Thursday, September 17, 2026

DIO NEWS AMRAVATI 17.09.2026

 










                              

  अमरावती विभागातून अभ्यासपूर्ण अभिप्राय व सूचना प्राप्त

                                             –अपर मुख्यसचिव व्ही. राधा

 

भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी टास्क फोर्स दीर्घकालीन मसुदा तयार करणार

 

अमरावती, दि. 17 (जिमाका) : भरती प्रक्रिया सुधारणा करण्यासंदर्भात अमरावती विभागातील हितधारकांकडून अभ्यासपूर्ण अभिप्राय व सूचना प्राप्त झाल्या आहेत. राज्यातील सर्व महसुली विभागातून प्राप्त सूचनांचा सखोल अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह (एमपीएससी) अन्य परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक,परिक्षार्थीस्नेही व सुटसूटित करण्यासाठी निर्धारीत कालावधीत उच्चस्तरीय स्टास्क फोर्स दीर्घकालीन मसुदा तयार करेल,अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्यसचिव तथा उच्च स्तरीय टास्क फोर्सच्या अध्यक्ष व्ही. राधा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 

            श्रीमती राधा यांच्या अध्यक्षतेखालील भरती प्रक्रिया सुधारणेसाठी नियुक्त उच्चस्तरीय टास्क फोर्सने पहिल्या सत्रात येथील नियोजन भवनात विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, लोकप्रतिनिधी व नागरिक आदी हितधारकांकडून अभिप्राय व सूचना ऐकूण घेतल्या. त्यानंतर महसूल भवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय विभागाचे सचिव तथा टास्क फोर्सचे सदस्यसचिव डॉ.एन.रामास्वामी , विभागीय आयुक्त नयना गुंडे,जिल्हाधिकारी आशिष येरेकर,मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी ,अपरआयुक्त (सा.प्र.)संजय जाधव यावेळी उपस्थित होते.

 

            सरळसेवेबाबत अत्यंत सखोल व अभ्यासपूर्ण अभिप्राय व सूचनांसह पोलीस उपनिरीक्षक पदभरती प्रक्रिये विषयी, एमपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या परिक्षेसाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) असावी, या परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक असावे, या परिक्षांसाठी वार्षिक शुल्क आणि नोंदणी असावी,परीक्षांचे वेळेत निकाल लागावे, प्रश्नपत्रिका सुरक्षित राहण्यासाठी प्रसंगी डिजीलॉकरचा उपयोग व्हावा,परिक्षार्थींच्या अडचणी सोडविण्यासाठी एमपीएससीचा विशेष कक्ष स्थापन करणे ,राज्यात विभागवार एमपीएससीचे कार्यालय उभारणे  आदी महत्वाचे विषय अमरावती विभागातील हितधारकांकडून प्राप्त झाले. यापूर्वी पुणे आणि नागपूर विभागाला टास्क फोर्सने भेट दिली असून अमरावती विभागात तुलनेने अधिक अभ्यासपूर्ण अभिप्राय व सूचना प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.अमरावती विभागात ईमेल व प्रत्यक्ष निवेदनाद्वारे मोठया प्रमाणात सूचना प्राप्त झाल्या आहेत आज प्रत्यक्ष हितधारकांनीही सूचना मांडल्या आहेत. यानंतर पुढील तीन महसूल विभागाला टास्क फोर्स भेट देणार असून तेथील अभिप्राय व सूचना ऐकूण घेणार आहे.

 

            राज्यातील परीक्षार्थींना आपले मत शासनापर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने पोचवता यावे व भरती प्रक्रियेत  सुधारणा करण्यासाठी टास्क फोर्स प्रत्यक्ष हितधारकांशी चर्चा करून त्यांची मत जाणून घेत आहे. राज्यातील सर्व विभागांतून प्राप्त माहितीचा सखोल अभ्यास करण्यात येईल. प्रसंगी केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी),अन्य राज्यांच्या लोकसेवा आयोगांना भेटी देवून त्यांच्याकडे कार्यान्वीत उत्तम पद्धतींचा अभ्यास करून राज्यात एमपीएससीसहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परीक्षा व अन्य महत्वाच्या समकक्ष परीक्षा पद्धतीतील आवश्यक सुधारणांचा दीर्घकालीन मसुदा तयार करून शासनाला सादर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.शासनाच्या विविध विभागांकडून करण्यात येणारी भरती प्रक्रिया तसेच एमपीएससीकडून या विभागाची पदे भरताना येणाऱ्या अडचणी,यासंदर्भातील प्रचलीत पद्धती व त्यात आवश्यक बदल करण्यासंदर्भात सखोल अभ्यास करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

 

००००००

सोमवारी जिल्हा महिला लोकशाही दिन

अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकशाही दिन सोमवार, दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

00000


मतदारयादी निरीक्षकांचा मंगळवारी दौरा

*जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांना थेट तक्रारी मांडण्याची संधी

अमरावती, दि. 17 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाद्वारे देशभरात राबवण्यात येत असलेल्या 'विशेष सखोल पुनरीक्षण' मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मतदारयादी निरीक्षक तथा अमरावती विभागीय आयुक्त यांचा मंगळवार, दि. २२ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात प्रथम दौरा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी ४.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे ही बैठक पार पडणार आहे.

या दौऱ्यादरम्यान विभागीय आयुक्त राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मतदार नोंदणीविषयक तक्रारी, आक्षेप व समस्या थेट ऐकून घेतील. मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील २५ लाख ४५ हजार ६७७ मतदारांच्या माहितीची घरोघरी जाऊन पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. एकही पात्र नागरिक सुटणार नाही आणि एकही अपात्र नागरिक समाविष्ट होणार नाही, या ध्येयाने ही मोहीम राबवली जात आहे. गणनापत्रक जमा न केलेल्या ३ लाख ५३ हजार २८२ मतदारांची नावे ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीत समाविष्ट केलेली नाहीत. मृत मतदार वगळता एकही पात्र नागरिक यादीतून वंचित राहू नये, यासाठी ही यादी जिल्ह्याच्या amravati.gov.in या संकेतस्थळावर तसेच राजकीय पक्षांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मतदारयादीवरील दावे आणि हरकतीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त यांचा हा दौरा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मतदार नोंदणीविषयक थेट तक्रारी, आक्षेप आणि समस्या मांडाव्यात, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे.

000000



पीएम विश्वकर्मा योजनेत जिल्हा राज्यात अव्वल

*कर्जमंजुरी, टूलकिटचे वाटप

अमरावती, दि. 17 (जिमाका) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवासंकल्प अभियानात बचत भवन येथे ‘विश्वकर्मा लाभार्थी मेळावा उत्साहात पार पडला. यात पीएम विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना कर्जमंजुरी पत्रे आणि टुलकिटचे वाटप करण्यात आले.

खासदार डॉ. अनिल बोंडे अध्यक्षस्थानी होते, यावेळी आमदार प्रवीण तायडे, पीएम विश्वकर्मा समितीचे अध्यक्ष दिलीप आकोटकर, पीएम विश्वकर्मा योजना जिल्हा समितीचे सदस्य सोपान गुढदे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे, टपाल खात्याचे अधीक्षक पी. ए. गेडाम, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक नरेश हेडाऊ उपस्थित होते.

पीएम विश्वकर्मा योजनेत जिल्ह्याने उल्लेखनीय प्रगती केली आहे. यात २४ हजार लाभार्थी नोंदणी करण्यात आली असून  २१ हजार लाभार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यात १८ हजार लाभार्थींनी टूलकिटचे वाटप करण्यात आले आहे. तसेच ६ हजार ६४० लाभार्थ्यांना बँकांकडून कर्ज मंजुरी झाली असून ५ हजार ४९५ लाभार्थ्यांना ४३ कोटी रुपये प्रत्यक्ष कर्ज वाटप वितरीत करण्यात आले आहे.

खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी ही योजना विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणारी असल्याचे सांगून नोंदणीकृत प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा फायदा पोहोचवण्याचे आवाहन केले. आमदार प्रवीण तायडे यांनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचे कौतुक करीत पहिल्या कर्जाचा नियमित भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांना तात्काळ दुसरे कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर, खासदार डॉ. अनिल बोंडे आणि आमदार प्रवीण तायडे यांच्या मार्गदर्शनामुळे जिल्ह्याने प्रशिक्षण, टूलकिट वाटप आणि कर्ज मंजुरी या तिन्ही बाबींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असल्याचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात १७ लाभार्थ्यांना कर्जमंजुरी पत्रे आणि १० लाभार्थ्यांना टूलकिट प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

00000



सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे सायबर जनजागृतीसाठी 'व्हॉकथॉन'

अमरावती, दि. 17 (जिमाका) : नागरिकांमध्ये दक्षता, पारदर्शकता, तसेच वाढत्या सायबर फसवणुकीबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे 'व्हॉकथॉन' उत्साहात पार पडले.

या जनजागृती उपक्रमाचे नेतृत्व सेंट्रल बँक ऑफ इंडिया अमरावती विभागाचे विभागीय प्रमुख सुनील पांडेय यांनी केले. यावेळी उप क्षेत्रीय व्यवस्थापक प्रदीप जाधव, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक नरेश हेडाऊ, तसेच सतर्कता अधिकारी राहुल कुमार गोंड प्रमुख उपस्थित होते.

या व्हॉकथॉनमध्ये अमरावती विभागातील सर्व शाखांचे शाखा व्यवस्थापक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. नागरिकांनी सतर्क राहून कोणत्याही प्रकारच्या सायबर फसवणुकीला बळी पडू नये, तसेच दक्ष आणि जबाबदार नागरिक म्हणून भूमिका बजावावी, असा संदेश या रॅलीद्वारे नागरिकांना देण्यात आला.

000000

 

 



राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची आढावा बैठक संपन्न

अमरावती, दि. 17 (जिमाका) : राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सदस्या किरण महल्ले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सामाजिक न्याय भवनात विविध शासकीय योजनांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत इतर मागास बहुजन कल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, तसेच महिला व बालविकास विभागांतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यात आला.

बैठकीदरम्यान अध्यक्ष श्रीमती महल्ले यांनी सर्व शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. चिखलदरा, मेळघाट, दिग्रस व दारव्हा यासारख्या दुर्गम भागातील नागरिकांना आधारकार्ड, रेशनकार्ड आणि जातीचा दाखला उपलब्ध व्हावीत यासाठी तालुका व जिल्हास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करून लाभार्थ्यांना ही या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. विमुक्त जाती व भटक्या जमातीतील घटकांच्या रोजगारासाठी होणाऱ्या सततच्या स्थलांतरामुळे त्यांना जन्माचा दाखला मिळण्यात अडचणी येतात. यावर मात करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीत प्रादेशिक उपसंचालक विजय वाकुलकर, आदिवासी विकास विभाग अप्पर आयुक्त संदीप गोलाईत, महिला व बालविकास विभाग विभागीय उपायुक्त ज्योती कडु, इतर मागास बहुजन कल्याणच्या सहायक संचालक सरिता बोबडे, तसेच अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांतील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

गणेशोत्सवाचा वारसा आता जागतिक डिजिटल संग्रहात

bappa.org’ वर अनुभव, परंपरा आणि आरती शेअर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 17 (जिमाका) : गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा, भक्ती, संस्कृती आणि लोकजीवनाचा वारसा जगभर पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत ‘bappa.org’ हे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. गणेशभक्तांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या बाप्पाशी संबंधित आठवणी, परंपरा, पाककृती आणि आरतीचा ठेवा डिजिटल स्वरूपात जतन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सवाशी संबंधित विविध प्रकारची माहिती एका जागतिक डिजिटल संग्रहात संकलित केली जात आहे. नागरिकांना जिल्ह्यातील गणेशोत्सवातील अनुभव आणि आठवणी शेअर करण्याबरोबरच घरगुती किंवा सार्वजनिक गणेश मंडळातील आरती रेकॉर्ड करून अपलोड करण्याची संधी मिळणार आहे. तसेच आपल्या गणरायाचे छायाचित्रही या संग्रहात सहभागी करून घेता येणार आहे.

यासाठी नागरिकांनी ‘bappa.org’ या संकेतस्थळाला भेट देऊन ‘माहिती या पर्यायातून ‘तुमची कथा सांगा या विभागात प्रवेश करावा. येथे कथा, पाककृती, परंपरा आणि थेट आरती असे चार पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी आवश्यक पर्याय निवडून संबंधित माहिती भरावी. मोबाईलचे लोकेशन बंद असल्यास पिनकोड क्रमांक नोंदवावा.

bappa.org’ या संकेतस्थळावर गणपती बाप्पाच्या प्रसिध्द आरत्या व भक्तिगीते, गणेशोत्सवाच्या विविध परंपरा आणि नागरिकांचे अनुभव यांचा डिजिटल संग्रह उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची सांस्कृतिक ओळख आणि लोकपरंपरा पुढील पिढ्यांसाठी जतन करण्यास मदत होणार आहे. गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या घरातील, परिसरातील आणि मंडळातील गणेशोत्सवाच्या परंपरा ‘bappa.org’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून जगासमोर आणाव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

000000

सेवा हक्क आयुक्तांनी घेतली अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांची भेट

 

     अमरावती, दि. 17 (जिमाका): राज्य सेवा हक्क आयुक्त अरुण डोंगरे यांनी आज  शासकीय विश्राम भवन  येथे सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्यसचिव व्ही. राधा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी  'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या' (सेवा हक्क कायदा) अंमलबजावणी व सुरू असलेल्या जनजागृती उपक्रमांबद्दल माहिती दिली.श्रीमती राधा यांनी या उपक्रमांचे आणि सेवा हक्क कायद्याबद्दल  जनजागृती वाढवण्यासाठी राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

 

     श्री. डोंगरे यांनी श्रीमती राधा यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाबाबतचे जनजागृती पत्रिका भेट दिली.पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन.रामास्वामी,विभागीय आयुक्त नयना गुंडे यावेळी उपस्थित होत्या.

 

००००००





जिल्हाधिकारी कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन

अमरावती, दि. 17 (जिमाक) : केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दानेज यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

00000

 

No comments:

Post a Comment

रेवसा गावात 'लोकसंवाद';

  रेवसा गावात 'लोकसंवाद'; पथनाट्यातून सावकारीविरोधात जनजागृती   कर्जमुक्ती योजनेसह कृषी विभागाच्या योजनांचाही संदेश