Thursday, June 25, 2026

DIO NEWS AMRAVATI 25.06.2026

 

शहरात प्रतिबंधात्मक कलम 37 (1) (3) लागू

अमरावती, दि. 25 (जिमाका) : शहरात शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात  लागू करण्यात आला असून सदर आदेश  दि. 26 जून  ते 10 जुलै 2026 च्या  मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे.

या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी कळविले आहे.

00000000

जिल्ह्यातील तरुणांसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण;

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची क्लिनिकल रिसर्च बॅचला भेट

अमरावती, दि.25 (जिमाका): जिल्ह्यातील युवा वर्गाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या उद्देशाने, किमान कौशल्य विकास योजनेअंतर्गत रेडिअंट हॉस्पिटल येथे 'क्लिनिकल रिसर्च असोसिएट' या कोर्सचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षण बॅचला आज जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला .

या प्रसंगी प्रशिक्षणार्थी तृप्ती मोहकर व शरण्य पांडव यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानत हे प्रशिक्षण करिअरसाठी उपयुक्त ठरेल, याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हॉस्पिटलच्या प्रशिक्षण संचालिका डॉ. माधुरी अग्रवाल यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा कोर्स 2025-26 या आर्थिक वर्षात उपलब्ध झाला असून, मागील वर्षी 60 पैकी 40 विद्यार्थ्यांना लखनऊ, हैदराबाद, दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये रोजगार मिळाला आहे. हा कोर्स औषधे, जैविक उत्पादने आणि वैद्यकीय उपकरणांच्या आंतरराष्ट्रीय नियमांचे सर्वसमावेशक ज्ञान देतो.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, क्लिनिकल रिसर्च हे वैद्यकीय क्षेत्रातील झपाट्याने विस्तारणारे क्षेत्र आहे. हे प्रशिक्षण भारतात खूप महागडे आहे, परंतु आपल्या जिल्ह्यातील युवकांसाठी ते शासनामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासोबतच जिल्ह्यात किसान ड्रोन ऑपरेटर, एआय, सायबर सिक्युरिटी, डिजिटल मार्केटिंग, सोलर पॅनल व सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन यांसारखे आधुनिक कोर्सेसही मोफत उपलब्ध आहेत. गरजू तरुणांनी या संधीचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रशिक्षणाबाबत अधिक माहिती व नोंदणीसाठी इच्छुकांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा उस्मानिया मशिदीजवळ, टेक्निकल हायस्कूल परिसरातील जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाशी संपर्क साधावा. या भेटीदरम्यान सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर , डॉ. काकाणी, डॉ. पवन अग्रवाल आदी उपस्थित होते.

00000000

अमरावती येथे दोन स्वतंत्र तहसील कार्यालयांचा प्रस्ताव;

समाविष्ट गावांच्या यादीवर 15 दिवसांत हरकती व सूचना नोंदवण्याचे आवाहन

अमरावती, दि. 25 (जिमाका): जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचे कामकाज अधिक लोकाभिमुख आणि गतीमान करण्यासाठी अमरावती येथे प्रस्तावित असलेल्या अपर तहसीलदार कार्यालयाबाबत 15 दिवसांची जाहीर सूचना तयार करून ती सूचना फलकावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले असून, या रचनेवर नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात येत आहेत. या प्रस्तावानुसार आता अमरावती जिल्ह्यामध्ये 'अपर तहसील कार्यालय (अमरावती ग्रामीण)' आणि 'तहसील कार्यालय, अमरावती (अमरावती शहर)' अशी दोन स्वतंत्र कार्यालये अस्तित्वात येणार असून, यामध्ये समाविष्ट असणारे महसूल मंडळ, ग्राम महसूल अधिकारी यांचे साजे (तलाठी साजे) आणि गावांची सविस्तर यादी या जाहीरनाम्यासोबत संलग्न करण्यात आली आहे. या दोन्ही प्रस्तावित कार्यालयांच्या हद्दीत येणाऱ्या महसूल मंडळांच्या आणि गावांच्या रचनेबाबत ज्या कोणा नागरिकांच्या किंवा लोकप्रतिनिधींच्या काही हरकती अथवा सूचना असतील, त्यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत आपल्या लेखी हरकती व सूचना उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर कराव्यात, तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही हरकती व सूचनांचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, अशी माहिती अमरावतीच्या उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी दिली आहे.

0000000

जिल्हा  लोकशाही दिन येत्या सोमवारी

अमरावती, दि. 26 (जिमाका) : जुलै महिन्याचा जिल्हा लोकशाही दिन सोमवार, दि. 6 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

0000000

अमरावती जिल्ह्यात प्रशासकीय पुनर्रचना: अचलपूर येथे 'अपर जिल्हाधिकारी कार्यालय'

प्रस्तावित; 14 तालुक्यांची होणार नवी विभागणी

अमरावती, दि. 25 (जिमाका): जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी अमरावती जिल्ह्यामध्ये आता अचलपूर येथे नवीन 'अपर जिल्हाधिकारी कार्यालय' प्रस्तावित करण्यात आले आहे. या नव्या कार्यालयाच्या स्थापनेमुळे जिल्ह्यातील एकूण 14 तालुक्यांची विभागणी दोन मुख्य कार्यालयांमध्ये केली जाणार आहे.

प्रस्तावित आराखड्यानुसार, नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्यालय हे अचलपूर येथे असेल. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात प्रामुख्याने मेळघाट आणि परिसरातील 6 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अचलपूर, चांदूर बाजार, दर्यापूर, अंजनगाव, चिखलदरा आणि धारणी या तालुक्यांचा समावेश आहे. या दुर्गम आणि मोठ्या तालुक्यांमधील नागरिकांना विविध महसुली व प्रशासकीय कामांसाठी आता थेट अमरावतीला येण्याची गरज पडणार नाही, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे.

तसेच मुख्य जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या थेट अखत्यारीत उर्वरित 8 तालुके कायम राहणार आहेत. यामध्ये अमरावती शहर व ग्रामीण, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, मोर्शी, वरुड, तिवसा आणि भातकुली या तालुक्यांचा समावेश असेल. या विभागणीमुळे प्रशासकीय कामांचे विकेंद्रीकरण होऊन कामांचा निपटारा अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे.

15 दिवसांत हरकती नोंदवण्याचे आवाहन

अचलपूर येथील प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्राबाबत नागरिकांच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास, त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.मिळालेल्या मुदतीनंतर येणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नसल्याने, नागरिकांनी आपल्या सूचना वेळेत मांडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

000000000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ची प्रमुख वैशिष्ट्ये...

‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ ची प्रमुख वैशिष्ट्ये... #महाराष्ट्रशासन #कर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरी ...