Thursday, May 7, 2026

DIO NEWS AMRAVATI 07-05-2026

 

सतर्क यंत्रणेची धडक कारवाई: अमरावतीत होणारा बालविवाह 

ऐनवेळी रोखला

      अमरावती, दि. 7 (जिमाका): जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत, प्रशासनाने एका अल्पवयीन बालिकेचा विवाह रोखून तिचे भविष्य वाचविले आहे. 5 मे 2026 रोजी चाईल्ड हेल्पलाईन (1098) आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

     दुसऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विवाह अमरावती शहरात लावला जाणार असल्याची गुप्त माहिती चाईल्ड हेल्पलाईनला मिळाली होती. या माहितीच्या आधारे यंत्रणांनी तातडीने तपास केला असता, संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबाने हा विवाह ठरविला होता. पथकाने बालिकेच्या घरी धाड टाकली तेव्हा तेथे साखरपुड्याचा कार्यक्रम आणि विवाहाची तयारी जोरात सुरू होती. सुरुवातीला नातेवाईकांकडून काही प्रमाणात विरोध झाला, मात्र बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देऊन आणि कायदेशीर कारवाईचा इशारा दिल्यानंतर वातावरण निवळले.

      संबंधित बालिकेला ताब्यात घेऊन बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले असून, सध्या तिला संरक्षणासाठी बालगृहात दाखल करण्यात आले आहे. तसेच पालकांकडून भविष्यात बालविवाह न करण्याबाबत लेखी हमीपत्र घेण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात असे प्रकार आढळल्यास त्वरित १०९८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांनी केले आहे. तसेच बालविवाहास प्रोत्साहन देणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय गट यांनी दिला आहे.

000000


सहकारी संस्थांच्या निवडणूक निर्णय अधिकारी निवडीसाठी

31 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

       अमरावती, दि. 7  (जिमाका): राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांच्याद्वारे जिल्ह्यातील 'क' व 'ड' वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्राधिकृत अधिकाऱ्यांची 2026 ते 2029 या कालावधीसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेअंतर्गत, सहकार कायदा, निवडणूक नियम आणि संबंधित कामकाजाचा पुरेसा अनुभव असलेल्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने शासकीय विभागातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी, तसेच अर्बन बँक फेडरेशन, पतसंस्था फेडरेशन, साखर कारखाना महासंघ यांसारख्या स्तरावरील फेडरल संस्थांमध्ये कार्यरत किंवा सेवानिवृत्त असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, अनुभवी वकील, सनदी प्रमाणित लेखापरीक्षक (CA), स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सेवानिवृत्त शिक्षक आणि खाजगी अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षकही या पदासाठी पात्र ठरू शकतील.

         इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आणि प्रतिज्ञापत्र दिनांक 31 मे 2026 पर्यंत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती, सहकार संकुल, कांता नगर या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करणे बंधनकारक आहे. या निवडीबाबतच्या सविस्तर अटी, शर्ती आणि अर्जाचा नमुना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या (http://scea.maharashtra.gov.in) आणि सहकार आयुक्त कार्यालयाच्या (http://sahkarayukta.maharashtra.gov.in) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. उमेदवारांनी विहित मुदतीत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 07-05-2026

  सतर्क यंत्रणेची धडक कारवाई: अमरावतीत होणारा बालविवाह  ऐनवेळी रोखला       अमरावती, दि. 7 (जिमाका): जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधासाठी राबवि...