क्रीडा विभागाच्या
योजनांचा लाभ घ्यावा – उपजिल्हाधिकारी दुर्गा देवरे
श्री बजरंग गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’
अमरावती, दि. 24 (जिमाका) : घरातच क्रीडा
विषयक वातावरण व त्यातून सुरु झालेला प्रवास, पुढे विविध स्पर्धांमधील यश ते उपजिल्हाधिकारी
पदाची जबाबदारी असा प्रेरणादायी प्रवास उलगडतांना उपजिल्हाधिकारी दुर्गा देवरे यांनी
क्रीडा क्षेत्रात कार्यरत सर्व घटकांनी क्रीडा विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे
आवाहन येथील पटवीपुरा स्थित श्री बजरंग गणेशोत्सव मंडळात आयोजित लोकसंवाद कार्यक्रमात
केले.
खेलो इंडिया, टार्गेट ऑलिम्पिक पोडियम,
व्यायामशाळा विकास योजना, क्रीडांगण विकास योजना, खेळाडूंकरिता गौरव व प्रोत्साहन व
बक्षिसे, शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदान आदी महत्वाच्या केंद्र व राज्य शासनाच्या
क्रीडा विभागाच्या योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे गेल्या दशकात क्रीडा क्षेत्राच्या
विकासाला गती मिळाली आहे. या योजनांचा लाभ क्रीडा क्षेत्रातील घटकांनी घ्यावा असे श्रीमती
देवरे म्हणाल्या.
माहिती व जनसंपर्क विभाग गणेशोत्सवा दरम्यान
राज्यभर शासकीय योजनांच्या माहितीवर आधारीत ‘लोकसंवाद’ हा संवादात्मक कार्यक्रम राबवित
आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाने गुरुवारी श्री बजरंग गणेशोत्सव
मंडळात लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने यावेळी
क्रीडा व युवक संचालनालय तसेच क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रदर्शनी
लावली व नागरीकांना माहिती दिली. श्री. बजरंग गणेशोत्सव मंडळात दर्शनाकरिता आलेल्या
उपजिल्हाधिकारी श्रीमती देवरे या स्वत: उत्तम खेडाळू असल्याने त्यांनी लोकसंवाद कार्यक्रमात
सहभाग घेवून उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या देदिप्यमान
प्रवासाबद्दल ऐकूण उपस्थितांनी त्यांना क्रीडा कारकिर्दी विषयी व शासकीय योजनांचा त्यांना
क्रीडापटू म्हणून झालेला फायदा याविषयी प्रश्न विचारले व त्यांनीही या प्रश्नांची खुमासदार
उत्तरे दिली. केंद्र व राज्य शासनाच्या क्रीडा विभागांकडून एकाहून एक सरस योजना राबविण्यात
येत आहेत त्याचा लाभ या क्षेत्रातील घटकांनी घ्यावा असे त्यांनी सांगितले. विदर्भ केसरी
प्रा. संजय तिरथकर यांनीही या लोकसंवादात सहभाग घेवून कुस्तीपटू म्हणून त्यांचा प्रवास
उलगडला.
या संवादात सहभागी होवून अमृता व टिना सुगंधी या मायलेकींनी क्रीडा
क्षेत्रात मुलींच्या योगदानावर भाष्य केले. टेनी क्वॉईट क्रीडा प्रकारात जिल्हा व राज्य
स्तरावर उत्तम कामगिरीचा अनुभव यावेळी टिना सुगंधी यांनी मांडला. बाबुलाल मामर्डे या
ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या काळातील खेळ व त्याने शरीरयष्टी सुधारण्यात होणारा लाभ
सांगतांना शंकरपटाच्या आठवणींना उजाडा दिला.
तत्पूर्वी, जिल्हा माहिती कार्यालयाचे
माहिती अधिकारी रितेश भुयार यांनी लोकसंवाद उपक्रमाविषयी प्रास्ताविकात माहिती दिली
व संपूर्ण कार्यक्रमांचे संयोजन केले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालाचे क्रीडा अधिकारी
संतोष विघ्ने आणि तालुका क्रीडा अधिकारी अनिल इंगळे यांनी क्रीडा विभागामार्फत राबविण्यात
येणाऱ्या क्रीडा पुरस्कार व युवा पुरस्कार योजना, राज्य व राष्ट्रीय युवा आदान प्रदान
कार्यक्रम, राज्य युवा विकास निधी आदींबाबत माहिती दिली. श्री बजरंग गणेशोत्सव मंडळाचे
अध्यक्ष डॉ.राजेश जवादे, संयोजक गजानन परिहार, प्रसिद्धी प्रमुख संजय मापले आणि पदाधिकारी
यावेळी उपस्थित होते.
00000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment