Monday, September 21, 2026

DIO NEWS AMRAVATI 21.09.2026


                                             जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबतची बातमी असत्य

जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण

 

अमरावती, दि. 21 (जिमाका) : जिल्ह्यातील ८ तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाल्याची माहिती काही प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहे. ही बातमी पूर्णपणे असत्य, अपूर्ण आणि दिशाभूल करणारी आहे. राज्य शासनाकडून अद्यापपर्यंत दुष्काळग्रस्त तालुक्यांची कोणतीही अधिकृत यादी किंवा घोषणा झालेली नाही. शासनाकडून अधिकृत यादी जाहीर होताच ती तात्काळ सर्व माध्यमांपर्यंत पोहोचवली जाईल, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

 

 

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुष्काळ जाहीर करण्यासाठी आवश्यक असणारी ट्रिगर तपासणी, पर्जन्यमानाचे विश्लेषण, पीकस्थिती अहवाल आणि विविध निर्देशांकांचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया विविध विभागामार्फत सुरू आहे. दुष्काळ घोषित करण्याचा अंतिम अधिकार हा राज्य शासनाचा असून, संबंधित विभागांकडून अंतिम अहवाल प्राप्त झाल्यावरच अधिकृत यादी प्रसिद्ध केली जाईल.

 

जिल्ह्याधिकाऱ्यांनी सर्व नागरिक व माध्यम प्रतिनिधींनी कोणत्याही अप्रमाणित बातमीवर अथवा माहितीवर विश्वास ठेवू नये, अधिकृत घोषणा होईपर्यंत संयम ठेवावा, माहितीची सत्यता केवळ शासनाच्या अधिकृत माध्यमांवरूनच पडताळून पहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

अल निनो व दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक मदत पुरवण्यासाठी विशेष पावले उचलली आहेत. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालय आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय स्तरावर 'शेतकरी मदत कक्ष' तातडीने स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी क्षेत्रिय यंत्रणेला दिले आहेत.

00000

'आपले सरकार सेवा केंद्र' वाटपासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

 

अमरावती, दि. 21 (जिमाका): अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागासाठी एकूण ६५५ जागांवर 'आपले सरकार सेवा केंद्र' वाटपाची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे.

 

त्यानुसार शहरी व ग्रामीण भागात एकूण ६५५ जागा उपलब्ध आहेत. अर्ज प्रक्रिया दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेपासून सुरू झाली आहे. इच्छुकांना asskamravati.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची अंतिम मुदत ही दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत असणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत केवळ ऑनलाईन पद्धतीनेच दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज सादर करायचे आहेत.

 

याबाबत अधिक माहिती आणि  मदतीसाठी उमेदवारांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000

सोमवारी 'माहिती अधिकार दिन' साजरा करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 21 (जिमाका) : नागरिकांमध्ये माहितीच्या अधिकाराबाबत जनजागृती व्हावी आणि ही प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक व्हावी, यासाठी सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी 'माहिती अधिकार दिन' साजरा करण्याचे आवाहन राज्य माहिती आयोग, अमरावती खंडपीठाने दिले आहेत.

 

माहिती अधिकार दिनानिमित्त माहिती अधिकार कायद्याच्या (कलम २६) अनुषंगाने सर्वसामान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांमध्ये या कायद्याबाबत साक्षरता निर्माण करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयांसोबतच शाळा आणि महाविद्यालयांमध्येही विद्यार्थ्यांसाठी माहिती अधिकार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात यावे. कायद्याच्या कलम ४ नुसार प्रत्येक कार्यालयात जन माहिती अधिकारी आणि प्रथम अपील अधिकारी यांचे नाव व पदनाम दर्शवणारे फलक लावणे आणि ते वेळेवर अद्यावत ठेवणे बंधनकारक केले आहे.

 

तसेच नागरिकांना अर्ज करणे सोपे जावे म्हणून मार्गदर्शक सूचना कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात याव्यात, तसेच अर्जावर भ्रमणध्वनी व ई-मेल आयडी नमूद करण्याची कार्यवाही करण्याचे आवाहन राज्य माहिती आयुक्त कार्यालयाने केले आहे.

00000



विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे

मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

 

अमरावती, दि. 21 (जिमाका) : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत अयोध्या कॉलनीतील नवमित्र गणेशोत्सव मंडळ येथे रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.

 

या आरोग्य शिबिरामध्ये कर्करोग, हृदयरोग, मेंदूचे आजार, लघवीशी संबंधित विकार, मूत्रपिंडाचे आजार, किडनी प्रत्यारोपण, बालरोग, प्लास्टिक सर्जरी, तसेच कान, नाक व घसा, कॉक्लीअरशी संबंधित ५५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी ५ रुग्णांना पुढील उपचारासाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात संदर्भित करण्यात आले.

 

या आरोग्य शिबिरात रुग्णांच्या तपासणीसाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय चमू उपस्थित होती. यात वैद्यकीय समन्वयक डॉ. पायल रोकडे), वैद्यकीय शिबिर समन्वयक भूपेंद्र जेवडे, अधिपरिचारक अभिजीत करवाडे आणि लोचनसिंग गौबंसे यांनी योगदान दिले.

 

सदर शिबिर विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. तसेच नवमित्र गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आशय रोकडे, निखिल ठाकरे, अभिषेक बोळे, सागर काकडे, गौरव केंडे, गिरीष धर्माळे, रोशन नवरे शिबिरास उपस्थित होते.

00000

जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांना 'अलर्ट'

पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास थेट फौजदारी गुन्हा

 

अमरावती, दि. 21 (जिमाका): जिल्ह्यासह निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आशिष येरेकर यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत परिपत्रक जारी करून पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास थेट फौजदारी गुन्हा करण्याचा इशारा दिला आहे.

 

या परिपत्रकानुसार, दुष्काळी परिस्थिती अत्यंत संवेदनशील असल्याने महसूल, कृषी, ग्रामविकास, नगरविकास, भूमी अभिलेख, महावितरण, पशुसंवर्धन, जलसंपदा व जलसंधारण या विभागांतील सर्व जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

 

सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पूर्णवेळ मुख्यालयी हजर राहून दुष्काळ निवारण, पीक पाहणी, कर्ज पुनर्गठन आणि शेतकरी मदतीची कामे सर्वोच्च प्राधान्याने पार पाडणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच वैद्यकीय आणीबाणी वगळता इतर कोणत्याही प्रकारच्या रजेसाठी केवळ जिल्हाधिकाऱ्यांचीच पूर्वपरवानगी आवश्यक राहील. मूळ प्रशासकीय प्रमुखांकडून परस्पर रजा मंजूर करून अनुपस्थित राहता येणार नाही.

 

 

जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय रजेवर जाणाऱ्या किंवा गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर 'महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९' अंतर्गत तात्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल. तसेच, 'आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५' च्या कलम ५१, ५५ व ५६ अंतर्गत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

 

दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांच्या अडचणी संवेदनशीलतेने ऐकून घेऊन जागेवरच तातडीने निवारण करण्याचे स्पष्ट आदेश सर्व यंत्रणांना देण्यात आले आहे. या कामात कोणतीही कुचराई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

000000






‘लोकसंवाद उपक्रमात कठोरा गावकऱ्यांनी घेतली ‘जल व माती वाचविण्याची शपथ

 

रोजगार महाकुंभात सहभागी होण्याचा कठोऱ्याच्या युवकांचा संकल्प

 

अमरावती, दि. 21 (जिमाका) : ‘माती व पाणी वाचल्याने जगाचा पोशिंदा शेतकरी व त्याची शेती ‘वाचेल पर्यायाने माणूस वाचेल हे  मार्मिक उत्तर देणारे कठोरा बु. येथील चिमुकले शाळकरी दक्ष सोनोने आणि रुद्र मेश्राम हे येणाऱ्या पिढीचे संदेश वाहक ठरावे असे, चित्र ‘लोकसंवाद कार्यक्रमात दिसून आले. गावकऱ्यांनी घेतलेली मृद व जलसंधारणाची शपथ  आणि २९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात १५ ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार महाकुंभात सहभागी होण्याचा गावातील युवकांनी व्यक्त केलेला मनोदय म्हणजे ‘लोकसंवाद उपक्रमाचे महत्व अधोरेखित करून गेले.

 

                माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर सुरु असलेल्या सेवा संकल्पांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाने कठोरा बु. येथील भवानी गणेशोत्सव मंडळात रविवारी २० सप्टेंबर रोजी ‘लोकसंवाद उपक्रम राबविला.या उपक्रमात मृद व जलसंधारण विभाग कार्यकारी अभियंता कार्यालय तसेच जिल्हा कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता केंद्र सहभागी झाले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती अधिकारी रितेश भुयार यांनी राज्यभर व अमरावती जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद उपक्रमाची माहिती दिली व उभय विभागांच्या प्रतिनिधींकडून देण्यात आलेल्या माहितीपश्चात उपस्थित नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे संबंधितांकडून देण्यात समन्वय साधला.

    

            कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता केंद्राचे जिल्हा समन्वयक प्रथमेश सोहळे यांनी विभामार्फत दर तिसऱ्या आठवडयात राबविण्यात येत असलेला रोगार मेळावा आणि त्यात सहभागी होण्याची प्रक्रिया व युवकांना प्रत्यक्ष मिळत असलेला रोजगार आदींविषयी माहिती दिली. यावेळी उपस्थित युवकांकडून अभिषेक काळबांडे यांनी प्रातिनिधीक प्रश्न विचारले व त्यांची समाधानकारक उत्तरे देण्यात आली. येत्या २९ सप्टेंबर रोजी राज्यभर ५०० ठिकाणी आणि अमरातवी जिल्ह्यात तालुका मुख्यालयांसह १५ ठिकाणी आयोजित होणाऱ्या ‘रोजगार महाकुंभाची माहिती देण्यात आली.या मेळाव्यात सहभागी होण्याचा संकल्प उपस्थित युवकांनी केला.

 

               मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने कनिष्ठ अभियंता आमोघ मेश्राम यांनी विभागाद्वारे ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली व उपस्थितांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.

 

            ‘मातीची धूप थांबवण्यासाठी आणि पाण्याचा थेंबन् थेंब जोपासण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन.’  अशी मृद व जलसंधारणाची शपथ यावेळी  जयभवानी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तेजस काळबांडे यांनी उपस्थित नागरीक व युवकांना दिली. मंडळाचे उपाध्यक्ष रोहित सोनोने, सचिव सार्थक  खोडे, सदस्य ओम सोनोने आणि पंचायत समितीच्या माजी सदस्य मिनाताई काळबांडे,उद्योजक अरुण काळबांडे यांच्यासह नागरीक,युवक व शाळकरी यावेळी उपस्थित होते. माहिती व जनसंपर्क विभागाद्वारे राज्यभर जिल्हा माहिती कार्यालयांच्या माध्यमातून १६ ते २४ ऑक्टोबर दरम्यान लोकसंवाद उपक्रम राबविण्यात येत आहे.                                              

०००००





'जनसंवाद' कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी स्वीकारली 1 हजारावर निवेदने

 

आस्थेने चौकशी करून विविध प्रश्न वेळेत मार्गी लावण्याचे दिले आश्वासन

 

अमरावती, दि. 21 (जिमाका): शेती व अन्य कामांसाठी  रेती, माती वाहून नेणाऱ्या  शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची अडवणूक करू नये, जिल्हा प्रशासनातील सर्व कार्यालयांनी आठवड्यात दुपारी 3-5 दरम्यान वेळ निश्चित करून अभ्यागतांना भेटा व त्यांचे प्रश्न सोडवा अशा सूचना देत पत्रकारांना निवासासाठी एकाच ठिकाणी जागा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन देत महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात जवळपास 1 हजारांहून अधिक निवेदन स्वीकारली.

 

             नियोजन भवनात पालकमंत्री श्री. बावनकुळे यांचा जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तरुण, तरुणी पासून महिला, पुरुष, वरिष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींनी यावेळी श्री. बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन सोपविले. या सर्व नागरिकांची त्यांनी आस्थेने चौकशी करून संबंधित विभागाकडून वेळेत अडचणी दूर करण्याचा विश्वास दिला.

 

               जमीन मोजणी, जमिनीचा ताबा मिळूनही मालकी हक्क मिळालेला नाही, मुख्य रस्त्या शेजारील नाले दुरुस्ती, योजनेचा लाभ अशा विविध विषयांवर यावेळी निवेदने देण्यात आली. ही सर्व निवेदनने संबंधित विभागाकडून तातडीने निकाली काढणार असल्याचा विश्वास पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी दिला.

 

              बैठकीला येत असताना नियोजन भवना समोर उपस्थित दिव्यांग व्यक्तींची आस्थेने चौकशी करून त्यांचे प्रश्न समजून घेत अडचणी दूर करण्याचा विश्वास दिला.

 

            जनसंवाद कार्यक्रमाला आमदार सर्वश्री प्रवीण तायडे, केवलराम काळे, राजेश वानखडे, प्रतापदादा अडसड, प्रवीण पोटे, उमेश यावलकर, विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक निकेतन कदम, मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले आदी उपस्थित होते.

००००००





जिल्ह्यातील शेतकरी  कर्जमुक्तीचे उद्दिष्ट्य पूर्ण करून शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज द्या - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

कर्जमुक्तीसाठी पात्र शेतकऱ्यांची केवायसी महिनाभरात पूर्ण करा

 

शेतकरी व नागरिकांना विनाखंड वीज उपलब्ध करून देण्याच्या दिल्या सूचना

 

अमरावती, दि. 21 ( जिमाका) : जिल्ह्यात दोन टप्प्यात 86 हजार 447 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती जाहीर झाली आहे. त्यातील मयत व अन्य कारणांमुळे केवायसी राहिलेल्या जवळपास 18 हजार शेतकऱ्यांची एक महिन्यात केवायसी पूर्ण करावी. यासाठी स्थानिक आमदारांची मदत घेऊन याद्या तयार करा अशा सूचना करत  शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या सूचना आज महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यंत्रणांना दिल्या. तसेच, जिल्ह्यात शेती व सार्वजनिक उपयोगासाठी वीज अखंड उपलब्ध होण्याकरिता महावितरण कंपनीने तातडीने यंत्रणा सुधार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 

              नियोजन भवनात पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कर्ज माफी व पीक कर्ज संदर्भात अग्रणी बँकांची  आणि महावितरणची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने'अंतर्गत दोन टप्प्यात कर्जमाफी जाहीर झाली आहे. यासंदर्भात याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र यातील काही शेतकऱ्यांना मालक शेतकरी मयत झाल्याने  व अन्य तांत्रिक कारणांमुळे केवायसी झाली नसल्याने कर्जमाफी झाली नसल्याचा विषय तातडीने सोडविण्याच्या सूचना श्री. बावनकुळे यांनी यावेळी केल्या. यासाठी तातडीने जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ निहाय केवायसी मुळे लाभला मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करून तलाठ्यांच्या माध्यमातून त्यांना नोटीस देण्यात याव्या, स्थानिक आमदारांनी यात स्वतः लक्ष घालून हा विषय प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी समन्वय अनेक कार्य करून महिनाभरात निकाली काढण्याचे निर्देशांनी दिले.

 

            या कामात बँकांनी कुठल्याही पद्धतीने दिरंगाई किंवा कुचराई करता कामा नये. बँकांनी मयत शेतकऱ्यांचा  वारस लावून त्यास लाभ देणे गरजेचे आहे. त्याकरिता तहसीलदार यांच्याकडून देण्यात येणारे वारसदाराचे प्रमाणपत्र  प्रमाण मानून कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. कामात दिरंगाई केल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांवर गुन्हे दाखल करावे असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

 

            जिल्ह्यात शेती व सार्वजनिक उपयोगात येणारी वीज सतत खंडित होत असल्याच्या तक्रारी पाहता उचित यंत्रणा राबवून ग्राहकांना अखंडित वीस पुरवठा करण्याचे निर्देश श्री. बावनकुळे यांनी महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. ज्या ठिकाणी विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) उभारण्याची गरज आहे तेथे ती उभारावी व त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

 

            यावर्षी पाऊस कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात यावे, त्यासाठी मालगुजारी काळातील गावोगावी बांधण्यात आलेल्या विहिरी पुनर्जीवित कराव्या अशा सूचना त्यांनी दिल्या. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी या संदर्भात आपल्या परिक्षेत्रातील यादी तयार करावी, सिमेंट रस्त्यांची कामे घेऊ नये, जिल्ह्यात जमिनीतील जलस्तर 200 फुटांनी वाढविण्यासाठी सर्व सर्वांनी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी दूरदृष्टी प्रणालीद्वारे उपस्थित असलेल्या सर्व तहसीलदारांशी त्या-त्या भागातील प्रश्नांबाबत त्यांनी माहिती जाणून घ्या सूचना दिल्या.

 

             नशा मुक्त अभियानांतर्गत अमरावती ग्रामीण पोलिसांच्या वतीने तयार केलेल्या डॉक्युमेंटरीच्या यावेळी श्री. बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

    

            या आढावा बैठकीस खासदार बळवंत वानखडे, आमदार सर्व श्री. प्रवीण तायडे, केवलराम काळे, राजेश वानखडे, प्रतापदादा अडसड, प्रवीण पोटे, संजय खोडके, सुलभा खोडके, उमेश यावलकर, विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक निकेतन कदम, मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले आदी उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment

रुख्मिणी गणेशोत्सव मंडळात ‘आरोग्य शिबिर’ आणि लोकसंवाद उपक्रमाचे आयोजन

  सायन्सकोर मैदान येथील रुख्मिणी गणेशोत्सव मंडळात ‘आरोग्य शिबिर' आणि ‘लोकसंवाद’ कार्यक्रम          अमरावती, दि. 22 (जिमाका) : मुख्...