Thursday, June 11, 2026

DIO NEWS AMRAVATI 11.06.2026


                        'सारथी'तर्फे गाविलगड आणि असदगड किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम;

सिडबॉलद्वारे वृक्षारोपण उपक्रम

अमरावती, दि. 11 (जिमाका): मराठा, कुणबी व कुणबी-मराठा समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी कार्यरत असलेल्या 'सारथी' संस्थेच्या वतीने राज्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. 'सारथी'चे व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील यांच्या संकल्पनेतून आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून नुकताच हा उपक्रम पार पडला. छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करणे आणि शाहू महाराजांच्या लोककल्याणाचा विचार पुढे नेणे, हा यामागचा मुख्य उद्देश होता.

या मोहिमेत अमरावती विभागांतर्गत चिखलदरा येथील गाविलगड आणि अकोला येथील असदगड किल्ल्यावर 'सारथी'च्या संशोधन अधिछात्रवृत्ती धारक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गाविलगड येथे उपव्यवस्थापकीय संचालक सचिन शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक विद्यार्थी शंकर गोरे, रूपेश पडघन, सदाशिव आरसोड, योगेश भोयर, पवन मापारी आणि कर्मचारी किरण चाफाले, देवानंद सोळंके व कुलदीप सूरकर यांनी परिसर स्वच्छ केला. या स्वच्छता मोहिमेसोबतच विद्यार्थ्यांनी स्थानिक प्रजातींच्या बिया, माती, शेण व बाविस्टीन पावडरचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केलेले 'सिडबॉल' चिखलदरा परिसरात टाकले, जेणेकरून पावसाळ्यात उत्तम वृक्षनिर्मिती होईल.

तसेच, अकोला येथील असदगड किल्ल्यावर अक्षय बांगर, अनिरुद्ध दळवी, अमोल धोत्रे, अजय काळे, सूरज पारस्कर आणि प्रिया शेटे या संशोधक विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवले. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वाटचालीतील गड-किल्ल्यांचे योगदान अधोरेखित करण्यात आले असून, नागरिकांनी या वास्तूंचे पावित्र्य राखावे व स्वच्छता ठेवावी, असे आवाहन 'सारथी' संस्थेने केले आहे.

000000000



मान्सूनपूर्व पूर आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज;

मालखेड तलावावर रंगीत तालीम संपन्न

अमरावती, दि. 11 (जिमाका): आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उद्भवू शकणाऱ्या पूर परिस्थितीचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी अमरावती जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आशिष येरेकर यांच्या आदेशाने  मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ ) नागपूर आणि जिल्हा शोध व बचाव पथक, जिल्हाधिकारी कार्यालय , अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने या थरारक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.

 

            निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड तलाव येथे जिल्हास्तरीय पूर आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम (मॉकड्रिल) पार पडली.  या रंगीत तालीमीदरम्यान पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुरक्षित सुटका करणे, त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवणे आणि पूर परिस्थितीमुळे घरांची पडझड किंवा इतर आपत्ती ओढवल्यास शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून जीवितहानी कशी टाळायची, याचे थेट सादरीकरण करण्यात आले. विशेषतः ग्रामीण भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास ती स्थानिक पातळीवर कशी हाताळावी, याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण एनडीआरएफ नागपूर आणि जिल्हा शोध व बचाव पथकातील तज्ज्ञांनी विविध प्रात्यक्षिकांद्वारे दिले. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या काय असाव्यात, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेत चांदूर रेल्वे तालुक्यातील महसूल विभाग, गटविकास अधिकारी, संबंधित कर्मचारी आणि आरोग्य यंत्रणेने सक्रिय सहभाग घेतला.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, चांदूर रेल्वेचे नायब तहसीलदार अनिल चौरे, पोलीस निरीक्षक श्री. मिश्रा, पोलीस निरीक्षक श्री. यादव, एनडीआरएफ नागपूरचे डॉ. झा, मुंबई मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ अनुराग कचोरी, महसूल अधिकारी प्रमोद शिरसाठ, तलाठी दीपक चव्हाण, आरोग्य यंत्रणेचे डॉ. अविनाश पवार, प्रीती पवार, सौरव पाठक, मनोज माकोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी सचिन धरमकर, विशाल लिमकर, आकाश निमकर, कौस्तुभ वैद्य, सुमित बांबल, प्रतिक कडू, नारायण दवंगे, अशोक निंबरते तसेच 'आपला मित्र' संस्थेचे तुषार गोंडाणे व अमोल गोंडाणे यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून शौर्यपूर्ण बचावकार्याची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी केले.

00000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 11.06.2026

                              'सारथी'तर्फे गाविलगड आणि असदगड किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम; सिडबॉलद्वारे वृक्षारोपण उपक्रम अमरावती, दि....