Monday, May 25, 2026

DIO NEWS AMRAVATI 25.05.2026

 बाल स्वास्थ्य कार्यक्रमात 879 बालकांना जीवदान

*4 हजार 547 इतर शस्त्रक्रिया यशस्वी

अमरावती, दि. 25 (जिमाका) : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा जिल्ह्यातील हजारो बालकांना आशेचा किरण ठरला आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमात गंभीर आजारग्रस्त असलेल्या बालकांना नवजीवन देण्यात आले आहे. मागील काही वर्षांत जिल्ह्यात 879 हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहे. याशिवाय 4 हजार 547 इतर शस्त्रक्रिया करून गरजू कुटुंबांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. या सर्व शस्त्रक्रियांसाठी बालकांच्या पालकांना एक रुपयाही खर्च करावा लागलेला नाही.

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. अंगणवाडी ते शाळा स्तरावरील प्रत्येक बालकापर्यंत पोहोचून संपूर्ण बालकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. दुर्गम भागातही आरोग्य सेवा पोहोचवून आजारांचे वेळेत निदान करणे ही या योजनेची खरी ताकद ठरली आहे.

योजनेत जन्मजात हृदय रोग, जन्मजात नेत्र रोग, जन्मजात कर्णदोष, दुभंगलेले ओठ व टाळू, हर्निया व हायड्रोसील, डोळ्यांचा तिरळेपणा, दंतरोग, फायमोसीस, हाडांचे इतर आजार आणि टॉन्सिल्स या प्रमुख शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या मोहिमेत नामवंत रुग्णालयांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यात अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. पाटील कान, नाक, घसा हॉस्पिटल, आचार्य विनोबा भावे रुग्णालय, सावंगी, कोकिळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई, एसआयसीसी चिल्ड्रन हॉस्पिटल, मुंबई, नेल्सन हॉस्पिटल, नागपूर, किम्सवे हॉस्पिटल, नागपूर, स्वास्थम हॉस्पिटल, नागपूर आणि संजीवनी हॉस्पिटल, मुंबई यांनी प्रमुख शस्त्रक्रिया केली.

जिल्हा पातळीवर कार्यरत असलेल्या पथकांमार्फत तालुकास्तरावर बालकांना मोफत सेवा पुरविली जात आहे. जिल्ह्यातील बालकांना दुर्धर आजार असल्यास या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी केले आहे.

0000000

सोमवारी 'डाक अदालत'चे आयोजन

अमरावती, दि. 25 (जिमाका): भारतीय डाक खात्याच्या वतीने अमरावती विभागातील ग्राहकांच्या प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यासाठी सोमवार, दि. 2 जून रोजी सकाळी 11 वाजता प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयात 'डाक अदालत' आयोजित करण्यात आले आहे.

या डाक अदालतीमध्ये प्रामुख्याने स्पीड पोस्ट, नोंदणीकृत पार्सल, काऊंटर सेवा, बचत बँक खाते आणि मनीऑर्डर यांसारख्या सेवांशी संबंधित तक्रारी विचारात घेतल्या जातील. विशेषतः अशा तक्रारी, ज्यांचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झाले नसेल किंवा ज्यांना विभागाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा प्रकरणांची दखल येथे घेतली जाणार आहे.

तक्रारदारांनी आपला अर्ज सादर करताना त्यामध्ये मूळ तक्रार केल्याची तारीख, संबंधित अधिकाऱ्याचे नाव व पद, आणि तक्रारीचा संपूर्ण तपशील नमूद करणे आवश्यक आहे. हे अर्ज 'प्रवर अधीक्षक डाकघर, अमरावती विभाग, अमरावती - 444602' यांच्या नावे पाठवावेत. सर्व संबंधित अर्ज 1 जूनपूर्वी कार्यालयात पोहोचणे अनिवार्य आहे, असे प्रवर अधीक्षक डाकघर यांनी कळविले आहे.

0000000

लाभार्थ्यांनी ह्यात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र

30 सप्टेंबरपूर्वी सादर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 25 (जिमाका) : भातकुली तालुक्यामधील विविध विशेष सहाय्य योजनांच्या सर्व लाभार्थ्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी ह्यात प्रमाणपत्र आणि दिव्यांग लाभार्थ्यांनी वैश्विक ओळखपत्र वेळेत सादर करावे, असे आवाहन भातकुलीचे तहसीलदार अक्षय मंडवे यांनी केले आहे.

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी वर्षातून एकदा ह्यात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांसाठी सरकारने बेनिफिशरी सत्यापन ॲप विकसित केले आहे.

लाभार्थी स्वतःच्या मोबाईलवर हे ॲप डाऊनलोड करून ऑनलाइन पद्धतीने ह्यात प्रमाणपत्र मोफत सादर करू शकतात. स्वतःचा मोबाईल नसल्यास लाभार्थी आपल्या नातेवाईकांमार्फत किंवा गावातील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायतमधील संगणक परिचालक, कर्मचारी यांच्या मदतीने हे काम पूर्ण करू शकतील. लाभार्थ्यांना सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरी सेवा केंद्रावर जाऊनही हे प्रमाणपत्र सादर करता येईल. येथे प्रक्रिया केल्यास 50 रूपये सेवा शुल्क द्यावे लागणार आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या नियमानुसार दिव्यांग लाभार्थ्यांना वैश्विक ओळखपत्र प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. अनेक दिव्यांगांनी अद्याप प्रमाणपत्र मिळालेले नसल्याची बाब लक्षात घेऊन, दिव्यांग सक्षमीकरण विभागाने या प्रक्रियेला दि. 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

तालुक्याबाहेरील आणि स्थानिक पात्र लाभार्थ्यांनी कोणत्याही तांत्रिक अडचणी किंवा मानधनात खंड पडू नये, यासाठी बेनिफिशरी सत्यापन ॲपवरून ह्यात प्रमाणपत्र त्वरित नोंदवावे. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांनी वैश्विक ओळखपत्र सादर करावे, असे आवाहन भातकुली तहसिलदार यांनी केले आहे.

00000

मतदारयाद्यांची 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहीम

*जूनपासून प्रत्यक्ष पडताळणीला सुरुवात

अमरावती, दि. 25 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने संपूर्ण देशात मतदार याद्यांचे 'विशेष सखोल पुनरिक्षण' घेण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर झाला आहे. यात महाराष्ट्राचा समावेश आहे. या मोहिमेत राज्यातील सुमारे 9 कोटी 86 लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.

देशात यापूर्वी 1952 ते 2004 दरम्यान विविध वर्षांमध्ये अशी मोहीम राबवण्यात आली होती. मात्र, मागील 20 वर्षांत केवळ 'विशेष संक्षिप्त पुनरिक्षण' घेण्यात आले असून 'विशेष सखोल पुनरिक्षण' झालेले नाही. या काळात झपाट्याने झालेल्या शहरीकरणामुळे लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले. अनेक मतदारांनी नवीन ठिकाणी नाव नोंदवले, पण जुन्या ठिकाणचे नाव वगळले नाही. परिणामी मतदारयाद्यांमध्ये दुबार नावे वाढली असण्याची शक्यता असल्याने ही पडताळणी केली जात आहे.

राज्यातील क्षेत्रीय यंत्रणा सध्या जनगणनेच्या कामात व्यस्त असल्याने निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासाठी स्वतंत्र वेळापत्रक निश्चित केले आहे. ही प्रक्रिया जून महिन्यापासून सुरू होऊन ऑक्टोबर 2026 मध्ये पूर्ण होईल. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि बीएलओ यांचे प्रशिक्षण. 30 जून ते 29 जुलै दरम्यान 'बीएलओ' घरोघरी जाऊन गणना अर्ज वाटप करतील व भरलेले अर्ज परत घेतील. 5 ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान प्रारुप यादीवर दावे व हरकती नोंदवणे. 3 ऑक्टोबरपर्यंत दावे व हरकती निकालात काढणे. 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

राज्यातील एकूण 9 कोटी 86 लाख 44 हजार 413 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1 लाख 253 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत 'बीएलओ' घरोघरी जाऊन आधीच माहिती भरलेले 'गणना प्रपत्र' मतदारांना देतील. यात मतदाराची सध्याची माहिती तसेच 2002-2004 मधील जुनी माहिती भरलेली असेल किंवा ती मतदाराला स्वतः भरता येईल. मतदारांना ही जुनी माहिती निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या संकेतस्थळावरूनही मिळवता येईल. मतदारांना हे गणना प्रपत्र ऑनलाइन पद्धतीनेही भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. गृहभेटीदरम्यान घर बंद आढळल्यास अधिकारी किमान 3 वेळा भेट देतील. आजमितीस राज्यात 72.04 टक्के जुन्या नोंदींचे मॅपिंग पूर्ण झाले आहे.

मतदार यादीतील व्यक्ती भारतीय नागरिक आहे, याची खातरजमा करण्याची जबाबदारी आयोगावर आहे. मतदारयादीत नोंदी जुळल्या नाहीत तर संबंधित मतदारांना नोटीस पाठवून कागदपत्रे सादर करण्यास सांगितले जाईल. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 'आधार' हे केवळ ओळख पुरावा म्हणून वापरले जाते. आधार अ‍ॅक्ट, 2026 च्या कलम 9 प्रमाणे आधार कार्ड हे नागरिकत्वाचा पुरावा म्हणून मानले जाणार नाही, हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांतर्फे नेमण्यात येणारे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी सहकार्य करणार आहेत. यामुळे दुबार व मृत व्यक्तींची नावे काढणे आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे सोपे होईल. राज्यात सध्या राजकीय पक्षांनी फक्त 1 लाख 13 हजार 558 'बीएलए' नेमले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर जास्तीत जास्त प्रतिनिधी नियुक्त करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

जिल्हा सामान्य रुग्णालयात 'जागतिक स्झिझोफ्रेनिया दिन' साजरा

अमरावती, दि. 25 (जिमाका) : जिल्हा सामान्य रुग्णालयात 'जागतिक स्झिझोफ्रेनिया दिन' साजरा करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल गुल्हाने, डॉ. रुपिकेश होले, भावना पुरोहित, प्रमोद भक्ते, सुनील कळतकर, विशाल झामरे, सायली डंभे उपस्थित होते.

डॉ. प्रमोद निरवणे, डॉ. अमोल गुल्हाने आणि भावना पुरोहित यांनी 'स्झिझोफ्रेनिया' या गंभीर मानसिक आजाराविषयी मार्गदर्शन केले. आजाराची लक्षणे, त्याचे वेळेवर निदान कसे करावे आणि उपलब्ध उपचार पद्धती कोणत्या आहेत, याबाबत माहिती दिली. विशाल झामरे यांनी सूत्रसंचालन केले. सायली डंभे यांनी आभार मानले.

00000000

भातकुली तहसिल कार्यालयात

आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन

अमरावती, दि. 25 (जिमाका): भातकुली जैन तहसिल कार्यालयात दि. 1 जूनपासून आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पावासाळ्याचे कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान हवा, वादळी पाऊस, सतत पाऊस, अतिवृष्टी, ढगफुटी, पूर इत्यादी कारणामुळे पशूहानी, जिवीत हानी उद्भवल्यास, त्याबाबतची माहिती तहसिल कार्यालय, भातकुली येथील दूरध्वनी क्रमांक 0721-2389001 वर तात्काळ कळवावी, असे आवाहन भातकुलीचे तहसिलदार अक्षय मंडवे यांनी कळविले आहे.

00000

समाज कल्याणच्या शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

अमरावती, दि. 25 : सामाजिक न्याय विभागाच्या जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गरजू विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या वसतिगृहांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनातर्फे सर्व सोयी-सुविधा पूर्णपणे मोफत पुरविल्या जातील.

शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये इयत्ता आठवी ते दहावी (शालेय), कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट डाऊनलोड करावी. डाऊनलोड केलेली प्रिंट घेऊन संबंधित वसतिगृहामध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

मुलांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (युनिट क्र. १, २, ३ आणि निंभोरा), संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह (निंभोरा), तसेच मुलींसाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह (कॅम्प, जेल रोड युनिट क्र. ४, आणि १२५वी जयंती वसतिगृह) प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. तसेच तालुकास्तरावरही आठवी ते दहावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांसाठी अर्ज संबंधित वसतिगृहात सादर करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शालेय अभ्यासक्रम आठवी ते दहावीसाठी ३० जून, कनिष्ठ महाविद्यालयासाठी १५ जुलै, अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी १५ जुलै, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी स्वतंत्रपणे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी ०७२१-२६६१२६१ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा समाज कल्याण आयुक्त कार्यालयात संपर्क साधावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

0000000

समाज कल्याणच्या शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

अमरावती, दि. 25 : सामाजिक न्याय विभागाच्या जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गरजू विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या वसतिगृहांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनातर्फे सर्व सोयी-सुविधा पूर्णपणे मोफत पुरविल्या जातील.

शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये इयत्ता आठवी ते दहावी (शालेय), कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट डाऊनलोड करावी. डाऊनलोड केलेली प्रिंट घेऊन संबंधित वसतिगृहामध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

मुलांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (युनिट क्र. १, २, ३ आणि निंभोरा), संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह (निंभोरा), तसेच मुलींसाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह (कॅम्प, जेल रोड युनिट क्र. ४, आणि १२५वी जयंती वसतिगृह) प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. तसेच तालुकास्तरावरही आठवी ते दहावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांसाठी अर्ज संबंधित वसतिगृहात सादर करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शालेय अभ्यासक्रम आठवी ते दहावीसाठी ३० जून, कनिष्ठ महाविद्यालयासाठी १५ जुलै, अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी १५ जुलै, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी स्वतंत्रपणे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी ०७२१-२६६१२६१ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा समाज कल्याण आयुक्त कार्यालयात संपर्क साधावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

0000000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 25.05.2026

  बाल स्वास्थ्य कार्यक्रमात 879 बालकांना जीवदान *4 हजार 547 इतर शस्त्रक्रिया यशस्वी अमरावती, दि. 25 (जिमाका) : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्य...