Wednesday, May 6, 2026

DIO NEWS AMRAVATI 06-05-2026

 जिल्ह्यातील नागरिकांनी 'स्व-गणना' करावी

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन

*1 मे पासून डिजिटल जनगणनेला सुरुवात

अमरावती, दि. 06 (जिमाका) : जिल्ह्यामध्ये 1 मेपासून स्व-जनगणनेच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. यावेळची जनगणना पूर्णपणे डिजिटल माध्यमाद्वारे होणार असून, नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरण्याची म्हणजेच 'स्व-गणना' करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

यावेळच्या जनगणनेमध्ये दि. 1 ते 15 मे कालावधीत नागरिक स्वतःची नोंदणी करू शकतील. नागरिकांनी se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपला मोबाईल क्रमांक नोंदवून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. यात साधारणपणे 30 प्रश्न विचारले जातील, ज्यांची उत्तरे देऊन नागरिक स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची माहिती भरू शकतील. ही माहिती भरल्यानंतर एक 'SE-ID' (Self-Enumeration ID) जनरेट होईल, जो नागरिकांना जपून ठेवावा लागेल. हा आयडी प्रत्यक्ष जनगणना करण्यासाठी आलेल्या प्रगणकाला द्यावा लागणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः स्व-गणना केली आहे. या प्रक्रियेसाठी केवळ दोन मिनिटांचा वेळ लागला आहे. नागरिकांनाही वेळ काढून या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. दि. 15 मेनंतर, म्हणजेच दि. 16 मेपासून प्रशासनातर्फे नियुक्त केलेले प्रगणक घरोघरी येऊन नागरिकांनी भरलेल्या माहितीची पडताळणी करणार आहेत. डिजिटल जनगणनेच्या या सुविधेमुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुटसुटीत होणार आहे.

0000000

नवीन कामगार संहिता नियमावलीवर हरकती व सूचना

नोंदवण्याचे कामगार उप आयुक्तांचे आवाहन

अमरावती, दि. 06 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागामार्फत राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी नवीन कामगार संहितांच्या नियमावलीची घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत औद्योगिक संबंध संहिता आणि वेतन संहिता यांबाबतच्या अधिसुचना दि. 28 आणि 30 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या प्रस्तावित नियमावलीबाबत संबंधित व्यक्ती, कामगार संघटना आणि भागधारकांनी आपल्या हरकती व सूचना विहित मुदतीत नोंदवाव्यात, असे आवाहन अमरावती विभागाचे कामगार उप आयुक्त चं. अं. राऊत यांनी केले आहे.

औद्योगिक संबंध संहिता आणि वेतन संहिता यांसारख्या महत्त्वाच्या नियमांबाबत हरकती नोंदवण्यासाठी 45 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ज्या नागरिकांना किंवा संघटनांना या नियमावलीबाबत काही बदल सुचवायचे असतील, त्यांनी आपल्या सूचना लेखी स्वरूपात 'कामगार आयुक्त कार्यालय, कामगार भवन, बांद्रा-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई - 400 051' या पत्त्यावर पाठवाव्यात. तसेच, mh.labourcodes@gmail.com या ई-मेल आयडीवर देखील आपल्या सूचना पाठवता येतील. अधिसुचना प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत प्राप्त होणाऱ्या सूचनांचाच विचार केला जाणार असल्याने, सर्वांनी या संधीचा लाभ घेऊन आपले मत नोंदवावे, असे आवाहन कामगार विभागातर्फे करण्यात आले आहे.

00000000

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 8 मे रोजी:

जिल्ह्यातील तरुणांसाठी नोकरीची संधी

अमरावती, दि. 6 (जिमाका): जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (मॉडेल करिअर सेंटर), अमरावती यांच्या वतीने शुक्रवार, दि. 8 मे 2026 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात श्रीराम इन्शुरन्स लि. (अमरावती), गार्डियन ट्रेनिंग अकादमी आणि सिक्युरिटी प्रा. लि. (हैदराबाद) यांसारख्या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून विविध पदांसाठी मुलाखती घेणार आहेत. पात्र उमेदवारांना निवडीनंतर लगेचच नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल.

इच्छुक उमेदवारांनी आपल्या अद्ययावत बायोडाटा, पासपोर्ट फोटो आणि आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, डेपो रोड, अमरावती येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. या मेळाव्यासाठी कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही. अधिक माहितीसाठी कार्यालयीन दूरध्वनी ०७२१-२५६६०६६ किंवा ८९८३४१९७९९/ ८६०५६५४०२५ या क्रमांकावर अथवा amravatirojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.

00000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 14-05-2026

  जिल्ह्यात लोकसहभागातून शेत पांदण रस्ते व जलपुनर्भरणाची कामे; अशासकीय संस्थांकडून अर्ज आमंत्रित अमरावती, दि.14 (जिमाका) : जिल्ह्यातील शेतक...