स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात 453 मतदार, 7 मतदान केंद्र
विभागांनी समन्वयाने काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
अमरावती, दि. 21 (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी सोमवार, दि. 25 मे रोजी अधिसुचना प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 453 मतदार असून उपविभागीय अधिकारी स्तरावर मतदान केंद्र राहणार आहे, निवडणुकीसाठी अल्प कालावधी असल्याने सर्व विभागांनी समन्वाने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.
स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणूक निमित्ताने जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे निवडणुकीशी संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली. बैठकीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हाधिकारी दुर्गा देवरे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी लागणारी आचारसंहिता जशीच्या तशी लागू करण्यात आली आहे. याची नोंद निवडणुकीशी संबंधितांनी घ्यावी. मतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी उपविभागीय स्तरावर मतदान केंद्र राहणार आहे. मतदारांची ड्राफ्ट यादी तयार झाली असून सर्व राजकीय पक्षांना ती पाठविण्यात येईल. यावरील हरकतीनंतर मतदारयादी अंतिम करण्यात येणार आहे. आचारसंहितेसाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर समिती नेमणे आवश्यक आहे. त्यानुसार कारवाई करण्यात यावी.
आचारसंहितेच्या कालावधीत कामे प्रस्तावित करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहे. त्यानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती स्थापन करण्यात आली आहे. कामे प्रस्तावित करणे आवश्यक असल्यास या समितीकडे पाठविण्यात याव्यात. मतदार कमी असल्याने त्यांना प्रलोभन देण्याचे प्रकार होण्याची शक्यता असल्याने याबाबत काळजी घेण्याची सूचना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिली.
00000000
पसंतीच्या दुचाकी क्रमांकासाठी सोमवारी अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 21 (जिमाका) : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे परिवहनेत्तर (दुचाकी) संवर्गातील वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येत आहे. या मालिकेतील आवडते किंवा पसंतीचे क्रमांक मिळवण्यासाठी इच्छुक वाहनधारकांनी सोमवार, दि. 25 मे रोजी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयात 25 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंतच खिडकी क्रमांक 25 अर्ज स्वीकारले जातील. यासाठी वाहन ज्या व्यक्तीच्या नावावर आहे, त्या व्यक्तीच्या नावाचा अर्ज, पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड आणि आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक अर्जावर नमूद करणे अनिवार्य आहे. पसंती क्रमांकाचे विहित शुल्क अमरावती कॅम्प ब्रँच, ट्रेझरी ब्रँच कोड नं. 003866 करिता देय असलेल्या डिमांड ड्राफ्टद्वारे भरणे आवश्यक आहे.
ज्या पसंती क्रमांकासाठी एकच अर्ज असेल किंवा एकापेक्षा जास्त अर्ज आले असतील, अशा क्रमांकाची यादी 25 मे रोजीच सायंकाळी 4 वाजता कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावली जाईल. एकाच क्रमांकासाठी दोन किंवा अधिक अर्ज आले असल्यास 26 मे रोजी दुपारी 1.30 वाजेपर्यंत मूळ शुल्काव्यतिरिक्त जादा रकमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात खिडकी क्र. 25 वर जमा करावा लागणार आहे. दुपारी 3 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात लिफाफे उघडले जातील. सर्वाधिक रकमेचा डिमांड ड्राफ्ट असलेल्याला पसंती क्रमांक दिला जाईल. उर्वरित अर्जदारांचे डीडी परत केले जातील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी कळविले आहे.
000000
दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ कार्यक्रम
अमरावती, दि. 21 (जिमाका) : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी 21 मे रोजी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’साजरा केला जातो. यानिमित आज जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी गोविंदा दानेज यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची अधिकारी-कर्मचाऱ्यांना शपथ दिली.
दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा यावेळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
00000000
No comments:
Post a Comment