सोमनाथ वारसा ७५ वर्षांचा…
Official Blogger Account of District Information Office, Amravati DGIPR, Government of Maharashtra
Sunday, May 10, 2026
सोमनाथ वारसा ७५ वर्षांचा… प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही पवित्र भूमी भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाची गौरवशाली साक्ष देत आहे. या सुवर्णक्षणाचे साक्षीदार बना…
Friday, May 8, 2026
DIO NEWS AMRAVATI 08-05-2026
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा
अमरावती, दि.
8 (जिमाका) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवार, दि. 9 मे, रोजी जिल्ह्याच्या
दौऱ्यावर येत आहेत.
दौऱ्यानुसार
पालकमंत्री श्री. बावनकुळे हे दुपारी 2 वाजता मोटारीने नागपूर येथून अमरावतीकडे प्रयाण
करतील. दुपारी 4.30 ते 6.30 वाजता जिल्हा परिषद कार्यालय, अमरावती येथे राखीव. सायंकाळी
7 वाजता मोटारीने अमरावती येथून नागपूरकडे प्रयाण करतील.
000000
जलयुक्त शिवार अभियान 2.0: अमरावती
जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना गती;
597 कामांना प्रशासकीय मान्यता
अमरावती, दि. 8 (जिमाका):पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आणि जिल्ह्याची
सिंचन क्षमता वाढवण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'जलयुक्त शिवार अभियान
2.0' अमरावती जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पावसाचे पाणी
अडवणे, भूजल पातळी वाढवणे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आणि जमिनीचा पोत सुधारणे
या त्रिसूत्रीवर भर देण्यात येत असून या उन्हाळ्यात विविध यंत्रणांमार्फत मोठ्या प्रमाणावर
कामांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली
विशेष निधीतून जिल्ह्यातील विविध यंत्रणांना 597 कामांसाठी प्रशासकीय मान्यता प्रदान
करण्यात आली आहे. यामध्ये भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत 603 कामांसाठी 5 कोटी 15 लाख
रुपये, मृद व जलसंधारण विभाग (जिल्हा परिषद) अंतर्गत 11 कामांसाठी 1 कोटी 69 लाख रुपये,
तर मध्यम व लघु पाटबंधारे विभाग अचलपूर अंतर्गत 4 कामांसाठी 1 कोटी 28 लाख रुपयांच्या
कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यावर्षी अभियानाला अतिरिक्त प्रोत्साहन देऊन जास्तीत
जास्त कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. पाणी साठवणुकीच्या
नवीन सुविधा निर्माण झाल्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ होणार असून, याचा थेट फायदा जिल्ह्यातील
शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्यासाठी होणार आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी
अमरावती जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभाग पूर्ण तत्परतेने हे अभियान राबवित आहेत.
000000
चिखलदरा तालुक्यातील विकासकामांचा
जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा;
मडकी येथे पर्यटन विकासासह जलसंधारणावर
भर
अमरावती, दि. ८ (जिमाका):जिल्हाधिकारी
आशिष येरेकर यांनी चिखलदरा तालुक्यातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी
केली. नुकत्याच झालेल्या दौऱ्यादरम्यान त्यांनी सुरू असलेल्या कामांचा दर्जा तपासून
सर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले. मडकी (ता. चिखलदरा)
येथे जिल्हा वार्षिक योजना आदिवासी उपाययोजना अंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट नाला बांधकामाची
पाहणी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केली. यावेळी त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण
झालेल्या विहीर व पाण्याच्या टाकीची तसेच अस्तित्वातील पाणीपुरवठा योजनांची सविस्तर
माहिती घेतली. मडकी येथील भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक सरपंच व ग्रामस्थांशी
संवाद साधताना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. जलसंधारणाची कामे केवळ पाणी साठवण्यापुरती
मर्यादित न ठेवता, त्यांचा उपयोग पर्यटन वाढीसाठी आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी करावा,
जेणेकरून पर्यटकांना आकर्षित करून स्थानिक रोजगार वाढवता येईल, असे त्यांनी यावेळी
सांगितले.
तसेच यावेळी मौजे कोहाणा येथे मृद व जलसंधारण
विभागामार्फत सुरू असलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याच्या (K.T. Weir) कामाचीही
पाहणी करण्यात आली. हे काम तांत्रिक निकषांनुसार आणि दर्जेदार करण्याच्या सूचना त्यांनी
यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले की, सर्व विकासकामे ही नियोजनबद्ध
आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन असावीत. जलसंधारणाच्या दर्जेदार कामांमुळे भूजल पातळीत
वाढ होऊन त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना सिंचनासाठी होईल. पाणीटंचाई दूर करण्यासोबतच
ही ठिकाणे पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाल्यास परिसराचा आर्थिक कायापालट होण्यास मदत
होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या पाहणी दौऱ्यात जिल्हा प्रशासनातील
विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, अभियंता व कर्मचारी उपस्थित होते.
0000000
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 10 उमेदवारांची अंतिम निवड
अमरावती, दि. 8 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार
व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक
जिल्हा कार्यालयात 'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा' संपन्न झाला. या मेळाव्यात
180 उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन 10 जणांची अंतिम, तर 46 उमेदवारांची प्राथमिक
निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी कौशल्य विकास अधिकारी
अभिषेक ठाकरे, सुभाष गुल्हाने, कृपा अर्गुलेवर, संदीप यादव, पंकज कचरे उपस्थित होते.
मेळाव्यात प्रेसिजन मॅपिंग, आशिष एंटरप्रायजेस, श्रीराम लाईफ इन्शुरन्स, हैदराबाद सिक्युरिटी,
एच.आर. जाधव मेअर्स आणि एल.आय.सी. या सहा नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या मेळाव्यातील एकूण 84 रिक्त पदांसाठी 210 उमेदवारांनी
नोंदणी केली होती. त्यापैकी प्रत्यक्ष उपस्थित राहिलेल्या 180 उमेदवारांच्या कंपनी
प्रतिनिधींनी मुलाखती घेतल्या. मुलाखतीअंती पात्रतेनुसार 46 उमेदवारांची प्राथमिक तर
10 उमेदवारांची विविध पदांवर थेट अंतिम नियुक्ती करण्यात आली.
0000000
मोथा येथे गावकऱ्यांच्या सुविधेसाठी शुद्ध पाणीपुरवठ्याचे नियोजन;
ग्रामपंचायतीकडून पारंपारिक जलस्रोतांचे जतन व सक्षमतेवर भर
अमरावती, दि. 8 (जिमाका): दुर्गम भागातील नागरिकांना
शुद्ध पाणीपुरवठा व्हावा आणि त्यांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे, यासाठी मोथा ग्रामपंचायत
व स्थानिक प्रशासनामार्फत विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे. चिखलदरा तालुक्यातील
मोथा येथे गावकऱ्यांची सोय व स्थानिक भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन पाणीपुरवठा अधिक
लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात आहे.
मोथा गावामध्ये सद्यस्थितीत गाव तलावातील विहिरीवरून
पाण्याच्या टाकीद्वारे घरोघरी नळ कनेक्शन देऊन पाणीपुरवठा केला जातो. या पाण्याचे नियमित
क्लोरिनेशन करून ते निर्जंतुक केले जाते. मात्र, मुख्य विहीर तलावामध्ये असल्याने पावसाळ्यात
किंवा नैसर्गिक कारणांमुळे पाणी गढूळ येण्याची शक्यता लक्षात घेऊन, गावकरी हे पाणी
पिण्याव्यतिरिक्त इतर घरगुती वापरासाठी प्राधान्याने वापरत आहेत.
गावकऱ्यांचे
आरोग्य निरोगी राहण्यासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी गावालगत असणाऱ्या दुसऱ्या
विहिरीचे स्वच्छ पाणी वापरण्याची येथील नागरिकांची पूर्वापार परंपरा आहे. ही विहीर
स्वच्छ पेयजलाचा एक उत्तम नैसर्गिक पर्याय ठरली आहे. सद्यस्थितीत या दुसऱ्या विहिरीची
पाणी साठवण क्षमता संपूर्ण गावाला नळ जोडणीद्वारे पुरवण्याइतकी पुरेशी नसली, तरी गावकऱ्यांची
पिण्याच्या पाण्याची अडचण दूर करण्यासाठी हा पारंपरिक जलस्रोत अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
लोकभावनांचा आदर करत आणि गावकऱ्यांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवून त्यांना गावातच
सुरक्षित पेयजल उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आगामी काळात विशेष प्रयत्न करणार आहे.
000000
- जिल्हाधिकारी आशिष येरेकर
कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या गरीब कुटुंबांना स्वतःच्या हक्काचे घर
आणि
मालकी हक्क मिळण्यास मदत होणार
अमरावती, दि. 8 (जिमाका) : अमरावती महानगरपालिकेच्या
हद्दीतील शासकीय जमिनीवरील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असलेल्या निवासी अतिक्रमणांना
नियमित करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महानगरपालिका
क्षेत्रातील मारुती नगर (पेठ अमरावती), सातुर्णा (जुने गावठाण) आणि महाजनपुरा या भागांतील
एकूण 77 कच्चे बांधकाम असलेल्या घरकुलांचे मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्याचा मार्ग
आता मोकळा झाला असल्याचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जाहीर केले आहे. या निर्णयामुळे
अनेक वर्षांपासून कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या गरीब कुटुंबांना स्वतःच्या हक्काचे घर
आणि मालकी हक्क मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने 25 मार्च
2026 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, राज्यातील शासकीय जमिनींवरील दि. 1 जानेवारी
2011 पर्यंतची निवासी अतिक्रमणे काही विशिष्ट अटींवर नियमित करण्याचा धोरणात्मक निर्णय
घेण्यात आला आहे. याच धोरणाची अंमलबजावणी आता अमरावती महानगरपालिका क्षेत्रात टप्प्याटप्प्याने
सुरू करण्यात येत आहे.
शासकीय नियमांनुसार, ज्या नागरिकांनी 1 जानेवारी
2011 पूर्वी शासकीय जमिनीवर निवासी उद्देशाने अतिक्रमण केले आहे, तेच या योजनेसाठी
पात्र ठरतील. यामध्ये कमाल 1500 चौ. फूट क्षेत्रापर्यंतची अतिक्रमणे नियमित केली जाणार
असून, त्यातील 500 चौ. फुटांपर्यंतचे क्षेत्र नागरिकांना पूर्णपणे मोफत (विनामूल्य)
दिले जाणार आहे. त्यावरील अतिरिक्त क्षेत्रासाठी शासनाने ठरवून दिलेले विहित शुल्क
(कब्जेहक्क रक्कम) भरावे लागेल. शुल्क भरल्यानंतर संबंधित पती-पत्नीच्या संयुक्त नावाने
'भोगवटादार वर्ग-2' म्हणून अधिकृत मालकी हक्काचे आदेश प्रशासनाकडून निर्गमित केले जातील.
या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि सुरक्षिततेचा
विचार करून काही कडक निकषही लावण्यात आले आहेत. नदीपात्र, नाले, रस्ते, पुराची निळी
किंवा लाल रेषा, वन जमीन, विविध कारणांसाठी आरक्षित ठेवलेल्या जागा आणि प्रतिबंधित
क्षेत्रातील कोणत्याही अतिक्रमणांना या योजनेअंतर्गत नियमित केले जाणार नाही, असे जिल्हाधिकारी
श्री. येरेकर यांनी स्पष्ट केले आहे.
या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेताना नागरिकांची
फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे
की, या संपूर्ण प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवली जात आहे. कोणत्याही नागरिकाने पट्टे
मिळवण्यासाठी किंवा मंजुरीसाठी कोणत्याही मध्यस्थावर विश्वास ठेवू नये. अधिकृत व अचूक
माहितीसाठी थेट अमरावती महानगरपालिकेच्या मुख्यालय स्तरावरील 'सहाय्यक संचालक नगर रचना
विभाग' अथवा संबंधित झोन स्तरावरील 'सहाय्यक आयुक्त' यांच्याशी थेट संपर्क साधावा.
00000
अमरावतीच्या राज्य सेवाहक्क आयुक्तपदी अरुण डोंगरे यांची नियुक्ती
मंगळवारी मुंबई येथे पद व गोपनीयतेची शपथ
अमराती दिनांक
8: राज्य सेवाहक्क आयोगाच्या अमरावती विभागाचे आयुक्त म्हणून म्हाडाचे सेवानिवृत्त
मुख्य अधिकारी तथा वरिष्ठ सनदी अधिकारी अरुण डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सेवाहक्क आयुक्त म्हणून राज्यपालांच्या वतीने आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार
श्रीवास्तव मंगळवार दिनांक 12 मे रोजी राज्य सेवाहक्क आयुक्त म्हणून त्यांना पद व गोपनीयतेची
शपथ देणार आहेत.
मुंबई येथील म्हाडाच्या बिल्डिंग रिपेअर अँड री कन्स्ट्रक्शन
बोर्डाचे मुख्य अधिकारी म्हणून अरुण डोंगरे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर शासनाने त्यांची
सेवाहक्क आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. शासकीय सेवेत सर्वसामान्य जनतेला न्याय
मिळावा या सामाजिक बांधीलकीने त्यांनी काम केले असून, शासकीय सेवेची सुरुवात उपजिल्हाधिकारी
तथा उपविभागीय अधिकारी मंगरूळपीर येथून झाली आहे. अमरावती विभागात मूर्तिजापूर, दारव्हा,
अचलपूर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केल्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी अमरावती
तसेच महसूल उपायुक्त अमरावती व नागपूर या पदावरही काम केले आहे.
अमरावती महापालिका आयुक्त म्हणून शहराच्या सर्वांगीण
विकासासोबतच ऑनलाइन इमारत परवाना पद्धत लागू केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला
घर बांधणीसाठी सुलभपणे परवानगी मिळत आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी असताना स्वच्छ भारत अभियानात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस व अभिनेते अभिताभ बच्चन यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता. यशवंत
पंचायतराज अभियानातही त्यांना राज्यात द्वितीय क्रमांक मिळाला आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी
या पदावर काम करताना जलयुक्त शिवार ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली.
या योजनेचा
राज्यस्तरावर गौरव करण्यात आला. शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे मुख्य कार्याधिकारी
तसेच शासनाच्या विविध विभागात त्यांनी यशस्वीपणे सेवा दिली आहे. मुंबई येथील म्हाडामध्ये
मुख्याधिकारी असताना इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांचा हक्क अबाधित राहावा,
त्यांना वेळेत भाडे मिळावे व इमारतीचे नियोजित वेळेत बांधकाम करून पुनर्वसन करण्यासंदर्भातील
महत्त्वपूर्ण शासन निर्णय त्यांच्या कार्यकाळात निर्गमित करण्यात आला. त्यांच्या प्रभावी
व उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांची अमरावतीचे राज्य सेवाहक्क आयुक्त म्हणून
नियुक्ती केली आहे.
Thursday, May 7, 2026
DIO NEWS AMRAVATI 07-05-2026
सतर्क यंत्रणेची धडक कारवाई: अमरावतीत होणारा बालविवाह
ऐनवेळी रोखला
अमरावती, दि. 7 (जिमाका): जिल्ह्यात बालविवाह
प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत, प्रशासनाने एका अल्पवयीन बालिकेचा
विवाह रोखून तिचे भविष्य वाचविले आहे. 5 मे 2026 रोजी चाईल्ड हेल्पलाईन (1098) आणि
जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ही यशस्वी कारवाई करण्यात आली.
दुसऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन
मुलीचा विवाह अमरावती शहरात लावला जाणार असल्याची गुप्त माहिती चाईल्ड हेल्पलाईनला
मिळाली होती. या माहितीच्या आधारे यंत्रणांनी तातडीने तपास केला असता, संबंधित मुलगी
अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबाने
हा विवाह ठरविला होता. पथकाने बालिकेच्या घरी धाड टाकली तेव्हा तेथे साखरपुड्याचा कार्यक्रम
आणि विवाहाची तयारी जोरात सुरू होती. सुरुवातीला नातेवाईकांकडून काही प्रमाणात विरोध
झाला, मात्र बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देऊन आणि कायदेशीर कारवाईचा इशारा
दिल्यानंतर वातावरण निवळले.
संबंधित बालिकेला ताब्यात घेऊन बालकल्याण समितीसमोर
हजर करण्यात आले असून, सध्या तिला संरक्षणासाठी बालगृहात दाखल करण्यात आले आहे. तसेच
पालकांकडून भविष्यात बालविवाह न करण्याबाबत लेखी हमीपत्र घेण्यात आले आहे. नागरिकांनी
आपल्या परिसरात असे प्रकार आढळल्यास त्वरित १०९८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे
आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांनी केले आहे. तसेच बालविवाहास प्रोत्साहन
देणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
संजय गट यांनी दिला आहे.
000000
सहकारी
संस्थांच्या निवडणूक निर्णय अधिकारी निवडीसाठी
31
मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 7 (जिमाका): राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे
यांच्याद्वारे जिल्ह्यातील 'क' व 'ड' वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पाडण्यासाठी
निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्राधिकृत अधिकाऱ्यांची 2026 ते 2029 या कालावधीसाठी नामतालिका
तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेअंतर्गत, सहकार कायदा,
निवडणूक नियम आणि संबंधित कामकाजाचा पुरेसा अनुभव असलेल्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज
मागविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने शासकीय विभागातील सेवानिवृत्त अधिकारी व
कर्मचारी, तसेच अर्बन बँक फेडरेशन, पतसंस्था फेडरेशन, साखर कारखाना महासंघ यांसारख्या
स्तरावरील फेडरल संस्थांमध्ये कार्यरत किंवा सेवानिवृत्त असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा
समावेश करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, अनुभवी वकील, सनदी प्रमाणित लेखापरीक्षक
(CA), स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सेवानिवृत्त शिक्षक आणि खाजगी अनुदानित शाळांमधील
सेवानिवृत्त शिक्षकही या पदासाठी पात्र ठरू शकतील.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील
अर्ज आणि प्रतिज्ञापत्र दिनांक 31 मे 2026 पर्यंत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,
अमरावती, सहकार संकुल, कांता नगर या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करणे बंधनकारक
आहे. या निवडीबाबतच्या सविस्तर अटी, शर्ती आणि अर्जाचा नमुना राज्य सहकारी निवडणूक
प्राधिकरणाच्या (http://scea.maharashtra.gov.in) आणि सहकार आयुक्त कार्यालयाच्या
(http://sahkarayukta.maharashtra.gov.in) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात
आला आहे. उमेदवारांनी विहित मुदतीत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक
कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
00000
Wednesday, May 6, 2026
DIO NEWS AMRAVATI 06-05-2026
जिल्ह्यातील नागरिकांनी 'स्व-गणना' करावी
-जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन
*1 मे पासून डिजिटल जनगणनेला सुरुवात
अमरावती, दि. 06 (जिमाका) : जिल्ह्यामध्ये 1 मेपासून स्व-जनगणनेच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. यावेळची जनगणना पूर्णपणे डिजिटल माध्यमाद्वारे होणार असून, नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरण्याची म्हणजेच 'स्व-गणना' करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
यावेळच्या जनगणनेमध्ये दि. 1 ते 15 मे कालावधीत नागरिक स्वतःची नोंदणी करू शकतील. नागरिकांनी se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपला मोबाईल क्रमांक नोंदवून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. यात साधारणपणे 30 प्रश्न विचारले जातील, ज्यांची उत्तरे देऊन नागरिक स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची माहिती भरू शकतील. ही माहिती भरल्यानंतर एक 'SE-ID' (Self-Enumeration ID) जनरेट होईल, जो नागरिकांना जपून ठेवावा लागेल. हा आयडी प्रत्यक्ष जनगणना करण्यासाठी आलेल्या प्रगणकाला द्यावा लागणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः स्व-गणना केली आहे. या प्रक्रियेसाठी केवळ दोन मिनिटांचा वेळ लागला आहे. नागरिकांनाही वेळ काढून या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. दि. 15 मेनंतर, म्हणजेच दि. 16 मेपासून प्रशासनातर्फे नियुक्त केलेले प्रगणक घरोघरी येऊन नागरिकांनी भरलेल्या माहितीची पडताळणी करणार आहेत. डिजिटल जनगणनेच्या या सुविधेमुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुटसुटीत होणार आहे.
0000000
नवीन कामगार संहिता नियमावलीवर हरकती व सूचना
नोंदवण्याचे कामगार उप आयुक्तांचे आवाहन
अमरावती, दि. 06 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागामार्फत राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी नवीन कामगार संहितांच्या नियमावलीची घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत औद्योगिक संबंध संहिता आणि वेतन संहिता यांबाबतच्या अधिसुचना दि. 28 आणि 30 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या प्रस्तावित नियमावलीबाबत संबंधित व्यक्ती, कामगार संघटना आणि भागधारकांनी आपल्या हरकती व सूचना विहित मुदतीत नोंदवाव्यात, असे आवाहन अमरावती विभागाचे कामगार उप आयुक्त चं. अं. राऊत यांनी केले आहे.
औद्योगिक संबंध संहिता आणि वेतन संहिता यांसारख्या महत्त्वाच्या नियमांबाबत हरकती नोंदवण्यासाठी 45 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ज्या नागरिकांना किंवा संघटनांना या नियमावलीबाबत काही बदल सुचवायचे असतील, त्यांनी आपल्या सूचना लेखी स्वरूपात 'कामगार आयुक्त कार्यालय, कामगार भवन, बांद्रा-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई - 400 051' या पत्त्यावर पाठवाव्यात. तसेच, mh.labourcodes@gmail.com
00000000
पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 8 मे रोजी:
जिल्ह्यातील तरुणांसाठी नोकरीची संधी
अमरावती, दि. 6 (जिमाका): जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (मॉडेल करिअर सेंटर), अमरावती यांच्या वतीने शुक्रवार, दि. 8 मे 2026 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात श्रीराम इन्शुरन्स लि. (अमरावती), गार्डियन ट्रेनिंग अकादमी आणि सिक्युरिटी प्रा. लि. (हैदराबाद) यांसारख्या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून विविध पदांसाठी मुलाखती घेणार आहेत. पात्र उमेदवारांना निवडीनंतर लगेचच नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल.
इच्छुक उमेदवारांनी आपल्या अद्ययावत बायोडाटा, पासपोर्ट फोटो आणि आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, डेपो रोड, अमरावती येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. या मेळाव्यासाठी कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही. अधिक माहितीसाठी कार्यालयीन दूरध्वनी ०७२१-२५६६०६६ किंवा ८९८३४१९७९९/ ८६०५६५४०२५ या क्रमांकावर अथवा amravatirojgar@gmail.com
00000000
नागरिकांनी जनगणना २०२७’ या प्रक्रियेत सहभागी होऊन स्व-गणना करावी व जास्तीत जास्त संख्येने जनगणनेचा भाग व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी #आशिष_येरेकर यांनी केले आहे.
Tuesday, May 5, 2026
DIO NEWS AMRAVATI 05-05-2026
मेळघाटात बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात 'निसर्ग अनुभव' उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद;
33 वाघ आणि शेकडो वन्यजीवांचे पर्यटकांना दर्शन
अमरावती, दि. 5 (जिमाका): निसर्ग प्रेमी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते, असा 'निसर्ग अनुभव' उपक्रम 1 मे 2026 रोजी बुद्ध पौर्णिमेच्या पर्वावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पात उत्साहात पार पडला. पौर्णिमेच्या लख्ख चांदण्यात सलग 12 तास घनदाट वनातील 264 मचाणांवर रात्रभर बसून पाणवठ्यावर येणाऱ्या वन्य प्राण्यांच्या निरीक्षणाचा थरारक अनुभव निसर्गप्रेमींनी मनमुरादपणे लुटला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अकोट, गुगामल, सिपना, मेळघाट वन्यजीव, अकोला आणि पांढरकवडा या सहा वन्यजीव विभागांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमासाठी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, यवतमाळ, औरंगाबाद, अकोला, अमरावती या जिल्ह्यांसह मध्य प्रदेश आणि तेलंगणा राज्यातूनही पर्यटकांनी मोठ्या संख्येने गुगल फॉर्मद्वारे नोंदणी केली होती.
या रोमांचक मोहिमेत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रात 30 वाघ, 16 बिबट, 110 अस्वल, 413 रानगवा, 856 सांबर आणि 121 नीलगाय या वन्यजीवांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. तसेच पांढरकवडा वन्यजीव विभागात 3 वाघ, 2 बिबट, 164 रानडुक्कर, 25 अस्वल, 67 नीलगाय व 153 चितळ दिसून आले. अकोला वन्यजीव विभागातही 16 बिबट, 25 अस्वल, 2 तडस, 23 कोल्हा, 60 रानडुक्कर, 202 चितळ आणि 365 नीलगाय असे वैविध्यपूर्ण वन्यजीव पर्यटकांच्या दृष्टीस पडले. मचाणावर बसण्यापूर्वी संबंधित वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी पर्यटकांना आवश्यक सूचना दिल्या होत्या आणि प्रत्येक निसर्गप्रेमीसोबत सुरक्षेसाठी वन कर्मचारी व निरीक्षणासाठी पत्रक देण्यात आले होते.
रात्रीच्या वेळी जंगलात शांतता, रातकिड्यांची किरकिर आणि हवेची झुळूक अशा नैसर्गिक वातावरणात वन्यजीवांना जवळून पाहणे, हा पर्यटकांसाठी एक विलोभनीय अनुभव ठरला. पौर्णिमेच्या प्रकाशात उजळलेले मेळघाटचे घनदाट जंगल आणि प्राण्यांचे आवाज यामुळे सहभागी पर्यटक भारावून गेले होते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने केलेल्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आणि वनविभागाच्या सहकार्याबद्दल पर्यटकांनी समाधान व्यक्त करत, वाघांना व इतर वन्यजीवांना नैसर्गिक अधिवासात अनुभवल्याचा विशेष आनंद व्यक्त केला आहे.
000000
Monday, May 4, 2026
DIO NEWS AMRAVATI 04-05-2026
मतदारयादी मॅपिंगचे कार्य तातडीने पूर्ण करावेत
-जिल्हाधिकारी आशिष येरेकरअमरावती, दि. 4 (जिमाका) : निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरावलोकन जाहिर केला आहे. त्यानुसार याआधी मतदारांची मॅपिंग करण्यात येत आहे. यात मतदारांची मॅपिंग झाली नसल्यास त्यांना नोटीस देऊन सुनावणी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मॅपिंगचे कार्य तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.
जिल्हा नियोजन भवनात मतदारांच्या मॅपिंगबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, महापालिकेचे उपायुक्त महेश देशमुख, योगेश पिटे, तहसिलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी निवडणूक आयोगाने नेमून दिलेले कार्य वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. विशेष संक्षिप्त पुनरावलोकन कार्यक्रमाची जबाबदारी बीएलओवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे सध्याच्या मतदारयादीतील मतदारांचा 2002च्या मतदारयादीत शोधावे लागणार आहे. यासाठी ॲप विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे बीएलओंनी प्रत्येक मतदारांचा शोध घेऊन मॅपिंग करणे आवश्यक आहे. मॅपिंगची टक्केवारी कमी झाल्यास उर्वरीत मतदारांना नोटीस देऊन सुनावणी घ्यावी लागणार आहे. हे काम अत्यंत जिकरीचे होणार असल्याने बीएलओंनी मॅपिंगची टक्केवारी वाढविणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात प्रामुख्याने बडनेरा आणि अमरावती या शहरी भागात मॅपिंगची गती वाढविणे आवश्यक आहे. मतदारांची मॅपिंग झालेली नसल्यास मतदारयादीतील नाव वगळण्याआधी मतदारांकडून फॉर्म नं. सात भरून घेण्याची कारवाई करावी. कमी मॅपिंग झालेल्या क्षेत्रातील मॅपिंगची टक्केवारी वाढविण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ पुरविले जाणार आहे. त्यामुळे येत्या 15 मेपर्यंत 95 टक्के मॅपिंग होण्यासाठी बीएलओंनी प्रयत्न करावेत. मॅपिंगच्या कामी खासगी संस्थांमधील कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित संस्थांनाही पत्र देऊन बीएलओंना शाळेतील कामामधून सूट देण्याची सूचना करण्यात येणार आहे. मॅपिंगच्या कामात अडथळा आणल्यास संबंधित बीएलओंवर फौजदारी कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे बीएलओंनी मॅपिंगचे काम काटेकोरपणे पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले.
सुरवातीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी मतदारांच्या मॅपिंगबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी मॅपिंगचे कार्य उत्कृष्टरित्या केलेल्या बीएलओंनी मनोगत व्यक्त केले.
000000
DIO NEWS AMRAVATI 15.8.2026
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्कृष्ट कार्यासाठी जिल्ह्यातील विविध अधिक...
-
पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा नियोजन समितीचा आढावा; 679 कोटी मंजूर निधीच्या कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करा - पालकमंत्री चंद...
-
महसूल दिनी एक लाख वृक्षारोपण होणार *आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल अमरावती, दि. ३१ : महसूल दिनाच्या निमित्ताने १ ...
-
खरीप पीक कर्जवितरणाला गती देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश कर्जवितरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करा - पालकमंत...





.jpeg)


.jpeg)
.jpeg)
.jpeg)