Thursday, April 30, 2026

DIO NEWS AMRAVATI 30.04.2026

 सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते

महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण

         अमरावती, दि. 30 (जिमाका) : महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिवस समारंभ 1 मे रोजी साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ शुक्रवार, 1 मे रोजी सकाळी 8 वाजता पोलीस मुख्यालय अमरावती शहर परेड मैदान येथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

        या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.

0000000

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

             अमरावती, दि. 30 (जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी नायब तहसिलदार प्रविण ढोले यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

000000

स्वाधार योजनेच्या त्रुटी पूर्ततेसाठी समाज कल्याण विभागाची विशेष कार्यशाळा;

5 मे पर्यंत अंतिम मुदत

अमरावती, दि.30 (जिमाका) :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटींमुळे 'Sent Back' (परत) करण्यात आले आहेत, त्यांच्यासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, अमरावती येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा 30 एप्रिल ते 5 मे 2026 या कालावधीत दुपारी 3 ते 5 या वेळेत पार पडणार असून, विद्यार्थ्यांनी स्वतः उपस्थित राहून त्रुटी दूर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय वसतिगृहांची संख्या मर्यादित आहे. यामुळे अनेक मागासवर्गीय विद्यार्थी निवासाच्या सुविधेपासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून शासन भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक खर्चासाठी थेट बँक खात्यात रक्कम जमा करते. मात्र, अनेक नवीन व नूतनीकरणाच्या अर्जांमध्ये आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केलेली नसल्याने किंवा अर्जात तांत्रिक चुका असल्याने हे अर्ज प्रलंबित आहेत.

ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज परत आले आहेत, त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर आणि ई-मेलवर संदेश पाठवण्यात आले आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी hmas.mahait.org या पोर्टलवर आवश्यक सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करून त्याची हार्डकॉपी कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे.

सहायक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी स्पष्ट केले की, 5 मे 2026 पर्यंत त्रुटींची पूर्तता न केल्यास विद्यार्थी या वर्षाच्या लाभापासून कायमचा वंचित राहील. तसेच त्याला पुढील वर्षीही नव्याने अर्ज करता येणार नाही. ही विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी असून, मुदतीत कार्यवाही न झाल्यास सर्व जबाबदारी विद्यार्थ्याची असेल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय भवन, चांदूर रेल्वे रोड, अमरावती येथे किंवा 0721-2661261 या क्रमांकावर संपर्क साधावा.

00000000

वरुड येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात संपन्न;

42 उमेदवारांना नियुक्ती पत्रे प्रदान

अमरावती, दि. 30 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती, मॉडेल करिअर सेंटर आणि संत अच्च्युत महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वरुड यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित 'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा' उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात प्रत्यक्ष मुलाखतीनंतर 42 उमेदवारांची प्राथमिक निवड करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते तात्काळ नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरुडचे प्राचार्य कमल किशोर फुटाणे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ येथील आदिवासी आश्रम शाळेचे प्रकल्प अधिकारी किशोर काळे, तसेच कौशल्य विकास कार्यालयाचे पंकज कचरे, आकाश येवले , प्रथमेश सोहळे उपस्थित होते.

या मेळाव्यामध्ये नागपूर, पुणे येथील टॅलेंट कॉर्प सोल्युशन आणि हैदराबाद येथील गार्डियन ट्रेनिंग अकादमी या दोन नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. एकूण 100 रिक्त पदांसाठी 163 उमेदवारांनी नोंदणी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक खापरे यांनी तर रश्मी माथणकर यांनी आभार मानले.

00000000

स्वाधार योजनेच्या त्रुटी पूर्ततेसाठी समाज कल्याण विभागाची विशेष कार्यशाळा;

10 मे पर्यंत अंतिम मुदत

अमरावती, दि. 30 (जिमाका) :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटींमुळे 'Sent Back' (परत) करण्यात आले आहेत, त्यांच्यासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, अमरावती येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा 30 एप्रिल ते 10 मे 2026 या कालावधीत दुपारी 3 ते 5 या वेळेत पार पडणार असून, विद्यार्थ्यांनी स्वतः उपस्थित राहून त्रुटी दूर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय वसतिगृहांची संख्या मर्यादित आहे. यामुळे अनेक मागासवर्गीय विद्यार्थी निवासाच्या सुविधेपासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून शासन भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक खर्चासाठी थेट बँक खात्यात रक्कम जमा करते. मात्र, अनेक नवीन व नूतनीकरणाच्या अर्जांमध्ये आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केलेली नसल्याने किंवा अर्जात तांत्रिक चुका असल्याने हे अर्ज प्रलंबित आहेत.

ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज परत आले आहेत, त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर आणि ई-मेलवर संदेश पाठवण्यात आले आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी hmas.mahait.org या पोर्टलवर आवश्यक सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करून त्याची हार्डकॉपी कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे.

सहायक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी स्पष्ट केले की, 10 मे 2026 पर्यंत त्रुटींची पूर्तता न केल्यास विद्यार्थी या वर्षाच्या लाभापासून कायमचा वंचित राहील. तसेच त्याला पुढील वर्षीही नव्याने अर्ज करता येणार नाही. ही विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी असून, मुदतीत कार्यवाही न झाल्यास सर्व जबाबदारी विद्यार्थ्याची असेल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय भवन, चांदूर रेल्वे रोड, अमरावती येथे किंवा 0721-2661261 या क्रमांकावर संपर्क साधावा.

00000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 01.05.2026

  जिल्ह्याच्या कृषी-औद्योगिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानावर भर                   - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील *67 वा महाराष्ट्र दिन उत...