Monday, June 22, 2026

    

    



                          अमरावती स्थानिक प्राधिकारी निवडणुकीत प्रवीण पोटे पाटील विजयी घोषित

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान

अमरावती, दि. 22 (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांनी 390 मते मिळविली. पहिल्या फेरीत विजयासाठी ठरविण्यात आलेला 211 मतांचा कोटा प्राप्त झाल्याने श्री. पोटे यांना विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी विजयी उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले.

अमरावती स्थानिक प्राधिकारी निवडणुकीत एकूण 427 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी दरम्यान यातील ६ मते अवैध ठरविण्यात आली, तर 421 मते वैध ठरल्याने विजयासाठी प्रथम पसंतीची 211 मतांचा निश्चित करण्यात आला होता. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत श्री. पोटे यांनी कोट्यापेक्षा अधिक म्हणजे 390 मते मिळविली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना 31 मते मिळाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हर्षजीत देशमुख यांना शून्य मत मिळाले.

निवडणूक निरीक्षक तथा कामगार आयुक्त डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या उपस्थितीमध्ये मतमोजणीची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडली. यावेळी विभागीय आयुक्त नयना गुंडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, ज्ञानेश्वर घ्यार, प्रसेनजित चव्हाण, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, दादासाहेब दराडे उपस्थित होते.

00000

ग्रामीण भागात  कलम 37 (1) व (3) लागू

अमरावती, दि. 22 (जिमाका) : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला असून दि. 27  जून 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अपर जिल्हादंडाधिकारी संतोष काकडे  यांनी कळविले आहे.

0000000

ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांनी मानधन सन्मान योजनेसाठी अर्ज करावेत

*1 ते 31 जुलै दरम्यान अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 22 (जिमाका) : ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांसाठी राजर्षि शाहु महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत मानधन सन्मान योजना आहे. यासाठी कलाकारांनी 1 ते 31 जुलै दरम्यान अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेसाठी सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यानुसार या योजनेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, तर सदस्य सचिव उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग राहणार आहेत. तसेच कलावंताची मानधन योजनेसाठी निवड करताना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जाणार आहे. त्यामुळे पात्र कलावंतांनी aaplesarkar.mahaonline.gov.in या लिंकवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालासाहेब बायस यांनी केले आहे.

0000000

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ

अमरावती, दि. 22 (जिमाका) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील सभागृहात शुक्रवार, दि. 19 जून रोजी सामजिक न्याय विभागाच्या वाचनालयाकरीता पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली.

यावेळी प्रादेशिक उपायुक्त माया केदार, सहायक आयुक्त समाज कल्याण राजेंद्र जाधवर, सहायक आयुक्त समाज कल्याण मंगला मून, श्री. वाठ, मनोज मेरत, विशेष अधिकारी श्री. मोरे, समाज कल्याण निरिक्षक आर. जे. महालकर उपस्थित होते. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना नशामुक्त भारत अभियान, विकसित भारत की पहचान बाबत सामुदायिक शपथ देण्यात आली. तसेच nmba.dosje.gov.in वेबसाईटवर ऑनलाईन शपथ घेणे, तसेच अभियानामध्ये सहभागी होण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सामाजिक न्याय आणि अधिकारीता विभागामार्फत दि. 26 जून रोजी आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिवस साजरा केला जातो. त्यानुसार सर्व महाविद्यालय, शासकीय अनुदानित वसतिगृह, व्यसनमुक्ती केंद्रात नागरिकांच्या सहभागासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. नागरिकांनी दि. 7 ते 26 जून दरम्यान सामाजिक सप्‍ताहात आयोजित नशामुक्त भारत अभियान विकसित भारत को पहचान या संकल्पनेवर आधारीत कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी विलास मसराळे यांनी केले आहे.

000000

विधी सेवा प्राधिकरणाचा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम

अमरावती, दि. 22 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग कार्यक्रम घेण्यात आला. रविवार, दि. 21 जून रोजी सकाळी 6.30 वाजता हा कार्यक्रम पार पडला.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उन्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि , प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्वला नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघाने कार्यक्रमात सहभाग नोंदविला. यावेळी जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश वरीष्ठस्तर, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, अमरावती जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी आणि सदस्य, अपर जिल्हाधिकारी, जिल्हा शासकीय अभियोक्ता आदी उपस्थित होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख यांनी आभार मानले.

00000

'स्वाधार' योजनेतील त्रृटी पूर्ण करण्यासाठी 7 जुलैपर्यंत मुदतवाढ

अमरावती, दि. 22 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या, परंतु कागदपत्रातील त्रुटींमुळे कार्यालयस्तरावर प्रलंबित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी दि. 7 जुलैपर्यंत त्रृटी पूर्ण कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य शासनाने शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अकरावी, बारावी, तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट आर्थिक मदत देण्यासाठी 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना' सुरू केली आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, त्यांच्यापैकी काही अर्ज कागदपत्रातील कमतरतेमुळे कार्यालयात प्रलंबित आहेत. या प्रलंबित विद्यार्थ्यांची यादी कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आली आहे. कार्यालयाकडून वेळोवेळी सूचना देऊनही अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप त्रुटी पूर्तता केलेली नाही, ज्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत.

विद्यार्थ्यांचे अर्ज त्रृटींमुळे प्रलंबित आहेत, त्यांनी शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार आवश्यक कागदपत्रे कार्यालयात संबंधित शाखेकडे जमा करावीत. या मुदतीत त्रुटी पूर्ण केली नसल्यास, याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थी विद्यार्थ्यांची राहणार आहे. तसेच दि. 16 जून ते 7 जुलै 2026 या कालावधीत दुपारी 3 ते 5 यावेळेत स्वत: उपस्थित राहून त्रृटी पूर्तता करून घेण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, अमरावती येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

त्रृटी पुर्ततेबाबत अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालय किंवा दुरध्वनी क्र. 0721-2661261 वर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी केले आहे.

0000000

जिल्हा सामान्य रुग्णालयात व्यसनमुक्ती दिन साजरा

अमरावती, दि. 22 (जिमाका) : जिल्हा सामान्य रूग्णालयात आज जागतिक व्यसनमुक्ती दिन साजरा करण्यात आला. प्रभारी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नरेंद्र सोळंके अध्यक्षस्थानी होते.

यावेळी मानसोपचार तज्‍ज्ञ डॉ. अमोल गुल्हाने, डॉ. प्रेषीत मढवी, डॉ. ऋषिकेश घोरपडे, अधिसेविका ललिता अटाळकर, भावना पुरोहित, श्रद्धा हरकंचे, प्रमोद भक्ते, सुनील कळतकर, सारा बांगड, सचिन टवलारे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. सोळंके, डॉ. गुल्हाने, डॉ. मढवी, श्रीमती पुरोहीत यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीबाबत उपचार आणि निदान याबात मार्गदशन केले. सारा बांगड यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोद भक्ते यांनी आभार मानले.

00000000

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

अमरावती, दि. 22 (जिमाका) : शासकीय वसतिगहात प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह युनिट क्र. 4, जेल रोड, अमरावती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह, जेल रोड, अमरावती,  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, कॅम्प, अमरावती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, अमरावती, 125 जयंती विलासनगर येथे शैक्षणिक सत्र 2026-27 करीता कनिष्ठ महाविद्यालयीन आणि अव्यावसायिक महाविद्यालयीन विभागाकरीता दि. 15 जुलैपर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

प्रवेशाकरीता इच्छुक विद्यार्थ्यांनी hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सदर करावेत. ऑनलाईन केलेला अर्ज डाऊनलोड करुन त्याची प्रिंट आणि सोबत आवश्यक कागदपत्रे वसतिगृहास सादर करावीत. वसतिगृहात प्रवेश मिळाला नसल्यास विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे, असे शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल यांनी कळविले आहे.

00000000

No comments:

Post a Comment

                                     अमरावती स्थानिक प्राधिकारी निवडणुकीत प्रवीण पोटे पाटील विजयी घोषित जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्...