चारा टंचाई दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी पेऱ्यावर भर दयावा -
कृषी सहसंचालक गणेश घोरपडे
अमरावती, दि.२१ (विमाका): दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याच्या टंचाईची शक्यता वर्तवली जात आहे.या पार्श्वभूमीवर जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा वापर करून खात्रीशीर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीच्या पेरणीवर भर देण्याचे आवाहन, विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी केले आहे.
यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे जमिनीतील ओलाव्यावर परीणाम झाला असून भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे जनावरांच्या चाऱ्याच्या टंचाईची शक्यता वर्तवली जात आहे.अशात जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा वापर करून खात्रीशीर पर्याय म्हणून जास्तीत जास्त क्षेत्र रब्बी ज्वारी खाली आणणे आवश्यक असून शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारीच्या पेरणीवर भर द्यावा, असे विभागीय कृषी सहसंचालकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
रब्बी ज्वारी हे कमी पाण्यात आणि कमी ओलाव्यावर येणारे अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. या पिकापासून मानवी आहारासाठी उत्तम दर्जाचे धान्य तर मिळतेच, शिवाय जनावरांसाठी पौष्टिक आणि चवदार कडबा (चारा) मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतो. चालू रब्बी हंगामासाठी ज्वारीचे बियाणे बाजारात पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या अधिकृत कृषि सेवा केंद्रातून बियाण्यांची खरेदी करावी. कोरडवाहू क्षेत्रासाठी आणि कमी ओलाव्यासाठी मालदांडी ३५-१, फुले अनुराधा, फुले माऊली, फुले सुचित्रा या वाणांची शिफारस करण्यात आली आहे.
पिकाची उगवण चांगली होण्यासाठी जमिनीतील ओलावा संपण्यापूर्वी शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारीची पेरणी तातडीने करावी, पारंपरिक पिकाऐवजी रब्बी ज्वारीला प्राधान्य देऊन आर्थिक नुकसान टाळावे आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवावा यासंदर्भात अधिक माहिती व मार्गदर्शनसाठी शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा,असे सांगण्यात आले आहे.
00000

No comments:
Post a Comment