Friday, May 15, 2026

DIO NEWS AMRAVATI 15-05-2026

 


जिल्हाधिकाऱ्यांकडून संत्रा बागेतील आधुनिक एआय तंत्रज्ञानाची पाहणी

अमरावती, दि. 15 (जिमाका): कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने आधुनिक संत्रा बाग व्यवस्थापनाला बळकटी देण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मोर्शी तालुक्यातील एआय आधारित संत्रा प्रात्यक्षिक प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.त्यांनी सिट्रस इस्टेट उमरखेड अंतर्गत या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची माहिती त्यांनी जाणून घेतली.

मोर्शी येथील प्रगतशील शेतकरी नवीन पेठे यांच्या शेतावर हा प्रयोग राबविला जात आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी खालील तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती घेतली. या प्रकल्पात एआय आणि आयओटी सेन्सर्सच्या मदतीने पिकांची रिअल-टाइम माहिती मिळवणे, उपग्रहाद्वारे पिकाच्या वाढीवर आणि ताणावर लक्ष ठेवणे, मातीतील ओलावा, खत व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन आणि रोग-कीड नियंत्रणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे, तज्ज्ञांचे मार्गदर्शनाचा समावेश आहे.

सिट्रस इस्टेटचे अध्यक्ष तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते आणि 'मॅप माय क्रॉप' कंपनीच्या ऍग्रोनॉमिस्टनी सॅटेलाईट डेटाचा वापर दैनंदिन शेतीकामात कसा होऊ शकतो, याचे प्रात्यक्षिक दिले. यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी अचूक निर्णय घेणे सुलभ होणार आहे.

बदलत्या हवामानात तंत्रज्ञान स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे मत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी व्यक्त केले. आयओटी सेन्सर्समुळे खते आणि पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादन खर्च कमी होईल आणि संत्र्याचा दर्जा सुधारेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी सिट्रस इस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय तळेगावकर, मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदिप पवार, तहसीलदार सागर ढवळे, तालुका कृषि अधिकारी प्रथमेश माने उपस्थित होते.

00000

रस्ते अपघातग्रस्तांसाठी 'पीएम राहत' योजना

*दीड लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार

अमरावती, दि. 15 (जिमाका) : रस्ते अपघातातील जखमींना तातडीने आणि वेळेवर उपचार मिळावेत यासाठी केंद्र सरकारने 'पीएम राहत' ही योजना सुरू केली आहे. जिल्ह्यामध्ये या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असून, अपघातग्रस्तांना आता दीड लाख रुपयांपर्यंत मोफत कॅशलेस उपचार मिळणार आहेत.

योजनेतून तात्काळ कॅशलेस उपचार केले जातील. यात अपघाताच्या तारखेपासून जास्तीत जास्त 7 दिवसांपर्यंत 1.5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जातील. अपघातानंतरचा पहिला तास अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात पैशांअभावी उपचार थांबू नये, यासाठी ही योजना राबविण्यात आहे. या योजनेच्या लाभासाठी कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची सक्ती करण्यात आलेली नाही. यातील उपचारासाठी होणारा खर्च 'मोटार वाहन अपघात निधी' मधून केला जाणार आहे.

जिल्ह्यातील 40 आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत असलेल्या रुग्णालयांमध्ये या योजनेचा लाभ घेता येईल. ही योजना यशस्वी करण्यासाठी रुग्णालय, पोलीस विभाग, राज्य आरोग्य संस्था आणि आपत्कालीन सेवा यांच्यात समन्वय साधण्यात आला आहे. गरजू नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी केले आहे.

0000000


अमरावती जिल्ह्यात 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर;

25.81 लक्ष मतदारांच्या नोंदींची होणार घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी

अमरावती, दि.15 (जिमाका) :भारत निवडणूक आयोगाने देशातील 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 'विशेष सखोल पुनरिक्षण' (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला असून, यामध्ये अमरावती जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. या व्यापक मोहिमेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील सुमारे 25 लक्ष 81 हजार 722 मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामाशी सांगड घालून क्षेत्रीय यंत्रणेचा विचार करून या तिसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, जिल्ह्यातील ही प्रक्रिया जून महिन्यापासून सुरू होऊन ऑक्टोबर 2026 मध्ये पूर्ण होणार आहे.

या मोहिमेची अंमलबजावणी अत्यंत व्यापक स्वरूपात केली जाणार असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन तपशिलाची खातरजमा केली जाईल. या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांतर्फे नेमण्यात आलेले 'बूथ लेव्हल एजंट्स' (BLA) त्यांना सहकार्य करणार आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत झालेल्या मतदार मॅपिंगच्या सद्यस्थितीचा विचार करता, 36-धामणगाव रेल्वे मतदारसंघात 3 लक्ष 13 हजार 425 एकूण मतदारांपैकी 2 लक्ष 91 हजार 784 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून 21 हजार 641 मतदारांचे मॅपिंग अपूर्ण आहे, ज्याची टक्केवारी 93.1 इतकी आहे. 37-बडनेरा मतदारसंघात 3 लक्ष 78 हजार 292 एकूण मतदारांपैकी 3 लक्ष 1 हजार 517 मतदारांचे मॅपिंग पूर्ण व 76 हजार 775 अपूर्ण असून टक्केवारी 79.7 आहे. 38-अमरावती मतदारसंघात 3 लक्ष 83 हजार 471 एकूण मतदारांपैकी 2 लक्ष 82 हजार 437 मतदारांचे मॅपिंग पूर्ण व 1 लक्ष 1 हजार 34 अपूर्ण असून टक्केवारी 73.65 आहे. 39-तिवसा मतदारसंघात 2 लक्ष 99 हजार 14 एकूण मतदारांपैकी 2 लक्ष 62 हजार 29 मतदारांचे मॅपिंग पूर्ण व 36 हजार 985 अपूर्ण असून टक्केवारी 87.63 आहे. 40-दर्यापूर मतदारसंघात 3 लक्ष 7 हजार 851 एकूण मतदारांपैकी 2 लक्ष 90 हजार 372 मतदारांचे मॅपिंग पूर्ण व 17 हजार 479 अपूर्ण असून टक्केवारी 94.32 आहे. 41-मेळघाट मतदारसंघात 3 लक्ष 11 हजार 478 एकूण मतदारांपैकी 2 लक्ष 74 हजार 581 मतदारांचे मॅपिंग पूर्ण व 36 हजार 897 अपूर्ण असून टक्केवारी 88.15 आहे. 42-अचलपूर मतदारसंघात 2 लक्ष 95 हजार 836 एकूण मतदारांपैकी 2 लक्ष 48 हजार 218 मतदारांचे मॅपिंग पूर्ण व 47 हजार 618 अपूर्ण असून टक्केवारी 83.9 आहे. तर 43-मोर्शी मतदारसंघात 2 लक्ष 92 हजार 355 एकूण मतदारांपैकी 2 लक्ष 60 हजार 375 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून 31 हजार 980 मतदारांचे मॅपिंग अपूर्ण आहे आणि येथील टक्केवारी 89.06 आहे. अशाप्रकारे संपूर्ण जिल्ह्यात एकूण 25 लक्ष 81 हजार 722 मतदारांपैकी 22 लक्ष 11 हजार 313 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून 3 लक्ष 70 हजार 409 मतदारांचे मॅपिंग अपूर्ण आहे, ज्याची एकूण सरासरी टक्केवारी 85.65 इतकी आहे.

या मोहिमेसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निवडणूक यंत्रणा व मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. मतदारसंघनिहाय आढावा घेतला असता, 36-धामणगाव रेल्वे मतदारसंघात 378 एकूण मतदान केंद्रे, 38 पर्यवेक्षक आणि 378 बीएलओ कार्यरत आहेत. 37-बडनेरा मतदारसंघात 345 मतदान केंद्रे, 29 पर्यवेक्षक आणि 345 बीएलओ आहेत. 38-अमरावती मतदारसंघात 322 मतदान केंद्रे, 31 पर्यवेक्षक आणि 322 बीएलओ आहेत. 39-तिवसा मतदारसंघात 319 मतदान केंद्रे, 33 पर्यवेक्षक आणि 319 बीएलओ आहेत. 40-दर्यापूर मतदारसंघात 342 मतदान केंद्रे, 20 पर्यवेक्षक आणि 342 बीएलओ आहेत. 41-मेळघाट मतदारसंघात 356 मतदान केंद्रे, 23 पर्यवेक्षक आणि 356 बीएलओ आहेत. 42-अचलपूर मतदारसंघात 309 मतदान केंद्रे, 25 पर्यवेक्षक आणि 309 बीएलओ आहेत. तर 43-मोर्शी मतदारसंघात 311 मतदान केंद्रे, 26 पर्यवेक्षक आणि 311 बीएलओ कार्यरत आहेत. संपूर्ण अमरावती जिल्ह्याचा विचार करता एकूण 2 हजार 682 मतदान केंद्रे, 225 पर्यवेक्षकांची पदे आणि 2 हजार 682 बीएलओ या प्रक्रियेसाठी सज्ज करण्यात आले आहेत.

जिल्हा प्रशासनाने या मोहिमेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले असून, त्यानुसार दिनांक 20 ते 29 जून 2026 या कालावधीत सर्व बीएलओ यांना प्रशिक्षण आणि पूर्वतयारी करून दिली जाईल. त्यानंतर 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत निवडणूक यंत्रणा प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेईल. या पडताळणीनंतर 5 ऑगस्ट 2026 रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. नागरिकांना 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 या कालावधीत आपल्या दावे व हरकती नोंदवता येतील. सर्व दावे व हरकतींचा निपटारा केल्यानंतर शेवटी 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

माहितीची अचूकता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आशिष येरेकर यांनी सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर आपले अधिकृत एजंट (BLA) नियुक्त करण्याचे जाहीर आवाहन केले आहे. यामुळे मतदार यादीतून दुबार नावे तसेच मृत व्यक्तींची नावे काढणे आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे ही प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि अचूक होण्यास मदत होणार आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी कळविले आहे.

000000

स्वाधार योजनेतील त्रुटी पूर्ततेसाठी ३० मेपर्यंत संधी

अमरावती, दि. 15 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत (सन 2025-26) मधील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीअभावी परत करण्यात आले आहेत, त्यांच्यासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र विद्यार्थ्यांनी दि. 15 मे ते 30 मे 2026 या कालावधीत आपल्या अर्जातील त्रुटी दूर करणे अनिवार्य आहे.

शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नसल्यास इयत्ता अकरावी, बारावी आणि पदवी, पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी स्वाधार योजनेंतर्गत थेट आर्थिक मदत दिली जाते. मात्र, अनेक नवीन व नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत किंवा हार्डकॉपी सादर केलेली नाही. अशा विद्यार्थ्यांना पोर्टलवर संदेश, मोबाईल आणि ई-मेलद्वारे त्रुटींबाबत कळवण्यात आले आहे.

अर्जातील त्रृटी दूर करण्यासाठी दि. 15 ते 30 मे दरम्यान दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे. यासाठी संबंधितांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्तालयाच्या मागे, अमरावती येथे उपस्थित राहावे लागणार आहे. विहित मुदतीत त्रुटींची पूर्तता केलेली नसल्यास विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्षाच्या (2025-26) लाभापासून कायमचा वंचित राहील. अशा विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षातही या योजनेसाठी नवीन अर्ज करता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्वरित hmas.mahait.org संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करावीत, अधिक माहितीसाठी ०७२१-२६६१२६१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

0000000

--

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 15-05-2026

  जिल्हाधिकाऱ्यांकडून संत्रा बागेतील आधुनिक एआय तंत्रज्ञानाची पाहणी अमरावती, दि. 15 (जिमाका): कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने आधुनिक संत्...