Saturday, May 30, 2026

DIO NEWS AMRAVATI 30.05.2026




 

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अभिनव संकल्पनेतून राज्यात प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शंभर टक्के पारदर्शक बदल्या

 

         अमरावती , दि. ३० (जिमाका) : जिल्हा प्रशासनात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्या यावर्षी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आल्या असून यावर्षी जिल्हा प्रशासनाने राज्यात प्रथमच समुपदेशाने बदलीचे धोरण काटेकोरपणे अंमलबजावणी करीत केले आहे. जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी स्वतः बदलीसाठी पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

         शंभर टक्के बदल्या समुपदेशाने करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाची भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या बचतीच्या आव्हानाला प्रतिसाद देत समुपदेशनाने बदलीचा प्रयोग जिल्ह्यात यशस्वी ठरलेला आहे. जिल्हाधिकारी, अमरावती यांच्या आस्थापनेवरील प्रशासकीय बदलीस पात्र सहायक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहायक व वाहनचालक या संवर्गांच्या प्रशासकीय बदल्या-२०२६ दि. २९ मे २०२६ रोजी समुपदेशनाद्वारे पार पडलेल्या आहेत.

 दरवर्षी समुपदेशनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे प्रशासकीय बदलीस पात्र कर्मचारी उपस्थित राहून समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रियेत सहभागी होतात. परंतु यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार घरून काम करण्याची मुभा, अनावश्यक सोने खरेदी टाळणे, पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करणे, खाद्यतेलाचा वापर कमी करणे, रासायनिक खतांवरील अवलंबिता कमी करून नैसर्गिक शेती करणे, स्वदेशी उत्पादनांचा वापर वाढविणे व परदेश दौरे टाळणे इ. बाबींचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने उपाय योजना प्रस्तावित केल्या आहेत.

त्यानुसार केंद्र व राज्य शासनाने सूचित केलेल्या उपाययोजनांचे अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या अधिनस्त जिल्ह्यातील सहायक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, महसुल सहायक, ग्राम महसुल अधिकारी, वाहन चालक इत्यादी संवर्गातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांना पेट्रोल, डिझेलचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच प्रवास टाळण्यासाठी त्यांच्या कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयात न बोलविता दि. २९ मे रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे समुपदेशन बदली प्रक्रिया आयोजित करण्यात आली. यामध्ये  सहायक महसूल अधिकारी संवर्गात बदलीस पात्र ४१ कर्मचाऱ्यांपैकी ४१ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली, मंडळ अधिकारी संवर्गात ५ पात्र कर्मचाऱ्यांपैकी ५ कर्मचाऱ्यांची बदली झाली, ग्राम महसूल अधिकारी संवर्गात ८२ पात्र कर्मचाऱ्यांपैकी ८२ कर्मचाऱ्यांची बदली झाली, महसूल सहायक संवर्गात ३९ पात्र कर्मचाऱ्यांपैकी ३९ कर्मचाऱ्यांची बदली झाली आणि वाहन चालक संवर्गात ३ पात्र कर्मचाऱ्यांपैकी ३ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आलेली आहे.

या बदली प्रक्रियेत सर्व संबंधित कर्मचारी यांनी त्यांच्या कार्यालयातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतलेला आहे. वरीलप्रमाणे पार पडलेल्या बदली प्रक्रियेबाबत सर्व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. धारणी, वरूड, अंजनगांव सुर्जी, धामणगांव रेल्वे इत्यादी दूरच्या कार्यालयातून बदली प्रक्रियेसाठी अमरावती मुख्यालयात न येता त्यांच्या स्वतःच्या कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रक्रियेत सहभागी होता आल्यामुळे अत्यंत पारदर्शक व विक्रमी वेळेत बदली प्रक्रिया पार पडल्यामुळे कर्मचारी संघटनांनी आनंद व्यक्त केलेला आहे.  जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी अभिनव संकल्पना राबविल्यामुळे त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. या बदली प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांच्या वेळेचा व पैशाचा अपव्यय न झाल्यामुळे सदर बदली प्रक्रिया यापुढेही अशाचप्रकारे राबवावी, असे कर्मचाऱ्यांनी मत व्यक्त केले आहे. आशियाई संकटाच्या आव्हानात्मक परिस्थितीत जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी प्रशासकीय बदल्या सुयोग्य, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने पार पाडल्या आहेत आणि हा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय आहे.

00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 30.05.2026

  जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अभिनव संकल्पनेतून राज्यात प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शंभर टक्के पारदर्शक बदल्या             अमरावत...