Tuesday, September 15, 2026

DIO NEWS AMRAVATI 15.09.2026

                                जिल्हाधिकाऱ्यांकडून मोर्शी तालुक्यातील खरीप पिकांची प्रत्यक्ष पाहणी

 

अमरावती, दि.15 (जिमाका): मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई महसूल मंडळातील नेर भाग-2 परिसरात  जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन खरीप हंगामातील विविध पिकांच्या सद्यस्थितीची पाहणी केली. या दौऱ्या दरम्यान त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून पिकांच्या वाढीबाबत सविस्तर माहिती घेतली.

 

             दौऱ्याच्या सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांनी बाळा कीर्तकर यांच्या शेतातील कपाशी पिकाची पाहणी केली. या परिसरात पडलेल्या पावसाच्या प्रदीर्घ खंडाचा पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे यावेळी दिसून आले. त्यानंतर रखमाबाई संभे आणि सुखदेव खवले यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची त्यांनी पाहणी केली.या शेतांमध्ये सोयाबीनला शेंगांचे प्रमाण तुलनेने कमी असून, काही शेंगांमध्ये दाणे पूर्णपणे भरले नसल्याचे चित्र समोर आले.रमेश खवले यांच्या शेतातील बागायती कपाशीची पाहणी केली असता, हे पीक मात्र समाधानकारक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले.

 

              पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी उपस्थित कृषी अधिकाऱ्यांकडून पिकांची सद्यस्थिती, उपलब्ध पर्जन्यमान, पावसाच्या खंडाचा पिकांवर झालेला परिणाम आणि शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत देण्यात येत असलेले तांत्रिक मार्गदर्शन याबाबींची सविस्तर माहिती घेतली. तसेच उपस्थित शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत, त्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.या पाहणी दौऱ्याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, उपविभागीय कृषी अधिकारी उज्ज्वल आगरकर तसेच तालुका कृषी अधिकारी प्रथमेश माने उपस्थित होते.

००००

बोर्डीनाला मध्यम प्रकल्पावर मच्छिमार संस्था नोंदणीला सुरुवात ; ३० दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 15 (जिमाका):  चांदुरबाजार तालुक्यातील बोर्डीनाला मध्यम प्रकल्प (152.27 हे.)  तलावावर नवीन सहकारी संस्था नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त आणि महिला मच्छिमारांना येत्या 30 दिवसांच्या आत अर्ज करण्याचे आवाहन, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाने केले आहे.

 

            या नोंदणी प्रक्रियेद्वारे बोर्डीनाला तलाव परिसरातील स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त आणि महिला मच्छिमारांना रोजगाराची आणि व्यवसायाची मोठी संधी उपलब्ध करून दिली जात आहे.

     

        तलाव परिसरातील स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त आणि मच्छिमार महिला या संस्था नोंदणीसाठी सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था),अमरावती यांचे कार्यालयात अर्ज करू शकतात. 30 दिवसांच्या आत इच्छुक उमेदवारांनी आपले प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.स्थानिक पातळीवर मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी आणि मच्छिमार बांधवांना आर्थिक सक्षम करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. तरी इच्छुकांनी विहित मुदतीत आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

००००००

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 4 हजारावर प्रकरणांचा निपटारा

 

14.48 कोटींहून अधिक रक्कमेची  तडजोड

 

अमरावती, दि. 15 (जिमाका) : जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये  दाखलपूर्व प्रकरणातील 2 हजार 460 प्रकरणे आणि प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांपैकी 2 हजार 131 अशा एकूण 4 हजार 591 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. या प्रकरणांमध्ये  14 कोटी  48 लाख 73 हजार 991 रुपयांची तडजोड झाल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे यांनी दिली आहे.

 

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार आणि अमरावतीच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा  उज्वला एम. नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली 12 सप्टेंबर 2026 रोजी अमरावती जिल्हा व सत्र न्यायालय आणि जिल्ह्यातील विविध तालुका न्यायालयांमध्ये 'राष्ट्रीय लोक अदालत' आयोजित करण्यात आली.

 

जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती तथा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती  प्रविण एस. पाटील यांनी  या निमित्ताने जिल्ह्यातील विविध न्यायालयांना भेटी दिल्या. त्यांनी चांदुर बाजार येथील राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन केले. याप्रसंगी त्यांनी न्यायिक अधिकारी, वकील आणि पक्षकारांशी संवाद साधून तडजोडीसाठी प्रोत्साहन दिले. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश  उज्वला एम. नंदेश्वर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

56 लाखांची उल्लेखनीय तडजोड आणि 'विशेष मोहीम'

 

अमरावती जिल्हा मुख्यालयातील लोक अदालतीमध्ये मोटर अपघात नुकसानभरपाई (एमएसीपी) संदर्भातील एका प्रकरणात उल्लेखनीय यश आले. पक्षकारांमधील सामोपचारानंतर विमा कंपनीने 56 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. ही तडजोड जिल्हा न्यायाधीश-1  ए. जी. जोशी, प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) हरीश शेंडे आणि जिल्हा न्यायाधीश-8 गिरीश देशमुख यांच्या पॅनेलसमोर झाली.

 

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 7 ते 11 सप्टेंबर 2026 दरम्यान राबविलेल्या विशेष मोहिमेत 1 हजार 307 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला, ज्यामुळे लोक अदालतीला मोठी  गती मिळाली.

000000

जिल्ह्यात तडीपारीच्या 163 प्रकरणांचा निपटारा;

10 प्रलंबित प्रकरणांवर आज सुनावणी

 

            अमरावती, दि. 15 (जिमाका): जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस आणि उपविभागीय दंडाधिकारी प्रशासनाकडून वेगाने कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे. विविध उपविभागीय अधिकारी कार्यालयांतर्गत एकूण 163 तडीपारीची प्रकरणे निकाली काढण्यात आली असून 10 प्रलंबित प्रकरणांवर बुधवारी, 16 सप्टेंबर रोजी याबाबत अंतिम आदेश जारी होणार आहे.

 

यासंदर्भात पोलीस विभागने जारी केलेल्या अहवालानुसार, कलम 163(2) अंतर्गत एकूण 105 प्रकरणे प्राप्त झाली होती, ती सर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. तर कलम 56 अंतर्गत एकूण 60 प्रकरणे प्राप्त झाली होती, त्यापैकी 54 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

 

              दर्यापूर उपविभागाअंतर्गत कलम 163 अंतर्गत 10 आणि कलम 56 अंतर्गत 4 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. दर्यापूर मधील 2 प्रकरणे खारिज करण्यात आली असून कलम १६३ अंतर्गत प्रलंबित 10 प्रकरणांवर आज, 16 सप्टेंबर 2025 रोजी अंतिम आदेश होणार आहेत.

 

अचलपूर उपविभागात कलम 56 अंतर्गत 38 प्रकरणे प्राप्त झाली होती, यातील 36 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून २ प्रकरणे प्रलंबित आहेत. चांदुर रेल्वे उपविभागात कलम 56 अंतर्गत 5 पैकी 4 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून 1 प्रकरण प्रलंबित आहे. झाडा (ता. धामणगाव रेल्वे) येथील एक प्रकरण फेरचौकशी अहवालासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी चांदुर रेल्वे यांच्याकडे प्रलंबित आहे.

 

 मोर्शी येथे कलम 163 अंतर्गत 7 आणि कलम 56 अंतर्गत 8 प्रकरणे पूर्णपणे निकाली काढण्यात आली आहेत. धारणी उपविभागात कलम 56 अंतर्गत दाखल एक प्रकरण निकाली काढण्यात आले. तिवसा आणि भातकुली  येथे कलम 163 अंतर्गत सर्व 88 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. तर कलम 56 अंतर्गत प्राप्त 2 प्रकरणांपैकी 1 निकाली काढण्यात आले असून, प्रलंबित 1 प्रकरणावर आज, 16 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

 

०००००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 15.09.2026

                                 जिल्हाधिकाऱ्यांकडून मोर्शी तालुक्यातील खरीप पिकांची प्रत्यक्ष पाहणी   अमरावती, दि.15 (जिमाका): मोर्शी तालुक...