Sunday, June 28, 2026

आदर्श शाळांच्या निधीचा पूर्ण उपयोग करावा राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर















आदर्श शाळांच्या निधीचा पूर्ण उपयोग करावा

राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

 

अमरावती, दि. २८ : जिल्ह्यातील आदर्श शाळांसाठी शासनस्तरावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. इमारत बांधकाम कमी किंमतीत झाले असले तरी शाळांमधील इतर सुविधांसाठी हा निधी उपयोगात आणता येणार आहे. यासाठी तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवून मान्यता घ्यावी आणि उर्वरित निधी शाळेतील सुविधांसाठी उपयोगात आणावा, अशा सूचना शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज दिल्या.

डॉ. भोयर यांनी आज माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी विभागातील पीएमश्री, सीएमश्री आणि आदर्श शाळांचा आढावा घेतला. बैठकीला उपसंचालक नीलिमा टाके, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, सहाय्यक शिक्षण संचालक अमोल पवार आदी उपस्थित होते.

डॉ. भोयर यांनी विभागातील काही मोजक्याच आदर्श शाळांचे बांधकाम होऊ शकले नाही. त्यामुळे ज्या शाळांचे काम प्रगतीपथावर आहे, अशा शाळांचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्यात यावे. शाळा बांधकामांमध्ये कमी किंमतीच्या निविदा प्राप्त झाल्यामुळे बांधकामावरील खर्चात बचत झाली आहे. हा निधी शाळेच्या विकासासाठी उपयोगात आणणे शक्य आहे. उर्वरित निधीबाबत प्रस्ताव तयार करून इतर उपयुक्त सुविधा निर्माण कराव्यात. या ठिकाणी अभ्यासिका, संगणक सुविधा यासारख्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगात येतील अशा सुविधा उभारण्यात याव्यात.

शासकीय शाळांचा स्वच्छतेचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आदर्श शाळेचे बांधकाम करताना या शाळेचा स्वच्छतेचीही काळजी राखली जाईल, यासाठी प्रयत्न करण्यात यावे. आदर्श शाळा या खऱ्या अर्थाने आदर्श व्हाव्यात यासाठी आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजनच्या निधीतून मागणी करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील शाळांमधील स्वच्छतागृहांचा आढावा घेऊन या ठिकाणच्या सुविधा निर्माण करण्यात याव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

बैठकीनंतर डॉ. भोयर यांनी मालटेकडी रोडवरील नियोजित डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलाच्या जागेची पाहणी केली. यावेळी आमदार संजय घोडके, सुलभा खोडके, महापौर श्रीचंद तेजवानी आदी उपस्थित होते. संकुलाची इमारत भव्यदिव्य असावी, तसेच या ठिकाणी कॉन्फरन्स रूम करण्यात यावी. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकाही निर्माण करण्यात यावी. सध्यास्थितीत शासकीय कर्मचाऱ्यांचे निवासस्थान बांधकामाबाबत पुनर्विचार करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. या संकुलाची घोषणा अर्थसंकल्पात झाल्यामुळे आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात याव्यात. ज्यामुळे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात निधीची तरतूद करण्याविषयी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

00000


 

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६ ही आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमुक्ती असून याद्वारे कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्...