Tuesday, June 16, 2026

DIO NEWS AMRAVATI 16.06.2026

 चांदुररेल्वे येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहात

विद्यार्थिनींसाठी विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरू

*इयत्ता 7 वी उत्तीर्ण झालेल्या व 8 वीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जूनपर्यंत

* कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी अंतिम मुदत 15 जुलैपर्यंत

अमरावती, दि. 16 (जिमाका): चांदूर रेल्वे येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनींसाठी विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

चांदूर रेल्वे बस डेपोच्या मागील परिसरात असलेल्या या शासकीय वसतिगृहात इयत्ता 8 वी पासून ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींसाठी निवास, भोजन आणि अभ्यासिकेची उत्तम सोय पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाते. या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात झाली असून, इयत्ता 7 वी उत्तीर्ण झालेल्या व 8 वीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जून 2026 पर्यंत आहे.

 तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी 15 जुलै 2026 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र विद्यार्थिनींनी प्रवेशासाठी https://hmasnew.mahait.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपले ऑनलाईन अर्ज मुदतीपूर्वी सादर करावेत. ग्रामीण व गरजू भागातील जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी या शासकीय योजनेचा आणि मोफत सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

00000000

‘पीएलएफएस’ आणि ‘अेएसयूएसई’ सर्वेक्षण ;

नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

            अमरावती, दि. 16 (जिमाका) : अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राज्यात 'नियतकालिक श्रम शक्ती सर्वेक्षण' आणि 'असंघटीत क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण' एप्रिल 2026 ते मार्च 2027 या कालावधीत राबविले जाणार आहे. या राष्ट्रीय कार्यात विभागातील नागरिकांनी सर्वेक्षणासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची आखणी करण्यासाठी ही सर्वेक्षणे अत्यंत मोलाची ठरणार आहेत. या सर्वेक्षणांमध्ये नियतकालिक श्रम शक्ती सर्वेक्षण अंतर्गत निवडक कुटुंबांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे श्रम बाजाराचे महत्त्वाचे निर्देशांक तयार केले जातील. यामध्ये प्रामुख्याने श्रम शक्ती सहभाग दर, कामगार-लोकसंख्या गुणोत्तर, बेरोजगारी द या घटकांची अचूक आकडेवारी संकलित केली जाईल, ज्यामुळे भविष्यातील रोजगार धोरणांना दिशा मिळेल.

असंघटीत क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण अंतर्गत राज्यातील उत्पादन, व्यापार आणि इतर सेवा क्षेत्रातील असंघटीत व बिगर-कृषि आस्थापनांच्या आर्थिक आणि कार्यात्मक वैशिष्ट्यांची आकडेवारी गोळा केली जाणार आहे. यामुळे असंघटीत क्षेत्रातील उद्योगांच्या विकासासाठी योजना आखणे सोपे होईल.

या सर्वेक्षणांची माहिती गोळा करण्यासाठी अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयांतर्गत 'Ipsos Research Private Limited' या नामांकित संस्थेची शासनाने निवड केली आहे. या संस्थेमार्फत नियुक्त केलेले अन्वेषक आणि पर्यवेक्षक केवळ 'नमुना पद्धतीने' निवडलेल्या ग्रामीण भागातील गावांना आणि शहरातील विशिष्ट वॉर्डांमधील कुटुंबांना व आस्थापनांना प्रत्यक्ष भेट देऊन विहित प्रपत्रात माहिती गोळा करणार आहेत.

            या सर्वेक्षणा अंतर्गत कुटुंब प्रमुख आणि उद्योग,आस्थापना प्रमुख यांच्या उपलब्धतेसाठी नियुक्त कर्मचारी रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशीही भेटी देऊ शकतात. सर्वेक्षणादरम्यान नागरिकांकडून किंवा उद्योगांकडून मिळालेली वैयक्तिक व व्यावसायिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. त्याचा वापर केवळ सांख्यिकी उद्देशांसाठी आणि शासकीय योजनांच्या नियोजनासाठीच केला जाईल. असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

00000000

शासकीय आय.टी.आय. गुरुकुंज मोझरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू;

10 वी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगाराची सुवर्णसंधी

अमरावती, दि. 16 (जिमाका):  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.), गुरुकुंज मोझरी (ता. तिवसा, जि. अमरावती) येथे सत्र ऑगस्ट 2026 करिता अधिकृत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. औद्योगिक क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेता, कौशल्याधारित शिक्षणातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याची ही एक उत्तम संधी आहे. या शैक्षणिक सत्रासाठी संस्थेत एकूण 368 जागा उपलब्ध असून, 10 वी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख अशा लोकप्रिय कोर्सेसचा यात समावेश आहे.

संस्थेमध्ये 1 वर्षाच्या कोर्सेस अंतर्गत वुड वर्क टेक्नॉलॉजी, कोपा, मेकॅनिक डिझेल, वेल्डर, फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी आणि सोलर टेक्निशियन हे कोर्सेस उपलब्ध आहेत. तर 2 वर्षांच्या कोर्सेसमध्ये इलेक्ट्रीशियन, वायरमन, मेकॅनिक मोटर व्हेहिकल, मशिनिस्ट, फिटर, आय.सी.टी.एस.एम. आणि ड्राफ्ट्समन मेकॅनिक यांसारख्या ट्रेडचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेत सुसज्ज संगणक कक्ष, मोफत इंटरनेट, वाचनालय, वसतिगृह, कॅन्टीन, शुद्ध पिण्याचे पाणी आणि ओपन ग्रीन जिम या अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत.

केवळ सैद्धांतिक शिक्षणच नव्हे तर प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्यासाठी येथे कॅम्पस ड्राईव्ह, ऑन द जॉब ट्रेनिंग आणि इंडस्ट्रियल व्हिजिट याद्वारे नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या उत्तम संधी मिळवून दिल्या जातात. याशिवाय संस्थेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना प्रभावीपणे राबविली जात आहे तरी इच्छुकांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी आय.टी.आय. मोझरी येथे थेट किंवा 07225-224237 या क्रमांकावर संपर्क साधावा.

00000000

No comments:

Post a Comment