Monday, October 5, 2026

DIO NEWS AMRAVATI 05.10.2026


                                             परिवहनेत्तर (दुचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी

 

नवीन वाहन मालिका सुरू करण्याबाबत आवाहन

 

  अमरावती, दि. 5 (जिमाका): परिवहनेत्तर ( दुचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहित शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज परिवहन कार्यालय, कॅम्प, अमरावती, खिडकी क्रमांक -25 येथे जमा करावेत,असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.

 

             वाहन ज्याच्या नावावर असेल त्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत त्यांच्या पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड जोडावे. तसेच अर्जामध्ये वाहन ज्या व्यक्तीच्या नावे आहे, त्या व्यक्तीचा आधारकार्डला संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. पसंती क्रमांक डिमांड ड्राफ्ट अमरावती, कॅम्प ब्रांच, ट्रेझरी ब्रांच कोड नं 003866 साठी देय असावा.एका पसंती क्रमांकासाठी एकच अर्ज आला असेल, त्यांची व एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आले असतील, त्यांच्या पसंती क्रमांकाची यादी 8 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 4 वाजता कार्यालयातील सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात येईल. एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आलेल्या यादीमधील पसंती क्रमांकांसाठी ज्यांनी अर्ज केला आहे, अशाच अर्जदारांनी 9 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 1.30 वाजेपर्यंत त्या क्रमांकासाठी पसंती क्रमांक शुल्काच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सीलबंद करून खिडकी क्रमांक -25 वर जमा करावे.

 

              एकाच पसंतीक्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज प्राप्त होऊन सिलबंद लिफाफ्यात सादर केलेल्या जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट धारकांनी 9 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 3 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात उपस्थित रहावे. लिलावासाठी उपस्थित राहणा-या अर्जदाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने ओळखपत्र व प्राधिकार पत्रासह हजर रहावे.

 

             कार्यालयात सादर झालेले जादा रक्कमेचे डिमांड ड्राफ्ट अर्जदारासमोर उघडण्यात येतील. ज्या अर्जदाराने जास्त रक्कमेचा ड्राफ्ट सादर केला असेल, त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल व उर्वरित कमी रक्कमेचा ड्राफ्ट संबंधित अर्जदारांना परत देण्यात येईल. तसेच, विहित वेळेत अनुपस्थित अर्जदारांचा कुठलाही प्रकारचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दुरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

0000000

जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात जनजागृती

 

अमरावती, दि. 5 (जिमाका) : जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्ताने   सोमवार, 5 ऑक्टोबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात मानसिक आरोग्याबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

 

 

                4 ते 10 ऑक्टोबर 2026 या कालावधीत जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या औचित्याने जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मानसिक आरोग्याबाबत जनजागृती कार्यक्रम साजरा झाला.

 

यावेळी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमोल गुल्हाने व डॉ. स्वाती सोनोने यांनी उपस्थित रुग्णांना मानसिक आजारांची लक्षणे, उपचार व मानसिक आरोग्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. तसेच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मेश्राम यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आजारांविषयी सविस्तर माहिती देत, मानसिक आजारांकडे दुर्लक्ष न करता वेळेत तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले. मानसिक आरोग्याबाबत समाजामध्ये असलेले गैरसमज दूर करून मानसिक आजारांवरील उपचाराबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

 

या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मेश्राम, डॉ. अक्षय चांदूरकर, डॉ. अमर बोडले, डॉ. ऋषिकेश, डॉ. रचना, डॉ. दीपक ठाकरे यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी व मानसिक आरोग्य विभागातील प्रशिक्षु वैद्यक (इंटर्न) उपस्थित होते.

0000000

निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ ॲपची मंगळवारी विशेष कार्यशाळा

 

            अमरावती, दि. 5 (जिमाका) : लेखा व कोषागारे संचालनालयाने निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी महा-उपलब्धी या मोबाईल ॲपबाबत जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी अमरावती जिल्हा कोषागार कार्यालयात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

             ही कार्यशाळा मंगळवार, दि. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कोषागार कार्यालयातील जिजाऊ सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

 

            ‘महा-उपलब्धी’ॲपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनासंबंधी विविध सेवा जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. निवृत्तीवेतनधारकांना विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरणार आहे. वित्त विभागाचे प्रधान सचिव (ले. व को.) ऑनलाइन उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

 

            कोषागार कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोषागार अधिकारी (निवे.) अमोल इखे यांनी केले आहे.

00000000


No comments:

Post a Comment

निवडणूक विशेष * मंगळवार ६ ऑक्टोबर*

  निवडणूक विशेष * मंगळवार ६ ऑक्टोबर*   *विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी २० उमेदवारांची...