जिल्ह्यात जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या
17 जणांवर दंडात्मक कारवाई
अमरावती, दि. 01 (जिमाका): राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावतीद्वारे 31 मे या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यंदा हा दिवस ‘आकर्षणाचा मुखवटा उतरवूया: तंबाखू आणि निकोटीनच्या व्यसनाचा प्रतिकार करूया’ या संकल्पनेवर साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार, जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, बस स्थानक व रेल्वे स्टेशन येथे पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान तंबाखू नियंत्रण कायदा (कोटपा-2003) अंतर्गत दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या 7 व्यक्तींकडून 1 हजार 300 रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच नागपुरी गेट पोलिसांच्या मदतीने पठाणपुरा व चांदणी चौक परिसरातील अवैध तंबाखू विक्रेत्यांवर धाड टाकून, 18 वर्षांखालील मुलांना तंबाखू विकणाऱ्या आणि शैक्षणिक संस्थेच्या 100 मीटर परिसरात विक्री करणाऱ्या 10 विक्रेत्यांवर कारवाई करत 2 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अशा प्रकारे एकूण 17 व्यक्तींकडून 3 हजार 300 रुपयांची दंडवसुली झाली.
जनजागृतीचा भाग म्हणून रुग्णालयांमध्ये रुग्ण, नातेवाईक, आशा सेविका आणि बचतगटांच्या महिलांसाठी विशेष गटचर्चा व समुपदेशन सत्रे घेण्यात आली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वच्छता वाहनांवरून आणि सोशल मीडियाद्वारे जनजागृती संदेश प्रसारित करण्यात आले. औद्योगिक व परिचर्या संस्थेतील विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली, तर रुग्णालयात रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. आकाशवाणी अमरावतीवरून जिल्हा सल्लागार डॉ. मंगेश गुजर यांचे मार्गदर्शन प्रसारित झाले. आज, दि. 1 जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वांना तंबाखू मुक्तीची शपथ देऊन ‘व्यसनाला नकार, आरोग्याचा स्वीकार’ या आवाहनासह मोहिमेचा समारोप करण्यात आला.
00000000
माजी सैनिक व वीरपत्नींच्या पाल्यांना शैक्षणिक साहाय्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याचे सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन
अमरावती, दि. 01 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, वीरपत्नी आणि त्यांच्या पाल्यांसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार केंद्रीय सैनिक बोर्डाची (केएसबी) अधिकृत ऑनलाईन संकेतस्थळ प्रणाली सुरू झाली आहे. पात्र माजी सैनिक आणि वीरपत्नींच्या पाल्यांना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाचे शैक्षणिक साहाय्य मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते बारावी तसेच बीए, बी.कॉम आणि बी.एस्सी या पदवी अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यांचे अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत आहे. सर्व पात्र माजी सैनिक आणि विधवा भगिनींनी आपल्या पाल्यांचे ऑनलाईन फॉर्म विहित मुदतीत भरावेत आणि फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट व संकेतस्थळावर अपलोड केलेली सर्व संबंधित कागदपत्रे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment