Wednesday, April 29, 2026

DIO NEWS AMRAVATI 29.04.2026

 

'स्वाधार' योजनेतील त्रृटी पूर्ण करण्यासाठी 10 मेपर्यंत मुदतवाढ

अमरावती, दि. 29 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या, परंतु कागदपत्रांतील त्रुटींमुळे कार्यालयस्तरावर प्रलंबित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी दि. 10 मेपर्यंत त्रृटी पूर्ण कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य शासनाने शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अकरावी, बारावी, तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट आर्थिक मदत देण्यासाठी 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना' सुरू केली आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, त्यांच्यापैकी काही अर्ज कागदपत्रांतील कमतरतेमुळे कार्यालयात प्रलंबित आहेत. या प्रलंबित विद्यार्थ्यांची यादी कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आली आहे. कार्यालयाकडून वेळोवेळी सूचना देऊनही अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप त्रुटी पूर्तता केलेली नाही, ज्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत.

विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटींमुळे प्रलंबित आहेत, त्यांनी शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार आवश्यक कागदपत्रे कार्यालयात संबंधित शाखेकडे जमा करावीत. या मुदतीत त्रुटी पूर्ण केली नसल्यास, याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थी विद्यार्थ्यांची राहील. तसेच दि. 29 एप्रिल ते 10 मे 2026 या कालावधीत दुपारी 3 ते 5 यावेळेत स्वत: उपस्थित राहून त्रुटी पूर्तता करून घेण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, अमरावती येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालय किंवा दुरध्वनी क्र. 0721-2661261 वर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी केले आहे.

0000000

वरुड येथे आज कौशल्य विकास केंद्राचा रोजगार मेळावा

अमरावती, दि. 29 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे गुरूवार, दि. 30 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरूड  जि. अमरावती येथे हा मेळावा होणार आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटरतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येते. मेळाव्यात योजनेसाठी विविध आस्थापना, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रांसह उपस्थित राहावे. याबाबत अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066, 8983419799, 8605654025 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त यांनी केले आहे.

000000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 29.04.2026

  'स्वाधार' योजनेतील त्रृटी पूर्ण करण्यासाठी 10 मेपर्यंत मुदतवाढ अमरावती, दि. 29 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार य...