राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा अमरावतीत शुभारंभ;
30 जूनपासून 5 दिवस चालणार घरोघरी मोहीम
अमरावती, दि. 29 (जिमाका): जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला आहे. अकोला परिमंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक तथा अमरावती जिल्ह्याचे राज्यस्तरीय समन्वय अधिकारी डॉ. सुशीलकुमार वाकचौरे यांच्या हस्ते बालकाला पोलिओचा डोस पाजून या देशव्यापी मोहिमेची अधिकृत सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप हेडाऊ, अधिसेविका ललिता अटाळकर, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक अधिकारी यांच्यासह रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि नगरपरिषद कार्यक्षेत्रामध्ये या मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून, यासाठी एकूण २२८ लसीकरण बूथ कार्यान्वित करण्यात आले आहेत. दि. 28 जून रोजी बूथ स्तरावर 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला असून, मोहिमेच्या पुढील टप्प्यात दि. 30 जून ते 4 जुलै 2026 या पाच दिवसांच्या कालावधीत विशेष पथकांद्वारे घरोघरी जाऊन उर्वरित सर्व बालकांचा शोध घेतला जाणार आहे. या 5 दिवसांत एकही बालक डोस मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आणि पालकांनी आपल्या 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस पाजून आपल्या पाल्याला या गंभीर आजारापासून सुरक्षित करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी केले आहे.
000000000
ग्रामीण पोलीस दलात 11 महिन्यांच्या प्रशिक्षणाची संधी;
आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी रोजगार मेळावा
अमरावती, दि. 29 (जिमाका): नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित तरुण-तरुणींना आपले कौशल्य वाढवण्याची आणि शासकीय विभागात कामाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, 30 जून 2026 रोजी 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी रोजगार मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून अमरावती ग्रामीण पोलीस विभागाच्या आस्थापनेअंतर्गत 11 महिन्यांच्या कार्य प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
हा मेळावा डेपो रोडवरील शासकीय तांत्रिक विद्यालय परिसरातील जिल्हा कौशल्य विकास केंद्रात आयोजित केला आहे. यासाठी वय किमान 18 ते 35 वर्षे आणि शैक्षणिक पात्रता 12 वी पास, आयटीआय, पदविका, पदवीधर किंवा पदव्युत्तर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सध्या शिक्षण सुरू असलेले उमेदवार यासाठी पात्र नसतील. इच्छुक उमेदवारांनी 'cmykpy' संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी तसेच बँक खाते आधार संलग्न असणे अनिवार्य आहे. पात्र उमेदवारांनी 30 जून रोजी स्वतःच्या खर्चाने बायोडाटा, फोटो व मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी 0721-2566066 या क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.
00000000
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटसाठी 30 जून अंतिम मुदत
अमरावती, दि. 29 (जिमाका) : केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार राज्य शासनाने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविण्याची तरतूद केली आहे. ही नंबर प्लेट बसविण्यासाठी 30 जून अंतिम मुदत आहे.
वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची अचूक ओळख पटविणे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांसह शासकीय, निमशासकीय कार्यालये व बँकांनी त्यांच्या 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक आहे. ही मुदत वाढवून 30 जून 2026 पर्यंत करण्यात आली आहे.
विहित मुदतीनंतर नियमानुसार वायुवेग पथकाद्वारे दि. 1 जुलै 2026 पासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. एचएसआरपी नंबरप्लेट नसलेली वाहने किंवा बनावट एचएसआरपी असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच अशा वाहनांचे परिवहन कार्यालयातील कामकाज थांबविण्यात येणार आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी कळविले आहे.
00000
ग्रामीण भागात कलम 37 (1) व (3) लागू
अमरावती, दि. 29 (जिमाका) : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती यांच्या क्षेत्रात महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला असून दि. 29 जून ते 13 जुलै 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अपर जिल्हादंडाधिकारी संतोष काकडे यांनी कळविले आहे.
0000000
आयआयटी मद्रासकडून जिल्ह्यात 'डीडीएचआय' अंतर्गत रस्ता सुरक्षा प्रशिक्षण संपन्न
अमरावती, दि. 29 (जिमाका): जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आयआयटी मद्रासच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर रोड सेफ्टी' (CoERS) तर्फे जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने विशेष रस्ता सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 'डीडीएचआय' (DDHI) उपक्रमांतर्गत हे एकदिवसीय प्रशिक्षण आज नियोजन भवन येथे संपन्न झाले. या प्रशिक्षणासाठी आयआयटी मद्रासचे प्रमुख प्रकल्प अधिकारी डॉ. रोशन जोस आणि प्रकल्प अभियंता प्रदीप कुमार एनव्हीके यांनी प्रशिक्षण दिले.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने या प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आर. वाय. पाटील कार्यकारी अभियंता प्रतिक गिरी यासह पोलीस, परिवहन, रस्ते विकास यंत्रणा, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या सत्रामध्ये वर्गखोली प्रशिक्षणाद्वारे डीडीएचआय आणि एफपीएस ऍप्लिकेशन्स, रस्त्यावरील धोके ओळखणे, अहवाल यंत्रणा आणि विविध विभागांच्या जबाबदाऱ्या यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी ट्रॉमा केअर आणि आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसादावर विशेष चर्चा करण्यात आली.
अमरावतीमधील रस्त्यांचे जाळे अधिक सुरक्षित करण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
00000000
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment