दुष्काळाबाबत मदतीचा आदेश उद्याच काढणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमरावती, दि. 24 (जिमाका): अमरावती विभागात सर्व जिल्ह्यात दुष्काळाची झळ पोहचली आहे. यामुळे पिके संकटात आली आहेत. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून या भागाचा दौरा केला आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत व्हावी, यासाठी दुष्काळाच्या संहितेच्या ट्रिगर एक नुसार देण्यात येणाऱ्या मदतीचा आदेश उद्याच काढण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
वाशिम येथील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिय येरेकर, वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासमवेत अमरावती विमानतळ येथे चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत करण्यासाठी केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासनाकडून तातडीने मदत देण्यात येईल. तसेच केंद्राच्या मदतीसाठी आवश्यक असणारे पंचनामे आदी प्रक्रिया करून मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येईल.
शेतकऱ्यांना मदतीचा आदेश तातडीने काढणे गरजेचे आहे. यातून काही भाग वगळला गेलेला असण्याची शक्यता असल्याने तिसऱ्या ट्रिगरमध्ये वगळलेल्या भागाचा समावेश करण्यात येईल. सर्वच भागात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ असल्याने मदतीची कारवाई करण्यात येणार आहे.
येत्या काळात चाराटंचाई, पाणीटंचाईबाबत उपाययोजना करून अन्नधान्याचीही मदत करावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये, यासाठी थेट मदत करण्यात येईल
रब्बीमध्ये काही ठिकाणी उपलब्ध असलेल्या पाण्यावर पिके घेण्याबाबत तपासणी करण्यात येईल. तसेच रब्बी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल.तसेच, रोजगार उपलब्ध होण्यासाठी जलसंधारणाच्या कामावर भर देण्यात येईल. जलसाठे आटलेले असल्यामुळे यातील गाळ काढणे, जलतारा स्ट्रक्चर निर्माण करणे, दुरुस्ती करणे आवश्यक असलेले तलाव शोधून त्यांची दुरुस्ती करण्यात येईल.
सर्वदूर पिकांची परिस्थिती सारखीच असल्यामुळे राज्य शासनाने मदतीचे धोरण आखले आहे. शेतकऱ्यांना करण्यात येणारी ही मदत दिवाळीपूर्वी मिळेल, याचे नियोजन केले जाईल.राज्य शासनाने कर्जमाफी केली असून कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांना नियमाप्रमाणे कर्ज द्यावेच लागेल. त्यासोबतच शेतमालाची शासकीय दराने खरेदी केली जाईल. यासाठी लवकरच नोंदणी सुरू केली जाईल.
जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीचा अहवाल सार्वजनिक केला जाणार आहे. अहवालावरून राजकारण होऊ नये म्हणून हा अहवाल सार्वजनिक केला नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
0000000
जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘पोषण आहार’ आणि 'अनेमिया' जागृती
अमरावती,दि. 24 (जिमाका): शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय येथे बालरोग कक्षामध्ये नुकताच 'राष्ट्रीय पोषण आहार मास' आणि 'अनेमिया' (रक्तक्षय) जागृती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल बत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली 16 सप्टेंबर 2026 रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला बालरोगशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. मिलिंद सूर्यवंशी, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बालरोगतज्ञ डॉ. सोनाली शिरभाते, अधिसेविका ललिता अटाळकर, तसेच आहारतज्ञ वैशाली चव्हाण व राजनंदिनी राठोड उपस्थित होत्या.
“हमारी अंगणवाडी, हमारी जिम्मेदारी” या घोषवाक्याला अनुसरून हा पोषण आहार मास साजरा केला जात आहे.पोषण आहार प्रदर्शनीचे आयोजन आणि मार्गदर्शन कार्यक्रमादरम्यान रुग्णालयात उपस्थित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये आहाराविषयी जनजागृती करण्यात आली. आहारतज्ज्ञांनी रोजच्या जेवणात पोषण मूल्यांचे महत्त्व सांगतानाच जंक फूड टाळणे, लठ्ठपणावर नियंत्रण, कुपोषण निर्मूलन आणि लहान मुलांसाठी आईच्या दुधाचे (स्तनपान) महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. कल्पना काळे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ‘पोषण आहार प्रदर्शनी’ आयोजित करण्यात आली होती.
०००००
#सेवासंकल्पअभियान
जीएमसीच्या जनसंपर्क अधिकारी पदी डॉ. कल्पना काळे
अमरावती, दि. 24 (जिमाका) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती (जीएमसी) येथे जनसंपर्क अधिकारी पदी डॉ. कल्पना काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. काळे या सध्या महाविद्यालयात जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. संस्थेचे अधिष्ठाता डॉ. अनिल बत्रा यांनी या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली आहे.
०००००
शहरात प्रतिबंधात्मक कलम 37 (1)
अमरावती, दि. 24 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून सदर आदेश आज दि. 24 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे.
या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे प्रभारी पोलीस आयुक्त यशवंत सोळंके यांनी कळविले आहे.
0000
मंगळवारचे 'रोजगार महाकुंभ' तूर्तास स्थगित
*निवडणूक आचारसंहितेमुळे निर्णय
अमरावती, दि. 24 (जिमाका) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक 2026 जाहीर झाली आहे. यामुळे संपूर्ण अमरावती विभागात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, कौशल्य विकास विभागामार्फत जिल्ह्यात मंगळवार, दि. 29 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेले 'रोजगार महाकुंभ 2026' व त्याअंतर्गत होणारे सर्व रोजगार मेळावे तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत.
आचारसंहितेच्या नियमांमुळे हा कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे. येत्या काळात रोजगार मेळाव्याची नवीन तारीख योग्यवेळी स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नोकरी इच्छुक उमेदवार, विविध व्यावसायिक उद्योजक, कंपन्या तसेच शैक्षणिक संस्थांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी कळविले आहे.
00000
शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्यासाठी बुधवारपर्यंत मुदत
अमरावती, दि. 24 : महाडीबीटी १.० ते महाडीबीटी २.० पोर्टल अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी महाविद्यालयांना बुधवार, दि. ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४, २०२४-२५ व २०२५-२६ मधील प्रलंबित अर्जांची छाननी करणे आणि बिले डाऊनलोड करून ठेवण्यासाठी महाडीबीटी १.० पोर्टल दि. १० ते ३० सप्टेंबर या कालावधीत सक्रिय राहणार आहे. सद्यस्थितीत विद्यार्थ्यांसाठी पुन्हा अर्ज करण्याची सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. डेटा स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाडीबीटी २.० पोर्टलवर हे अर्ज पुन्हा भरण्यासाठी उपलब्ध केले जातील. दि. १० ते ३० सप्टेंबर दरम्यान महाडीबीटी १.० वर कोणतेही नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. नवीन अर्जांची प्रक्रिया केवळ महाडीबीटी २.० वर चालणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शिष्यवृत्ती विभाग प्रमुखांनी अर्जांची काळजीपूर्वक तपासणी करून कागदपत्रांतील त्रुटींची तातडीने पूर्तता करून घ्यावी. त्रुटींची पूर्तता न करता अर्ज पुढील स्तरावर पाठवणे चुकीचे असून, त्यामुळे अर्ज नामंजूर होऊ शकतात.
दि. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज निकाली निघाले नसल्यास किंवा चुकीच्या अर्जांना मंजुरी दिल्यास विद्यार्थ्यांचे होणाऱ्या नुकसानास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य पूर्णपणे जबाबदार राहतील, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी कळविले आहे.
0000
इतर मागास बहुजनचे शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्यासाठी बुधवारपर्यंत मुदत
अमरावती, दि. 24 : महाडीबीटी १.० ते महाडीबीटी २.० पोर्टल अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी महाविद्यालयांना बुधवार, दि. ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४, २०२४-२५ व २०२५-२६ मधील प्रलंबित अर्जांची छाननी करणे आणि बिले डाऊनलोड करून ठेवण्यासाठी महाडीबीटी १.० पोर्टल दि. १० ते ३० सप्टेंबर या कालावधीत सक्रिय राहणार आहे. सद्यस्थितीत विद्यार्थ्यांसाठी पुन्हा अर्ज करण्याची सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. डेटा स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाडीबीटी २.० पोर्टलवर हे अर्ज पुन्हा भरण्यासाठी उपलब्ध केले जातील. दि. १० ते ३० सप्टेंबर दरम्यान महाडीबीटी १.० वर कोणतेही नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. नवीन अर्जांची प्रक्रिया केवळ महाडीबीटी २.० वर चालणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शिष्यवृत्ती विभाग प्रमुखांनी अर्जांची काळजीपूर्वक तपासणी करून कागदपत्रांतील त्रुटींची तातडीने पूर्तता करून घ्यावी. त्रुटींची पूर्तता न करता अर्ज पुढील स्तरावर पाठवणे चुकीचे असून, त्यामुळे अर्ज नामंजूर होऊ शकतात.
दि. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज निकाली निघाले नसल्यास किंवा चुकीच्या अर्जांना मंजुरी दिल्यास विद्यार्थ्यांचे होणाऱ्या नुकसानास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य पूर्णपणे जबाबदार राहतील, असे इतर मागास बहुजन कल्याणच्या सहायक संचालक सरिता बोबडे यांनी कळविले आहे.
000000
ग्रामीण नवसंशोधकांसाठी स्पर्धेचे आयोजन
अमरावती, दि. 24 : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नवसंशोधक, पारंपरिक ज्ञानधारक आणि स्थानिक पातळीवर समस्या निवारण करणाऱ्यांसाठी युवकाना संधी उपलब्ध झाली आहे. 'हनी बी नेटवर्क', 'ग्यान' आणि 'गेटको' यांच्या वतीने हनी बी नेटवर्क क्रिएटिवीटी ॲण्ड इन्क्ल्यूसिव्ह इनोव्हेशन अवार्ड-इंडिया 2025-26 या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नाविन्यपूर्ण शोध, शेतकऱ्यांचे प्रयोग, पारंपरिक ज्ञान आणि कारागिरांच्या कल्पकतेला राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून दिले जाणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५ लाख, द्वितीय ३ लाख आणि तृतीय २ लाख रूपये बक्षीस देण्यात येणार आहे. प्रोत्साहनात्मक पुरस्कारात १२ विजेत्यांना प्रत्येकी ५० हजाराचे पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच तज्ज्ञांकडून संशोधनाला व्यावसायिक व तांत्रिक पाठबळ मिळणार आहे.
या स्पर्धेसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत आहे. यासाठी gian.org या संकेतस्थळावर अर्ज करावे लागणार आहे. अधिक माहितीसाठी hbncriia-india@gian.org यावर ईमेल करावा. तसेच gian@gian.org किंवा 6353549783 या क्रमांकावर संपर्क क्रमांक करावा. जिल्ह्यातील नवसंशोधकांनी सर्जनशील कल्पना आणि शोधांची नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
00000
क्रीडा विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा – उपजिल्हाधिकारी दुर्गा देवरे
श्री बजरंग गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’
अमरावती, दि. 24 (जिमाका) : घरातच क्रीडा विषयक वातावरण व त्यातून सुरु झालेला प्रवास, पुढे विविध स्पर्धांमधील यश ते उपजिल्हाधिकारी पदाची जबाबदारी असा प्रेरणादायी प्रवास उलगडतांना उपजिल्हाधिकारी दुर्गा देवरे यांनी क्रीडा क्षेत्रात कार्यरत सर्व घटकांनी क्रीडा विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन येथील पटवीपुरा स्थित श्री बजरंग गणेशोत्सव मंडळात आयोजित लोकसंवाद कार्यक्रमात केले.
खेलो इंडिया, टार्गेट ऑलिम्पिक पोडियम, व्यायामशाळा विकास योजना, क्रीडांगण विकास योजना, खेळाडूंकरिता गौरव व प्रोत्साहन व बक्षिसे, शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदान आदी महत्वाच्या केंद्र व राज्य शासनाच्या क्रीडा विभागाच्या योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे गेल्या दशकात क्रीडा क्षेत्राच्या विकासाला गती मिळाली आहे. या योजनांचा लाभ क्रीडा क्षेत्रातील घटकांनी घ्यावा असे श्रीमती देवरे म्हणाल्या.
माहिती व जनसंपर्क विभाग गणेशोत्सवा दरम्यान राज्यभर शासकीय योजनांच्या माहितीवर आधारीत ‘लोकसंवाद’ हा संवादात्मक कार्यक्रम राबवित आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाने गुरुवारी श्री बजरंग गणेशोत्सव मंडळात लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने यावेळी क्रीडा व युवक संचालनालय तसेच क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रदर्शनी लावली व नागरीकांना माहिती दिली. श्री. बजरंग गणेशोत्सव मंडळात दर्शनाकरिता आलेल्या उपजिल्हाधिकारी श्रीमती देवरे या स्वत: उत्तम खेडाळू असल्याने त्यांनी लोकसंवाद कार्यक्रमात सहभाग घेवून उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या देदिप्यमान प्रवासाबद्दल ऐकूण उपस्थितांनी त्यांना क्रीडा कारकिर्दी विषयी व शासकीय योजनांचा त्यांना क्रीडापटू म्हणून झालेला फायदा याविषयी प्रश्न विचारले व त्यांनीही या प्रश्नांची खुमासदार उत्तरे दिली. केंद्र व राज्य शासनाच्या क्रीडा विभागांकडून एकाहून एक सरस योजना राबविण्यात येत आहेत त्याचा लाभ या क्षेत्रातील घटकांनी घ्यावा असे त्यांनी सांगितले. विदर्भ केसरी प्रा. संजय तिरथकर यांनीही या लोकसंवादात सहभाग घेवून कुस्तीपटू म्हणून त्यांचा प्रवास उलगडला.
या संवादात सहभागी होवून अमृता व टिना सुगंधी या मायलेकींनी क्रीडा क्षेत्रात मुलींच्या योगदानावर भाष्य केले. टेनी क्वॉईट क्रीडा प्रकारात जिल्हा व राज्य स्तरावर उत्तम कामगिरीचा अनुभव यावेळी टिना सुगंधी यांनी मांडला. बाबुलाल मामर्डे या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या काळातील खेळ व त्याने शरीरयष्टी सुधारण्यात होणारा लाभ सांगतांना शंकरपटाच्या आठवणींना उजाडा दिला.
तत्पूर्वी, जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती अधिकारी रितेश भुयार यांनी लोकसंवाद उपक्रमाविषयी प्रास्ताविकात माहिती दिली व संपूर्ण कार्यक्रमांचे संयोजन केले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालाचे क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने आणि तालुका क्रीडा अधिकारी अनिल इंगळे यांनी क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या क्रीडा पुरस्कार व युवा पुरस्कार योजना, राज्य व राष्ट्रीय युवा आदान प्रदान कार्यक्रम, राज्य युवा विकास निधी आदींबाबत माहिती दिली. श्री बजरंग गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजेश जवादे, संयोजक गजानन परिहार, प्रसिद्धी प्रमुख संजय मापले आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
००००००

.jpeg)
.jpeg)

No comments:
Post a Comment