Tuesday, April 7, 2026

DIO NEWS AMRAVATI 07-04-2026

                                        ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा

अमरावती, दि. 07 (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे शुक्रवार दि. 10 एप्रिल रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यानुसार, शुक्रवार, दि. 10 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता भातकुली येथून अमरावतीकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता महात्मा ज्योतीबा फुले कला आणि वाणिज्य महाविद्यालय, भातकुली येथे आयोजित रोजगार मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता अमरावतीकडे प्रयाण करतील. दुपारी 1.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे आगमन व कार्यालयीन कामकाज पाहतील.

000000

ग्रामीण भागात  कलम 37(1) व (3) लागू

अमरावती, दि. 07 (जिमाका) : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला असून दि. 16 एप्रिल 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी  आशिष येरेकर यांनी कळविले आहे.

0000000

 ‘अमृत' संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी 'परिवार सर्वेक्षण' मोहीम;

25एप्रिल पर्यंत नोंदणीचे आवाहन

अमरावती, दि. 07 (जिमाका): महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी दि. 8 एप्रिल ते 25 एप्रिल 2026 या कालावधीत 'परिवार सर्वेक्षण' अभियान राबविण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून लक्षित गटातील कुटुंबांची संख्या निश्चित करणे, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे आणि भविष्यात नवनवीन लोककल्याणकारी योजनांची आखणी करणे हा मुख्य हेतू असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

'अमृत' संस्था प्रामुख्याने ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य यांसारख्या 25 जातींमधील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्य करते. या संस्थेमार्फत व्यक्तिमत्व विकास, औद्योगिक व उन्नत कौशल्य विकास, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसाहाय्य, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन आणि उद्योग-व्यवसाय वृद्धीसाठी वैयक्तिक व्याज परतावा योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे.

हे सर्वेक्षण महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी राबविले जाणार असून, या काळात अमृत संस्थेचे प्रतिनिधी थेट लक्षित गटातील कुटुंबांशी संपर्क साधतील. तसेच विविध सामाजिक संस्था, संघटना आणि मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडूनही प्रातिनिधिक स्वरूपात माहिती संकलित केली जाणार आहे. स्थानिक संसाधने आणि तरुणांच्या कौशल्यानुसार नवीन मूल्यवर्धित योजना तयार करण्यासाठी हे सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

लक्षित गटातील ज्या कुटुंबांना किंवा संस्थांना या मोहिमेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी अमृतच्या जिल्हा किंवा विभागीय व्यवस्थापकांशी संपर्क साधून आपल्या परिवाराची नोंदणी करावी. या नोंदणीमुळे भविष्यात राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे सोपे होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन नोंदणी करावी, असे आवाहन 'अमृत' संस्थेमार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी  अमरावती जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी  तसेच amrut.amravatidm@gmail.com या संकेतस्थळावर किंवा ९७३०१५१४५०  आणि ९११२२२६१५४  यावर संपर्क साधवा.

000000

जिल्ह्यात 8 ते 14 एप्रिल दरम्यान 'सामाजिक समता सप्ताह';

विविध लोककल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन

अमरावती, दि. 07 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात दि. 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत 'सामाजिक समता सप्ताह' साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये या सप्ताहाचे नियोजन करण्यात आले असून, समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी कळविले आहे.

या सप्ताहाची सुरुवात 8 एप्रिल रोजी उद्घाटन समारंभाने होणार असून 9 एप्रिलला जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळा व वसतिगृहामध्ये निबंध, वक्तृत्व आणि लघुनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. 10 एप्रिल रोजी समतादूतांच्या माध्यमातून पथनाट्ये सादर करून सामाजिक न्याय विभागाच्या 'मार्जिन मनी' योजनेसह इतर महत्त्वाच्या योजनांचे प्रबोधन केले जाईल. 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सामाजिक कार्यावर आधारित विशेष कार्यक्रम होतील. 12 एप्रिल रोजी 'संविधान जागर' अंतर्गत भारतीय संविधानाची माहिती व महिला मेळाव्याचे आयोजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महिलाविषयक कार्य अधोरेखित केले जाईल.

सप्ताहाच्या उत्तरार्धात 13 एप्रिलला ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आणि स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल, ज्यामध्ये मान्यवरांची व्याख्याने व चर्चासत्रे होतील. विशेष म्हणजे, या सप्ताहात 'अॅट्रॉसिटी' कायद्यांतर्गत वारसांना नियुक्ती आदेश देणे, दादासाहेब गायकवाड योजनेतून जमिनीच्या पट्ट्यांचे वाटप, 'बार्टी'च्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार असे कार्यक्रम होणार आहेत. या सर्व उपक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

0000000







महिलांनी अर्थकारणाला गती द्यावी

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 7 (जिमाका) : महिला बचतगटांसाठी एक लाख रूपयांचा निधी देण्यात येत आहे. हा निधी शासनाला परत करावा लागणार नाही. त्यामुळे महिलांनी या निधीचा उपयोग उद्योगाच्या विकासासाठी करावी. यामुळे अर्थकारणाला गती मिळणार असून इतरांना प्रेरणा मिळेल, असे मत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी व्यक्त केले.

महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरुषांचा जेंडर सेंसीटिव्ह रोल मॉडेल म्हणून सुधारक सन्मान पुरस्कार जिल्हाधिकारी यांच्या शुभ हस्ते आज देण्यात आला. तसेच बचतगटांना एक लाख रूपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. रंजन वानखडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय गट, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी ऋषीकेश घ्यार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, विना परतावा देण्यात आलेल्या निधीचा बचतगटांनी निट उपयोग करावा. उद्योगासाठी ही पायाभरणी असून ही मोलाची रक्कम राहणार आहे. या निधीचा चांगला उपयोग करून यशकथा निर्माण कराव्यात. महिला बचतटांसाठी विविध स्टार्टअप कार्य करीत असून त्यांच्याशी जुळावे. यामुळे मार्केटींगची मदत होणार आहे. जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेतील लाभार्थींची पतसंस्था सुरू करण्यात आली आहे. तसेच महिलांची विविध कार्यकारी सहकारी संस्था सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे महिला सक्षमीकरणाला बळकटी मिळणार असल्याचे सांगितले.

डॉ. वानखडे यांनी प्रास्ताविक केले. पुनम सोनार यांनी सूत्रसंचालन केले. श्री. घ्यार यांनी आभार मानले. यावेळी जनाराव खंडारे, माधान, ता. चांदूर बाजार, दत्ता कडूकर, तिवरा, ता. धामणगाव, निलेश कोहळे, सुरळी, ता. वरुड यांनी जेंडर सेंसीटिव्ह रोल मॉडेलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच शक्ती महिला बचतगट, भिलटेक, ता. चांदूर रेल्वे, स्वामी समर्थ महिला बचतगट, शिराळा, ता. अमरावती, आदर्श महिला बचतगट, पूर्णानगर, ता. भातकुली या बचतगटांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

0000000

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेत तरुणांसाठी नामवंत कंपन्यांत विद्यावेतनासह प्रशिक्षणाची संधी

अमरावती, दि. 07 (जिमाका): भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या 'प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2026' अंतर्गत आता देशातील पहिल्या 500 नामवंत कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेचा तिसरा टप्पा आता अधिक व्यापक स्वरूपात सुरू झाला असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

या योजनेमध्ये उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेमध्ये 10 वी, 12 वी उत्तीर्ण, आयटीआय प्रमाणपत्रधारक, पॉलिटेक्निक डिप्लोमा तसेच पदवीधर उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आता पदव्युत्तर आणि एमबीए पूर्ण केलेले विद्यार्थी देखील या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

निवड झालेल्या उमेदवारांना विद्यावेतन  दरमहा 9 हजार रुपये मिळणार आहे. यापैकी 8 हजार 100 रुपये सरकारकडून थेट बँक खात्यात जमा होतील, तर 900 रुपये संबंधित कंपनीकडून दिले जातील. याशिवाय, रुजू होताना 6 हजार रुपयांचे एकरकमी सानुग्रह अनुदान देखील दिले जाणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 6 ते 9 महिन्यांचा असेल, ज्यानंतर उमेदवारांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.

ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी आहे, ते या योजनेसाठी पात्र नसतील. तसेच, आयआयटी, आयआयएम यांसारख्या उच्च संस्थांमधील पदवीधर या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. इच्छुकांनी आपली नोंदणी केंद्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर pminternship.mca.gov.in येथे पूर्ण करावी, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 08-04-2026

                                                    अंजनगावसुर्जीच्या महिला होणार आत्मनिर्भर; जिल्हाधिकाऱ्यांनी साधला प्रशिक्षणार्थ्यांशी थे...