Thursday, October 1, 2026

DIO NEWS AMRAVATI 01.10.2026





                                  समाज कल्याण विभागात 'माहिती अधिकार दिन' साजरा

 

सेवा संकल्प अभियानांतर्गत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली माहिती अधिकाराची उजळणी

 

अमरावती, दि. 1 (जिमाका) : प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण आणि सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण  कार्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात 'सेवा संकल्प अभियान २०२६' अंतर्गत २८ सप्टेंबर रोजी ‘माहिती अधिकार दिन’ साजरा करण्यात आला.

 

सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी ‘माहिती अधिकार अधिनियम २००५’ वर आधारित विशेष प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सराव करून घेतला. प्रश्नोत्तरांच्या रंजक फेरीतून माहिती अधिकाराचा अर्ज कसा करावा, प्रथम व द्वितीय अपील प्रक्रिया आणि जन माहिती अधिकाऱ्यांची भूमिका याविषयी सखोल आणि व्यावहारिक उजळणी करण्यात आली. प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाचे सहाय्यक संचालक डॉ. दिनेश मेटकर यांनी माहिती अधिकार अधिनियमाचा मुख्य उद्देश, प्रशासनातील पारदर्शकता, नागरिकांचे अधिकार याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांच्या मार्गदर्शनाखाली  पार  पडलेल्या या कार्यक्रमात माहिती अधिकाराचा प्रभावी आणि सकारात्मक वापर करून नागरिकांना जलद व पारदर्शक सेवा देण्याचा संकल्प उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला.

०००००

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे खेळाडूंना मिळणार घरबसल्या ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’

 

अमरावती, दि. 1 (जिमाका) : राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने मिळावा यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने खेळाडूंसाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमुळे खेळाडूंना घरी बसून अत्यंत सोप्या पद्धतीने आपले क्रीडा ई-प्रमाणपत्र मिळवता येणार आहे.

 

ही नवीन प्रणाली ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे, ज्यामुळे बोगस प्रमाणपत्रांच्या गैरप्रकारांना पूर्णपणे आळा बसेल. खेळाडूने पोर्टलवर माहिती भरल्यानंतर, ती मूळ डेटाशी जुळल्यास अवघ्या २४ तासांच्या आत डिजिटल पडताळणी अहवाल उपलब्ध होणार आहे. तसेच, प्रत्येक प्रमाणपत्रावर एक क्युआर कोड सुरक्षा असेल. नियुक्ती प्राधिकारी हा क्युआर कोड स्कॅन करून प्रमाणपत्राची सत्यता त्वरित पडताळू शकतील.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर सर्व शासकीय पदभरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंना आता हे ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रमाणपत्राशिवाय खेळाडू संवर्गातून अर्जाचा विचार केला जाणार नाही. ज्या खेळाडूंनी यापूर्वी विभागीय उपसंचालकांकडून प्रमाणपत्रांची पडताळणी करून घेतली आहे, त्यांनाही आगामी भरती प्रक्रियेसाठी या नवीन प्रणालीद्वारे प्रमाणपत्र तयार करून घेणे बंधनकारक आहे.

 

या प्रणाली अंतर्गत ५ टक्के खेळाडू आरक्षणाचे क्रीडा संघटनेमार्फत प्राप्त अभिलेख (रेकॉर्ड्स) 'क्रीडा ई-प्रमाण' पोर्टलवर अपलोड केले जात आहेत. अधिकृत स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंनी प्रमाणपत्र मिळविण्याकरिता क्रीडा विभागाच्या sports.maharashtra.gov.in  या अधिकृत संकेतस्थळावर आपली नोंदणी पूर्ण करावी आणि प्रमाणपत्र मिळवावे, असे आवाहन क्रीडा विभागाकडून करण्यात आले आहे.

 

            कबड्डी,फेन्सिंग,ट्रायथलॉन (२०२५ ची स्पर्धा),ज्युडो (२०२४ ची स्पर्धा),कुराश (२०२४-२५ व २०१७-१८) या स्पर्धांचे अभिलेख ऑनलाईन उपलब्ध आहेत, त्याच खेळाडूंनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत. इतर पात्र खेळांच्या खेळाडूंनी नोंदणी करावी,इतर अभिलेख देखील अपलोड करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.

००००

‘वन्यजीव सप्ताह’; मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे विविध जनजागृती उपक्रम

2 ते 8 ऑक्टोबरदरम्यान विद्यार्थी व नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

अमरावती, दि 1 (जिमाका) : मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावतीच्या वतीने २ ते ८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत वन्यजीव संवर्धन, नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी ‘अधिवास जोडणीकरण, वन्यजीवांचे सक्षमीकरण’ या संकल्पनेवर आधारित विविध शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासांचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी असून विद्यार्थी, शिक्षक, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मेळघाट व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने केले आहे.

 

वन्यजीव सप्ताहाच्या आयोजनात मेळघाट व्याघ्र प्रकल्पासोबतच अरण्यम् कंझर्व्हेशन सोसायटी, युथ फॉर नेचर कन्झर्व्हेशन ऑर्गनायझेशन, नेचर सोसायटी, ऑर्गनायझेशन फॉर कुला, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था आणि पर्यावरण संवर्धन शिक्षण संस्था यांचा सहभाग राहणार आहे. अमरावतीतील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी या उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

 

          वन्यजीव सप्ताहाचे उद्घाटन २ ऑक्टोबर रोजी अमरावती येथील कुलाढाप सभागृहात होणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण स्वयंसेवक कार्यशाळा, बांबू उद्यानात निसर्गभ्रमंती तसेच वन्यजीव विषयावरील चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तापडिया सिटी सेंटर येथे वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येणार असून ते सर्व नागरिकांसाठी खुले राहणार आहे. सप्ताहादरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी वन्यजीव माहितीपट व चित्रपट प्रदर्शन, निसर्ग प्रश्नमंजुषा, पोस्टरनिर्मिती, पर्यावरणविषयक कविता तसेच वने व वन्यजीव सहजीवनावर आधारित रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. बिबट्यासोबत सहजीवनाबाबत जागरूकता कार्यशाळा, ‘टॉक विथ ट्री’ उपक्रम, वन्यजीवविषयक व्याख्याने व सादरीकरणे यांचाही कार्यक्रमात समावेश आहे. जलसंवर्धन तसेच प्लास्टिक बाटल्यांच्या पुनर्वापराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

 

मेळघाट परिसरात प्लास्टिक संकलन व निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार आहे. चिखलदरा येथील निवासी अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पक्षीनिरीक्षणाचा उपक्रम, तर आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमांद्वारे विविध गटांतील विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

 

        वन्यजीव सप्ताहाचा समारोप ८ ऑक्टोबर रोजी कुलाढाप सभागृह, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालय, अमरावती येथे होणार असून विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे वितरित करण्यात येणार आहेत.

०००००

परिवहनेत्तर (चारचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी

 

नवीन वाहन मालिका सुरू करण्याबाबत आवाहन

 

            अमरावती, दि. 1 (जिमाका): परिवहनेत्तर ( चारचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी  गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026  रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहित शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज परिवहन कार्यालय, कॅम्प, अमरावती, खिडकी क्रमांक -25 येथे जमा करावेत,असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.

 

              वाहन ज्याच्या नावावर असेल त्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत त्यांच्या पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड जोडावे. तसेच अर्जामध्ये वाहन ज्या व्यक्तीच्या नावे आहे, त्या व्यक्तीचा आधारकार्डला संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. पसंती क्रमांक डिमांड ड्राफ्ट अमरावती, कॅम्प ब्रांच, ट्रेझरी ब्रांच कोड नं 003866 साठी  देय असावा.एका पसंती क्रमांकासाठी एकच अर्ज आला असेल, त्यांची व एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आले असतील, त्यांच्या पसंती क्रमांकाची यादी 8 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी  4 वाजता कार्यालयातील सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात येईल. एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आलेल्या यादीमधील पसंती क्रमांकांसाठी ज्यांनी अर्ज केला आहे, अशाच अर्जदारांनी 9 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 1.30 वाजेपर्यंत त्या क्रमांकासाठी पसंती क्रमांक शुल्काच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सीलबंद करून खिडकी क्रमांक -25 वर जमा करावे.

 

              एकाच पसंतीक्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज प्राप्त होऊन सिलबंद लिफाफ्यात सादर केलेल्या जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट धारकांनी  9 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 3 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात उपस्थित रहावे. लिलावासाठी उपस्थित राहणा-या अर्जदाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने ओळखपत्र व प्राधिकार पत्रासह हजर रहावे.

 

            कार्यालयात सादर झालेले जादा रक्कमेचे डिमांड ड्राफ्ट अर्जदारासमोर उघडण्यात येतील. ज्या अर्जदाराने जास्त रक्कमेचा ड्राफ्ट सादर केला असेल, त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल व उर्वरित कमी रक्कमेचा ड्राफ्ट संबंधित अर्जदारांना परत देण्यात येईल. तसेच, विहित वेळेत अनुपस्थित अर्जदारांचा कुठलाही प्रकारचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दुरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी  यांनी केले आहे.

0000000


शनिवार व रविवारी मोर्शीत ‘ग्रंथोत्सव’

 

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते उद्घाटन

 

             अमरावती,दि. 1 (जिमाका) : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने शनिवार, ३ व रविवार,४ ऑक्टोबर रोजी मोर्शी येथील पंजाबबाबा सभागृहात ‘ग्रंथोत्सव-२०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार असून ग्रंथ प्रदर्शन व विक्रीसोबतच विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथप्रेमी,साहित्य रसिक नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन, जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा ग्रंथोत्सव समितीचे सदस्य सचिव डॉ.अतुल वानखडे यांनी केले आहे.

 

            महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने दोन दिवशीय  ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार असून ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल कुलट हे विशेष अथिती म्हणून उपस्थित राहरणार आहेत ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. तत्पूर्वी, उपविभागीय अधिकारी प्रदीप पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी १० वा. ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे.

 

            ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारी १२ वा. ‘भारताचा रक्तरंजीत इतिहास’ विषयावर प्रा.जगदिश पाटील यांचे व्याख्यान होणार आहे सहायक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील हे अध्यक्षस्थानी असतील. दुपारी १ ते १.३० वाजेदरम्यान प्रसिद्ध कवी धीरज चावरे हे 'हास्य कवितांचा विनोदी कार्यक्रम' सादर करणार आहेत. तर दुपारी २ ते ४.३० वा. दरम्यान ‘पुस्तकाची मैत्री’ विषयावर परिसंवाद होणार आहे.

 

             दुसऱ्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ वाजे दरम्यान दोन व्याख्यान आणि एकपात्री प्रयोग सादर होणार आहेत. त्यातील पहिले व्याख्यान ‘सार्वजनिक ग्रंथालयामधील सॉफ्ट स्किल्स आंतरवैयक्तीक कौशल्य आणि व्यावसायीक क्षमता’ विषयावर  डॉ.रविंद्र सरोदे यांचे तर ‘वाचन संस्कृती काल आज आणि उद्या’ विषयावर डॉ. राजेश बोबडे यांचे व्याख्यान होणार आहे. हर्षदा इंदोन यांचा ‘मी वाचन संस्कृती बोलते’ हा एकपात्री नाट्य प्रयोग तर आचल सरदार यांचा ‘चला हसू या गाऊ या’ हा नक्कल व गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

 

            दुपारी २ ते ४ वाजे दरम्यान ‘कविसंमेलन’ होणार आहे. प्रसिद्ध गझलकार नितीन देशमुख अध्यक्ष स्थानी असतील तर गजानन देशमुख,विशाल मोहोड,किशोर जराड, अलका तालनकर,संदीप देशमुख,प्रणाली देशमुख,विशाल कनेकर हे कवि सहभाग घेणार आहेत. दुपारी ४ ते ५ वाजेदरम्यान ग्रंथोत्सवाचा समारोप होणार आहे. विभागीय ग्रंथालय संघाचे प्रभाकर घुगे हे अध्यक्ष  स्थानी असतील तर शासकीय विभागीय ग्रंथालयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड आणि जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चंद्रकांत चांगदे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

०००००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 01.10.2026

                                   समाज कल्याण विभागात 'माहिती अधिकार दिन' साजरा   सेवा संकल्प अभियानांतर्गत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घ...