Tuesday, June 30, 2026

DIO NEWS AMRAVATI 30.06.2026




                                  बँकांनी शासकीय योजनांसाठी प्राधान्याने कर्जपुरवठा करावा

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 30 (जिमाका) : राज्यातील स्वयंरोजगाराचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनातर्फे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविले जातात. यासाठी बँकांकडे कृषी, जिल्हा उद्योग केंद्रांकडून प्रस्ताव सादर करण्यात येतात. या प्रस्तावांची तातडीने छाननी करून बँकांनी शासकीय योजनांसाठी प्राधान्याने कर्ज पुरवठा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

जिल्हा नियोजन सभागृहात आज जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा पार पडली. यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ, जिल्हा उद्योग अधिकारी निलेश निकम, कृषी उपसंचालक वरूण देशमुख आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, गेल्या वर्षातील 419 प्रकरणी अद्यापही कर्ज वितरीत झालेले नाही. या प्रस्तावांची तातडीने छाननी करावी, तसेच निर्णय घेऊन कर्ज वितरणाची प्रक्रिया करण्यात यावी. यात आवश्यकता असल्यास संबंधितांचे प्रशिक्षण पूर्ण करावेत. गेल्या वर्षात या योजनांसाठी चांगल्या प्रकारे पतपुरवठा करण्यात आला आहे. यावर्षीही पाठपुरावा करून कर्ज प्रक्रिया करावी. जुने प्रस्ताव करीत असताना नवीन प्रस्तावाही स्विकारण्यात यावे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी कर्जाचे वाटप कमी प्रमाणात झालेले आहे. त्यामुळे बँकांनी सजग होऊन याकामी मनुष्यबळ नेमून कर्ज वितरणाची गती वाढवावी. राज्य शासनाच्या कर्जमाफीनंतर कर्ज मागणाऱ्यांची संख्या वाढणार असल्याने बँकांनी यासाठी नियोजन करावे. यावर्षी अल-निनोचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे समस्या येऊ शकतात. त्याचा सामना बँकांना करावा लागू नये, याची काळजी घ्यावी. येत्या 15 दिवसानंतर पुन्हा या प्रकरणांचा आढावा घेण्यात येणार असल्याने बँकांनी कर्जप्रक्रिया जलद करावी, असे आवाहन केले.

00000000

शहर वाहतुकीत तात्पुरता बदल

पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलीसांचे आवाहन

अमरावती, दि. 30 (जिमाका) : अमरावती शहरातील बडनेरा-अमरावती राज्य मार्ग क्र. 304 वरील कि. मी. 162/050 या पादचारी उड्डाणपूलाचे विकासकाम सर्वसामान्य नागरिकांचे हिताचे असून सदर स्टिल स्ट्रक्चर निश्चित स्थानावर स्थापीत करतांना कोणताही अनुचित प्रकार घडु नये याकरीता अलामस गेट बडनेरा ते सावता मैदान बडनेरा या दरम्यान मार्गावरील वाहतुक बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती अमरावती शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी दिली आहे.

 हे मार्ग बंद असतील

अलमास गेट ते सावता मैदान बडनेरा पर्यंत मार्ग सर्व प्रकारचे वाहन व पादचारी यांना कालावधी 4 जुलै च्या रात्री 11.30 वाजेपासून दि. 5 जुलै 2026 च्या सकाळी 6  वाजेपर्यंत बंद राहील.

   हे असतील पर्यायी मार्ग

            बडनेरा कडून अलमास गेट कडे येणार सर्व वाहनांनी अकोला वाय पॉइंट येथून सुपर एक्सप्रेस हायवेवर मेघे कॉलेज चौक, कोंडेश्वर टी पॉईटं मार्गे अमरावती. अमरावती कडून अलमास गेट मार्गे बडनेरा कडे जाणाऱ्या वाहनांनी जुना बायपासचा वापर करावा.

            सदर अधिसुचनेचे जो कोणी वाहन चालक उल्लंघन करेल त्यांचे विरूध्द मो. वा. का. 1988 व महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. असे आवाहन अमरावती शहरचे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी केले आहे.

00000000

सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू;

सहकारी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना 'डीसीएम' अनिवार्य

अमरावती दि. 30 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार सहकारी संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी 'सहकार व्यवस्थापन पदविका' (DCM) अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सहकारी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना आपले दैनंदिन कामकाज सांभाळून हा अभ्यासक्रम पूर्ण करता यावा, तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सहकार क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सहकारी संघातर्फे दुरस्थ (पोस्टल) शिक्षण पद्धतीने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

 महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित (पुणे) अंतर्गत अमरावती येथील 'भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र' येथे या सहा महिन्यांच्या पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. हा अभ्यासक्रम 1 जुलै 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीसाठी असणार असून, यामध्ये प्रवेश घेण्याची मुदत 1 जुलै 2026 ते 30 जुलै 2026 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी सहकारी संस्थांचे प्रतिनिधी किंवा कर्मचाऱ्यांसाठी किमान 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित संस्थेतील 6 महिन्यांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे, तर खाजगी किंवा थेट उमेदवारांसाठी किमान 12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. सहकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी किंवा या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी वेळेत आपले प्रवेश निश्चित करावेत, असे आवाहन प्रशिक्षण केंद्रातर्फे करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशा संदर्भातील अधिक माहिती, प्रवेश अर्ज आणि नाव नोंदणीसाठी उमेदवारांनी प्राचार्य, भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र, अमरावती यांच्याशी थेट संपर्क साधावा, ज्यासाठी अधिकृत संपर्काकरिता 9881047668 हा भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

000000000

जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक मादकद्रव्य विरोधी दिन साजरा;

व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांवर वैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन

अमरावती, दि. 30 (जिमाका): समाजाला, विशेषतः तरुण पिढीला अमली पदार्थांच्या घातक विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि व्यसनाधीनतेविरुद्ध व्यापक जनजागृती करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने 26 जून हा जागतिक मादकद्रव्य विरोधी दिन  नुकताच साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक़ डॉ. विनोद पवार बाह्य संपर्क अधिकारी डॉ. संदीप हेडाऊ, प्रभारी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नरेंद्र सोळंके, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल गुल्हाने, डॉ. प्रेषित मढवी, डॉ.  ऋषिकेश घोरपडे यांच्यासह अधिसेविका श्रीमती ललिता अटाळकर, श्रीमती श्रद्धा हरकंचे, सारा बांगड ,सावली परतेती उपस्थित होते.

डॉ. विनोद पवार म्हणाले, मादक द्रव्यांचे सेवन हे मानवी शरीराचा आणि आरोग्याचा पूर्णपणे नाश करते. कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचे व्यसन हे केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करते. या गंभीर आजारातून आणि मानसिकतेतून रुग्णांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा रुग्णालयामार्फत अत्यंत प्रभावी आणि आधुनिक औषधोपचार पद्धती उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यासोबतच मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल गुल्हाने, डॉ. संदीप हेडाऊ, डॉ. नरेंद्र सोळंके आणि डॉ. प्रेषित मढवी यांनी उपस्थितांना मादक द्रव्यांच्या सेवनामुळे मध्यवर्ती मज्जासंस्थेवर होणारे परिणाम, मानसिक आजार आणि सामाजिक दुष्परिणाम याविषयी शास्त्रीय व सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमाला जिल्हा स्त्री रुग्णालय परिचर्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी, रुग्णालयीन कर्मचारी तसेच रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सारा बांगड यांनी, तर आभार श्रद्धा हरकंचे यांनी मानले.

000000

'राज्यमाता गोमाता संवाद यात्रा'; 2 जुलै रोजी अमरावतीत भव्य समारोप

अमरावती, दि. 30 (जिमाका): महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभागातर्फे 22 जूनपासून संपूर्ण राज्यभरात 'राज्यमाता गोमाता संवाद यात्रा' सुरू करण्यात आली आहे. या संवाद यात्रेचा अमरावती जिल्हास्तरीय कार्यक्रम येत्या 2 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता शेगाव नाका येथील 'अभियंता भवन' येथे आयोजित करण्यात आला आहे. सलग 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेत सुमारे 6 हजार किलोमीटरचा प्रवास केला जाणार असून, राज्यातील 35 जिल्ह्यांमध्ये याचे संचलन होणार आहे. या यात्रेत राज्यातील हजारहून अधिक गोशाळा प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. या संपूर्ण प्रवासात 15 हजारांपेक्षा जास्त गोशाळा संचालक, गोरक्षक, गोपालक आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून विविध विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा केली जाईल.

रासायनिक शेतीला सक्षम पर्याय म्हणून देशी गायीच्या शेणावर आधारित नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील गोशाळा केवळ देणग्यांवर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहू शकतील, याचे मार्गदर्शन याद्वारे केले जाईल. यासोबतच शेण आणि गोमूत्रापासून तयार होणाऱ्या विविध मूल्यवर्धित उत्पादनांविषयी (सेंद्रिय खते, औषधे आणि दैनंदिन वापराच्या वस्तू) समाजात जनजागृती केली जाणार आहे. पशुसंवर्धन विभाग आणि गोसेवा आयोगाच्या विविध गोपालन योजनांची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, गोशाळा संचालकांच्या आढावा बैठका घेणे आणि पशुसंवर्धन विभाग व गोशाळांमध्ये उत्तम समन्वय साधणे यासाठी ही यात्रा कार्यरत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून गोवंशाचे रक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासन व स्थानिक गोरक्षकांमध्ये सलोख्याचा समन्वय साधणे, संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायद्याच्या कायदेशीर बाबींविषयी समाजाला अवगत करणे, आणि स्थानिक देशी गोवंशाच्या संगोपनासंदर्भात वैज्ञानिक व पारंपरिक पद्धतींची माहिती देणे या प्रमुख वैशिष्ट्यांसह या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व गोसेवक, गोरक्षक, शेतकरी, पशुपालक आणि गोशाळा संचालकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000000

वनरक्षक भरती-2023: अमरावती वनवृत्तातील 'पेसा' क्षेत्रातील

माजी सैनिक प्रवर्गाच्या जागांबाबत वनविभागाकडून वस्तूस्थिती स्पष्ट

अमरावती, दि. 30 (जिमाका): वनरक्षक सरळसेवा भरती-2023 अंतर्गत अमरावती वनवृत्तातील 'पेसा' (PESA) क्षेत्रातील माजी सैनिक प्रवर्गाच्या रिक्त जागांवर नियुक्ती देण्याबाबत वनविभागाने प्रचलित शासकीय व कायदेशीर नियमांच्या आधारे वस्तूस्थिती स्पष्ट केली आहे.

यानुसार, अमरावती वनवृत्तांतर्गत वनरक्षक भरती प्रक्रियेची जाहिरात जून 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती, ज्यामध्ये अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमातीसाठी एकूण 230 पदांचा समावेश होता. या भरतीची ऑनलाईन परीक्षा आणि शारीरिक पात्रता चाचणी पूर्ण झाल्यानंतर जानेवारी 2024 मध्ये सर्वसाधारण गुणवत्ता यादी देखील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. दरम्यान, पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात न्यायालयीन प्रक्रियेमुळे अंतिम नियुक्तीची कार्यवाही प्रलंबित होती. मात्र, उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी व रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी शासनाच्या विशेष सूचनेनुसार 230 पैकी 193 पात्र उमेदवारांना मानधन तत्त्वावर तात्पुरते नियुक्ती आदेश देण्यात आले होते.

वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झालेल्या मार्गदर्शनानुसार, प्रचलित शासन परिपत्रकातील नियमांन्वये समांतर आरक्षणाची पदे एका सामाजिक प्रवर्गातून दुसऱ्या सामाजिक प्रवर्गात वर्ग करता येत नाहीत. तसेच, पेसा क्षेत्रातील उमेदवारांना मानधन तत्त्वावर दिलेल्या नियुक्त्या ही एकवेळची विशेष बाब म्हणून केलेली तात्पुरती तरतूद असल्याने, या प्रक्रियेतील रिक्त पदे प्रतीक्षा यादीतून भरणे उचित ठरणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार प्रचलित नियमांच्या अधीन राहूनच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे वनविभागाने नमूद केले आहे.

00000000

हरित ऊर्जेच्या दिशेने 'अमृत'चे मोठे पाऊल; 'अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन'

योजनेद्वारे जिल्ह्यातील युवकांना स्वयंरोजगाराची संधी

अमरावती, दि. 30 (जिमाका): पर्यावरण संवर्धन, हरित ऊर्जा आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था 'महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी' (अमृत), पुणे यांच्या माध्यमातून राज्यभर 'अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन' हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या राज्यस्तरीय उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अमरावती जिल्ह्यामध्ये विशेष जनजागृती व लाभार्थी नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र युवक, महिला आणि उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत जिल्हा कार्यालयामार्फत करण्यात येत आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत असल्यामुळे भविष्यात शहरांसह तालुका व ग्रामीण भागातही ईव्ही चार्जिंग स्टेशनची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता निर्माण होणार आहे. या क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराच्या मोठया  संधी उपलब्ध होणार असल्याने अमृतने आपल्या लक्षित गटातील युवक-युवती, महिला उद्योजक, स्वयं सहाय्यता गट, एमएसएमई उद्योजक, शेतकरी उत्पादक गट तसेच नवीन उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन भविष्यातील हरित ऊर्जा क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय उभारावा, यासाठी अमृत जिल्हा कार्यालयामार्फत गावपातळीपर्यंत या योजनेची माहिती पोहोचविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत लाभार्थ्यांना ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणी, संचालन व व्यवस्थापन, सौरऊर्जेवर आधारित चार्जिंग सुविधा आणि फ्रँचायझी मॉडेल यासंदर्भात तज्ज्ञांकडून विनामूल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी घेतलेल्या कर्जावर अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभही मिळणार असून, यामुळे नवोदित उद्योजकांना आर्थिक दिलासा मिळेल. इच्छुक उमेदवारांनी www.mahaamrut.org.in या अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला आणि बारावीची गुणपत्रिका ही कागदपत्रे आवश्यक आहेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 'अमृत जिल्हा कार्यालय, आशीर्वाद बिल्डिंग, मालटेकडी रोड, टोपे नगर, अमरावती' येथे किंवा 9112227635/ 7249451152 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000

शुक्रवारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांचा दौरा

अमरावती, दि. 30 (जिमाका) : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर या शुक्रवार, दि. 3 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्‍यावर येत आहेत. दौऱ्या दरम्यान त्या कार्यशाळा, जनसुनावणी आणि आढावा बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

श्रीमती रहाटकर ह्या शुक्रवारी सकाळी 10 ते 11 वाजेपर्यत जिल्हा नियोजन भवन येथे पोश अॅक्ट अधिनियम 2013 या विषयावरील कार्यशाळेला उपस्थित राहतील. सकाळी 11 ते 12 वाजेपर्यत अमरावती येथील श्री शिवाजी सायन्स कॉलेज येथे यशोदा एआयबाबत कार्यशाळात सहभागी होतील. दुपारी 12 ते 1.30 या वेळेत जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत विविध विषयावर आढावा बैठक घेतील. दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपपर्यत जिल्हा नियोजन भवन येथे महिलाच्या तक्रारीबाबत जन सुनावणीला उपस्थित राहतील. यात कौटुंबिक हिंसाचार, लैगिक छळ अनैतिक व्यापार, महिलांचे अपहरण, आदी महिलांच्या सुरक्षिततेच्या विषयाबाबत महिलांच्या समस्या व तक्रारी स्विकारण्यात येतील. त्यानंतर दुपारी 3 ते 4.30 या वेळेत जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्‍यांसोबत महिलांच्या सुरक्षितता, संरक्षण तसेच महिला आणि महिला सक्षमीकरणाशी संबंधित विविध विषयावर आढावा बैठक घेण्यात येणार आहे. शासकीय विश्रामगृह येथे सायंकाळी 5 ते 6 दरम्यान जिल्ह्यातील लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य यांच्यासोबत महिलांच्या विविध समस्यावर बैठक घेतील.

या कार्यक्रमाला नागरीकांनी उपस्थित राहावे, तसेच समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 30.06.2026

                                   बँकांनी शासकीय योजनांसाठी प्राधान्याने कर्जपुरवठा करावा -जिल्हाधिकारी आशिष येरेकर अमरावती, दि. 30 (जिमाका...