Thursday, April 30, 2026

DIO NEWS AMRAVATI 01.05.2026

 






















जिल्ह्याच्या कृषी-औद्योगिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानावर भर

                  - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

*67 वा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

 

अमरावती , दि. 1 (जिमाका) : शेती व उद्योग क्षेत्रात आधुनिकतेची कास धरीत जिल्ह्याने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी शासनाने अनेक महत्त्वाच्या योजना कार्यान्वित केल्या आहेत.  शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि उद्योग क्षेत्राचा विकास करून जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन सहकार मंत्री  बाबासाहेब पाटील यांनी आज येथे केले.

 

            महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या निमित्ताने  पोलीस मुख्यालय, अमरावती शहर परेड मैदान येथे मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी सहकार मंत्री श्री. बाबासाहेब पाटील  बोलत होते. पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त राकेश ओला, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, उपायुक्त अजय लहाने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

            श्री. पाटील म्हणाले, राज्याच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी  शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. राज्य शासनाने पीक कर्जासाठी २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार असून ही प्रक्रिया लवकरच प्रत्यक्ष सुरू होणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित १ लाख १५ हजार ८६२ शेतकऱ्यांना ७४५ कोटी रुपयांची मदत थेट खात्यात जमा करण्यात आली आहे. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता २ लाख ७१ हजार ७६२ शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला आहे.  कृषी यांत्रिकीकरणासाठी १४.८५ कोटी रुपये खर्चून २ हजार ९८ शेतकऱ्यांना यंत्र व औजारे खरेदीसाठी मदत केली आहे.

 

            मोर्शी आणि वरुड येथील सिट्रस इस्टेटमध्ये आता एआय (AI) आधारित तंत्रज्ञान राबविले जाईल. 

सिंचनासाठी 'प्रती थेंब अधिक पीक' योजनेत ३ हजार ५५९ आणि मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत २ हजार १५३ लाभार्थींची निवड झाली आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत अमरावती जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला असून ही जिल्हावासियांसाठी अभिमानाची बाब आहे.

 

            जिल्ह्याच्या औद्योगिक विकास आणि महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत असल्याचे सांगून सहकार मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, अमरावतीमध्ये 'पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क' आणि विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधेमुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. औद्योगिक वसाहतीत आयटी पार्क आणि आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र आकारास येत आहे. रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत १ हजार ५५ कर्ज प्रकरणे मंजूर झाली असून, यात ६३३ महिला उद्योजिकांचा समावेश आहे. 

 

            आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कल्याण आरोग्य विभागातर्फे महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आणि आयुष्मान कार्ड वाटप सुरू आहे. मेळघाटातील माता-बालमृत्यू दर शून्यावर आणण्यासाठी 'मेळघाट परिक्रमा' उपक्रम राबविला जात आहे. महिलांसाठी 'पिंक ई-रिक्षा', 'आई' योजना आणि 'लाडकी बहीण' योजनेद्वारे आर्थिक सक्षमीकरण केले जात असून, जिल्हा 'बालविवाहमुक्त' करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. 

      

       पर्यटन क्षेत्रात चिखलदरा येथील स्कायवॉक पूर्ण करण्यावर भर दिला जात असून आमझरी गावाची 'मधाचे गाव' म्हणून निवड झाली आहे. तसेच, संत गाडगेबाबांच्या १५० व्या जयंतीनिमित्त 'संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट' विकसित करण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. देशाच्या पहिल्या डिजिटल जनगणनेत नागरिकांनी अचूक माहिती भरून सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पाटील यांनी यावेळी केले. महाराष्ट्र दिनानिमित्त आणि जागतिक कामगार दिनानिमित्त त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

 

पुरस्कार वितरण सोहळा

 

             विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सन 2024-25 या वर्षासाठी 'विशेष जिल्हा युवा पुरस्कार' नाळ चित्रपट फेम बालकलाकार श्रीनिवास  पोकळे,  युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केल्याबद्दल युवक गटातून अमर  वानखडे (तिवसा), युवती गटातून कु. जानव्ही राऊत (नया वाठोडा) तसेच संस्था गटातून श्री. संताजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था (गुरुकुंज आश्रम) यांना सन्मानित करण्यात आले. यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार, व्यसनमुक्ती, रक्तदान आणि आदिवासी विकास क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे.

 

      सन 2025-26 या वर्षासाठी युवक गटात समाजप्रबोधनकार वेदांत मुंदाने (अमरावती), युवती गटात कु. पुजा गुंजरकर (ब्राम्हणवाडा थडी) आणि संस्था गटात स्वामी विवेकानंद विचार मंच (अचलपूर) यांना सन्मानित करण्यात आले.  अचलपूरच्या विवेकानंद विचारमंचने आरोग्य सेवा आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले आहे.

  याशिवाय अपर आयुक्त सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे , सहायक ग्रंथालय संचालक राजेश पाटील, सहायक ग्रंथालय संचालक सुरजकुमार मडावी, अधीक्षक अभियंता मंगेश पाटील, महसूल सहायक मनीषा ढोके, शिक्षिका रितू तळमळे, ग्राम महसूल अधिकारी पवन मुंडे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संजय अंबाडेकर, जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाच्या सुमेधा बारलिंगे, मंजिरी महाजन, संध्या साउरकर, कविता पाचघरे,पोलीस निरीक्षक निलेश गावंडे,  राखीव पोलीस उपनिरीक्षक श्रीधर गुळसुंदरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश श्रीवास, अजय मिश्रा, प्रवीण काळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय पेठे, होमगार्ड सैनिक राजेंद्र शाहाकार, पोलीस हवालदार राजेश कोचे, राजीव बाहेनकर, दीपक सुंदरकर, शंकर बावनकुळे,पंकज गावंडे, उज्ज्वल सामुद्रे, सुरक्षारक्षक शिवकुमार तायडे यांना उत्कृष्ट कार्याबाबत यावेळी गौरविण्यात आले.

 

 

 

 प्रारंभी विविध शासकीय विभागामार्फत परेड संचलन करण्यात आले. मंत्री श्री. पाटील यांनी परेड संचलनाचे निरीक्षण केले.  परेडचे संचलन परेड कमांडर उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे तसेच दुय्यम परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक श्रीधर गुळसुंदरे यांनी केले.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन देशमुख यांनी केले.

 

 ***







 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 01.05.2026

  जिल्ह्याच्या कृषी-औद्योगिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानावर भर                   - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील *67 वा महाराष्ट्र दिन उत...