Thursday, May 14, 2026

DIO NEWS AMRAVATI 14-05-2026

 जिल्ह्यात लोकसहभागातून शेत पांदण रस्ते व जलपुनर्भरणाची कामे; अशासकीय संस्थांकडून अर्ज आमंत्रित

अमरावती, दि.14 (जिमाका) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेत पांदण रस्ते व जलपुनर्भरण योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत लोकसहभागातून शेत पांदण रस्ते आणि जलपुनर्भरणाची कामे करण्यासाठी इच्छुक अशासकीय संस्थांकडून अर्ज सादर करण्याचे आवाहन  आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

या योजनेमध्ये शेतकरी लोकसहभाग, ग्रामपंचायत स्वनिधी आणि जिल्हा नियोजन समिती निधी यांच्या अभिसरणातून ही कामे केली जाणार आहेत. ही योजना कोणत्याही एजन्सीच्या नफ्यासाठी  नसून, ती पूर्णपणे लोकसहभाग आणि सेवाभावावर आधारित आहे, जेणेकरून कमी खर्चात शेतकरी हिताचे रस्ते निर्माण होतील.

 

जिल्हास्तरावरून या योजनेसाठी प्रति 1 किलोमीटर पांदण रस्त्यासाठी कमाल 9 लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये लोकसहभागाची किमान मर्यादा 1.5 लाख रुपये असून, उर्वरित रक्कम जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दिली जाईल. या निधीवर सर्व शासकीय कपाती लागू राहतील. तसेच, पांदण रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर (लोकसहभागातून होणारे मातीकाम वगळून) मोजमापानुसार जिल्हा नियोजन समितीचा निधी वितरित केला जाईल. जे अर्जदार जास्तीत जास्त लोकसहभाग आणि कमीत कमी शासकीय निधीमध्ये काम करण्यास तयार असतील, अशा संस्थांना प्राधान्य दिले जाईल. याशिवाय, यापूर्वी ‘जलयुक्त शिवार’ किंवा तलावातील गाळ काढण्याच्या योजनांमध्ये काम करण्याचा अनुभव असलेल्या संस्थांना विशेष प्राधान्य मिळेल.

इच्छुक अशासकीय संस्थांनी आपल्या अर्जासोबत संस्थेचे मान्यता व नोंदणी प्रमाणपत्र, अध्यक्ष व सदस्यांची नावे, अनुभव प्रमाणपत्र आणि यापूर्वी केलेल्या कामांची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. हे अर्ज उपजिल्हाधिकारी (रोहयो) कार्यालय, अमरावती येथे सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्याचा कालावधी शुक्रवार, दि. 15 मे  ते 22 मे 2026 पर्यंत (सुटीचे दिवस वगळून) सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील. प्राप्त अर्जांची छाननी जिल्हास्तरीय समितीमार्फत 25 मे 2026 रोजी केली जाईल. त्यानंतर छाननीमध्ये पात्र ठरलेल्या संस्थांची बैठक व चर्चासत्र 26 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या योजनेबाबत काही अडचणी किंवा अधिक माहिती हवी असल्यास उपजिल्हाधिकारी (रोहयो)  ज्ञानेश्वर घ्यार (9527966064), कार्यक्रम व्यवस्थापक रामेश्वर परळकर (9890144170) यांच्याशी संपर्क साधावा. 

 ******

 




छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

अमरावती, दि. 14 (जिमाका) : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

 यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज, उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, नाझर विजय सांगळे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

00000

 

सोमवारी जिल्हा महिला लोकशाही दिन 

 

अमरावती, दि. 14 (जिमाका) : जिल्हा महिला लोकशाही दिन सोमवार, दिनांक 18 मे, 2026 रोजी सकाळी  11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

00000

औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी देशव्यापी बंद; जिल्ह्यात औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज, नियंत्रण कक्ष स्थापन

 

अमरावती, दि.14 (जिमाका) : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ बुधवार, दिनांक २० मे २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी बंदची घोषणा करण्यात आली आहे. या बंदमध्ये देशातील ठोक व किरकोळ औषध विक्रेते सहभागी होणार असून, त्यांनी आपले व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात नागरिकांना आवश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत आणि अखंडपणे उपलब्ध व्हावा, यासाठी अन्न व औषध प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असल्याची माहिती अमरावतीचे सहाय्यक आयुक्त (औषधे) डॉ. अ. मा. माणिकराव यांनी दिली आहे.

 मुंबई येथील सह आयुक्त (औषधे) तथा नियंत्रण प्राधिकारी यांच्या निर्देशानुसार, अमरावती जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते, रुग्णालयांशी संलग्न असलेली औषध दुकाने तसेच २४ तास सुरू असणाऱ्या औषध दुकानांशी प्रशासनाने तातडीने समन्वय साधला आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबाबत संबंधित दुकानांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक तालुका आणि गाव पातळीवर देखील आवश्यक औषध दुकाने सुरू राहतील, यादृष्टीने प्रशासन विशेष प्रयत्न करीत आहे.

 या आणीबाणीच्या परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था आणि आरोग्य सेवा विस्कळीत होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच खाजगी व निमसरकारी रुग्णालयांच्या प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.

 नागरिकांनी या बंदच्या काळात कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. औषध पुरवठ्याबाबत नागरिकांना कोणतीही अडचण किंवा तातडीची गरज भासल्यास, अमरावती कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिक ०७२१-२६६५८९२ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा jcamrawati2022@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधू शकतात. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने औषधे उपलब्ध करून देण्यास प्रशासन पूर्ण मदत करेल, अशी ग्वाही डॉ. माणिकराव यांनी दिली आहे.

 00000

अमरावतीत 19 मे रोजी रोजगार मेळावा;

महिंद्र ॲन्ड महिंद्र’ कंपनीत हजार जागांवर प्रधानमंत्री इंटर्नशिपची संधी

 

अमरावती, दि.14 (जिमाका) : : नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करियर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 19मे 2026 रोजी 'पं. दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात महिंद्र ॲन्ड महिंद्र, पुणे कंपनीमध्ये शासन मान्यताप्राप्त 'प्रधानमंत्री इंटर्नशिप' करण्याची संधी जिल्ह्यातील उमेदवारांना मिळणार आहे.

 

या मेळाव्याच्या माध्यमातून कंपनीतील हजारहून अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल. यासाठी 10 वी, 12वी आणि आय.टी.आय. उत्तीर्ण असलेले तसेच 18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र असणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना एकूण 18 हजार 55 रुपये विद्यावेतन दिले जाईल. यामध्ये 9 हजार 55 रुपयांसह प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या भत्त्याचा समावेश आहे. याशिवाय उमेदवारांना कंपनीकडून जेवण आणि बस सुविधा पूर्णपणे मोफत पुरवली जाणार आहे.

 

इच्छुक व गरजू उमेदवारांनी या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी दिलेल्या अधिकृत लिंक किंवा क्यूआर कोडद्वारे पूर्व-नोंदणी करणे आवश्यक आहे. मुलाखतीसाठी उमेदवारांनी 19 मे रोजी शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, डेपो रोड, अमरावती येथील कार्यालयात स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट फोटो, आधारकार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, वयाचा व पत्त्याचा पुरावा घेऊन प्रत्यक्ष उपस्थित राहावे. मेळाव्यासाठी कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही. अधिक माहितीसाठी नागरिकांनी 0721-2566066 किंवा 8983419799या क्रमांकावर संपर्क साधावा.

******

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 14-05-2026

  जिल्ह्यात लोकसहभागातून शेत पांदण रस्ते व जलपुनर्भरणाची कामे; अशासकीय संस्थांकडून अर्ज आमंत्रित अमरावती, दि.14 (जिमाका) : जिल्ह्यातील शेतक...