Tuesday, July 9, 2024

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत तंबाखू मुक्त आरोग्यदायी शाळा उपक्रम

 

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत तंबाखू मुक्त आरोग्यदायी शाळा उपक्रम

           अमरावती, दि. 09 (जिमाका): राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत तंबाखू मुक्त करण्याच्या उद्देशाने जिल्हा व तालुकास्तरावर तंबाखू मुक्त आरोग्यदायी शाळा उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमातंर्गत शाळा व महाविद्यालयात विविध कार्यक्रम व कार्यशाळेच्या माध्यमातून तज्ज्ञाव्दारे मार्गदर्शन करण्यात येत आहे.

 

           तंबाखू मुक्त आरोग्यदायी शाळा उपक्रमातंर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा नुकतीच ज्ञानमाता हायस्कूल अमरावती येथे पार पडली. या उपक्रमात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सलाम मुंबई फाउंडेशन व शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांनी सहभाग घेतला होता. यावेळी शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने, उपशिक्षांधिकारी निखील मानकर, शिक्षण विस्तार अधिकारी गजला नाजली, ज्ञानमाता हायस्कूलच्या प्राचार्य प्रवीण खांडेकर आदि उपस्थित होते. जिल्हा सामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. मंगेश गुजर, सलाम मुंबई फौन्डेशनचे समन्वयक पूजा वाघमारे व त्यांचे प्रतिनिधी यांनी मार्गदर्शन केले.

 

           राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात 3 जुलैपासून झाली असून सर्व तालुका ठिकाणी दि. 13 जुलै 2024 पर्यंत कार्यशाळा तालुका स्तरांवर घेण्यात येत आहे. तिवसा, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, वरुड व मोर्शी या ठिकाणी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत समुपदेशक व सलाम मुंबई फौन्डेशनचे तज्ज्ञ प्रतिनिधी यांनी मार्गदर्शन केले. तसेच केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या 9 निकषाचे कशा पद्धतीने पूर्ण करावयाचे व त्याची नोंदणी कशी कराची याबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन तज्ज्ञामार्फत केले जात आहे. प्रशिक्षणामध्ये तंबाखू नियंत्रण कायदा 2003 बाबत माहिती व मार्गदशनही दिल्या जात आहे.

0000

 

Monday, July 8, 2024

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कार्यालयाचे स्थलांतर

 

औद्योगिक सुरक्षा  व आरोग्य संचालनालय कार्यालयाचे स्थलांतर

       अमरावती, दि. 08 (जिमाका): औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय हे कार्यालय नवीन जागेवर दि. 1 जुलै 2024 रोजी पासून स्थलांतरीत झाले आहे.

             या कार्यालयाचा नवीन पत्ता उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, 1 ला माळा, प्लॉट नं. 5, पितृछाया, राधानगर, गल्ली नं. 1, पंजाब आणि सिंध बँकच्या वर, पंचवटी चौक, अमरावती 444603 येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. कार्यालयाच्या बदली झालेल्या जागेत कार्यालयीन कामकाजाकरिता संपर्क साधावा, असे आवाहन उपसंचालक प.म.गंपावार यांनी केले आहे.

00000

खरीप पीक स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

 

खरीप पीक स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

           अमरावती, दि. 08 (जिमाक) :  पिकांच्या उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी कृषी विभागामार्फत खरीप हंगामासाठी पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सहभागासाठी मूग व उडीद पीक उत्पादक शेतकऱ्यांनी दि. 31 जुलैपूर्वी तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल उत्पादकांनी 31 ऑगस्टपूर्वी कृषी कार्यालयात सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

          राज्यामध्ये पीकांची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी उत्पादन वाढविणे, प्रयोगशील शेतक-यांचे मनोबल उंचावणे, त्यापासून इतरांना प्रेरणा मिळणे, अद्ययावत तंत्रज्ञान सर्वदूर पोहोचविणे असा स्पर्धेचा उद्देश असल्याचे श्री. सातपुते यांनी सांगितले.

 

स्पर्धेत बक्षीसे अशी आहेत

         सर्वसाधारण व आदिवासी गट दोहोंसाठी तालुका पातळीवर अनुक्रमे पाच, तीन व दोन हजार रूपये अशी पहिली तीन बक्षीसे आहेत. जिल्हास्तरावर पहिले बक्षीस 10 हजार असून, दुसरे 7 हजार व तिसरे 5 हजार रूपये आहे. राज्यस्तरावर पहिली तीन बक्षीसे अनुक्रमे 50 हजार, 40 हजार व 30 हजार रूपये अशी आहेत.

 

एकापेक्षा जास्त पिकांसाठी सहभाग घेऊ शकता

           स्पर्धेतील सहभागासाठी संबंधित पिकाची शेतात किमान 40 आर क्षेत्रावर लागवड असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी सहभाग घेता येईल. सर्व गटासाठी पीकनिहाय 300 रूपये प्रवेश शुल्क आहे. इच्छुकांनी विहित अर्जासह प्रवेश शुल्काची पावती, सातबारा, आठ अ उतारा, तसेच आदिवासी बांधवांसाठी जात प्रमाणपत्र आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

            स्पर्धेसाठी तालुका हा घटक आधारभूत आहे. त्यासाठी पुरेसे अर्ज प्राप्त झाल्यानंतर तालुका कृषी अधिकारी स्पर्धा जाहीर करतील. प्रत्येक तालुक्यात किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 असणे आवश्यक आहे. मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीसाठी कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी, तालुका किंवा जिल्हा कृषी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन श्री. सातपुते यांनी केले.

0000

खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी ई-आर-1 सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत

 

खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी ई-आर-1 सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत

          अमरावती, दि. 08 (जिमाका) :  उद्योजक, आस्थापना यांनी त्रैमासिक ई-आर-1 ऑनलाईन सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2024 पर्यंत आहे. सर्व खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी यासाठी ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा. ई-आर-1 ऑनलाईन सादर न करणाऱ्या कसूरदार आस्थापनावर विहित कायद्यान्वये कार्यवाही करण्यात येणार आहे. याची संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

             कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्याकडून पुरविण्यात येणाऱ्या रोजगारविषयक सर्व सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. या सुविधांसाठी  www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच उद्योजक व आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालय (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारे) कायदा 1959 व नियमावली 1960 कलम 5 (1) व कलम 5 (2) अन्वये त्रैमासिक ई-आर-1 ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. 31 जून 2024 अखेर संपणाऱ्या त्रैमासिक ई-आर-1 ऑनलाईन या प्रपत्राची माहिती वरील संकेतस्थळावर सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी उद्योजक, आस्थापना यांनी त्यांचे युजर आयडी व पासवर्डच्या माध्यामातून लॉगिन करून ऑनलाईन सादर करावयाची आहे. ऑनलाईन ई-आर-1 सादर करतांना काही अडचण असल्याच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाशी संपर्क साधावा. किंवा दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 यावर संपर्क साधावा.

000000

ऑफिसर क्लब येथे मत्स्यव्यवसाय उत्पादक शेतकरी व ग्राहक मेळाव्याचे आयोजन

 

ऑफिसर क्लब येथे मत्स्यव्यवसाय उत्पादक शेतकरी व ग्राहक मेळाव्याचे आयोजन

         अमरावती, दि. 08 (जिमाका): प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय विभाग व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवसनिमित्य ऑफिसर क्लब, जुना बायपास रोड, अमरावती येथे बुधवार दि. 10 जुलै रोजी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत मत्स्यव्यवसाय उत्पादक शेतकरी व ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मत्स्य पदार्थांचा खाद्य महोत्सवाचे आयोजन सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा जिल्ह्यातील मत्स्य कास्तकार, व्यवसायिक, व्यवसाय सहकारी संस्थाचे पदाधिकारी, सभासद व मत्स्य खवय्यांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त एम.एम. मेश्राम यांनी केले आहे.

 

          मेळाव्यामध्ये मत्स्य व्यवसायातील विविध रोजगार संधी व त्यासाठी आवश्यक असणारी परीपूर्ण माहितीसह मत्स्यव्यवसायाशी निगडित विविध विषयांवर तांत्रिक मार्गदर्शन सत्र, विविध शासकीय योजनेची माहिती, मच्छीमारांच्या विकासासाठी विविध कल्याणकारी योजना, मत्स्य व्यवसायाकरीता लागणाऱ्या सर्व साहित्याचे पुरवठादार यांच्याबरोबर समन्वय मेळाव्याचा माध्यमातून संधी उपलब्ध होणार आहे.

 

मत्स्य पदार्थांचा खाद्य महोत्सव

         मत्स्यव्यवसाय  विभागामार्फत ऑफिसर्स क्लब, अमरावती येथे दि. 10 जुलै रोजी सायंकाळी 6 ते 9 वाजेदरम्यान मत्स्य पदार्थांचा खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात अमरावतीकराना केवळ 499 रूपयामध्ये पोटभर चविष्ट मास्यांचा आस्वाद घेता येणार आहे. ताज्या स्वच्छ मासळीपासून पारंपारिक घरगुती पद्धतीने तयार केलेले मत्स्यपदार्थ अत्यंत रास्त दरात उपलब्ध आहे. लहान थोरांपासून वयोवृध्दापर्यंत सर्वांना मासे खाण्याचे अनेक फायदे आहेत. मासे खाल्लामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कर्करोग हृद्यविकाऱ्यांसारख्या आजारामुळे होणारा मृत्यूचा धोका कमी होतो,  लहान मुलांच्या मेंदूची वाढ होण्यास व बुद्धीचानाक्ष होण्यास माशांमध्ये असलेल्या ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मदत करते. तसेच डोळ्यांची निगा राखण्याकरीता मासे खाणे हे अत्यंत लाभदायक असतात.

000000

एक रुपयात पीक विमा योजना; शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा

 

एक रुपयात पीक विमा योजना; शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा

            अमरावती, दि. 08 (जिमाका): नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा याकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येतो. योजनेंतर्गत खरीप हंगामासाठी एक रुपया भरुन पिक विमा संरक्षण प्राप्त होतो. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवानी एक रुपया भरुन पीक विमा योजनेचा लाभ दि. 15 जुलैपूर्वी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केल आहे.

          हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून पीक काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपिट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खन, दुष्काळ, पावसातील खंड, किंड व रोग इत्यादी बाबीं मुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात‍ नुकसान इत्यादी जोखमीच्या बाबीचा योजनेत समावेश करण्यात आला आहे. योजनेतंर्गत विमा नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना  नुकसान भरपाई मिळणार आहे. जिल्ह्यात पीक विमा योजनेंतर्गत नोंदणी संथ गतीने सुरू असून आतापर्यत चालु हंगामात 93 हजार 569 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. विमा नोंदणी करण्याची मुदत 15 जुलै असून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. योजनेची सविस्तर माहितीसाठी गावातील कृषी सहायक व तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. सी.एस.सी. केंद्रामार्फत योजनेच्या अर्जामागे शेतकऱ्यांनी केवळ 1 रूपयाच भरावयाचा आहे. अर्ज करण्यासाठी अतिरिक्त पैसे घेतल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभाग, तहसिल कार्यालयास तक्रार करावी. अखेरच्या दिवसात पीक विमा पोर्टलवर लोड येण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. तरी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता जवळच्या सी.एस.सी केंद्राशी संपर्क साधुन योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Friday, July 5, 2024

मागास प्रवर्गातील मुलामुलींना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; 15 जुलैपर्यंत मुदतवाढ

 

मागास प्रवर्गातील मुलामुलींना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; 15 जुलैपर्यंत मुदतवाढ

 

          अमरावती, दि. 05 (जिमाका): विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुलामुलींना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.  सन 2024-25 करीता 75 विद्यार्थ्यांसाठी  दि. 30 जून 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. या योजनेस मिळालेला प्रतिसाद विचारात घेऊन 15 दिवसांची म्हणजेच दि. 15 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शिष्यवृत्ती योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे प्रादेशिक उपसंचालक विजय साळवे यांनी केले आहे.

                                                                    000000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...