जिल्ह्यात खाद्यतेल अभियानांतर्गत 'मिनी ऑईल मिल'साठी
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
अमरावती, दि. 19 (जिमाका): जिल्ह्यामध्ये सन 2026-27 या वर्षात सोयाबीन पिकासाठी 'राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया योजना' राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत जिल्ह्यात 'मिनी ऑईल मिल (एक्सपेलर)' या घटकाचे लक्षांक प्राप्त झाले आहेत. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा जास्तीत-जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत मिनी ऑईल मिल, एक्सपेलर फिल्टर प्रेससह आणि मिनी ऑईल मिल, एक्सपेलर फिल्टर प्रेसशिवाय अशा दोन घटकांचा लाभ वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि मूल्य साखळी भागीदार गट यांना दिला जाणार आहे. कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या नियमांनुसारच लाभार्थ्यांची निवड केली जाईल आणि यासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी सादर केलेल्या अर्जांमधून प्राधान्याने या योजनेसाठी लाभार्थी निवडले जाणार आहेत. या अभियानांतर्गत आर्थिक मर्यादेचा तपशील पाहता, मिनी ऑईल मिल, एक्सपेलर फिल्टर प्रेससह या घटकासाठी ४ लाख रुपये प्रति युनिट खर्च मर्यादा असून, युनिटच्या किमतीच्या 50 टक्के किंवा निर्धारित उच्चतम मर्यादेत, अथवा युनिटच्या किमतीच्या 40 टक्के किंवा निर्धारित उच्चतम मर्यादेत अनुदान देय राहील; तर मिनी ऑईल मिल, एक्सपेलर फिल्टर प्रेसशिवाय या घटकासाठी 3 लाख रुपये प्रति युनिट खर्च मर्यादा असून, यामध्येही युनिटच्या किमतीच्या 50 टक्के किंवा निर्धारित उच्चतम मर्यादेत, अथवा युनिटच्या किमतीच्या 40 टक्के किंवा निर्धारित उच्चतम मर्यादेत अनुदान उपलब्ध करून दिले जाईल.
पात्रतेच्या निकषानुसार जिल्ह्यातील इच्छुक वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि मूल्य साखळी भागीदार गटांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत आणि या योजनेच्या अधिक माहितीसाठी व तांत्रिक तपशिलासाठी नागरिकांनी आपापल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
000000
जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतींचे प्रारूप आरक्षण प्रसिद्ध;
25 जूनपर्यंत आक्षेप नोंदवण्याचे आवाहन
अमरावती, दि. 19 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील एकूण 498 ग्रामपंचायतींचे प्रभागनिहाय प्रारूप आरक्षण आज, 19 जून 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. संबंधित तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे रीतसर मुनादी (दवंडी) देऊन हे प्रारूप आरक्षण नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. या प्रभागनिहाय प्रारूप आरक्षणामध्ये जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील 44, वरूड 43, दर्यापूर 49, अंजनगाव सुर्जी 34, अमरावती 46, भातकुली 36, नांदगाव खंडेश्वर 51, चांदुर रेल्वे 30, धामणगाव रेल्वे 55, तिवसा 30, मोर्शी 39 आणि चांदुर बाजार तालुक्यातील 41 अशा एकूण 498 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाचा तपशील समाविष्ट आहे. दरम्यान, हे प्रारूप आरक्षण प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या नागरिकांना यावर काही आक्षेप किंवा हरकती घ्यायच्या असतील, त्यांच्यासाठी 25 जून 2026 ही अंतिम तारीख असणार आहे. शासकीय सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत संबंधित तहसील कार्यालयात हे आक्षेप स्वीकारले जातील, तरी इच्छुकांनी विहित मुदतीत आपले आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी केले आहे.
000000
‘नशा मुक्त भारत अभियान’ सामाजिक सप्ताहाचे उद्घाटन;
26 जूनपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 19 (जिमाका): सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागांतर्गत 26 जून या 'आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिवसा'चे औचित्य साधून जिल्ह्यात 26 जून पर्यंत 'सामाजिक सप्ताह' साजरा करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात या सप्ताहांतर्गत 'नशा मुक्त भारत अभियान विकसित भारत की पहचान' या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे उद्घाटन समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.
याप्रसंगी समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर, वित्त व लेखा विभागाचे सहायक संचालक श्री. मेतकर तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी, महामंडळांचे कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांनी नशा मुक्तीचे संकल्प पत्र व शपथ घेतली, तसेच निर्धारित संकेतस्थळावर ऑनलाईन शपथही नोंदवण्यात आली. या पार्श्वभूमीवर निवासी शाळांचे मुख्याध्यापक व शासकीय वसतिगृह अधीक्षक यांनी विविध उपक्रम राबवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, शासकीय अनुदानित वसतिगृहे, व्यसनमुक्ती केंद्रे आणि सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000000
No comments:
Post a Comment