Tuesday, June 2, 2026

DIO NEWS AMRAVATI 02.06.2026

 केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2027:

मोफत पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात

अमरावती, दि. 02 जून (जिमाका): केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षा 2027 च्या पूर्व तयारीसाठी उमेदवारांना विनामूल्य प्रशिक्षण भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, अमरावती यांच्या तर्फे देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्रातील प्रवेशासाठी राज्यस्तरावर सामायिक प्रवेश परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार असून यासाठी नमूद केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 जून 2026 ही राहील, तर परीक्षा शुल्क भरण्यासाठी 19 जून 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. या प्रवेशासाठीची राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा दिनांक 19 जुलै 2026 रोजी रविवारी, सकाळी  11 ते दुपारी 1 या वेळेत संपूर्ण राज्यात ऑफलाईन पद्धतीने घेतली जाईल. या परीक्षेची सविस्तर जाहिरात, आवश्यक शैक्षणिक पात्रता, परीक्षेचा अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची संपूर्ण माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व महत्त्वाच्या सूचना www.siac.org.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत आपले ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या संचालक डॉ. प्रतिभा भोरजार यांनी केले आहे.

000000

कडधान्य आत्मनिर्भरता अभियान: जिल्ह्यात कडधान्य प्रक्रिया युनिट

उभारणीसाठी 33 टक्के अनुदान

अमरावती, दि. 2 (जिमाका): कडधान्य पिकांच्या मूल्यवर्धनाला चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने आणि काढणी पश्चात पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी 'कडधान्य आत्मनिर्भरता अभियान' राबविण्यात येत आहे. या अंतर्गत कडधान्य प्रक्रिया युनिट स्थापन करण्यासाठी 33 टक्के अनुदान देवून आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था, क्लस्टर स्तर महासंघ, प्राथमिक कृषी पतसंस्था, वैयक्तिक उद्योजक तसेच प्रक्रिया युनिट स्थापन करण्यास इच्छुक इतर पात्र व्यक्ती व संस्थांना सहाय्य देऊन कडधान्य मूल्यसाखळी अधिक कार्यक्षम व सक्षम करणे हा मुख्य उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गट लाभार्थ्यांमध्ये संबंधित संस्था किमान मागील दोन वर्षांपासून विधिवत नोंदणीकृत व कार्यरत असावी, तसेच प्रकल्प खर्चाच्या किमान 15 टक्के रक्कम व कार्यभांडवलासाठी आवश्यक मार्जिन मनी स्वतः उभारण्याची आर्थिक क्षमता असावी. वैयक्तिक लाभार्थ्यांचे वय किमान 21 वर्षे पूर्ण असावे आणि एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीस हे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात येईल. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, महिला, डोंगराळ क्षेत्रे व आकांक्षी जिल्हे यांना प्राधान्य दिले जाईल.

या अभियानांतर्गत पात्र युनिटला प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा कमाल रुपये 25 लाख प्रति युनिट, यापैकी जे कमी असेल ते अनुदान केवळ यंत्रसामग्री खरेदी तसेच इमारत, गोदाम व साठवणूक पायाभूत सुविधा बांधकामासाठी दिले जाईल; तर जमीन, वीज आणि मनुष्यबळ इत्यादी खर्चासाठी अनुदान देय राहणार नाही. तसेच, इमारत व गोदामाच्या बांधकामासाठी अनुदानाचा जास्तीत जास्त हिस्सा एकूण पात्र अनुदानाच्या 30 टक्क्यांपर्यंतच मर्यादित असेल. शासकीय अनुदान एकूण प्रकल्प खर्चापैकी ठराविक खर्चाची पूर्तता करीत असल्याने उर्वरित रकमेसाठी लाभार्थ्यांचे स्वतःचे भांडवल योगदान किमान 15 टक्के असणे आणि वित्तीय संस्थांकडून मुदत कर्ज घेणे अनिवार्य राहील. या योजनेचा लाभ घेणाऱ्या नवीन प्रक्रिया युनिटची किमान क्षमता 300 किलो प्रति तास असणे आवश्यक असून, सर्व यंत्रसामग्री राष्ट्रीय मानकीकरण संस्था किंवा समतुल्य गुणवत्ता मानकानुसार असणे बंधनकारक आहे. यासोबतच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण व इतर सुरक्षा, पर्यावरणीय व वैधानिक नियमांचे पालन करणे आवश्यक राहील. लाभार्थ्याला युनिट उभारणीच्या दिनांकापासून किमान 3 वर्षे सदर मालमत्ता जतन करणे बंधनकारक असून, निधीचा गैरवापर झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी, शेतकरी गट, कंपन्या आणि संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी आपल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६

  #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्तीयोजना2026 #FarmerWelfare #...