Thursday, April 9, 2026

DIO NEWS AMRAVATI 09-04-2026

 पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा

अमरावती, दि. 9 : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवार, दि. 10 एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, दुपारी 2 वाजता श्री. बावनकुळे हे अमरावती शहर पोलीस आयुक्तालयासाठी खरेदी केलेल्या नवीन शासकीय वाहनांचा लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहतील. त्यानंतर 4 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहानिमित्त समाज कल्याण योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ वाटप कार्यक्रम, तसेच सायंकाळी 5 वाजता इलेक्ट्रॉनिक्स मिडीया असोसिएशनतर्फे आयोजित गजलनवाज भिमराव पांचाळे यांचा अमृत महोत्सव व नागरी सत्काराला उपस्थित राहतील. सायंकाळी 6 वाजता हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गुरूवर्य अंबादासपंत वैद्य मार्गाचे नामकरण आणि कुस्ती मॅटचे उद्घाटन करतील.

श्री. बावनकुळे हे सायंकाळी 7 वाजेनंतर डॉ. सुनील देशमुख, नगरसेवक ऋषिकेश देशमुख आणि सुरेखा ठाकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. त्यानंतर रात्री 8.30 वाजता नागपूरकडे प्रस्थान करतील.

00000



जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा

अमरावती, दि. 09 : जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. या निवेदनांवर झालेल्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात प्रामुख्याने आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यात येवदा, वडनेर गंगा येथे आरोग्य सुविधांसाठी यंत्रणांनी पुढाकार घेऊन कार्य करावे. तसेच रूग्णांच्या तपासण्यांसाठी सॅम्पल अमरावती येथे पाठवावे लागते. त्यामुळे रूग्णांची अडचण होते. त्यामुळे या सुविधा निर्माण करण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी सकारात्मकतेने काम करावे. दर्यापूर तालुका अल्पसंख्याकमध्ये येत असल्याने त्यांच्यासाठी असलेल्या योजनांमधून आरोग्य विषयक सुविधा उभारण्यावर भर द्यावा. तसेच ग्रामीण रूग्णालय स्थापन करण्यासाठी जागांचा शोध घेण्यात यावा. गरजूंना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आयुष्मान कार्ड काढण्यासाठी विशेष मोहिम घेण्यात यावी.

वन विभागातर्फे नमो उद्यान आणि वड उद्यान तयार करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. ही उद्याने तातडीने पूर्ण व्हावीत, यासाठी प्रयत्न करण्यात यावे. तसेच ही उद्याने तयार करताना याठिकाणी झाडांची संख्या अधिक असावी. तसेच अतिक्रमणाचा प्रश्न समोर येत आहे. त्यामुळे नगरपालिकांच्या पुढाकाराने शहरातील अतिक्रमणे काढण्यात यावीत. तसेच सर्वांना घरे ही शासनाची भूमिका असल्याने पट्टेवाटप करण्यात यावे. खेलो इंडियामध्ये प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे 14 प्रस्ताव पाठविण्यात यावे. तसेच यावली शहिद येथील शहिद स्मारकासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.

00000






मतदान केंद्रांवर 11 व 12 एप्रिल रोजी विशेष मॅपिंग शिबिर;

महापौरांचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन

अमरावती, दि. 9 (जिमाका): अमरावती मतदारसंघातील मतदार नोंदणी आणि 'एस आय आर' (SIR) मॅपिंगच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी आज तहसील कार्यालय येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महापौर श्रीचंद तेजवानी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महापौरांनी सर्व नगरसेवक आणि बीएलओ  सुपरवायझर यांना मतदारांच्या समस्या सोडवून मॅपिंग प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

महाराष्ट्रामध्ये अद्याप मुख्य 'एस आय आर' प्रोग्राम सुरू झाला नसून सध्या केवळ प्री-मॅपिंगचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये किंवा त्रस्त होऊ नये. मतदारांनी आपल्या भागातील बीएलओशी संपर्क साधून ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ज्या प्रभागांमध्ये मॅपिंगची टक्केवारी कमी आहे, तेथील लोकप्रतिनिधी आणि सुपरवायझर यांना अधिक सक्रिय होण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मॅपिंगच्या कामाला गती देण्यासाठी येत्या 11 आणि 12 एप्रिल रोजी सर्व मतदान केंद्रांवर 'विशेष कॅम्प' आयोजित करण्यात आले आहेत. या कॅम्पची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करून नागरिकांना सहभागी करून घ्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. मतदारांनी घाबरून न जाता या दोन दिवसांच्या शिबिरात आपले नाव आणि मॅपिंगची खातरजमा करून घ्यावी, असेही ते म्हणाले.

या बैठकीला अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे, नायब तहसीलदार सुनील रासेकर, राजेश धवणे (निवडणूक विभाग), कृष्णा गाडेकर, महसूल सहाय्यक भारत कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नगरसेवकांनी बीएलओंच्या कामात पूर्णतः सहाय्य करावे, जेणेकरून मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत होईल, असा विश्वास महापौर श्री. तेजवानी यावेळी व्यक्त केला.

00000

खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी ई-आर-1

सादर करण्यासाठी ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा

            अमरावती, दि. 09 (जिमाका) : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्याकडून पुरविण्यात येणाऱ्या रोजगार विषयक सर्व सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. या सुविधांसाठी  www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच उद्योजक व आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालय (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारे) कायदा 1959 व नियमावली 1960 कलम 5 (1) व कलम 5 (2) अन्वये त्रैमासिक ई-आर-1 ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे.

          मार्च-2026 अखेर संपणाऱ्या त्रैमासिक ई-आर-1 ऑनलाईन या प्रपत्राची माहिती वरील संकेतस्थळावर सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी उद्योजक, आस्थापना यांनी त्यांचे युजर आयडी व पासवर्डच्या माध्यामातून लॉगिन करून ऑनलाईन सादर करावयाची आहे. ऑनलाईन ई-आर-1 सादर करतांना काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाशी संपर्क साधावा. किंवा दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 यावर संपर्क साधावा. ई-आर-1 सादर करण्याची अंतिम मुदत एप्रिल-2026 आहे. ई-आर-1 ऑनलाईन सादर न करणाऱ्या आस्थापनांवर विहित नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, याची कृपया नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

0000000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 09-04-2026

  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा अमरावती, दि. 9 : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवार, दि. 10 एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर...