Monday, May 18, 2026

DIO NEWS AMRAVATI 17-05-2026







जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा 
विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी  मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश
समन्वयातून विकासकामे गतिमान करण्यावर भर

अमरावती : 16 मे 
      
      मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हा परिषद अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 
      यावेळी विभागीय आयुक्त नयना गुंडे, आमदार प्रवीण तायडे, प्रताप अडसड, संजय खोडके, राजेश वानखडे, केवलराम काळे, उमेश उर्फ चंदू यावलकर, रवी राणा, महापौर श्रीचंद तेजवानी, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, महानगर पालिका आयुक्त वर्षा लड्डा उपस्थित होते.
        
      बैठकीदरम्यान जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा, विकासकामांच्या प्रगतीचा, प्रलंबित विषयांचा तसेच आगामी नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांना कामकाज अधिक प्रभावी, गतिमान व लोकाभिमुख पद्धतीने राबविण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री महोदय यांनी दिलेत 
   
    बैठकीत पाणी पुरवठा, स्वच्छ भारत मिशन, शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास, कृषी, लघु सिंचन, ग्रामपंचायत, बांधकाम तसेच सामान्य प्रशासन विभागांच्या कामांचा सखोल आढावा घेण्यात आला. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून काम करावे आणि शासनाच्या योजनांची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

   उमेद अभियान अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बचत गटांना बळकटी देण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांचे फिरते भांडवल उपलब्ध करून देण्यात येईल. स्वच्छ भारत मिशन मध्ये पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांसह आसपासच्या गावांचा क्लस्टर तयार करून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा करावा आणी प्रकल्पांतर्गत सेंद्रिय खत निर्मिती करून ते स्थानिक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्यात. 

    कृषी विभागाने भरारी पथक स्थापन करून कार्यान्वित करावे, महिला व बालविकास विभागाला पुढील तीन वर्षांचा आराखडा तयार करून नागपूर मॉडेलच्या धर्तीवर अंगणवाडी केंद्रांचे उन्नतीकरण करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. 

   लघु सिंचन विभागाने जिल्ह्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घ्यावीत. पाणीस्रोतांचे सर्वेक्षण करून मृत बंधारे पुनर्जीवित करावे, गॅबियन बंधारे तयार करावे आणी सि एस आर निधी उपलब्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एकत्रित नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तर ग्रामपंचायत विभागाला टप्प्याटप्प्याने स्मशानभूमी विकासाची कामे पूर्ण करण्यास सांगण्यात आले. 
    
    सामान्य प्रशासन विभागाच्या आढाव्यात जिल्ह्यातील गट विकास अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे पालकमंत्री महोदय म्हणालेत. आरोग्य विभागाला नागपूर मॉडेलप्रमाणे "मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र" विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सर्व विभागांच्या समन्वयातून जिल्ह्यात २५ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.

      शिक्षण विभागाने पुढील तीन वर्षांचा आराखडा तयार करून जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डिजिटल शाळा विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दूरवरून शाळेत येणाऱ्या पाच हजार विद्यार्थ्यांना सायकल उपलब्ध करून देण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

   पाणीपुरवठा विभागाला जुन्या योजनांची दुरुस्ती, रिचार्ज शाफ्ट उभारणी करण्याचे सूचित करून पाणीटंचाई निधी तातडीने वितरित केला जाईल असेही सांगण्यात आले. 
      
    वाचन संस्कृतीला बाळकट करण्यासाठी जिल्ह्यातील  १०० गावात "मॉडेल वाचनालये" तयार करण्यात येणार असून त्यासाठी वापरात नसलेल्या शासकीय इमारतींचा उपयोग करावा असे निर्देश मा. मंत्री महोदय यांनी दिलेत.  

     एल निनो च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जलसंधारणाची कामे व्यापक प्रमाणात राबविण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. प्रत्येक गावात नाला खोलीकरण, शेततळे आणि इतर उपाययोजना हाती घेण्यावर भर देण्यात आला. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, सिंचन, घरकुल दिवाबत्ती आणि सौर ऊर्जा या विषयांना प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी  बैठकीत दिले. याशिवाय, यावर्षी कोणत्याही निधीतून अनावश्यक सिमेंट रस्त्यांची कामे करू नयेत आणि गावांतील पथदिवे सौर ऊर्जेवर रूपांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

                           00000


 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 18-05-2026

                                                मेळघाट विकासासाठी प्रशासनातील समन्वय वाढवावा -मंत्री डॉ. अशोक उईके अमरावती, दि. 18 (जिमाका) ...