Sunday, May 31, 2026

DIO NEWS AMRAVATI 31.05.2026


जिल्हाधिकारी कार्यालयात  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

      अमरावती, दि. 31 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

     यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल विवेक जाधव, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.     

00000


मेळघाटातील 'कुटीर' साडीचा जागतिक स्तरावर मान्यता; ऑस्ट्रेलियन विचारवंत बार्बरा ओ'नील यांनी परिधान करून केले कौतुक

अमरावती , दि. 31  (जिमाका) :
​अमरावती जिल्ह्यातील दुर्गम मेळघाट परिसरातील आदिवासी व ग्रामीण महिलांच्या कौशल्याला आता थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या विकेंद्रित सोलर चरखा समूह कार्यक्रमांतर्गत कस्तुरबा सोलर खादी महिला समितीच्या महिलांनी तयार केलेल्या ‘कुटीर’ ब्रँडच्या साडीने जागतिक स्तरावर आपला प्रभाव पाडला आहे. दिल्ली येथे आयोजित 'लिव्ह वेल, लिव्ह नॅचुरली' या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध आरोग्य व नैसर्गिक जीवनशैली प्रचारक बार्बरा ओ'नील यांना ही सोलर चरखा कापडापासून तयार केलेली आकर्षक साडी भेट देण्यात आली होती. या साडीची उत्कृष्ट गुणवत्ता, सौंदर्य आणि अप्रतिम हस्तकला पाहून बार्बरा ओ'नील इतक्या प्रभावित झाल्या की, त्यांनी मुंबई येथील त्यांच्या पुढील मोठ्या कार्यक्रमात हीच साडी परिधान करून उपस्थितांना संबोधित केले.
​धारणी तालुक्यातील मांडू येथील महिला कारागिरांनी आपल्या कष्ट, जिद्द आणि कलाकुसरीच्या बळावर तयार केलेल्या या उत्पादनाला मिळालेली ही जागतिक पसंती संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत गौरवाचा क्षण ठरली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मेळघाटातील महिलांना केवळ रोजगारच मिळाला नसून, त्या स्वावलंबन आणि सन्मानाने शाश्वत विकासाकडे पाऊल टाकत आहेत. अमरावतीचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे म्हणाले की, 'मेळघाटातून जगभर' हा प्रवास आता केवळ एक स्वप्न राहिले नसून, ग्रामीण महिलांच्या हातांनी विणलेली ती एक प्रेरणादायी यशोगाथा बनली आहे, ज्यामुळे ‘कुटीर’ ब्रँडला जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळाली आहे.

****


विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात, अमरावती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी; रुग्णालयाला कर्मचाऱ्यांकडून 'वॉटर कुलर' भेट


स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात ( सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल) अमरावती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे, रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेत या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिव्यांनी मुंदाने होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. माधुरी गाडेकर उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या लोककल्याणकारी कार्यास अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आणि कार्य आपल्या भाषणातून अधोरेखित केले.

'वॉटर कुलर'ची भेट:
उन्हाळ्याचे दिवस आणि रुग्णांची गरज लक्षात घेता, रुग्णालयाचे  *वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे* यांनी जयंतीनिमित्त रुग्णालयात एक लोकोपयोगी उपक्रम राबवण्याची संकल्पना मांडली होती. त्यांच्या या संकल्पनेला रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत, स्वतःहून निधी गोळा करून रुग्णालयाला एक 'वॉटर कुलर' भेट दिला. यामुळे रुग्णालयात येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.
महिलांनी केलेले उत्कृष्ट नियोजन आणि कर्मचाऱ्यांच्या सामूहिक दातृत्वामुळे या जयंती महोत्सवाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाला रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, प्रशासकीय कर्मचारी व चतुर्थश्रेणी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 31.05.2026

जिल्हाधिकारी कार्यालयात  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन       अमरावती, दि. 31 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या...