Friday, June 12, 2026

DIO NEWS AMRAVATI 12.06.2026

 



जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचा

तिवसा तालुक्यात 'गावमुक्काम'; नागरिकांशी साधला थेट संवाद

अमरावती, दि. 12 (जिमाका) :जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नुकताच तिवसा तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मौजे मोझरी येथे 'गावभेट व गावमुक्काम' केला, ज्यामुळे 'प्रशासन आपल्या दारी' ही संकल्पना प्रत्यक्षात साकार झाल्याचे पाहायला मिळाले. 

              दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, ११ जून रोजी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी मौजे शिवणगाव येथील कृषी विभागांतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतील प्रकल्पांना भेटी दिल्या. यामध्ये निलेश कुरवाडे यांच्या 'अर्क आईस्क्रीम युनिट ' आणि स्वाती डोळस यांच्या 'हळद पावडर प्रकल्पा'ची पाहणी करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच शिवणगाव येथील नागरिकांच्या समस्या ऐकून त्या तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

            यानंतर त्यांनी तिवसा येथील नव्याने उभारण्यात आलेल्या शासकीय धान्य गोदामाची पाहणी करून डॉ. पंजाबराव देशमुख खरेदी-विक्री संघाच्या ज्वारी खरेदीचा आढावा घेतला. 

जिल्हाधिकाऱ्यांनी तिवसा तहसील कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक घेऊन शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांच्या तक्रारींवर गतिमान कारवाई करण्याचे निर्देश दिले. गुरुदेवनगर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन सामूहिक प्रार्थनेला उपस्थित राहिले. तसेच पद्मश्री पुरस्कार प्राप्त जनार्धन बोथे गुरुजी यांचा शाल व श्रीफळ देऊन प्रशासनातर्फे सत्कार केला. 

सायंकाळी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी मोझरी येथील झेंडा चौकात ग्रामस्थांशी व शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेत अनेक प्रश्नांवर जागेवरच निर्णय घेतले व रात्री मोझरी गावातच मुक्काम केला. 

  दुसऱ्या दिवशी, सकाळी त्यांनी मोझरी विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध इमारतींच्या बांधकामांची पाहणी केली. यानंतर तिवसा नगर पंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन डेपोला भेट देऊन मुख्याधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. उपजिल्हा रुग्णालय तिवसा येथील स्वच्छता, कर्मचारी उपलब्धता व आरोग्य सुविधांची तपासणी करून त्यांनी आवश्यक सूचना केल्या. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नूतनीकरण करण्यात आलेल्या ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाची पाहणी करून त्यांनी दप्तराच्या कामकाजाचाही आढावा घेतला. 

            यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब दराडे, तहसीलदार मयूर कळसे, गट विकास अधिकारी अभिषेक कासोदे यांच्यासह सर्व प्रमुख विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या संवेदनशील आणि लोकाभिमुख दौऱ्यामुळे तिवसा तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रशासनाप्रती अत्यंत सकारात्मक व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

0000


 

 

बोगस 'एचटीबीटी' कापूस बियाण्यांचा साठा जप्त;

७ लाख १२ हजारांच्या मुद्देमालासह आरोपीला अटक

अमरावती, दि. १२ (जिमाका): खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि कृषी निविष्ठांची गुणवत्ता राखण्यासाठी अमरावती जिल्हा कृषी विभागाने जिल्ह्यात धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांची विक्री होऊ नये, तसेच शेतकऱ्यांकडून चढ्या दराने वसुली केली जाऊ नये, यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष भरारी पथके नेमण्यात आली आहेत.

मोहिमेदरम्यान कृषी विभागाचे जिल्हास्तरीय गुण नियंत्रण भरारी पथक आणि पोलीस विभाग यांनी नुकतीच संयुक्तपणे मोठी कारवाई केली. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विराग देशमुख यांना पोलीस पथकाकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील मौजा निमगव्हाण (ता. चांदूर रेल्वे) आणि तळेगाव दशाशर पोलीस स्टेशन (ता. धामणगाव रेल्वे) यांच्या सीमावर्ती भागातील शेतात ही धाड टाकण्यात आली. या कारवाईत बेकायदेशीर विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला अनधिकृत आणि बोगस एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

संबंधित शेतात धाड टाकली असता तेथे ९ गोण्यांमध्ये 'महाराजा', 'विराट', 'ग्लायको गार्ड' आणि 'कोहिनूर' अशा विविध नावांची बोगस एचटीबीटी कापूस बियाण्यांची एकूण ४३२ पाकिटे आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या या बियाण्यांची एकूण किंमत ७ लाख१२ हजार ८०० रुपये इतकी आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शुभमसिंग बलजितसिंह चौधरी (वय २१ वर्षे, मूळ रा. वाडी विस्तारवरदिया, जिल्हा कच्छ, गुजरात; हल्ली मुक्काम हिरापूर, ता. धामणगाव रेल्वे) याला ताब्यात घेतले आहे. पंचायत समितीचे गुण नियंत्रण निरीक्षक रवी राणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध वाडी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

ही कारवाई बियाणे कायदा १९६६, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा २००९ व नियम २०१० आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील विविध कलमांच्या उल्लंघनाखाली करण्यात आली आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, निविष्ठा व गुण नियंत्रण संचालक सुनील बोरकर, विभागीय कृषि सहसंचालक गणेश घोरपडे, मुख्य गुण नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते, तंत्र अधिकारी नितीन लोखंडे, विभागीय गुण नियंत्रण निरीक्षक संजय पाटील आणि जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी मल्ला तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

*****

 

शहरात प्रतिबंधात्मक कलम 37 (1) (3) लागू

अमरावती, दि. 12 (जिमाका) : शहरात शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात  लागू करण्यात आला असून सदर आदेश आज  दि. 11 ते 25 जून 2026 च्या  मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे.

या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी कळविले आहे.

0000

 

 

 

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना

मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी १९ जूनपर्यंत मुदत

अमरावती, दि. १२ (जिमाका): सन २०२६-२७ या वर्षाकरिता अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 'मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने' पुरवण्याच्या योजनेअंतर्गत ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत शुक्रवार,  दिनांक १९ जून २०२६ पर्यंत आहे. तरी जिल्ह्यातील पात्र बचत गटांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

 

00000

 

नौदल माजी सैनिक आणि विधवांच्या

पेन्शन समस्या निवारणासाठी सोमवारी विशेष शिबिर

अमरावती, दि. १२ (जिमाका): मुंबई येथील 'आयएनएस त्राता, नेव्हल युनिट' (INS Trata, Naval Unit) कडून नौदलाचे माजी सैनिक (Naval ESMs) आणि त्यांच्या विधवा यांच्या पेन्शन तसेच इतर दस्तऐवजांशी संबंधित प्रलंबित समस्यांचे निवारण करण्यासाठी 'आयएनएस त्राता, नेव्हल युनिट'ची एक विशेष चमू येत आहे. ज्या नौदल माजी सैनिक आणि त्यांच्या विधवा भगिनींच्या पेन्शन किंवा इतर कागदपत्रांबाबत काही तक्रारी अथवा समस्या असतील, त्यांनी सोमवार, दिनांक १५ जून २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे आपल्या आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  मेजर आनंद पाथरकर यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 12.06.2026

  जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचा तिवसा तालुक्यात 'गावमुक्काम'; नागरिकांशी साधला थेट संवाद अमरावती, दि. 12 (जिमाका) :जिल्हाधिकारी आशि...