51 व्या ग्रंथभेट योजनेसाठी निवडलेल्या पुस्तकांची यादी जाहीर
हरकती नोंदवण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत
अमरावती, दि.19 (जिमाका) : ग्रंथालय संचालनालयाच्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेअंतर्गत 51 व्या ग्रंथभेट योजनेसाठी निवडण्यात आलेल्या पुस्तकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीतील पुस्तकांबाबत सूचना, हरकती, आक्षेप 31 ऑक्टोबर, 2026 पर्यंत ग्रंथालय संचालक कार्यालयात पाठविण्याचे आवाहन, प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.
सन 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या आणि ग्रंथालय संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांमधून राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमिती सदस्यांनी एकूण 1183 ग्रंथांची निवड केली आहे. यामध्ये 685 मराठी, 246 हिंदी आणि 252 इंग्रजी पुस्तकांचा समावेश आहे. ही यादी ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in वर अधिकृत संकेतस्थळावर 16 ऑक्टोबर, 2026 ते 31 ऑक्टोबर, 2026 या कालावधीत सर्वांना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली आहे. सदर ग्रंथ यादीतील पुस्तके ग्रंथालय संचालनालयाच्या 25% ग्रंथसूचीनुसार वितरित करणे बंधनकारक असणार आहे.
या ग्रंथयादीतील कोणत्याही पुस्तकाबाबत सूचना, हरकती, आक्षेप 31 ऑक्टोबर, 2026 पर्यंत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई - ४०० ००१ यांच्याकडे कार्यालयीन वेळेत लेखी स्वरूपात, हस्तबटवड्याने किंवा पोष्टाने पाठवणे आवश्यक आहे. तसेच संकेतस्थळावर दिलेल्या ई-मेल आयडीवरही हे आक्षेप नोंदवता येतील. मुदतीनंतर येणाऱ्या कोणत्याही हरकतींचा किंवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. या यादीतील ग्रंथांचे नाव, लेखक, प्रकाशक आणि किंमत यामध्ये काही बदल किंवा त्रुटी आढळल्यास त्या निदर्शनास आणून दिल्यास त्याचे स्वागतच असेल, असे सांगण्यात आले आहे.
०००००
30 ऑक्टोबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सव
*‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्पनेवर स्पर्धा
अमरावती, दि. 19 (जिमाका): जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे शुक्रवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलमध्ये जिल्हास्तरीय युवा महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवात ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारीत स्पर्धां आयोजित करण्यात येणार आहे.
विकसित भारत युवा नेतृत्व संवाद अंतर्गत स्पर्धा घेण्यात येणार आहे. युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयातर्फे दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. जानेवारी 2027 मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा जिल्हास्तरीय महोत्सव आयोजित केला आहे. यात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, पथनाट्य, चित्रकला, कविता लेखन या स्पर्धा घेण्यात येणार आहे.
यात सहभागी होणाऱ्या युवक-युवतींचे वय 17 ऑगस्ट 2027 रोजी 15 ते 29 वर्षे असावे. इच्छुक स्पर्धकांनी माय भारत पोर्टलवर नोंदणी करणे आणि गुगल फॉर्मद्वारे प्रवेश नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच प्रवेशिकेची हार्ड कॉपी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावी. एक युवक केवळ एकाच स्पर्धा प्रकारात सहभाग घेऊ शकेल. जिल्ह्यातील रहिवासी किंवा जिल्ह्यात शिक्षण घेत असलेले तरुणच या महोत्सवात सहभागी होऊ शकतील. मागील वर्षाच्या सांस्कृतिक विभागातील सहभागी युवकांना यावर्षीच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेता येणार नाही.
प्राविण्य प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांना जिल्हास्तरावर रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे, युवक मंडळे, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था, एनएसएस, भारत स्काऊट अँड गाईड यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
000000


No comments:
Post a Comment