Monday, June 15, 2026

DIO NEWS AMRAVATI 15.06.2026

 

एकल महिला धोरणासाठी १७ जून रोजी जिल्हास्तरीय बैठक;

ठोस उपाययोजनांसह प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

अमरावती, दि १५ (जिमाका) : महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित तसेच इतर एकल महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी एक स्वतंत्र आणि व्यापक ‘एकल महिला धोरण’ तयार करण्यात येत असून, हे धोरण अधिक परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने बुधवार, दिनांक १७ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हा परिषद अमरावतीच्या पंजाबराव देशमुख सभागृहात जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीमध्ये एकल महिलांचे प्रश्न केवळ मांडण्याऐवजी त्यावर ठोस मार्ग काढण्याच्या उद्देशाने चर्चा केली जाणार असून, जिल्ह्यातील एकल महिला, नागरिक, स्वयंसेवी संस्था, महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक आणि विषयतज्ज्ञांना या धोरण निर्मिती प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय गट यांनी केले आहे.

 

या धोरणाचा मसुदा तयार करताना केवळ त्रोटक स्वरूपातील मते किंवा समस्या मांडण्याऐवजी, त्या समस्यांवर शासनाने नेमक्या कोणत्या ठोस उपाययोजना कराव्यात, कोणती नवीन योजना सुरू करावी, विद्यमान योजनांमध्ये काय बदल करावेत आणि आवश्यकतेनुसार कोणत्या कायद्यांमध्ये किंवा नियमांमध्ये सुधारणा करण्यात याव्यात, याविषयी सविस्तर आणि अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी पाठवणाऱ्या या प्रस्तावामध्ये संबंधित विषयाची पार्श्वभूमी, अपेक्षित उपाययोजना, संभाव्य लाभार्थी आणि त्याचे अपेक्षित परिणाम या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश असावा.

 

ज्या नागरिकांना किंवा संस्थांना बैठकीव्यतिरिक्त आपले अभिप्राय थेट प्रशासनापर्यंत पोहोचवायचे आहेत, त्यांच्यासाठी प्रशासनाने  ८२०८५८१९१५  हा अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर केला असून, प्राप्त होणाऱ्या सर्व नाविन्यपूर्ण सूचना व अभिप्रायांचा 'एकल महिला धोरणाचा' मसुदा तयार करताना योग्य तो विचार केला जाईल, तरी अमरावती जिल्ह्यातील सर्व संबंधित घटकांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

00000

 

 


 अमरावतीच्या कुमकुम मोहोडचा जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णवेध; मिक्स्ड टीम प्रकारात भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक

 

अमरावती, दि १५ (जिमाका) :  तुर्की येथील अंतालिया येथे ९ ते १४ जून २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘आर्चरी वर्ल्ड कप स्टेज-३’ (धनुर्विद्या विश्वचषक) स्पर्धेत भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. अमरावतीच्या खेलो इंडिया केंद्राची प्रशिक्षणार्थी कुमकुम मोहोड हिने भारतीय संघातील धीरज बोम्मादेवरा राय याच्यासह मिक्स्ड टीम (मिश्र संघ) प्रकारात अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा ५-१ अशा सेट फरकाने पराभव करून भारताला हे ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

 

अमरावती येथील खेलो इंडिया धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्रात मागील आठ वर्षांपासून राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रफुल्ल डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करणाऱ्या कुमकुमच्या या सातत्यपूर्ण आंतरराष्ट्रीय यशामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा गौरव वाढला आहे. तसेच यापूर्वीही चीन येथे झालेल्या आर्चरी वर्ल्ड कप स्टेज-२ स्पर्धेत तिने भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व करताना सुवर्णपदक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. कुमकुमच्या या यशाबद्दल जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे.  

 

उपसंचालक तथा जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर आणि अध्यक्ष अॅड. श्री. प्रशांत देशपांडे यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. कुमकुमची सध्याची प्रगती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सातत्य पाहता ती आगामी स्पर्धांमध्येही भारताला आणखी पदके मिळवून देईल, असा विश्वास तिचे प्रशिक्षक प्रफुल डांगे यांनी व्यक्त केला असून कुमकुम आता जुलै २०२६ मध्ये स्पेन येथे होणाऱ्या 'वर्ल्ड कप स्टेज-४' आणि जपान येथे होणाऱ्या '२० व्या आशियाई क्रीडा' स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

00000

 

निरोगी वृद्धत्वासाठी योग; २१ जूनला अमरावतीकर

एकत्र येऊन साजरा करणार योग दिन

 

अमरावती, दि १५ (जिमाका) : केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या वतीने रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा केला जाणार आहे. यंदाच्या योग दिनासाठी ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ ही थीम आणि ‘योग करा निरोगी रहा आणि आनंदी आयुष्य जगा’ हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे. या वर्षीचा मुख्य जिल्हास्तरीय कार्यक्रम २१ जून रोजी सकाळी ६.१५ ते ७.१५ या वेळेत विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाला प्रमुख लोकप्रतिनिधी, वरिष्ठ सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ योग प्रसारक उपस्थित राहणार आहेत.

 

हा कार्यक्रम जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, एस.आर.पी.एफ., महानगरपालिका, शिक्षण विभाग, वनविभाग, जिल्हा होमगार्ड, राष्ट्रीय छात्र सेना , संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि क्रीडा भारती यांसह जिल्ह्यातील विविध योग व क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे.

 

जिल्ह्यातील सर्व नागरिक, क्रीडाप्रेमी, योग समिती सदस्य, क्रीडा प्रशिक्षक, शिक्षक व विद्यार्थ्यांना २१ जून रोजी सकाळी ६.१५ वाजता विभागीय क्रीडा संकुल येथे उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे. तसेच कार्यक्रमाला येताना नागरिकांनी सोबत स्वतःची पाण्याची बॉटल आणि चटई किंवा मॅट्स आणावी, अशी सूचना देण्यात आली आहे.

****

 

'स्वाधार' योजनेच्या लाभासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश अर्ज बंधनकारक; समाज कल्याण विभागाचे विद्यार्थ्यांना आवाहन

 

अमरावती, दि १५ (जिमाका) :  शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करणार नाहीत त्यांना स्वाधार योजनेचा तसेच वसतिगृह योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी दिली आहे.

 

             राज्यात व्यावसायिक व अव्यावसायिक महाविद्यालयांची आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना शासकीय वसतिगृहातील जागांची मर्यादा लक्षात घेता सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शक्य होत नसल्याने, पात्र विद्यार्थ्यांच्या भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट बँक खात्यात आर्थिक रक्कम जमा करण्यासाठी शासनाने 'स्वाधार योजना' सुरू केली आहे. मात्र समाज कल्याण विभागाने आता या नियमात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदललेल्या नियमांनुसार इयत्ता ११ वी, १२ वी तसेच १२ वी नंतरच्या व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सर्व पात्र विद्यार्थ्यांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर १५  ते ३१ जुलै २०२६ या मुदतीत ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक आहे. गुणवत्तेनुसार अथवा जागेअभावी ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, तेच विद्यार्थी पुढील 'स्वाधार योजने’च्या लाभासाठी पात्र राहतील.

 

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी सर्व पात्र विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात शासकीय वसतिगृहासाठी वेळेत अर्ज नोंदविण्याचे आवाहन केले असून अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय भवन, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती (चांदूर रेल्वे रोड, सी.पी. ऑफिसच्या मागे, अमरावती) येथे किंवा speldswo_amt@rediffmail.com या ई-मेल आयडीवर तसेच 0721-2661261 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 15.06.2026

  एकल महिला धोरणासाठी १७ जून रोजी जिल्हास्तरीय बैठक; ठोस उपाययोजनांसह प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन   अमरावती, दि १५ ...