Tuesday, April 28, 2026

 नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 10 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

*कृषी विभागाची कारवाई

अमरावती, दि. 27 (जिमाका) : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि कृषी निविष्ठांची गुणवत्ता राखण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील कृषी केंद्रांची कसून तपासणी करण्यात येत आहे. यात गंभीर त्रुटी आढळल्याने 10 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर 6 केंद्रांना कडक ताकीद देण्यात आली आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलेल्या भरारी पथकांनी जिल्ह्यातील विविध केंद्रांची तपासणी केली. या तपासणीत ई-पॉस मशीनवरील नोंद आणि दुकानातील प्रत्यक्ष साठा यामध्ये तफावत आढळणे, खतांची छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणे किंवा पक्के बिल न देणे, परवाना नसताना बियाण्यांची साठवणूक करणे किंवा नोंदवही अद्ययावत नसणे, अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांची वाहतूक आणि विक्री करणे आदी बाबी तपासून कारवाई करण्यात आली आहे.

कृषी विभागाने एप्रिल 2026 अखेरपर्यंत 100 टक्के विक्री केंद्रांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. फसवणूक टाळण्यासाठी बियाणे किंवा खते केवळ अधिकृत परवानाधारक केंद्रांकडूनच खरेदी करावीत, खरेदी केल्यानंतर पक्के बिल आवर्जून घ्यावे आणि बियाण्यांच्या पाकिटाचे सील तपासावे, खते खरेदी करताना दुकानदार अनावश्यक उत्पादने (लिंकिंग) घेण्याची सक्ती करत असल्यास तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

शेतकऱ्याची फसवणूक झाली किंवा खतांचा अवाजवी दर आकारला गेल्यास, त्यांनी तात्काळ तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षकांकडे संपर्क साधावा. तक्रारीसाठी कृषी विभागाने ८०८०५३६६०२ हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक देखील जाहीर केला आहे.

0000000

पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डद्वारे पशुपालकांना 3 लाखांपर्यंत अर्थसहाय्य

अमरावती, दि. 27 (जिमाका) : राज्यातील पशुपालकांना आर्थिक बळकटी देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड मोहिम राबविण्यात येत आहे. या योजनेतून पात्र पशुपालकांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्जसुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील यांनी दिली.

राज्यातील पशुपालन, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन व वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पशुधनाच्या देखभालीसाठी व दैनंदिन खर्चासाठी आकर्षक व्याज सवलतीसह कर्ज दिले जाते. ज्यांच्याकडे किसान क्रेडिट कार्ड नाही, त्यांना 1.60 लाख रुपयांपर्यंत विनातारण कर्ज उपलब्ध होणार असून दूध संस्थेची हमी असल्यास ही मर्यादा 3 लाख रुपयांपर्यंत वाढवता येते. ज्या पशुपालकांकडे आधीच किसान क्रेडिट कार्ड आहे, त्यांनाही पतमर्यादा वाढवून 3 लाख रुपयांपर्यंत लाभ घेता येणार आहे.

कर्जाचा मूळ व्याजदर 9 टक्के असला तरी नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून 3 टक्के व राज्य शासनाच्या 11 फेब्रुवारी 2025 च्या निर्णयानुसार 4 टक्के अशी एकूण 7 टक्क्यांपर्यंत व्याज सवलत मिळते. बँकांकडूनही 2 टक्के सवलत दिल्याने नियमित परतफेड करणाऱ्या पशुपालकांना शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळू शकतो. सन 2026-27 पासून मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेंतर्गतही या कार्डद्वारे खेळते भांडवलाचा लाभ मिळणार आहे. राज्यातील 10 लाख पात्र पशुपालकांना या योजनेच्या कक्षेत आणण्याचे उद्दिष्ट विभागाने ठेवले आहे.

दूध सोसायटी, दूध संघ किंवा दूध उत्पादक कंपनीचे सभासद असलेले व अद्याप योजनेचा लाभ न घेतलेले पशुपालक या मोहिमेसाठी पात्र असून जिल्ह्यात पशुसंवर्धन उपआयुक्त हे योजनेचे संनियंत्रण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सध्या पशुपालन करणाऱ्या व लाभ न घेतलेल्या सर्व पात्र पशुपालकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

योजनेसाठी प्रकल्प धारकाने केंद्र, राज्य शासन किंवा जिल्हा परिषदेच्या अन्य अनुदान योजनांचा लाभ घेतलेला नसावा. सर्व पशुधनाची एनडीएलएम पोर्टलवर नोंद आवश्यक आहे. व्याज सवलत ही ठराविक किमान पशुधन संख्या असलेल्या पशूपालकांनाच लागू राहील. यामध्ये 25 हजार मांसल कुक्कुट पक्षी किंवा 50 हजार अंडी उत्पादक पक्षी, 45 हजार क्षमतेचे हॅचरी युनिट, 100 पर्यंत दुधाळ जनावरे, 500 पर्यंत मेंढी किंवा शेळी गट व 200 पर्यंत वराह यांचा समावेश आहे.

घेतलेल्या कर्जाची परतफेड कर्ज उचल केल्याच्या तारखेपासून एका वर्षाच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच योजनेच्या अटी व निकषांनुसार वेळोवेळी होणाऱ्या बदलांचे पालन करणे लाभार्थ्यांसाठी बंधनकारक राहील.

पशूधन संकल्पनेसाठी आर्थिक अडचण येऊ नये व ग्रामीण भागात पशुधन व्यवसायाला चालना मिळावी, यासाठी पात्र पशुपालकांनी आपल्या नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात, दूध संस्था किंवा 1962 या हेल्पलाईनवर संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे.

0000000


13 अवैध तंबाखू विक्रेत्यांकडून दंड वसूल

अमरावती, दि. 27 (जिमाका): शहरातील सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी आणि तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शहराच्या मुख्य बाजारपेठेत कारवाई करण्यात आली. या कारवाईत 13 अवैध तंबाखू विक्रेत्यांकडून दंड वसूल करण्यात आला.

जिल्हा सामान्य रुग्णालयाचा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सिटी कोतवाली पोलीस स्टेशन आणि संभाजीनगर येथील मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबवली. शहरातील गांधी चौक, अंबादेवी मंदिर परिसर, राजकमल चौक आणि श्याम चौक या ठिकाणी ही तपासणी करण्यात आली. यावेळी तंबाखू नियंत्रण कायदा 2003 मधील कलम 4 सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी आणि कलम 6 अ मध्ये 18 वर्षांखालील मुलांना तंबाखू विक्री करण्यास बंदी याचे उल्लंघन करणाऱ्या अवैध विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत 13 विक्रेत्यांकडून 4 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरात तंबाखू विक्री करणाऱ्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई सुरूच राहणार आहे.

00000

 

 

अमरावतीत 2 मे पासून उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

अमरावती, दि. 27 (जिमाका) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे सन २०२६-२७ या वर्षासाठी ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या दि. 2 मे पासून हे शिबीर सुरू होणार असून दि. 15 मेपर्यंत चालणार आहे.

सदर शिबिर हे दि. २ मे पासून सुरू होणार असून सकाळी ६ ते ८ आणि सायंकाळी ५.३० ते ७ वाजेपर्यंत चालणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल आहे. या शिबिरात एकूण १५ हून अधिक क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. तसेच व्हॉलीबॉल, सॉफ्टबॉल, बॅडमिंटन आणि धनुर्विद्या या ४ खेळांचे प्रशिक्षण राज्य शासनाच्या एनआयएस गुणवत्ताधारक प्रशिक्षकांमार्फत विनामूल्य दिले जाणार आहे. याव्यतिरिक्त तलवारबाजी, बास्केटबॉल, स्क्वॅश, नेटबॉल, शुटींगबॉल, मल्लखांब, टेबल टेनिस, थ्रोबॉल, स्केटींग, कुडो आणि बॉक्सिंग या खेळांचेही प्रशिक्षण दिले जाईल. जिल्हा क्रीडा संकुल, विभागीय क्रीडा संकुल, श्री गणेशदास राठी विद्यालय, गुरुकुल विद्यालय, नांदगाव खंडेश्वर, जय बजरंग व्यायामशाळा, तोगंलाबाद, दर्यापूर आणि इतर तालुका क्रीडा संकुलांमध्ये हे प्रशिक्षण वर्ग चालणार आहेत.

शिबिरादरम्यान खेळाडूंना आहार, दुखापतीवरील इलाज, फिजीओथेरेपी आणि क्रीडा मानसशास्त्र या विषयांवरही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. इच्छुक खेळाडूंनी प्रवेश अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे जमा करावेत. अधिक माहितीसाठी व्हॉलीबॉल - राहुल निवडंगे ७७७४००१५७९, सॉफ्टबॉल - स्वप्नील चांदेकर ९७६७०००९४९, बॅडमिंटन - रितेश अनंतवार ८६६९०८४१४२, धनुर्विद्या (आर्चरी) - प्रफुल्ल डांगे ९९२३००८४११, वेदांत वानखडे ७४९९०९२३१२ यांच्याशी संपर्क साधता येईल.

खेळाडूंच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या संधीचा अमरावती जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000

मातंग समाजासाठी सोमवारी विशेष कार्यशाळा

अमरावती, दि. 27 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातर्फे मातंग समाज व तत्सम बारा पोट जातीतील वंचित घटकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सोमवार, दि. 4 मे रोजी दुपारी 11 वाजता सामाजिक न्याय भवनात होणार आहे.

कार्यशाळेत मातंग समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्या येणार आहे. समाजातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योजना फायदेशीर ठरत असल्याने यावेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मातंग समाजातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एम. टी. खडसे यांनी केले आहे.

00000

दिव्यांगांना तालुकास्तरावरच मिळणार दिव्यांग प्रमाणपत्र

अमरावती, दि. 27 (जिमाका) : जिल्ह्यातील दिव्यांगांच्या सोयीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही. ही सुविधा लवकरच तालुकास्तरावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

उपजिल्हा रुग्णालय अचलपूर, धारणी, मोर्शी, दर्यापूर आणि ग्रामीण रुग्णालय चांदूर बाजार, तिवसा येथे कायमस्वरूपी दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव 'आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे' यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच संबंधित केंद्रांना 'युडीआयडी' पोर्टलचे लॉगिन आयडी व पासवर्ड दिले जातील. त्यानंतर तालुकास्तरावरच प्रमाणपत्र वाटप सुरू होईल.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत सन २०२२ ते २०२५ या कालावधीत आयोजित शिबिरांद्वारे एकूण २ हजार ४७३ दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील दिव्यांगांना अमरावती शहरात येण्या-जाण्याचा होणारा त्रास आणि खर्च वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दिव्यांग प्रमाणपत्र, आजाराचे प्रमाणपत्र किंवा वृद्धांच्या वयाचा दाखला देण्यासाठी शासन स्तरावरून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. ही प्रक्रिया पूर्णतः मोफत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही दलालांच्या आमिषाला बळी पडू नये. कोणी पैशांची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांच्याकडे तक्रार करावी, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी कळविले आहे.

00000

डाक विभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

अमरावती, दि. 27 (जिमाका) : भारतीय डाक विभाग, अमरावती विभागांतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

या सोहळ्याला नागपूर परिक्षेत्राचे डाक सेवा संचालक डॉ. सुधीर जाखरे उपस्थित होते. अमरावती डाक विभागाचे प्रवर अधीक्षक श्री. गेडाम अध्यक्षस्थानी होते.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये टपाल विभागाच्या विविध सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी 'अतिविशिष्ट' कामगिरी केली, अशा गुणवंतांचा डॉ. सुधीर जाखरे यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि पदक देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी डॉ. जाखरे यांनी, प्रत्येक कर्मचारी हा विभागाचा कणा आहे. तांत्रिक युगात ग्राहकांना अधिक दर्जेदार आणि गतिमान सेवा देण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे, असे आवाहन केले. प्रवर अधीक्षक श्री. गेडाम यांनी देखील कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले.

000000

सोमवारी जिल्हा महिला लोकशाही दिन

अमरावती, दि. 27 (जिमाका) : मे महिन्याचा जिल्हा लोकशाही दिन सोमवार, दि. 4 मे रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 28.04.2026

  जिल्हा युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी होणार मान्यवरांच्या हस्ते गौरव अमरावती, दि. 28 (जिमाका): सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण...