Wednesday, April 8, 2026

DIO NEWS AMRAVATI 08-04-2026





                                         अंजनगावसुर्जीच्या महिला होणार आत्मनिर्भर;

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला प्रशिक्षणार्थ्यांशी थेट संवाद

            अमरावती, दि. 08 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती मार्फत आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या किमान कौशल्य विकास कार्यक्रम (2025-26)अंतर्गत सुरू असलेल्या ‘फॅशन डिझायनर' या अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षण बॅचला आज जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी भेट दिली. अंजनगाव सुर्जी येथील रोशनी महिला विकास संस्थेद्वारे संचलित या प्रशिक्षणार्थीसोबत त्यांनी थेट संवाद साधला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षणातून स्वावलंबी होण्याचा मार्ग प्राप्त होतो असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलेत.

               या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले की, "या योजनेचा उद्देश केवळ प्रशिक्षण पूर्ण करणे हा उद्देश नसून, प्राप्त कौशल्याचा वापर करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे महत्त्वाचे आहे. रोशनी रेडीमेड गारमेंट फाउंडेशन, एमआयडीसी, अंजनगाव सुर्जी येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या फेब्रिक क्लस्टरमध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी रोजगाराच्या संधी मिळवाव्यात आणि स्वतःच्या पायावर उभे होवून सक्षम व्हावे, असा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

            महिलांनी केवळ वस्तूंची निर्मिती करून न थांबता, त्यांच्या मार्केटिंगवर  विशेष लक्ष केंद्रित करावे. व्यवसायाचे विस्तारीकरण करण्यासाठी बाजारपेठेची मागणी ओळखून नाविन्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थींनी केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता, उद्योग उभारणीसाठी पुढाकार घ्यावा. विविध शासकीय योजनांतर्गत उपलब्ध असलेल्या निधीचा आणि सवलतीच्या कर्ज योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे छोटे-मोठे उद्योग सुरू करावेत व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले.

             या विशेष प्रशिक्षण उपक्रमात अल्पसंख्यांक समाजातील महिलांनी नोंदवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी समाधान व्यक्त केले. समाजातील सर्व स्तरांतील महिला मुख्य प्रवाहात येत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

             हा प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पूर्णतः मोफत राबविला जात आहे. जिल्हा उद्योग केंद्र,अमरावती यांचे निधीतून उभे राहिलेल्या स्थानिक एमआयडीसीमधील फेब्रिक क्लस्टरमध्ये किमान कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.फॅशन डिझायनिंग सारख्या रोजगाराभिमुख कोर्सेसमुळे ग्रामीण भागातील महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. . जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे अंजनगाव सुर्जी परिसरातील गरजू तरुणांना आणि महिलांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या दर्जेदार संधी उपलब्ध होणार आहेत.

            या प्रसंगी जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे  ,तहसीलदार पुष्पा दाबेराव, संस्थेच्या संचालिका शोभा सुने, आशिष सुने, केंद्रातील प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी आदी उपस्थित होते.

0000000

 

भारतीय डाक विभागात विमा एजंट पदासाठी 21 एप्रिलला मुलाखती

अमरावती, दि. 08 (जिमाका): भारतीय डाक विभागाकडून डाक जीवन विमा योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यासाठी विमा एजंट नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी 18 वर्षांपेक्षा कमी नसावे तसेच उमेदवार किमान इयत्ता दहावी किंवा बोर्डाची समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड ही त्यांचे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, संवाद कौशल्य, जीवन विम्याबाबतचे ज्ञान आणि मुलाखतीत मिळणाऱ्या गुणांच्या आधारावर केली जाणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपयांची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून एनएससी किंवा केव्हीपीच्या स्वरूपात ठेवावी लागेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून सुरुवातीला तात्पुरता परवाना देण्यात येईल. हा परवाना आयआरडीए ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपी परवान्यात रूपांतरित केला जाईल. ही परीक्षा नियुक्तीनंतर 3 वर्षांच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. ही नियुक्ती पूर्णपणे कमिशन तत्त्वावर असेल. भारतीय डाक विभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता निवड रद्द करण्याचे अधिकार राखून ठेवले आहेत.

इच्छुक उमेदवारांनी 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि पासपोर्ट साईज फोटोसह दि. 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत 'प्रवर अधीक्षक कार्यालय, कॅम्प, अमरावती - 444602' येथे उपस्थित राहावे, असे आवाहन अमरावती विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

0000000

महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत

            अमरावती, दि. 08 (जिमाका): इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीवर विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या अंतर्गत सन 2025-26 या वर्षातील नवीन अर्ज भरण्यासाठी, तसेच सन 2023-24 व 2024-25 मधील अर्जांची त्रुटीपूर्तता  करण्यासाठी 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

              या विभागामार्फत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा फी योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या इतर मागासवर्गीय मुलींसाठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आणि शिक्षण व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती अशा विविध योजना राबविल्या जातात.

            सर्व संस्था आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन नूतनीकरणाचे अर्ज विहित मुदतीत https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरून घ्यावेत. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीपूर्ततेसाठी 'Send Back' करण्यात आले आहेत, त्यांच्याकडून तात्काळ त्रुटींची पूर्तता करून घेऊन ते अर्ज जिल्हा लॉगिनवर पाठवावेत. विहित वेळेत अर्ज भरून घेण्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची राहणार आहे.

             अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थी व महाविद्यालयांनी नूतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी, 'Re-Apply' करण्यासाठी आणि प्रलंबित अर्जांची त्रुटी पूर्तता करण्यासाठी तत्परता दाखवावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.

0000000

 

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास 30 जूनपर्यंत मुदत

            अमरावती, दि. 8 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. शैक्षणिक वर्ष 2025-26 चे नवीन अर्ज व नूतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी, तसेच 2023-24 व 2024-25 या वर्षांतील अर्जांची त्रुटीपूर्तता (Re-apply) करण्यासाठी आता 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

              या विभागामार्फत प्रामुख्याने भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण व परीक्षा फी प्रतिपूर्ती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन आणि व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अशा पाच महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात. माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत आपले अर्ज ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे.

            विद्यार्थ्यांच्या लॉगिनला त्रुटीपूर्ततेसाठी 'Send Back' केलेले अर्ज संबंधित महाविद्यालयांनी तातडीने विद्यार्थ्यांकडून दुरुस्त करून घ्यावेत. विहित वेळेत अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची राहणार आहे. अमरावती जिल्ह्यातील पात्र विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी नवीन अर्ज भरण्याची व प्रलंबित अर्जांची त्रुटीपूर्तता करण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

00000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 08-04-2026

                                                    अंजनगावसुर्जीच्या महिला होणार आत्मनिर्भर; जिल्हाधिकाऱ्यांनी साधला प्रशिक्षणार्थ्यांशी थे...