महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त सेंद्रीय शेतीचा उपक्रम
-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
* कृषि निविष्ठा लिंकिंगवर कठोर कारवाई करणार
अमरावती, दि. 16 (जिमाका) : रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांना वळविण्यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात येणार आहे. ही मोहिम महात्मा जोतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त राबविण्यात येणार आहे. पहिल्या वर्षात सुमारे एक हजार हेक्टर सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जनमत तयार करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी व्यापक जनजागृतीची मोहिम हाती घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज जिल्हास्तरीय खरीप हंगाम 2026 ची नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी कै. वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे, खासदार बळवंत वानखेडे, अमर काळे, विभागीय आयुक्त नयना गुंडे, आमदार संजय खोडके, रवी राणा, केवलराम काळे, प्रताप अडसड, प्रविण तायडे, राजेश वानखेडे, उमेश यावलकर, गजानन लवटे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मनपा आयुक्त वर्षा लढ्ढा, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम उपस्थित होते.
श्री. बावनकुळे यांनी, सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. देशस्तरावर सेंद्रिय शेतीबाबत जनमत तयार करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. सुरवातीला उत्पादकता कमी होत असली तरी रासायनिक खतांचा खर्च कमी होत असल्याने आणि शेतमालाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कृषि विभागाने कृषि सहायकापासून तालुका कृषि अधिकारी स्तरापर्यंत उद्दीष्ट देऊन जिल्ह्यात सेंद्रिय शेतीबाबत सकारात्मक वातावरण तयार करावे. सेंद्रिय शेतीमुळे शेतकऱ्यांची रासायनिक खतांवरील अवलंबितता कमी होण्यास मदत मिळणार आहे.
खरीप हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांकडून कृषि निविष्ठांमध्ये लिंकिंगच्या तक्रारी करण्यात येत आहे. त्यामुळे कंपनी किवा स्थानिक विक्रेत्यांच्या स्तरावर लिंकिंग होणार नाही, यासाठी कृषि विभागाने भरारी पथकामार्फत कारवाई करावी. आवश्यकता भासल्यास विक्रेता आणि कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत लिंकिंगचा शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. येत्या काळात दुकानात लिंकिंगचे साहित्य ठेवता येणार नाही. त्यामुळे लिंकिंगवर अंकुश ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना आवश्यक खते उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्यात यावे. यासोबतच प्रतिबंधित बियाणे जिल्ह्यात विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी बँकांना ताकिद देण्यात यावी. खरीपासाठी 1650 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे. प्रामुख्याने राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांनी कर्ज वाटप करावे यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. कृषि कर्जवाटप करण्यासाठी बँकांना कॅम्प लावण्यासाठी सूचना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
अल निनीच्या प्रभावामुळे जलसाठे प्रभावित होणार असल्याने जिल्ह्यात प्रामुख्याने जलसंधारणाची कामे प्राधान्याने करण्यात येणार आहे. प्रामुख्याने जलसंधारण आणि जलसंपदा विभागावर पाणी साठविण्याची जबाबदारी राहणार असल्याने याचे नियोजन करण्यात यावे. नाले आणि तलावातून गाळ काढण्यासाठी पुढाकार घेवून पाणी साठविण्यासाठी नियोजन करण्यात यावे. त्यासोबतच रिचार्ज शाफ्टची कामे हाती घेण्यात यावे. यासाठी सीएसआरचा निधी उपलब्ध करून कामे करण्यात यावी. जिल्ह्यात पांदण रस्त्यांबाबत चांगले काम करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन आणि मातोश्री योजना मिळून पांदण रस्यासाठी निधी मिळत आहे. यासर्व निधीचा चांगली उपयोग करण्यात यावा. या कामांना लोकप्रतिनिधींनी भेटी द्याव्यात. या रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची नोंदणी करावी. चारा उपलब्ध होण्यासाठी बचतगटांना महसूली जागा देऊन याठिकाणी चारा निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात यावे, अशा सूचना पालिकमंत्री श्री. बावनकुळे यांनी दिले.
00000000
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडून वडाळी तलाव परिसराची पाहणी
अमरावती, दि. 16 (जिमाका): वडाळी उद्यान परिसरात भव्य ‘वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक’ उभारण्याबाबत चर्चा
अमरावती : महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी अमरावती येथील वडाळी तलाव परिसराची पाहणी करून परिसरातील विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रस्तावित वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित स्थळालाही भेट देत संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली.
पाहणीदरम्यान संजय राठोड यांनी वडाळी उद्यान परिसरात भव्य, आकर्षक व दिमाखदार असे स्मारक उभारण्यात यावे, तसेच शहरातील मुख्य रस्त्यावरूनही सदर स्मारक स्पष्टपणे दिसेल, अशा प्रकारचा आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देश दिले. हे स्मारक अमरावती शहराची ओळख ठरणारे व नागरिकांसह पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच वडाळी तलाव परिसराचे सौंदर्यीकरण, पर्यटन विकास, प्रकाश व्यवस्था, नागरिकांसाठी सुविधा व स्मारक उभारणी संदर्भातील सर्व बाबींवर शासन स्तरावर लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असून संपूर्ण प्रस्ताव अंतिम करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. संबंधित सर्व प्रक्रिया गतीने पूर्ण करून विकास कामांना चालना देण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी विविध मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका तसेच संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते. वडाळी तलाव परिसराच्या सर्वांगीण विकासाबाबत व स्मारकाच्या प्रस्तावित आराखड्याबाबत उपस्थितांमध्ये सकारात्मक चर्चा करण्यात आली.
0000000
15 व्या वित्त आयोगातून 26 ग्रामपंचायतींना ई-रिक्षा
घनकचरा व्यवस्थापनाला मिळणार नवी गती, पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी
अमरावती, दि. 16 (जिमाका): जिल्हा परिषद, अमरावती अंतर्गत 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून अमरावती जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनासाठी बॅटरी ऑपरेटेड ई-रिक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. ग्रामीण स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी जिल्ह्यात आता बॅटरी संचालित घंटागाड्या धावणार आहेत.
आज जिल्हा परिषद येथे आयोजित कार्यक्रमात मा.ना. चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अमरावती जिल्हा यांच्या हस्ते या वाहनांना हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार प्रवीण तायडे, प्रताप अडसड, संजय खोडके, राजेश वानखडे, केवलराम काळे, उमेश उर्फ चंदू यावलकर, रवी राणा, महापौर श्रीचंद तेजवानी, विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, महानगर पालिका आयुक्त वर्षा लड्डा उपस्थित होते.
घराघरातून कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेला या वाहनांमुळे गती मिळणार असून ग्रामीण स्वच्छतेसह पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे. पारंपरिक डिझेल वाहनांच्या तुलनेत ही ई-वाहने पर्यावरणपूरक असून इंधन खर्चातही बचत होणार आहे.
घनकचरा संकलन व व्यवस्थापन अधिक प्रभावी, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने राबविण्यासाठी पंचायत विभागाच्या प्रशासकीय मान्यतेने ही वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रत्येकी ३ लाख रुपये किंमतीच्या या वाहनांसाठी एकूण 78 लाख रुपयांचा निधी 15 व्या वित्त आयोगातून उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ही वाहने लवकरच संबंधित ग्रामपंचायतींच्या स्वाधीन करण्यात येणार असून त्याद्वारे स्वच्छ भारत मिशन अभियानाला नवी गती मिळणार आहे.
या गावांचा समावेश:
अमरावती तालुक्यातील ब्राम्हणवाडा गोविंदपूर व लोणटेक, अचलपूर तालुक्यातील वडगाव फत्तेपूर व रासेगाव, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील टाकरखेडा मोरे व खानमपूर पांढरी, भातकुली तालुक्यातील आसरा व टाकरखेडा शंभू, चांदूर बाजार तालुक्यातील कुर्हा, चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला व कवठा कडू, दर्यापूर तालुक्यातील पिंपलोद व थिलोरी, मोर्शी तालुक्यातील शिरखेड व खानापूर, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ व धानोरा गुरव, तिवसा तालुक्यातील शिरजगाव मो, वरुड तालुक्यातील हातुर्णा व शहापूर, धारणी तालुक्यातील हरिसाल व कुसुमकोट बु., धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी व वडगाव राजदी तसेच चिखलदरा तालुक्यातील टेंभूसोडा व काटकुंभ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
000000
मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेची प्रभावी
अंमलबजावणी करा
-
पालकमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे
*महाराजस्व अभियानातून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक
*खारतळेगाव येथील पाणंद रस्त्याची पाहणी
*जनता दरबारात नागरिकांची ८५ निवेदने स्विकारली
अमरावती,दि.१६
: ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना’ ही शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारी योजना
असून याव्दारे शेतकऱ्यांना शेत मशागतीसाठी व शेत मालाची ने-आण करण्यासाठी बारामाही
रस्ता उपलब्ध करुन दिला जातो. यानुषंगाने जिल्ह्यातील सर्व पाणंद रस्त्यांचे उद्दिष्ट
पूर्ततेसाठी प्रभावी नियोजन करुन येत्या खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणंद रस्ते उपलब्ध
करुन द्यावे, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी संबंधित कार्यान्वयन यंत्रणांना आज दिले.
दर्यापूर उपविभागीय कार्यालय येथे आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री. बावनकुळे
यांनी दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील महसूल कामकाजांचा आज आढावा घेतला. त्यावेळी
ते बोलत होते. आमदार राजेश वानखडे, आमदार गजानन लवटे, आमदार प्रवीण तायडे, जिल्हाधिकारी
आशिष येरेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, माजी आमदार श्री. बुंदीले यांच्यासह शासकीय
विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्री
श्री. बावनकुळे यांनी तहसील कार्यालय येथे आयोजित जनता दरबारात सामान्य नागरिकांशी
थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, महसूल विभागाशी संबंधीत प्रश्न, तक्रारी जाणून घेतल्या.
यावेळी नागरिकांकडून प्राप्त 85 निवेदने स्विकारुन त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे
निर्देश पालकमंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पालकमंत्री
श्री. बावनकुळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान योजने अंतर्गत
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विशेष समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून त्यामाध्यमातून
सामान्य नागरिकांचे महसूल व अन्य महत्वाच्या विभागाशी निगडीत प्रश्न व तक्रारी एकाच
जागेवरच सोडविण्यात येत आहे. सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या,
महसूल विभागाशी संबंधीत प्रकरणांचा निपटारा करण्यात येत आहे. नागरिकांनीही या शिबिरांचा
लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पालकमंत्र्यांनी
दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्याचा महसूल कामांचा सविस्तर आढावा संबंधित उपविभागीय
अधिकारी, तहसीलदार तसेच अन्य यंत्रणांचे प्रमुख यांच्याकडून घेतला. यानुषंगाने निवासी
अतिक्रमणे नियमानुकूल करणे, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना, अकृषक परवानगी,
सनद तसेच अकृषक आकारणी बदं करणे, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान टप्पा
क्रमांक एक अंमलबजावणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महसूली तंटामुक्त गाव अभियान,
ई-पीक पाहणी, ई फेरफार, जिवंत 7/12 मोहिम आदी महत्वाच्या बाबीं संदर्भात पालकमंत्र्यांनी
दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्याचा आढावा घेतला. उपरोक्त सर्व महत्वाच्या योजनांच्या
संदर्भात नियोजित व प्रस्तावित कामे विहित कालमर्यादेत पूर्ण झाली पाहिजे, असे निर्देश
त्यांनी कार्यान्वयन यंत्रणांना यावेळी दिले.
3 नोव्हेंबर
2025 च्या शासन अधिसूचनेनुसार जनतेची मागणी लक्षात घेऊन अनाधिकृत तुकडा / गुठ्यांची
मानीव नियमितीकरण करण्याची सुलभ कार्यपध्दती तयार केलेली आहे. तुकडे बंदी विषयक
7/12 अभिलेखात नोंदी घेणे आणि तुकडे बंदीमुळे नोंदणीकृत न झालेले व्यवहाराचे खरेदीदस्त
नोंदविणे यानुषंगाने तरतूदी करण्यात आलेल्या आहे. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना या
योजनेचा लाभ देऊन तालुक्यातील सर्व प्रकरणे निकाली काढावीत, असे निर्देश पालकमंत्री
महोदयांनी यावेळी दिले.
तालुक्यातील
शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, पाणी टंचाई उपाययोजना, जलसंधारणाची कामे, जलसंचयन उपाययोजना,
कृषी विभाग, महिला व बालविकास विभाग, वीज पुरवठा आदी शासकीय विभागांचा प्रलंबित व नियोजित
कामे याबाबत सविस्तर आढावा पालकमंत्र्यांनी यावेळी घेतला.
खारतळेगाव येथील पाणंद रस्त्याची पाहणी
दर्यापूर दौऱ्या
दरम्यान पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद योजने अंतर्गत
भातकुली तालुक्यातील खारतळेगाव येथे तयार करण्यात आलेल्या पाणंद रस्त्याच्या ठिकाणी
प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी आमदार राजेश वानखडे, गजानन
लवटे यांच्यासह महसूल, कृषी, भुमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
00000




.jpeg)

.jpeg)


.jpeg)




.jpg)


.jpeg)

.jpeg)

.jpeg)



.jpeg)





.jpeg)



No comments:
Post a Comment