Wednesday, October 21, 2026

DIO NEWS AMRAVATI 21.10.2026

 




मतमोजणीचे पहिले प्रशिक्षण संपन्न

शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी समन्वयाने पार पाडावी

-विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे आवाहन

 

          अमरावती, दि. 21 : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीची मतमोजणी मंगळवार, 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतमोजणी करण्याची प्रक्रिया राहणार आहे. त्यामुळे मतमोजणीला मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांनी शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी समन्वयाने व्यवस्थित पार पाडावी, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी नयना गुंडे यांनी केले.

          विभागीय आयुक्त कार्यालयात आज विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर (वाशिम), प्रविणकुमार देवरे (बुलडाणा), विकास मिना (यवतमाळ), अपर आयुक्त संजय जाधव, सहआयुक्त वासंती माळी, जात पडताळणीचे अध्यक्ष नरेंद्र फुलझेले (बुलडाणा), सोनाप्पा यमगर (यवतमाळ) आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

          विभागीय आयुक्त श्रीमती गुंडे यांनी, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक इतर सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. यातील मतदान हे पसंतीक्रमानुसार द्यावे लागते. त्यामुळे मतमोजणीवेळी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. प्रशिक्षणामुळे मतमोजणीच्यावेळी येणाऱ्या समस्या आणि संकल्पना स्पष्ट होण्यास मदत मिळाली आहे. मतमोजणीसाठी नियुक्तांनी याआधीही कार्य पार पाडले आहे. त्यामुळे त्यांना मतमोजणीची कल्पना आहे. मतदान पसंतीक्रमानुसार होत असल्याने पसंतीक्रम पाहावा. तसेच मतपत्रिकेविषयी शंका असल्यास याबाबत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेणार आहेत.

          मतमोजणीची प्रक्रिया दीर्घ कालावधीसाठी सुरू राहते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी यासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहावे. मतमोजणीसाठी नियुक्तांची दि. 26 ऑक्टोबर रोजी राहण्याची व्यवस्था विश्रामगृह आणि प्रबोधिनी येथे करण्यात आली आहे. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी वेळेपूर्वी केंद्रावर हजर व्हावे. मतपत्रिकांची हाताळणी व्यवस्थितरित्या करावी लागणार आहे. तसेच प्रतिबंध असल्याने मोबाईल व इतर डिजीटल सयंत्र मतमोजणीच्या ठिकाणी आणू नयेत. अशी सुचनाही विभागीय आयुक्तांनी यावेळी केली.

          यावेळी श्रीमती माळी यांनी, मतमोजणीच्या प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनीचे संचालक श्यामकांत म्हस्के यांनी मार्गदर्शन केले.

000000



अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक

पाच जिल्ह्यातील ८१ मतदान केंद्रावर २३ ऑक्टोबर रोजी होणार मतदान

मतदान केंद्रावर २४३ अधिकारी, कर्मचारी बजावणार कर्तव्य

 

अमरावती, दि. २१ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, यासाठी एकूण २६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी मतदारसंघात, विभागातील पाच जिल्ह्यांत ८१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, ३५ हजार ८१० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी अमरावती विभागातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

 

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अमरावती विभागातील ५ जिल्ह्यातील ८१ मतदान केंद्रांवर जवळपास २४३ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ५३ अधिकारी, कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. सर्व मतदान केंद्रावर मतदारांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. मतदारांसाठी मतदानासंबंधीची सर्व माहिती मतदान केंद्राबाहेर उपलब्ध देण्यात आली आहे.

          एका मतदान केंद्रावर ५ याप्रमाणे अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी आणि एक पोलीस कर्मचारी याप्रमाणे अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. सर्व मतदान केंद्राच्या प्रक्रियेचे ‘वेब कास्टींग’ करण्यात येत असून त्याद्वारे कामकाजावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. ८१ मतदान केंद्रासाठी २८ झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मतदार आपला हक्क बजावणार

 विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकुण मतदारांची संख्या ३५ हजार ८१० असून जिल्हानिहाय एकुण मतदारांची संख्या अनुक्रमे पुढील प्रमाणे आहे. अमरावती - १०,०९७, अकोला - ५,९४२, बुलढाणा - ९,१२४, वाशिम - ३,७१५ आणि यवतमाळ - ६,९३२ अशी मतदारांची संख्या आहे. तर जिल्हानिहाय एकुण मतदान केंद्रांची संख्या अनुक्रमे पुढील प्रमाणे आहे. अमरावती - २५, अकोला - १३, बुलढाणा - १८, वाशिम - ७ आणि यवतमाळ - १८ अशी एकुण ८१ केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.

          निवडणुकीसाठी शुक्रवार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार आहे. निवडणूकीसाठी मतदार असलेल्या शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष नैमित्तिक रजा जाहीर करण्यात आली आहे. मात्र निवडणुकीकरीता मतदार असलेल्या खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना ही विशेष नैमित्तिक रजा लागू होत नाही. त्यामुळे अशा मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ४ तासांची विशेष सवलत देण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर मतदान कर्मचारी आणि मतपेट्या आणण्याकरीता व्यवस्था करण्यात आली असून त्याबाबत वाहतुक आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानूसार कार्यवाही केली जाणार आहे. लोकशाही भवन येथे स्थापन करण्यात आलेल्या ‘स्ट्राँग रुम’ मध्ये सर्व मतपेट्या कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात येणार आहेत.

मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरामध्ये सार्वजनिक किंवा खाजगी जागेत ध्वनीवर्धक, लाऊडस्पीकर किंवा अन्य उपकरणाचा वापर करण्यास, ते लावण्यास किंवा चालविण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात त्यांचे बुथ किंवा मंडप उभारता येणार नाहीत तसेच बेकायदेशीर जमाव करणे, प्रचार करणे किंवा मतदारांना अमिष दाखवून प्रभावित करण्यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये कडक प्रतिबंध जारी करण्यात आले आहेत.

या निवडणुकीच्या मतदानानंतर मंगळवार २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अमरावती येथील लोकशाही भवन येथे मतमोजणीची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.

 

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावावा असे आवाहन अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे.

०००००

रविवारी ‘उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमां’तर्गत जिल्ह्यात पायाभूत चाचणी

१४ हजार १८६ असाक्षरांची होणार चाचणी

 

अमरावती, दि. २१ (जिमाका) : केंद्र शासन पुरस्कृत ‘उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमां’तर्गत अमरावती जिल्ह्यात रविवार, २५ ऑक्टोबर रोजी  ‘पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यांकन चाचणी’  आयोजित करण्यात आली आहे. चाचणीसाठी १४ हजार १८६ असाक्षरांनी नोंदणी केली असून, यात ११ हजार ४३९ महिला आणि २ हजार ७४७ पुरुष असाक्षरांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) सतिश मुगल यांनी  दिली आहे.

 

           देशातील १५ वर्षे व त्यावरील वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यात या परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

         ‘पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यांकन चाचणी’ करिता रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:०० ते सायं. ५:०० या वेळेत परीक्षा केंद्र सुरू राहतील. प्रत्यक्ष चाचणी  कालावधी ३ तासांचा असेल. तद दिव्यांग व्यक्तींसाठी ३० मिनिटे अतिरीक्त वेळ दिला जाणार आहे. परीक्षा एकूण १५० गुणांची असेल. यामध्ये भाग-क (वाचन) ५० गुण, भाग-ख (लेखन) ५० गुण, आणि भाग-ग (संख्याज्ञान) ५० गुण अशी गुण विभागणी  असेल.

 

      उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागात स्वतंत्रपणे ३३ टक्के (१७ गुण) मिळवणे अनिवार्य आहे, तसेच एकूण १५० गुणांपैकी किमान ३३ टक्के (५१ गुण) मिळवणे आवश्यक आहे. कोणत्याही एका भागात गुण कमी पडल्यास नियमानुसार जास्तीत जास्त ५ 'ग्रेस गुण' (वाढीव गुण) दिले जातील. मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, कन्नड, तेलगू, तमिळ, बंगाली आदी भाषांतून ही चाचणी पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.

 

       ज्या असाक्षर व्यक्तींची 'उल्हास ॲप'वर ऑनलाइन नोंदणी झालेली नाही, त्यांना चाचणीच्या दिवशीही नोंदणी करून परीक्षा देता येईल. यू-डायस क्रमांकानुसार नोंदणी झालेली प्रत्येक शाळा हेच परीक्षा केंद्र असेल.  परीक्षेस जाताना स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो नोंदणी अर्जावर लावावा तसेच मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा बँक पासबुक या पैकी एक  ओळखपत्र  म्हणून सोबत ठेवणे आवश्यक आहे.

 

         या मूल्यमापन चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या नवसाक्षरांना केंद्रशासनाकडून प्रमाणपत्र/गुणपत्रक देण्यात येणार आहे. शिक्षणाधिकारी  तथा नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे  सदस्य सचिव सतिश मुगल यांनी सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत.

                                            

           ०००००

 

 

एनएमएमएस परीक्षेच्या ऑनलाइन अर्जासाठी तृतीय मुदतवाढ

नियमित शुल्कासह २८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार

 

अमरावती, दि. २१ (जिमाका) : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेसाठी ऑनलाइन शाळा नोंदणी आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली  असून आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in⁠ आणि www.mscenmms.in⁠ संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. २० डिसेंबर २०२६ रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

 

        सुधारित वेळापत्रकानुसार, नियमित शुल्कासह ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याची मुदत २१ ऑक्टोबरहून वाढवून २८ ऑक्टोबर २०२६ अशी करण्यात आली आहे. तसेच विलंब व अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्र भरण्याची अट लागू राहणार नाही, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. २८ ऑक्टोबर २०२६ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, याची नोंद घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून करण्यात आले आहे.

                                            ०००००


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.10.2026

  मतमोजणीचे पहिले प्रशिक्षण संपन्न शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी समन्वयाने पार पाडावी -विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे आवाहन             अमरावत...