Monday, September 30, 2024

DIO AMRAVATI NEWS 30.09.2024

 



मेळघाटातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

अमरावती, दि. 30 : सिमाडोह येथील अपघातानंतर मेळघाटातील अपघाताचा मुद्दा गांभीर्याने समोर आला आहे. यावर तातडीने उपाययोजना कराव्या लागणार आहे. त्यामुळे शक्य असलेल्या ठिकाणी रस्ता रूंदीकरण, संरक्षण कठडे उभारणे आणि परिवहन मंडळाच्या बसेसच्या फेऱ्या तातडीने वाढवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात सिमाडोह येथील खासगी बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम, परिवहन आणि परिवहन महामंडळातर्फे एकत्रित उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले. परिवहन महामंडळाच्या बसेसची संख्या आणि वेळेवर बसेस नसल्यामुळे नागरिक खासगी बसेसमधून नाईलाजाने प्रवास करतात. त्यामुळे परिवहन मंडळाने बसेसच्या फेऱ्या वाढवाव्यात. तसेच प्रवाशांच्या गरजेनुसार बसेसचा वेळ ठरविण्यात यावा. यामुळे खासगी बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या नियंत्रणात येईल.

मेळघाटातील रस्ते अरूंद आहेत. तसेच वळणाचे रस्ते असल्यामुळे याठिकाणी अपघाताची शक्यता वाढत असते. त्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी फलक लावण्यात यावेत. तसेच रस्ता रूंदीकरण आणि अपघात प्रवण क्षेत्रात संरक्षक कठडे उभारण्यात यावेत. अपघातासाठी खासगी वाहनांचा अतिवेग कारण असल्यामुळे परिवहन विभागाने पोलिसांसोबत वाहनांची तपासणी करण्यात यावी. यात अतिवेगासोबतच मर्यादेपेक्षा जादा प्रवासी असल्यास कारवाई करावी. त्यामुळे खासगी वाहतुकीवर अंकुश लागण्यास मदत होईल.

वन विभागाच्या परवानगी अभावी नवीन रस्त्यांचे कामे करणे शक्य नाही. मात्र खडीकरण करून रस्ते रूंद करणे तातडीने शक्य आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या रूंदीकरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. त्यामुळे भविष्यात याठिकाणी रूंद रस्ते तयार होण्यास मदत होईल. यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश दिले.

00000

 




 

नांदगाव खंडेश्वर येथे स्वच्छता ही सेवा मोहिमेला सुरुवात

अमरावती, दि. 30 : नेहरू युवा केंद्रतर्फे नांदगाव खंडेश्वर येथे स्वच्छता ही सेवा मोहीमेला सुरवात करण्यात आली. यात नागरिकांनी उत्स्फुर्त  प्रतिसाद नोंदविला.

जिल्हा समन्वयक स्नेहल बासुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा 2024 मोहीम राबविण्यात येत आहे. यात स्वच्छतेचे महत्त्व, स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता यांचे पालन करण्यात येत आहे. गांधी जयंती अगोदर परिसर स्वच्छ करणे, दररोज परिसर स्वच्छ ठेवणे आणि आरोग्य निरोगी राहावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांना  भूपेंद्र जेवडे यांनी स्वच्छतेची शपथ दिली. स्वच्छता मोहिमेला ॲड. मोहन जाधव, भुमेश्वर गोरे, आकाश मंगळे, पवन जेवडे, निलेश हळदे, सचिन डोक यांनी पुढाकार घेतला.

00000



नया अकोला येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

अमरावती, दि. 30 : उपमुख्यमंत्री सामुदायिक मोफत आरोग्य तपासणी शिबीर नया अकोला येथे पार पडले.

शिबिरात कर्करोग, हृदयरोग, मेंदू, लघवी, किडनी आजार, किडनी प्रत्यारोपण, प्लास्टिक सर्जरी, बालरोग, एनसीडी आजाराशी संबंधित  रुग्ण तपासणी करण्यात आली. यात 92 रुग्णांपैकी 25 रुग्ण विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. शिबिरासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे, नोडल अधिकारी डॉ. श्याम गावंडे यांनी मार्गदर्शन केले. तपासणीसाठी डॉ. सपना गुप्ता, वैद्यकीय अधिकारी दिनेश हिवराळे, लेखापाल भूपेंद्र जेवडे, अधिपरीचारीका प्रतिभा सोळंके, एस. एस. खेडेकर, आशा जी. एच. निमकर, सुनंदा ढोक, योगिता घोम, राजकन्या बुरडे, आरती बागडे, दिपक शर्मा यांनी सहकार्य केले.

0000

सणउत्सव कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश जारी

अमरावती, दि. 30 : जिल्ह्यात आगामी काळात सण उत्सव साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे.

जिल्ह्यात नवरात्री उत्सवास प्रारंभ होणार आहे, तसेच दुर्गा विसर्जन, विविध कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित  राखण्यासाठी  महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 36 नुसार पोलीस आयुक्तालयाच्या  परिसरातील  दि. 2 ते दि. 16 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहे.

0000

तंत्रनिकेतनमध्ये मोफत ब्युटिशियन प्रशिक्षण

अमरावती, दि. 30 : केंद्र शासन पुरस्कृत कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलीटेक्निक योजना ही शासकीय तंत्रनिकेतन येथे राबविण्यात येते. यात तांत्रिक कौशल्यावर आधारीत ब्युटिशियन या तीन महिने कालावधीचे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

सदर प्रशिक्षण ग्रामीण अल्पशिक्षीत युवतींसाठी आहे. प्रशिक्षणासाठी वयाची अट नाही. प्रशिक्षणासाठी अर्ज योजनेच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. मुलाखतीतून प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलीटेक्निक योजना कार्यालय, मुलींचे वसतिगृहासमोर, शासकीय तंत्रनिकेतन परिसर गाडगेनगर, अमरावती येथे संदीप डाहाके, विनोद कदम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन योजनेचे समन्वयक  प्रा. एस. व्ही. आचार्य आणि प्राचार्य व्ही. आर मानकर यांनी केले आहे.

00000

भूकंपामुळे कोणतीही हानी नाही

नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अमरावती, दि. 30 : जिल्ह्यात आज दि. ३० सप्टेंबर रोजी वेळ दुपारी १.३७ मिनिटांनी चिखलदरा तालुक्यातील टेटू आणि आमझरी भागामध्ये आणि लगतचे काही गाव, तालुक्यामध्ये भूकंपाचा धक्का जाणविल्याची माहिती मिळाली. या भूकंपामुळे कोणतीही हानी झाली नसून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

या संदर्भातील तांत्रिक माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र, नवी दिल्ली यांनी वेबसाईटवर भूकंपाची माहिती प्रकाशित केली आहे. यात 4.2 तिव्रता दर्शविली आहे. यासंदर्भात भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण मध्य विभाग नागपूर येथील भूवैज्ञानिकांशी संपर्क करण्यात आला आहे. त्यांच्याद्वारे क्षेत्रिय तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर भूकंप किंवा हादऱ्याबद्दलची कारणे आणि इतर आवश्यक बाबींची माहिती प्राप्त होणार आहे.

जिल्ह्यातील भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याबाबत माहिती प्राप्त झालेली नाही. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, तसेच सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

00000

Friday, September 27, 2024

DIO AMRAVATI NEWS 27.09.2024

 





महिलांना एमआयडीसीत प्राधान्याने जागा देणार

       - उद्योगमंत्री उदय सामंत

महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रम थाटात संपन्न

            अमरावती, दि. 27 (जिमाका) : उद्योग क्षेत्रामध्ये राज्य आघाडीवर आहे. उद्योग क्षेत्रामध्येही स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिलांचा टक्का वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी एमआयडीसीच्या क्षेत्रामध्ये स्वतंत्र भूखंड उपलब्ध करुन दिले जातील, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.

महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रम आज येथे पार पडला. यावेळी आमदार रवी राणा, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर आदी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, संपूर्ण बाजारपेठेचा उद्योग क्षेत्राशी संबंध येतोच. त्यामुळे सामाजिक सक्षमीकरण करताना उद्योग क्षेत्राचा विचार करावाच लागतो. लाडकी बहिण योजनेतून महिलांचे सक्षमीकरण करीत असताना त्यांना मिळालेल्या मदतीतून बाजारपेठेतील आवश्यक वस्तूंची खरेदी होत असल्यामुळे एका दृष्टीकोनातून अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. त्यामुळे राज्याचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी उद्योग क्षेत्राचा विकास करणे गरजेचे आहे. विदर्भाचा विकास व्हावा यासाठी नांदगाव पेठ येथे पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहे. उद्योग क्षेत्रात सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही महत्वाची नांदी आहे.

             ग्रामीण पातळीवर रोजगार निर्माण करणारी विश्वकर्मा योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यात येत आहे. या योजनेत 50 हजार नोंदणी झाली, यातील 30 हजार लाभार्थ्यांना किटचे वाटप करण्यात आले. यात 35 हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ग्रामीण पातळीवरील रोजगारासह मोठे उद्योग राज्यात येण्यासाठी उद्योग विभाग कार्य करीत आहे. राज्यातील एकही उद्योग बाहेर जाऊ दिल्या जाणार नाही. त्यासोबतच गडचिरोली सारख्या जिल्ह्यात स्टील क्षेत्रातील गुंतवणूक होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. येत्या एक वर्षात येथील चित्र बदलेले असेल.

 कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले. उपेंद्र तोमर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. मोनिका उमक यांनी सूत्रसंचालन केले.

000000







पर्यटनदिनानिमित्त विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन

            अमरावती, दि. 27 (जिमाका) : जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज विविध उपक्रम राबविण्यात आले. यात पक्षीनिरिक्षण, कला प्रदर्शन आणि पथनाट्याचे सादरीकरण करून पर्यटनाबाबत जनजागृती करण्यात आली.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज सकाळी वाजता छत्री तलाव परिसरात ट्रेकिंग आणि पक्षी निरिक्षणाचा कार्यक्रम पार पडला. यात अॅडव्हेंचर हब क्लबचे जयंत वडतकर, मनिष ढाकुलकर यांनी विविध पक्ष्यांबाबत माहिती दिली. आजच्या पक्षी निरिक्षणामध्ये 35 प्रजातींचे पक्षी आढळून आले. पक्षी निरीक्षकांकडून या पक्ष्यांबाबत सविस्तर वैज्ञानिक माहिती देण्यात आली.

अॅनिमेशन कॉलेजच्या वतीने पेपर शिल्प, कला प्रदर्शनी घेण्यात आली. यात प्रतिभावंत विद्यार्थ्यांनी पेपरपासून तयार केलेल्या गणपतीचे प्रदर्शन भरविण्यात आले. पेपर शिल्पाबाबत प्राचार्य विजय राऊत यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. समाजकार्य महाविद्यालयाच्या युवा पर्यटन क्लबमार्फत इर्विन चौकात पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणातून पर्यटनाबाबत माहिती देण्यात आली. यात सहभागी कलावंताना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्था या आंतरराष्ट्रीय पर्यटन संस्थेद्वारे २७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन जाहिर करण्यात आला आहे. या दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय पर्यटन संस्थेद्वारे घोषवाक्य प्रसिद्ध करण्यात आले आहे. यावर्षी जागतिक पर्यटन दिनाचे पर्यटन आणि शांतता हे घोषवाक्य घोषित करण्यात आले होते. त्यानुसार जागतिक पर्यटनदिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यातून पर्यटन आणि शांततेचा संदेश देण्यात आला आहे.

पर्यटनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्थानिक नागरिकांतर्फे विविध क्षेत्रात उपक्रमशिल कार्यक्रम राबविण्यात येतात. ही आशादायक बाब आहे. यातूनही स्थानिक पर्यटनवाढीसाठी हातभार लागेल, असे मत पर्यटन उपसंचालक विजय अवधाने यांनी व्यक्त केले.

00000


जागतिक रेबीज दिनानिमित्त जनजागृती

अमरावती, दि. 27 (जिमाका) : जागतिक रेबीज दिन दि. 28 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. रेबीज दिनानिमित्त आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

नागरिकांना रेबीजबद्दल जागरूक करण्यासाठी आणि प्राणघातक आजारापासून वाचवण्यासाठी दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी रेबीज दिन साजरा करण्यात येतो. जागतिक रेबीज दिनाचा उद्देश मानव आणि प्राण्यांवर रेबीजच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता वाढविणे, धोकादायक रोग रोखता येईल, याविषयी माहिती आणि सल्ला प्रदान करणे आणि रेबीज नियंत्रणातील वाढीव प्रयत्नांसाठी प्रयत्न करणे आहे.

रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी कुत्रा, ससा, माकड, मांजर चावल्यानंतर होतो. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास म्हणतात. रेबीज रोग झाल्यास प्राणघातक आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र्यांनाही होतो. हा कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90 ते 175  दिवसात दिसू लागतात. जंगलातले लांडगे जंगली कुत्र्यांना चावतात, त्यामुळे जंगली कुत्र्यांना रेबीज होतो. ही जंगली कुत्री गावातल्या कुत्र्यांना चावतात, त्यामुळे त्यांना हा रोग होतो. आणि रेबीज झालेली कुत्री माणसांना चावल्यास हा रोग होतो. कुत्र्यांच्या लाळेद्वारे रोगाचा प्रसार होतो.

या रोगाची लक्षणे ही साधारणपणे 2 ते 12 आठवडे ताप आणि तापाची लक्षणे दिसतात. मानसिक त्रास, निद्रानाश, भास होणे, सामान्य माणसासारखे न वागणे, अतिशयोक्ती करत वागणे अशी लक्षणे दिसून येतात. रेबीज झालेल्या माणसाला पाण्याची भिती वाटते. रेबीज झालेल्या माणसाचा घसा पूर्णपणे खरवडून निघतो. माणूस काही बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा घसा खरवडलेला असल्यामुळे कुत्र्याच्या भुंकण्याप्रमाणे आवाज येतो. वास्तविक कुत्रा चावला म्हणून असा आवाज येतो असे नाही. पण काही अशिक्षित माणसे असा विचार करून कुत्र्यांना मारतात.

या आजारावर उपचार म्हणून चावल्याने जखम झाल्यावर लवकरात लवकर साबण व स्वच्छ पाण्याने धुतल्यास जखमेतील रेबीजचे जंतू कमी होण्यास मदत होते. शक्य असल्यास त्यावर ॲण्टीसेप्टीक मलम लावावे. त्वरीत जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रेबीजवर पीईपी पोस्ट एक्‍स्पोजर प्रोफायलॅक्सिस ही प्रभावी लस उपलब्ध असून कुत्रे चावल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ती टोचून घेणे योग्य आहे. पेशंटने मानवी रेबीज इम्युनोग्लोबुलिनचा एक डोस व रेबीज लसीचे चार डोस 28 दिवसात घेतले पाहिजेत. रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकरात लवकर घेतला पाहिजे. त्यानंतर 3 दिवस, 7 दिवस आणि 28 दिवसांनी लसीचे डोस द्यावेत. आता पोटात घ्यायचे इंजेक्शन देण्याची गरज नसून दंडावर देण्याचे इंजेक्शन उपलब्ध आहे, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.

000000

--




Thursday, September 26, 2024

DIO AMRAVATI NEWS 26.09.2024

 



















1420 कोटी रूपयांतून दर्जेदार विकासकामे होणार

-उपमुख्यमंत्री अजित पवार

*विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन

*वाढीव कराबाबत ऑक्टोबरपर्यंत कार्यवाही

 

अमरावती, दि. 26 : अमरावती शहर आणि परिसराच्या विकासासाठी भरघोस निधी देण्यात आला आहे. यातून शहराच्या वैभवात भर पडणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण होतील. एकाच दिवशी 1420 कोटी रूपयांच्या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले आहे. ही कामे दर्जेदार होण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

 

जिल्हा नियोजनच्या सभागृहात आज विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार सुलभा खोडके, विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्‍य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, मुख्य अभियंता गिरीश जोशी, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रुपा गिरासे आदी उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, शासनाला उत्पन्न देणाऱ्या विभागांकडून मोठ्या प्रमाणावर कर गोळा करण्यात येत आहे. या विभागांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहे. विकासकामे करताना पुढील काळाचा विचार ठेवण्यात आला आहे. सारथी संस्थेमध्ये 300 आसन क्षमतेचे श्रोतागृह मंजूर आहे. मात्र याठिकाणी 500 विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय राहणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व सारथीच्या ठिकाणी आता 500 क्षमतेचे श्रोतागृह राहणार आहे. यासाठी लागणारा अतिरिक्त निधीही देण्यात येणार आहे. एकाच दिवशी 1420 कोटी रूपयांच्या विविध कामांचे लोकार्पण, भूमिपूजन करण्यात आले आहे. या सुविधांचा नागरिकांना लाभ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

अमरावती महापालिकेकडून वाढीव दराने कर आकारणी केली आहे. त्यामुळे तात्काळ सॉफ्टवेअरमध्ये दुरूस्ती करून नागरिकांना करपावत्या देण्यात याव्यात. कोणत्याही परिस्थितीत ऑक्टोबरपर्यंत ही कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश दिले.  सर्व घटकांचा विकास होण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. त्याचा भाग म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, मुलींना मोफत शिक्षण, बारावीनंतर विद्यावेतन, शेतकऱ्यांना मोफत वीज, दुधाला अनुदान, तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येत आहे.

 

सारथी, बार्टी सारख्या संस्था उभारून अध्ययनासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात येत आहे. त्यासोबतच विभागीय स्तरावर चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधांचा खेळाडूंनी लाभ घ्यावा. खाशबा जाधव यांच्यानंतर यावर्षी राज्यातील खेळाडूने वैयक्तिक पदक प्राप्त केले आहे. खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळाल्यास भविष्यात पदक मिळवणारे खेळाडू राज्यातून तयार होतील, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुलासाठी निधी वाढवून देण्यात आला आहे. त्यामुळे या क्रीडा सुविधा प्राधान्याने उभ्या राहतील.

 

अमरावती येथील पाणी पुरवठ्याची अमृत योजना, सारथीचे विभागीय कार्यालय, वसतिगृह, अभ्यासिका, लालखडी रेल्वे उड्डाणपूल, चांगापूर फाटा रस्ता, विभागीय क्रीडा संकुल मैदानाचे भूमिपूजन तर जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यासोबतच वस्तू व सेवा कर इमारतीचे नुतनीकरण, विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील क्रीडा सुविधा, उत्पादन शुल्कच्या इमारतीचे उद्घाटन, वडाळी उद्यान सौंदर्यीकरणाचे उद्घाटन करण्यात आले, तसेच नगरोत्थान अभियानातील कामांचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले.

क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले. उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांनी आभार मानले.

 

00000


‘महाराष्ट्राची उद्योग भरारी’चे आज आयोजन


अमरावती, दि. 26 : राज्याने घेतलेल्या उद्योगविषयक महत्त्वाच्या निर्णयांची माहिती उद्योजक, व्यावसायिकांना व्हावी, तसेच राज्याचे व्हीजन कळावे यासाठी शुक्रवार, दि. 27 सप्टेंबर रोजी हॉटेल ग्रँड मैफिल येथे दुपारी २ वाजता "उद्यमात् सकल समृद्धी, महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, खासदार अनिल बोंडे, बळवंत वानखडे, अमर काळे, आमदार किरण सरनाईक, धीरज लिंगाडे, यशोमती ठाकुर, सुलभा खोडके, रवि राणा, राजकुमार पटेल, प्रताप अडसड, देवेंद्र भुयार उपस्थित राहतील.

तसेच उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, विकास आयुक्त उद्योग दिपेंद्र सिंह कुशवाह, व्यवस्थापकीय संचालक एमएसएसआयडीसी राजेंद्र निंबाळकर, विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय, सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड उपस्थित राहणार आहेत.

000000



आज जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

 

        अमरावती दि. २६ (जिमाका) :  ' संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संस्था ' (UNWTO) या आंतरराष्ट्रीय पर्यटन संस्थेद्वारे घोषित दि.२७ सप्टेंबर यादिवशी दरवर्षी 'जागतिक पर्यटन दिन ' म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाच्या औचित्याने दरवर्षी आंतरराष्ट्रीय पर्यटन संस्थेद्वारे घोषवाक्य प्रसिद्ध करण्यात येते. यावर्षी जागतिक पर्यटन दिनाचे 'पर्यटन आणि शांतता' हे घोषवाक्य घोषित करण्यात केले आहे.

 

या जागतिक पर्यटन दिनानिमित्त उद्या शुक्रवार , दि. २७ सप्टेंबर, २०२४ ला सकाळी ६ ते १० या वेळेत छत्री तलाव परिसरात 'ट्रेकिंग व पक्षी निरिक्षण कार्यक्रम ' आयोजित करण्यात आला आहे. तसेच   ॲनिमेशन कॉलेजचे प्राचार्य विजय राऊत यांच्या वतीने 'पेपर शिल्प, कला प्रदर्शनी'चे आयोजन सकाळी १०.३० वाजता ॲनिमेशन कॉलेज येथे करण्यात आले आहे. तसेच युवा पर्यटन क्लब, समाजकार्य महाविद्यालय, अमरावती यांच्या मार्फत इर्विन चौक येथे   सकाळी ९ ते १० या कालावधीमध्ये पथनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

वरील उपक्रमांमध्ये स्थानिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रादेशिक कार्यालय, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक विजय अवधाने यांनी केले आहे.

 

00000

--

Wednesday, September 25, 2024

DIO AMRAVATI NEWS 25.09.2024

 



पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना

जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

                अमरावती, दि. 25 : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात  आज निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 तहसिलदार प्रशांत पडघम, अधीक्षक निलेश खटके, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रज्ज्वल पाथरे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यांनीही यावेळी दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.               

                            

00000

 

जलजन्य व कीटकजन्य आजाराच्या साथीला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाच्या सूचना

 

अमरावती, दि. 25 : दरवर्षी पावसाळयात व पावसाळयानंतर  जलजन्य व कीटकजन्य आजाराच्या साथी पसरतात. पावसाळ्यात पाण्याचे स्रोत दूषित होतात. त्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, कावीळ, विषमज्वर, विषाणूजन्य या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. ठिकठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होऊन हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनियासारखे आजार वाढतात. यासाठी आरोग्य विभागामार्फत आरोग्य शिबिरांचे आयोजन करुन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. किरकोळ आजारावर उपचार करुण संशयित रुग्णांचे रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे. या आजारांना आळा घालण्यासाठी आरोग्य कर्मचारी सर्वेक्षण करीत आहेत. यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी दिली आहे.

जलजन्य व कीटकजन्य आजाराच्या साथीला आळा घालण्यासाठी शुध्द पाण्याचा पिण्यासाठी वापर करा. गावातील विहिरीचे शुध्दीकरण करुन घ्यावे. आपल्या घराचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. परिसरातील नाल्या, गटारी, डबकी  यात पाणी तुंबू नये याबाबत दक्ष रहावे, आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, सांडपाण्यासाठी शोषखड्‌डा व परसबाग निर्माण करावी, आजारी व्यक्ती व लहान मुलांना पाणी उकळून गार करुन प्यावयास दयावे. साथीचे आजार बळावल्यास सर्वप्रथम आशा, आरोग्य सेवक, सेविका प्राथमिक आरोग्य केंद्रास सूचना दयाव्यात, साचलेल्या पाण्यामध्ये ऑईल, गोडे तेल टाकावे जेणेकरुन डास उत्पत्ती होणार नाहीत.  भाजीपाला व फळे मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावीत.  ग्रामपंचायतकडून धूर फवारणी करुण घेण्यात यावी. आपल्या छतावरील टायर व रिकाम्या प्लास्टिकच्या बॉटल्स तसेच इतर पाणी साचणारे साहित्य काढून टाकावे. झोपतांन मच्छरदाणीचा वापर करावा. कुलरमधील पाणी काढावे. तसेच फुलदाण्या आणि कुंडयांमध्ये पाणी साचू देवू नये.

शिळे व उघडयावरचे अन्न खाऊ नये. तसेच दूषित मांस व फळे खाऊ नये, डासांच्या अळया पाण्यामध्ये होवू देऊ नये.  पिण्याच्या विहिरीजवळ भांडी, कपडे व प्राणी धुवू नये.  परिसरात कुठेही सांडपाण्याचे डबके साचू देवू नये, उघडयावर शौचास बसू नये. अनोळखी तथा नवीन विहिरीचे पाणी शुध्द केल्यावर अथवा खात्री झाल्याशिवाय सेवन करु नये, याबाबींची खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

000000

संत्रा फळबाग योजनेतंर्गत प्राथमिक प्रक्रिया केंद्र उभारण्याबाबत

प्रस्ताव सादर करण्यास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) : राज्य शासनाने राज्यातील नागपूर जिल्हयातील नागपूर, काटोल व कळमेश्वर तर अमरावती जिल्हयातील मोर्शी,  बुलडाणा जिल्हयातील संग्रामपूर येथे आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारणे यास मान्यता देवून 20 कोटी रुपये  निधीची तरतुद करण्यात आलेली आहे. योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सहकारी प्रक्रिया संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, खाजगी उद्योजक आणि बाजार समिती यांचा समावेश आहे.

               महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाने पहिल्या टप्यात प्राथमिक प्रक्रिया प्रकल्पासाठी लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरु केलेली आहे. या प्रकल्पासाठी प्रस्ताव मागविण्यासाठी निविदा तसेच मॉडेल प्रकल्प अहवाल महाराष्ट्र राज्य कृषि पणनमंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  आता अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2024  पर्यंत वाढविण्यात येत आहे. त्याबाबतची सूचना पणनमंडळाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. तरी या योजनेचा लाभ संबंधित तालुक्यातील जास्तीत-जास्त लाभार्थींनी घ्यावा. या योजनेच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या मुख्यालयाशी     020-24528100  या दूरध्वनी क्रमांकावर प्रकल्प विभागाशी संपर्क साधावा,  असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी केले आहे.

000000

 

 

शहरातील इच्छुक महिलांना रोजगारासाठी

पिंक (गुलाबी) ई- रिक्षा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) : राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुर्नवसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, स्त्री सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या अमरावती शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व  चालविण्यासाठी  इतर सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी  शहरातील गरजू महिलांना रोजगारासाठी  ‘पिंक (गुलाबी) ई- रिक्षा’ योजना लागू करण्यात आली आहे.

 योजनेचे स्वरुप : 

ई-रिक्षाची किंमतीमध्ये सर्व करांच्या (जीएसटी, रेजिस्ट्रेशन रोड टॅक्स इ.­) समावेश असेल. नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, अनुज्ञेय असलेल्या खाजगी बँकाकडून ई- रिक्षा किंमतीच्या 70 टक्के कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल.  राज्य शासन 20 टक्के आर्थिक भार उचलेल,  योजनेची लाभार्थी महिला-मुली यांच्यावर 10 टक्के आर्थिक भार असेल, कर्जाची परतफेड करण्याची मुदत 5 वर्षे  राहील.

योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता :

लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र रहिवाशी असणे आवश्यक राहील. अर्जदाराचे वय 20 ते 40 वर्षे दरम्यान असणे अनिवार्य आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न  3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.  विधवा, कायद्याचे घटस्फोटित, राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षणगृह बालगृहातील आजी-माजी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल.  दारिद्रय रेषेखालील महिलांनाही प्राधान्य देण्यात येईल.

योजनेचा अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल कल्याण, जिल्हा परिषद, महिला आर्थिक विकास महामंडळ, सर्व कार्यालय, महिला व बाल विकास भवन, कॅम्प रोड, अमरावती, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी (पूर्व), बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी (पश्चिम), दत्तापॅलेस गांधी चौक, अमरावती, अधीक्षक, शासकीय मुलींचे निरीक्षणगृह, बालगृह, देसाई ले-आउट, गणेश कॉलनी, जिल्हा समन्वयक महिला सक्षमीकरण केंद्र, वन स्टॉप सेंटर, जिल्हा स्त्री रुग्णालय, अमरावती या कार्यालयातून प्राप्त करुन 7 दिवसात सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

DIO NEWS AMRAVATI 12.11.2024

  दर्यापूर विधानसभा क्षेत्राची दुसरी खर्च तपासणी *सर्व उमेदवारांनी सादर केला खर्च अमरावती, दि. 12 (जिमाका) : दर्यापूर विधानसभा मतदारसंघा...