कर्जमुक्ती योजनेसाठी तीन लाख शेतकऱ्यांची माहिती सादर
*कर्जमाफीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा
*नियमित कर्ज भरणाऱ्या 93 हजार शेतकऱ्यांना लाभ
अमरावती, दि. 29 (जिमाका) : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 राज्य शासनाने जाहिर केली आहे. यात सुमारे तीन लाख शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे सादर करण्यात आली आहे. यात 12 प्रमुख बँकांमधील 2 लाख 2 हजार थकीत कर्जदार आणि 93 हजार नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यात आली आहे. कर्जमाफीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यातील 12 प्रमुख बँकांतर्गत एकूण 2 लाख 2 हजार 167 शेतकरी खाती या योजनेत 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरली आहेत. यातील रक्कम सुमारे 2338 कोटी रुपये होणार आहे. तसेच वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या 93 हजार 139 शेतकरी खात्यांना 50 हजार रुपयांपर्यंतच्या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी 524 कोटी रक्कम कळविण्यात आली आहे.
बँकनिहाय आकडेवारीनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत सर्वाधिक 71 हजार 655 खात्यांची 700 कोटी रुपयांची रक्कम कळविण्यात आली आहे. त्याखालोखाल स्टेट बँक ऑफ इंडियातील 41 हजार 135 खात्यांच्या 513 कोटी रूपयांची रक्कम आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या 29 हजार 980 खात्यांना 488 कोटी रुपये कर्जमाफीची रक्कम कळविण्यात आली आहे. तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे 29 हजार 10 शेतकऱ्यांचे 298 कोटी, बँक ऑफ बडोदाचे 3 हजार 102 शेतकऱ्यांचे 47 कोटी, बँक ऑफ इंडियाचे 7 हजार 183 शेतकऱ्यांचे 80 कोटी, युनियन बँक ऑफ इंडियाचे 6 हजार 170 शेतकऱ्यांचे 76 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 2 हजार 83 शेतकऱ्यांचे 29 कोटी, युको बँकेचे 518 शेतकऱ्यांचे 5 कोटी, पंजाब नॅशनल बँकेचे 2 हजार 182 शेतकऱ्यांचे 8 कोटी, कॅनरा बँकेचे 1 हजार 902 शेतकऱ्यांचे 9 कोटी, इंडियन बँकेचे 7 हजार 247 शेतकऱ्यांचे 82 कोटी रूपयांच्या कर्जमाफीची रक्कम कळविण्यात आली आहे.
वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना 50 हजार रूपयांचा लाभ देण्यात येणार आहे. प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्येही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्वाधिक ४८ हजार ८६९ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यांना 244 कोटी रूपयांचे प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे 10 हजार 390 शेतकऱ्यांना 51 कोटी, बँक ऑफ बडोदाचे 2 हजार 691 शेतकऱ्यांना 43 कोटी, बँक ऑफ इंडियाचे 1 हजार 733 शेतकऱ्यांना 14 कोटी, युनियन बँक ऑफ इंडियाचे 2 हजार 750 शेतकऱ्यांना 13 कोटी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे 11 हजार 677 शेतकऱ्यांना 58 कोटी, बँक ऑफ महाराष्ट्रचे 9 हजार 482 शेतकऱ्यांना 47 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 1 हजार 488 शेतकऱ्यांना 7 कोटी, युको बँकेचे 411 शेतकऱ्यांना 4 कोटी, पंजाब नॅशनल बँकेचे 2 हजार 26 शेतकऱ्यांना 25 कोटी, कॅनरा बँकेचे 192 शेतकऱ्यांना 2 कोटी, इंडियन बँकेचे 1 हजार 430 शेतकऱ्यांना 11 कोटी रूपयांचे प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.
कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. सर्व बँकांना हा गोळा केलेला डेटा पोर्टलवर तातडीने अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करता येणार आहे.
0000000

No comments:
Post a Comment