डफरीन, सुपर, वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात सीसीटीव्ही लावणार
- जिल्हाधिकारी आशिष येरेकर
* अग्निशामक सुरक्षा अधिकाऱ्याची नेमणूक करणार
*सुव्यवस्थेसाठी पोलिस चौकी उभारणार
अमरावती, दि. 16 : जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा स्त्री रूग्णालय, सुपर स्पेशालिटी रूग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा परिसरात नागरिकांची सतत वर्दळ असते. या परिसरात उपद्रवी नागरिकांचा वावर कमी व्हावा, तसेच याठिकाणी कायदा व सुव्यवस्था कायम राखली जावी, यासाठी हा परिसरात सीसीटीव्हीच्या नियंत्रणात आणण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
जिल्हा स्त्री रूग्णालयातील सुविधांचा आढावा जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी रूग्णालयाचे व्यवस्थापन, आरोग्य सेवा, अग्निशामक सुरक्षा आणि विविध विकासकामांबाबत आज आढावा घेतला. जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, जिल्ह्याच्या ठिकाणी महत्वपूर्ण असलेल्या या रूग्णालयात सुविधा असणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानुसार दर महिन्याला याबाबत आढावा घेण्यात येईल. रूग्णालयाच्या परिसरात सुरक्षा आणि स्वच्छता राखण्यात यावी. परिसरात अनावश्यक येणारे लोक आणि उपद्रवी नागरिकांवर कारवाई करण्यासाठी याठिकाणी तातडीने पोलिस चौकी उभारण्यात येईल.
जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीनंतर याठिकाणी एसएनआयसीयू सुविधेसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. हा एसएनआयसीयू नवजात बाळांच्या दृष्टीने महत्वाचा असून सर्व पडताळणी करून तातडीने कार्यान्वित करावा. ऑक्सिजन आणि कॉम्प्रेसरची सुविधा सुरू राहण्यासाठी वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी व्यवस्था करावी. सुरक्षेच्या दृष्टीने मॉक ड्रिल आणि अग्निशामक यंत्रणेचे ऑडिट करण्यात यावे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी विद्यार्थी सुविधा व हॉस्टेल तातडीने करण्यात यावी. महाविद्यालयातील हॉस्टेल, लॅब, वातानुकुलीत कामाना लवकरात लवकर मंजुरी घेऊन ती पूर्ण करण्यात यावे. तसेच वीज पुरवठा सुरळीत ठेवणे, व्होल्टेज फ्लक्चुएशन रोखणे, वृक्ष छाटणी आणि स्वच्छता मोहिमेला वेग देण्यात यावे, निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.
00000
दुष्काळावर मात करण्यासाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा अवलंब करा –
विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांचे पशुपालकांना आवाहन
अमरावती, दि. १६ (जिमाका): जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि चारा टंचाईवर प्रभावी उपाय म्हणून पशुपालकांनी हायड्रोपोनिक्स (जलसंजीवनी) तंत्रज्ञानाद्वारे हिरवा चारा निर्मितीचा अवलंब करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त नैना गुंडे आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
अमरावती तालुका व पशुसंवर्धन अधिकारी यांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयात या तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आलेल्या मका चाऱ्याचे प्रात्यक्षिक नुकतेच दाखविण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, पशुसंवर्धन विभागाचे सह आयुक्त डॉ. येसू देव वंजारी, उपायुक्त डॉ. वल्लभ जोशी, सहाय्यक आयुक्त डॉ. पंकज रवाळे तसेच दर्यापूरचे सहाय्यक आयुक्त डॉ. प्रतीक बोडके आदी यावेळी उपस्थित होते.
हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामुळे अत्यंत कमी पाण्यात, कमी खर्चात आणि उपलब्ध साधनसामग्रीत अवघ्या काही दिवसांत पौष्टिक हिरवा चारा तयार करणे शक्य होते. पारंपरिक चारा पद्धतीच्या तुलनेत अत्यंत कमी पाण्याचा वापर होतो, हे तंत्रज्ञान घरात उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून अत्यंत कमी खर्चात उभारता येते. जमिनीशिवाय अवघ्या ७ ते ८ दिवसांत जनावरांसाठी अत्यंत पौष्टिक व पचनास सोपा असलेला मका चारा या तंत्रज्ञानामुळे तयार करता येतो. चारा टंचाई आणि पाण्याच्या टंचाईच्या काळात हे तंत्रज्ञान पशुपालकांसाठी अतिशय उपयुक्त व दिलासादायक ठरणार आहे.
कमी जागेत आणि कमी संसाधनांत अधिक उत्पादन देणाऱ्या या आधुनिक तंत्रज्ञानाचा जिल्ह्यातील जास्तीत-जास्त पशुपालकांनी आणि शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात व गोठ्यात वापर करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
000000
जिल्ह्यातील ग्रामीण भागात निवडणूक आचारसंहितेच्या काळात कडक निर्बंध लागू
- अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
अमरावती,दि.१६ (जिमाका) : जिल्ह्यातील शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शांततेत मतदान पार पाडण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३च्या कलम १६३ अन्वये अमरावती पोलीस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागासाठी कडक प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. निवडणुकीचे मतदान पथक मतदान केंद्रांवर पोहोचल्यापासून ते मतदान प्रक्रिया संपेपर्यंत २१ आणि २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हे आदेश लागू राहणार आहेत.
या आदेशानुसार मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरामध्ये सार्वजनिक किंवा खाजगी जागेत ध्वनीवर्धक, लाऊडस्पीकर किंवा अन्य उपकरणाचा वापर करण्यास, ते लावण्यास किंवा चालविण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.कोणत्याही राजकीय पक्षाला मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात त्यांचे बूथ किंवा मंडप उभारता येणार नाहीत. तसेच बेकायदेशीर जमाव करणे, प्रचार करणे, किंवा मतदारांना आमिष दाखवून प्रभावित करण्यावर बंदी असेल.
अनधिकृतपणे मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात वाहने आणण्यास मनाई आहे. तसेच या परिघात असणारी सर्व प्रकारची दुकाने, हॉटेल्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, झेरॉक्स, फॅक्स आणि एस.टी.डी. बूथ या कालावधीत बंद राहतील. मतदान केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, वायरलेस सेट, कॉर्डलेस फोन, आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणण्यास सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना आणि इतर व्यक्तींना प्रतिबंध करण्यात आला आहे.
मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मतदान केंद्र परिसरात धूम्रपान करणे, शस्त्रे बाळगणे आणि ज्वलनशील पदार्थ नेण्यास सक्त मनाई आहे. अमरावती जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया भयमुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने हे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
०००००
अमरावतीत 23 ते 26 ऑक्टोबरदरम्यान राष्ट्रीय स्पर्धेसाठी
महाराष्ट्र संघाचे निवडपूर्व प्रशिक्षण
अमरावती,दि.१६
(जिमाका) : येथील जिल्हा क्रीडा संकुलात गुरुवारी १५ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय शालेय
वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा २०२६-२७ चा समारोप झाला. स्पर्धेत पुणे,नाशिक कोल्हपूरसह
अमरावती विभागाच्या खेळाडूंनी विविध वजनी गटांत पदके मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.
येत्या २३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान जिल्हा क्रीडा संकुलात राष्ट्रीय ७० व्या राष्ट्रीय
शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे निवडपूर्व प्रशिक्षण शिबिर
आयोजित करण्यात येणार आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,
पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग
असोसिएशन आणि अमरावती जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते
१५ ऑक्टोबर दरम्यान आयोजित राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा २०२६-२७ चा
समारोप झाला.समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे
होते. महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष अनिल माऊली, माजी अध्यक्ष
प्रमोद चौंडकर, सचिव प्रकाश बेंद्रे तसेच अमरावती जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव
शक्ती दीक्षित यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंना उपजिल्हाधिकारी
संतोष काकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आणि उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी
शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय स्तरावरही महाराष्ट्राचे खेळाडू चमकदार कामगिरी करतील,
असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.गणेश जाधव यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेची
माहिती दिली. महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग असोसिएशनच्या तांत्रिक अधिकारी, पंच आणि
पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप रोंटिये यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुका
क्रीडा अधिकारी अनिल इंगळे यांनी केले.
१७ व १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावती, नागपूर, छत्रपती
संभाजीनगर, लातूर, पुणे, कोल्हापूर, मुंबई आणि नाशिक या आठ विभागांतील खेळाडूंनी सहभाग
घेतला. स्पर्धेत खेळाडूंनी विविध वजनी गटांत उत्कृष्ट कामगिरी करत आपले कौशल्य सिद्ध
केले.
स्पर्धेतील सर्वसाधारण विजेतेपदांमध्ये १७ वर्षे मुलींच्या गटात पुणे विभाग,
१७ वर्षे मुलांच्या गटात नाशिक विभाग, १९ वर्षे मुलींच्या गटात पुणे विभाग, तर १९ वर्षे
मुलांच्या गटात कोल्हापूर विभागाने बाजी मारली. स्पर्धेत अमरावती विभागाच्या खेळाडूंनीही
विविध वजनी गटांत पदके मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. १९ वर्षे मुलांच्या ११० किलो
वजनी गटात पियुष किरण आठवले याने प्रथम क्रमांक मिळविला, तर ११० किलोवरील वजनी गटात
श्लोक विजय ससुरकर याने प्रथम क्रमांक पटकावला. १७ वर्षे मुलींच्या ६१ किलो वजनी गटात
पूजा संजय थेपकर हिने द्वितीय क्रमांक मिळविला. विविध गटांतील विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या
हस्ते पदके, पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी अमरावतीत
प्रशिक्षण शिबिर
७०व्या राष्ट्रीय
शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेचे आयोजन ३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत
त्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली येथे होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या
महाराष्ट्राच्या वेटलिफ्टिंग संघाचे निवडपूर्व प्रशिक्षण शिबिर २३ ते २६ ऑक्टोबरदरम्यान
जिल्हा क्रीडा संकुल, तपोवन चौक, अमरावती येथे आयोजित करण्यात येणार आहे.
०००००
राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुणे,नाशिक,कोल्हापूर
व अमरावती विभाग अव्वल
अमरावती,दि.१६
(जिमाका) :येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२६-२७
मध्ये पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि अमरावती विभागातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत
विविध वयोगटांत व वजन गटांत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले. १७ आणि १९ वर्षांखालील
मुले व मुलींच्या गटात अटीतटीचे सामने पाहायला मिळाले.
१७ वर्ष मुलांच्या ८८ किलो आतील
वजनी गटात पुणे विभागाच्या सुजल धडांबे याने प्रथम क्रमांक पटकाविला तर नाशिक विभागाचा
सौरभ महाजनने द्वितीय आणि छत्रपती संभाजीनगर विभागाचा अनुज मंगरुळे तृतिय क्रमांक पटकाविला.मुलांच्या
९८ किलो आतील वजन गटात तुळशीदास मेगणे याने (कोल्हापूर विभाग) प्रथम, साई मिडगुळे
(पुणे विभाग) द्वितीय तर सर्वेश इंगळेने (अमरावती विभाग) तृतीय क्रमांक पटकाविला.मुलांच्या
९८ किलो वरील वजन गटात आर्यन वरकड याने (पुणे
विभाग) प्रथम, रोहीत कांबळे (लातूर विभाग) द्वितीय तर कृष्णा माने (नाशिक विभाग) याने तृतीय क्रमांक पटकाविला.
मुलींच्या १७ वर्ष वयांच्या ६९ किलो आतील वजन गटात साधवी चौधरी हीने (नाशिक विभाग) प्रथम, धनश्री थोरात
(कोल्हापूर विभाग) द्वितीय तर सानवी बोरकर
(पुणे विभाग) हिने तृतीय क्रमांक पटकाविला. ७७ किलो आतील वजन गटात अंबीका बोरुडे हिने (पुणे विभाग) प्रथम क्रमांक तर आयशा पटेल
(कोल्हापूर विभाग) द्वितीय तर सौम्या चव्हाण (मुंबई विभाग) हिने तृतीय क्रमांक पटकाविला.७७
किलो वरील वजन गटात खुशी सकपाळ हिने (मुंबई विभाग) पहिला क्रमांक पटकाविला तर सानवी जगडे (पुणे विभाग) ने द्वितीय तर प्रणिती
चव्हाण ने(कोल्हापूर विभाग) तृतीय क्रमांक पटकाविला.
१९ वर्ष मुलांच्या ७१ किलो आतील वजन गटात
प्रितम वोड याने(पुणे विभाग) प्रथम
क्रमांक तर अभिजीत राऊत ने(छत्रपती संभाजी
नगर विभाग) द्वितीय तर वैभव पाटील ने (कोल्हापूर
विभाग) तृतीय क्रमांक पटकाविला. ८८ किलो आतील वजन गटात श्रेयस सूर्यवंशी याने (कोल्हापूर
विभाग) प्रथम क्रमांक तर रोहीत पवार (लातूर विभाग) याने द्वितीय तर क्रीश पाटील (मुंबई
विभाग) याने तृतीय क्रमांक पटकाविला. ९८ किलो वजन गटात सम्यक कांबळे (कोल्हापूर विभाग)
याने प्रथम क्रमांक तर राजस शिंदे (मुंबई विभाग) याने द्वितीय क्रमांक आणि त्र्यंबक
महाडीक (नागपूर विभाग) याने तृतीय क्रमांक पटकाविला. ११० किलो आतील वजन गटात पियुष
आढावे (अमरावती विभाग) याने प्रथम क्रमांक तर ऋतुराज आंब्रे ने(पुणे विभाग) द्वितीय तर वेद चौगुले (कोल्हापूर
विभाग) याने तृतीय क्रमांक पटकाविला. ११० किलो वरील वजन गटात श्लोक सुरळकर
(अमरावती विभाग) प्रथम क्रमांकावर राहिला तर धिरेंद्र सिंग (पुणे विभाग) दुसऱ्या व
इस्माईल वसीम तालीब (मुंबई विभाग) तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
१९ वर्ष मुलींच्या ६९ किलो आतील वजन गट
इशान्या राऊत हिने (पुणे विभाग) प्रथम क्रमांक तर पुजा थेपेकर (अमरावती विभाग) हिने द्वितीय आणि रेणु मुडलगी ने(कोल्हापूर विभाग) तृतीय क्रमांक पटकाविला.
७७ किलो आतील वजन गटात रतीका चिंचवाडे (पुणे विभाग) हिने प्रथम क्रमांक तर दिव्या कल्याणकर ने (अमरावती विभाग) द्वितीय आणि सई करणाळे
(कोल्हापूर विभाग) हिने तृतीय क्रमांक पटकाविला. ८६ किलो वजन गटात आनंदी सांगळे (नाशिक विभाग) ने प्रथम तर श्रेया गायकवाड
(छत्रपती संभाजी नगर विभाग) हिने द्वितीय तर आराधित खोत (कोल्हापूर विभाग) ने तृतीय
क्रमांक मिळविला. ८६ किलो वरील वजन गटात निकीता शिंदे हिने (कोल्हापूर विभाग) प्रथम
क्रमांक तर श्रेया कानडे (पुणे विभाग) हिने द्वितीय आणि पुर्वा अन्नदाते (मुंबई विभाग)
हिने तृतीय क्रमांक पटकाविला.
००००००
घातक चायनीज फटाक्यांची साठेबाजी करणाऱ्यांवर होणार कारवाई
अमरावती, दि.
१६ (जिमाका) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने बंदी घातलेल्या घातक 'चायनीज
फटाक्यां’च्या साठ्यांबाबत 'ग्राहक
दक्षता कल्याण फाउंडेशनच्या तक्रारीची गंभीर दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर
जिल्हादंडाधिकारी संतोष काकडे यांनी तत्काळ नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा
विभागाकडून (पीईएसओ) चायनीज फटाक्यांची साठेबाजी करणाऱ्या दुकानदारांवर कोणतीही ठोस
कारवाई होत नसल्याचे सांगून नागपूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व लहान-मोठ्या फटाका गोदामांची
तत्काळ सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे. बाजारपेठेत छुप्या मार्गाने विक्रीसाठी
आलेल्या आणि गोदामांमध्ये साठवलेल्या चायनीज फटाक्यांचा साठा तत्काळ जप्त करून दोषींवर
कडक कायदेशीर कारवाई करावी, सणासुदीच्या काळात सामान्य ग्राहकांची होणारी आर्थिक लूट
थांबवून, त्यांना वाजवी दरात आणि सुरक्षेचे नियम पाळून बनवलेले भारतीय फटाकेच मिळावेत
अशी मागणी ग्राहक दक्षता फाऊंडेशनकडून करण्यात आली आहे.
या निवेदनाची गंभीर दखल घेत अप्पर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी निवेदनातील मुद्द्यांच्या
अनुषंगाने तातडीने योग्य ती नियमानुसार कारवाई करण्याचे आणि केलेल्या कारवाईबाबत ग्राहक
दक्षता कल्याण फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षांना त्यांच्या कार्यालयात अवगत करण्याचे
निर्देश दिले आहेत.
००००
एसआयआर अंतर्गत मतदार नोदंणीसाठी मुदतवाढ
नोंदणीसाठी सर्व विधानसभा मतदारसंघांत
'विशेष मतदार नोंदणी शिबिर'
विशेष शिबिराचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे
नागरिकांना आवाहन
अमरावती, दि.१६
(जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात सध्या 'मतदार याद्यांचा विशेष
सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६' (एसआयआर) राबविण्यात
येत आहे. नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी मिळालेल्या
मुदतवाढीचा फायदा घेता यावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व ८ विधानसभा मतदारसंघांमधील सर्व
मतदान केंद्रांवर १७ आणि १८ तसेच २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ (शनिवार व रविवारी) रोजी
"विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे" आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरांचा लाभ
घेण्याचे जाहीर आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले
आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण - २०२६ च्या सुधारित वेळापत्रकानुसार २६ ऑक्टोबर २०२६
पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहे.मतदार
याद्यांची अंतिम प्रसिद्धी १६ नोव्हेंबर, २०२६ करण्यात येणार आहे. ३६-धामणगाव रेल्वे,
३७-बडनेरा, ३८-अमरावती, ३९-तिवसा, ४०-दर्यापूर, ४१-मेळघाट, ४२-अचलपूर आणि ४३-मोर्शी
या आठही विधानसभा मतदारसंघांतील सर्व पात्र नागरिकांनी, विशेषतः युवा व नवमतदारांनी
या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिबिरामध्ये या सुविधा मिळणार सर्व विधानसभा मतदान केंद्रावर १७, १८, २४ व २५
ऑक्टोबर या चारही दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व मतदान केंद्रांवर
'बीएलओ' प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांचे अर्ज स्वीकारले जाणार आहे. ३१ ऑगस्ट रोजी
प्रसिद्ध झालेली प्रारूप मतदार यादी सर्व मतदान केंद्रांवर उपलब्ध असेल व तिथे नागरिक स्वतःचे व कुटुंबातील सदस्यांचे नाव तपासू
शकतात.
ज्यांचे वय १ ऑक्टोबर २०२६ रोजी १८ वर्षे पूर्ण झाले आहे,अशा नवमतदारांना फॉर्म
क्र. ६ भरून तात्काळ नाव या शिबिरात नोंदवता येणार आहे. मृत अथवा कायमस्वरूपी स्थलांतरित
व्यक्तींचे नाव मतदार यादीतून वगळण्यासाठी फॉर्म क्र. ७ स्वीकारले जाणार आहेत. नावातील,
जन्मतारखेतील किंवा पत्त्यातील दुरुस्तीसाठी आवश्यक पुराव्यांसह फॉर्म क्र. ८ भरून
देता येणार आहे. नागरिक स्वतः voterportal.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा व्होटर
हेल्पलाई ॲप (व्हीएचए) द्वारे देखील ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.
०००००
शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी भातकुली तालुक्यात 3 हजारावर लाभार्थ्यांची ई-केवायसी
पूर्ण
फार्मर आयडी काढण्यास ग्रामपंचायत
स्तरावर पुढाकार
अमरावती, दि.
१६ (जिमाका) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत भातकुली
तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी महसूल,कृषी,ग्राम विकास
आणि सहकार विभागामार्फत विशेष प्रयत्नातून ३ हजार ४८९ लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण
करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थ्यांना ग्राम
महसूल अधिकाऱ्यांमार्फत संबंधित कॉमन सर्व्हिस सेंटरवर (सीएससी) नेऊन फार्मर आयडी तयार
करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच जे लाभार्थी मयत आहेत त्यांना कर्जमाफी करिता तहसील
कार्यालय मार्फत वारस प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू आहे.उर्वरित पात्र लाभार्थ्यांना
तत्काळ ईकेवायसी पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने
केले आहे.
भातकुली तालुक्यात योजनेच्या अंमलबजावणीसाठी महसूल,कृषी, ग्रामविकास,सहकार विभागाकडून
एकत्रित प्रयत्न करण्यात येत असल्यामुळे पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यास
मदत होत आहे.लाभार्थ्यांना कोणतीही अडचण असल्यास
तहसील,कृषी कार्यालय,पंचायत समिती,निबंधक कार्यालयात संपर्क साधता येणार आहे.
००००
.jpg)
.jpg)


.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)


No comments:
Post a Comment