसंबंधी बैठक व चर्चा. दुपारी 4 वाजता शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास भेट. सायंकाळी 7 वाजता चिखलदरा विश्रामगृह मुक्काम.

गुरूवार, दि. 9 एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजता धारणी विश्रामगृह येथे तालुक्यातील शेतकरी आत्महत्याबाबत बैठक व चर्चा, तसेच प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी यांचे समवेत आदिवासी शेतकऱ्यांच्या योजनांबाबत बैठक व चर्चा करतील. दुपारी 1.30 वाजता शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास भेट देतील.

000000000

कौशल्य विकास केंद्राचा अमरावती येथे रोजगार मेळावा

येत्या शुक्रवारी

            अमरावती, दि. 06 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे शुक्रवार, दि. 10 एप्रिल 2026 रोजी आयोजन करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले कला आणि वाणिज्य महाविद्यालय, भातकुली, जि. अमरावती  येथे हा मेळावा होणार आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटरतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये नागपूर कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येतो. मेळाव्यात योजनेसाठी विविध आस्थापना, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. यात ऑनलाईन सहभाग नोंदवून आपली रजिट्रेशनची प्रत काढून मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित राहावे. याबाबत अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066/8983419799/8605654025 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह महात्मा ज्योतिबा फुले कला आणि वाणिज्य महाविद्यालय, भातकुली जि. अमरावती येथे उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

0000000

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या अर्जात दुरुस्तीसाठी

30 एप्रिलपर्यंत संधी

अमरावती, दि. 06 (जिमाका): राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांना योजनेच्या अर्जात दुरुस्तीसाठी  संधी देण्यात आली आहे. ज्या पात्र महिलांनी अर्ज भरताना कुटुंबातील सदस्यांच्या नोकरी किंवा निवृत्तीवेतनाबाबत नजरचुकीने चुकीची माहिती निवडली होती, त्यांना आता ही चूक सुधारण्यासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

योजनेच्या निकषानुसार, कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी (नियमित किंवा कंत्राटी) नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेणारा नसावा, अशी अट आहे. मात्र, 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना अनेक लाभार्थ्यांकडून या पर्यायाबाबत चुकीची नोंद झाली होती. अशा लाभार्थी महिलांसाठी ऑनलाइन ई-केवायसी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ज्या पात्र महिलांच्या अर्जामध्ये अशा तांत्रिक त्रुटी आहेत, त्यांनी विहित मुदतीत म्हणजे 30 एप्रिल 2026 पर्यंत आपली माहिती ऑनलाइन पोर्टलवर जाऊन अपडेट करावी. या दुरुस्तीमुळे पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळण्यात येणारे अडथळे दूर होणार असून, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका अधिक मजबूत होण्यास मदत होईल.

0000000

विश्रोळी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पाणी 9 व 10 एप्रिलला बंद;

नागरिकांनी पाण्याचा साठा करण्याचे मजीप्राचे आवाहन

अमरावती, दि. 06 (जिमाका): महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत (मजीप्रा) येणाऱ्या 125 गावे विश्रोळी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे आगामी  गुरुवार, दि. 9 एप्रिल आणि शुक्रवार, दि. 10 एप्रिल 2026  रोजी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मजीप्रामार्फत करण्यात आले आहे.

विश्रोळी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या 600 मिमी व्यासाच्या मुख्य पाईप लाईनवर 'अल्ट्रा सोनिक जलमापक' बसविण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच, वाढीव 105 गावे पाणी पुरवठा योजनेच्या अशुद्ध जलवाहिनीचे  कामही याच काळात पूर्ण केले जाणार आहे. या तांत्रिक कामांच्या दृष्टीने दि. 9 आणि 10 एप्रिल 2026 रोजी संपूर्ण दिवसभर या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या गावांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

या योजनेत समावेश असलेल्या सर्व 105 गावातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी आधीच आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

00000000

                                               महिला सक्षमीकरणासाठी पुरुषांचा पुढाकार;

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते 'सुधारक सन्मान­’ सोहळ्याचे आज आयोजन

अमरावती, दि. 06 (जिमाका): नवतेजास्विनी कार्यक्रमांतर्गत महिला सक्षमीकरणासाठी संवेदनशीलता दाखविणाऱ्या आणि गावपातळीवर महिलांच्या विकासासाठी पुढाकार घेणाऱ्या पुरुषांचा उद्या, मंगळवार, दि. 7 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी  आशिष येरेकर यांच्या हस्ते संपन्न होईल. 'जेंडर सेन्सिटिव्ह रोल मॉडेल'म्हणून निवडण्यात आलेल्या जिल्ह्यातील तीन पुरुषांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते यावेळी 'सुधारक सन्मान' देऊन गौरविण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) वतीने 'नवतेजास्विनी' कार्यक्रमांतर्गत जेंडर व न्युट्रिशन या घटकासाठी वर्ष 2025-26 चे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा मूळ हेतू गावस्तरावर महिलांसाठी सक्षम व पूरक वातावरण निर्माण करणे, महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेला गती देणे आणि समाजात संवेदनशील पुरुष रोल मॉडेल घडविणे हा आहे.

महिलांच्या प्रगतीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील अंतिम 3 पुरुषांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महिलांच्या प्रगतीत पुरुषांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

0000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 06-04-2026

                                             ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा अमरावती, दि. 06 (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन म...